Friday, 12 July 2013

सत्य

                                                                        सत्य

(१)सत्य हे एक तत्व आहे, मूल्य नव्हे. पण ते श्रेष्ठतम जीवनमूल्य असू शकते. कारण सत्याचा पाया तर्कशास्त्रात आहे. म्हणून सत्य हे बौध्दिकमूल्य आहे. सत्यं, शिवम् सुंदरम्ही जीवनतत्वे आहेत. सत्य हे शिवाचे कवच असून सर्व विश्वात्मकतेचे विश्रांतिस्थान आहे.

(२)कांहीजण ऋत म्हणजेच सत्य असे मानतात. पण ऋत हा नियम आहे.  विश्वाचे नियमन करणारा. त्यामुळे ऋतच्या विपरित, विरुध्द अर्थाचा शब्द, संकल्पना अस्तित्वात नाही. सत्याच्या विरुध्द मात्र असत्य आहे.

विश्वाच्या संचलनाचे, व्यवस्थापनेचे, ऋतुचक्रांचे नियमन, ग्रहता-यांचे परिभ्रमण . असंख्य निसर्गाचे नियम म्हणजेचऋतहोय.

सत्याची प्रचिती, ओळख, परिसीमा अवकाश हे ऋतचे आविष्करण आहेम्हणूनच सत्य स्वाभाविक आहे त्याचे परिशीलन ऋत होय.

आपले जीवन ही सत्यदर्शनाची सत्यशोधनाची एक प्रयोगशाळा आहे, असं मला नेहमी वाटत आलं आहे.कारण सत्याचे दिग्दर्शन आपल्या जगण्याच्याच प्रत्येक कृतीतूनच नव्हे तर त्यामागील मनोभूमिकेतून, वृत्तीतून आणि विचारांतूनच होत असते, असं मला वाटतं.

          मन शुध्द, तर विचार शुध्द;

          विचार शुध्द, तर भावना शुध्द;

          भावना शुध्द, तरच आचार शुध्द.

गणपती अथर्वशीषातील,

          ऋतं वच्मी, सत्यम् वच्मी.

किंवा      सत्यं ब्रुयात्, प्रियं ब्रुयात्.

ह्या वचनांचा अर्थ: सत्य हे निसर्ग-नियमांसारखं असते, त्यामुळेच ते श्रेयस आहेच पण प्रेयसही आहे.

ऋत म्हणजे केवळ सत्य नव्हे तर ते असे तत्व आहे की जे विश्वाचे नियमन करते.वेदांनी सत्य कसे आहे, तर ते ऋत आहेच पण प्रेयस श्रेयसही आहे, असं म्हणलं आहे.

सत्यमेव जयतेहे मांडुक्य उपनिषदांनी गायलेलं त्रिकालाबाधित सत्य आहे.

तसेच, सत्य हे केवळ बोलण्यासाठी नसून ते सदाचाराचे सात्विक आविष्करण आहे.अशी ही शृंखला मला माझी ओळख पटविण्याकरिता सदैव मार्गदर्शक राहिली आहे.     

(३) जीवनातील सनातन सत्य एकच, ते म्हणजे मृत्यू. हे सत्य इतके निखळ, स्वच्छ आहे की मला असं वाटतं की मृत्यूपासून मी जितका दूर आहे, तितकं सत्य माझ्यापासून दूर आहे. हे जग, मी, माझेपणात हरवलेलं माझं अस्तित्व…....सारं सारं अशाश्वत आहे. पण मृत्यू ज्यापासून मला वेगळं करु शकत नाही, तो आहे आत्मा, जो शाश्वत, निरंतर, निराकार, चिरंतन आहे. उत्पत्ती, स्थिती आणि विलय ह्यांच्याही पलीकडे आहे. सर्वांना व्यापूनही तो अविभाज्य, अक्षय आहे. ह्याच्या प्रकाशात अवघे ब्रम्हांड सदैव चैतन्यमय, प्रकाशमय राहते.

(४) माझी सत्य स्वीकारण्याची क्षमता चांगली आहे, पण सत्याला भिडण्याची, सत्याला उघड करून देण्याची घेण्याची क्षमता मात्र अत्यंत स्वल्प आहे. म्हणूनच माझ्या क्षमतेप्रमाणेच मी सत्याकरिता झगडलो आहे, पण अपयशच पदरी घेऊन आहे. सत्याला यशस्वी करण्याची क्षमता माझ्यात नाहीयेय, त्यासाठी आवश्यक असलेला आक्रमकपणा, परिणामांची आणि जीवनाच्या सर्वंकष परिमाणांची कमरता, न्यूनता माझ्यात आहे. माझी प्रकृती, वृत्ती, स्वभाव आणि मनाची ठेवण त्यागात, परंपरेत, वास्तवाच्या जाणीवेत जगणारी, समजूतदारपणे जबाबदारी स्वीकारणारी, कुटुंब, समाज माणूसकीला अधिक जपणारी अशी आहे. मी स्वत:पेक्षा कुटुंब, समाज आणि एकूणच माणूसकीला श्रेष्ठ मानतो. ह्याच परिमाणांमध्ये मी सत्याला मान देत आलो आहे त्याच्याशी तडजोड करुनच जगत आलो आहे. जे सत्य मला रुचत नाही म्हणण्यापेक्षा, जे सत्य मला माझ्या भौतिक अस्मितेच्या आणि जाणीवेच्या पलीकडे नेणारं आहे, ते पचविण्याची क्षमता माझ्याकडे नाही. कारण मी तत्व म्हणूनसत्यासाठी सत्यहे मान्य केले तरी मी ते माझे स्वत्व म्हणून स्वीकारलेलं नाही. सत्यासाठी स्वत:लाझोकून देणं“ “प्राणांची आहुती देणंह्या गोष्टी मला आदर्शवाद म्हणून कितीही आकर्षक, प्रभावी आणि श्रेय प्रेय असल्या तरी मी मात्र माझ्या जीवनात त्याप्रमाणे जगलेलो नाही. माझा प्रयत्न जीवनाशी सत्याकरिता तडजोडी करण्यातच गेला. माझ्या जगण्याचं सूत्रजगण्यासाठी सत्य, जगण्याच्या सामान्यत्वासाठी सत्यअसं आहे तेच मी कसोशीनं पाळत आणि सांभाळत आलो आहे. कारण मी अत्यंत सामान्य आहे. सत्य हे असिधाराव्रत आहे, माझ्याच नव्हे तर विश्वाच्या, समस्त जीवांच्या सनातन अस्तित्वाच्याही पलीकडे जाणारे आविष्करण आहे. गांधी, स्वा सावरकर, सानेगुरुजी, सुनीताबाई देशपांडे, दुर्गाबाई, बाबा आमटे ह्या इतर अनेक असामान्य विभूती सत्यवादीच नव्हे तर सत्यावर अधिकार असणा-या आहेत, असं मला वाटतं. बाकी सर्व माझ्यासारखे सत्याला भिणारे पण सत्याशी तडजोड करत जगणारे!

(५)नोबेल पुरस्कार विजेत्या श्रीमती झिम्बोस्का ह्या कवयित्रीने असं म्हणंल आहे की मानवी जीवनाच्या अंतापासून ते आरंभापर्यंत मी, पोलंड हा माझा देश, म्हणून जगले. माझ्या जाणीवाचा आरंभ युध्द-यादवी, राजकीय उलथा-पालथी मानवी संहार पहात झाला; जिथे अंत पाहिला, तो माझा आरंभ होता. ह्या संहारात एकीकडे पडत असलेल्या आहुती पाहत असतानाच मी सृजनांचा आविष्कार, आक्रोश, जन्म, धडपडत जगण्याच्या सनातन परंपरा पाहिल्या आणि सजगपणाने, सहानुभूतीच्या जाणीवांचा विस्तार   कारुण्यमय अवस्था अनुभवल्या. त्यांनी पुढे असं म्हणलं आहे की सत्याची कठोरता, क्रुरपणा, भीषणता, विषण्णता, भीषणता, अगतिकता ह्यातूनच मला माझी ओळख झाली.

(६)उपनिषदांनी वेदांनी सत्य हे मृत्यूतच नव्हे तर त्याच्याही पलीकडील वास्तव आहे, असं म्हणलं आहे. जन्म मृत्यू ह्यांच्या दरम्यान जे दिसतं, अनुभवाला येतं किंबहुना आपल्या जाणीवेच्या कक्षेत येतं, ते सत्य नसून तो सत्याचा आभास आहे. आदि शंकराचार्यांचे सुप्रसिध्द वचनजगन् मिथ्याह्याचे दिग्दर्शन श्रीमती झिम्बोस्कांच्या काव्यात साकार झाले आहे. त्या म्हणतात,“आजच्या गोंगाट-गोंधळाच्या काळात मी कवी आहे, हे ओळखणंदेखील कठीण झालं आहे. माझ्यातला कवी कुठेतरी आत खोलवर दडलेला असतो आणि त्याच्यावर खुद्द माझादेखील विश्वास नसतो.“ कारण कवी, काव्य सत्यालाच नव्हे तर अवघ्या विश्वाला, त्याच्या सर्व अंगप्रत्यंगांसह आपल्या कवेत घेण्याची चेष्टा करत असतो.

(७)स्वत:विषयी असणा-या अनेक गैरसमजांमध्ये एक मोठ्ठा गैरसमज,
बहुसंख्य लोकांमध्येच कशाला, आपल्यातच असतो, तो म्हणजे,“माझ्यावर कुणाचे प्रेम नाही“, “माझ्याबद्दल कुणाला आदर नाही“, “सगळे मेले स्वार्थी, लंपट, कपटी…..”,“माझं कुणी एैकत नाहीह्या आणि अशा अनेक तक्रारी, दुखे: वेदना-समस्यांनी आपण निराश, वैफल्यग्रस्त असतो. ह्याचं मूळ आपल्यातच आहे, हे आपल्याला समजत नाही.कारण ह्या सर्वाचे मूळ, त्यांची कारण-परंपरा, आपण इतरांमध्ये, दुस-यांमध्ये आहे, हे निश्चित करून असतो. पण हे असं नसतं, हे सत्य जितक्या लवकर आपल्याला पचविता येईल, तितक्या लवकर आपल्याला अंतिम सत्याच्या जवळ जाण्याच्या पायवाटा दिसू लागतील. चिंतन, मनन, आत्मशोधन, आत्मबोधन-संशोधन करण्याची आपली मानसिक, बौध्दिक, सामाजिक आणि आधिभौतिक तयारी होऊ लागते.

     भगवान पतंजलींनी एका सूत्रात म्हणले आहे-

कायेन्द्रियसिध्दिरशुध्दिक्षयात्तपस:“ (साधनपाद-४३)

चित्ताच्या शुध्दिकरीता आवश्यक आहे, स्वत:विषयी इतरांबद्दल, इतरेजनांबाबत सहानुभूतीने, मायेने करूणेने विचार करणे.

बुध्दीसामर्थ्याच्या जोरावर सर्व भौतिक उत्तरे शोधता येतात, परंतु स्वत:बद्दलच्या समस्या, प्रमेयं सोडविता येत नाहीत.

()काळजी करणे हा मानवाचाच नव्हे तर सर्व सजीव-र्निजीवांचा जगण्याचा धर्म आहे. कारण प्रत्येकाला काळाच्या परिमाणात जगावे लागते.म्हणून काळ जे आपल्याला घ्यायला लावतो, ती म्हणजे काळजी होय. त्यामुळे काळ ह्या परिमाणापलिकडे जो जातो, तो खरा परमेश्वराचा होऊन जातो.हे सत्य ज्याला अंगीकारता येतं, तो खरा संत-सद्गुरु-योगी.

() सद्विचार सत्य असतात. आणि हे सत्य ऋत असते, म्हणूनच ते अशाश्वत असते वैश्विक असते.अशी सत्ये आचरणात आणणे, हा माझा आदर्शवाद आहे. पण ही सत्ये प्रत्यक्षात आणणे, माझ्या कुवतीच्या, धैर्याच्या, सहनशीलतेच्या बाहेर असतील ती योग्य काळाच्या संदर्भात, योग्य व्यक्तीमार्फतच यशस्वी होत असतात, हे मला समजले तर मी अशा सत्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मी हुतात्मा होण्यास पात्र नाही, हे सुध्दा सत्य मी समजावून घेतलं आहे.

उदा.() व्यवस्था ही घराची शोभा आहे.

() संतुष्ट स्त्री ही घराची लक्षमी आहे.

() समाधान हेच घराचे खरं सुख आहे.

() आतिथ्य हे घराचं वैभव आहे.

() धार्मिकता हे घराचे वळण आहे.

ही सत्ये ऋत आहेत. पण ती माझी आदर्श असली तरी माझ्या घरात ह्या आदर्शांना फारसा वाव नाही; फारशी जागा नाही.कारण मी माझे घर, माझी माणसं ह्या सर्वांना मी घडविलेलं नाही.प्रत्येकाचं सदभाग्य, यश त्याच्या नियतीच्या परिमाणात अवकाशातच सिध्द होत असतं. “प्रयत्नांती परमेश्वरहे वचनही ऋत सत्य आहे, पण स्वसंवेध्य नाही.हे सत्य नियतीच्या सुयोग्य चौकटीतच सिध्द होऊ शकते, म्हणून ते गणरायाप्रमाणे स्वसंवेध्य नाही. 

(10) जगामध्ये सत्य आणि असत्य असं काही असत का? तसं पाहिलं तर जगामध्ये सत्याला सत्य म्हणून सिद्ध होण्यासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही. कारण सत्य हे स्वसंवेध्य असत. पण असत्याला मात्र सत्य म्हणून सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. कारण मुळातच सर्व जे काही आहे ते सत्यच आहे! असत्य सुद्धा सत्य आहे! सत्य आणि असत्य हा मानवी दृष्टीचा, मानवी    दृष्टिकोनाचा अविष्कार आणि आविष्कारही आहे.                                                

ज्याला मी सत्य म्हणतो ते माझ्यापुरते सत्य असते. त्याचप्रमाणे, ज्याला जग असत्य म्हणत, ते माझ्या दृष्टीत असत्य असेलच असं नाही. ह्याच कारण द्वंद्व....हे विश्व द्वंद्वात्मक आहे. स्त्री-पुरुष ह्या द्वन्द्वासह सर्व वस्तू, प्राणीमात्र, सर्व तत्वेसुद्धा द्वंद्वात्मक आहेत. सुख-दु:खांपासून ते श्रीमंती-गरिबी आणि अस्तित्व-अनास्तित्व ह्या सर्व गोष्टी द्वंद्वात्मक आहेत.


          विज्ञान ह्यालाच Bipolarity म्हणते. न्युटननी आणि इतर अनेक वैज्ञानिकांनी द्वंद्वात्मक रचनेचा सूक्ष्म अभ्यास केला; संशोधन करून असत्याला, अनास्तित्वाला सत्यात, अस्तित्वात प्रस्थापित केलं आणि तसं करताना त्यांनी विश्वातील सूक्ष्म तत्व, निसर्गाचं सूक्ष्मरूप स्थूलात आणल. म्हणजे असं की न्यूटनने  गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत, गतीचे नियम, द्विधृवता (Bipolarity) इ. शोध लावताना जे सूक्ष्मात होते; जे अस्तित्वात होते, त्याचंच नियमबद्ध, वस्तुनिष्ठ आविष्करण केले व त्यातूनच असंख्य तत्वांची व शोधांची निर्मिती झाली.


          विवेकानंदानी हीच वैज्ञानिकता अध्यात्म शास्त्राच्या माध्यमातून मांडली व Unity in diversity and Diversity in unity हे सिद्धांत मांडले. निसर्गात आणि निसर्ग निर्मित सर्व प्राणिमात्रांत जी वैविध्यता, वैचित्र्य आहे, त्यात सर्व- समावेशकता, एकरूपता आहे. There is diversity in all beings, from man-woman to mobile, radio, TV and so on but in all these there is unity ….all these arise, emanate from one common principle, uniqueness i.e. God, the nature and this is one singular principle of all Universality. म्हणजे असं की स्त्री-पुरुष हे वैविध्य एकाच स्त्रीच्या शरीरातून पण स्त्री-पुरुषाच्या मीलनातून घडून येते. Fertilization of egg in the womb of woman by sperm of man happens and this unity….ह्या एकात्मकतेतून स्त्री-पुरुष ही विविधता diversity जन्माला येते. स्त्री-पुरुष निर्मितीची प्रक्रिया एकात्म आहे, सूक्ष्म आहे पण त्यातून जी निर्मिती होते, ती मात्र स्थूल आहे. थोडक्यात, सूक्ष्मातून स्थूलात आणि स्थूलातून सूक्ष्मात अशी ही एक चिरंतन, निरंतर आणि निरामय-चिरामय अशी निसर्गाची प्रक्रिया अखंड, अव्याहतपणे चालू असते. प्रक्रिया सूक्ष्म आहे, पण परिणाम दृश्य म्हणजे स्थूल आहे. प्रक्रियेत unity एकात्मता आहे पण परिणाम मात्र diversity आहे. शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांताची वैदिक मांडणी ह्याच सूत्रावर आधारित अशी केली आहे.


(11) ज्याप्रमाणे, सत्य म्हणजे वास्तव नव्हे, त्याचप्रमाणे, वास्तव म्हणजे सत्य नव्हे, कारण सत्य म्हणजे परमेश्वर. वास्तवाला सत्य म्हणणारी माणस ह्या जगालाच सत्य मानतात. देव हा त्यांच्या बाबतीत कोणीतरी दुसरा, सुरापास्त, पूजा-अर्चा, पूजनीय किंवा अस्तित्वाच्या आणि दिसण्याच्या पलीकडचा असतो. अशी माणस देवालाच अध्यात्म विषय मानून आपल्या जीवनातील देवाचे स्थान निश्चित करत असतात. त्यामुळे, देव आणि सत्य ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या दृष्टीने भिन्न असतात आणि अध्यात्म हा पलायनवाद असतो किंवा आपल्या भावनांचे उदात्तीकरण करण्याचा एक मार्ग असतो. दुसरे असं की त्यांच्या देवाबद्दलच्या संकल्पनाही स्थिर नसतात. आस्तिक असणे म्हणजे देव मानणे, ही त्यांची धारणा असते. म्हणून अशी माणस अत्यंत भिऊन, घाबरून आणि संकुचित असतात. आपल्यापेक्षा व आपल्या समाजापलीकडे काही असू शकत, ह्यावर त्यांचा विश्वास नसतो. केवळ देव हा त्यांच्या सर्व समस्यांवर उपाय नसतो.
          मी व माझा अनुभव असा आहे की देव हा आपल्या अंत:करणात असतो. परमेश्वर ही उपासना, साधना शक्ती आहे. सत्गुरू दीक्षित सर हे माझ्या ईश्वरी प्रेरणेचे मनुष्य रूप आहे. त्यामुळे मी म्हणजे कोण आहे? हा माझा सदैव चालणारा शोध आहे, ती एक माझी सतत जळणारी समई सारखी शांत, अखंड जळणारी व प्रकाश देणारी ज्योत आहे. तिच्या प्रकाशात मी सदैव राहावं, ही माझी धडपड आहे. मनाला ह्या ज्योतीत विलीन करावं, ही माझी उत्कट आकांक्षा आहे. अध्यात्म हा माझा ज्ञानमय, बोधमय आणि मला कृतार्थ करणारा, सत्गुरूप्रेरित असा माझा जीवनक्रम आहे. वास्तवाला भिडणार आणि सतत अनुभवला येणारं जग हा माझ्या प्रारब्धाचा, संचिताचा प्रवास आहे. मृत्यू हा माझ्या शरीराचा अंत असला तरी तो माझा अंत नाही. मी स्वत:ला ह्या देहापुरता सीमित मनात नाही. माझा देह व शरीर ह्या भिन्नत्वाने  जगण्याचा माझा प्रयत्न आहे, पण मी मात्र ह्या दोघांच्याही अलीकडे किंवा पलिकडे कुठे तरी असून सत्गुरू मला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत, मी त्यांनी दर्शविलेल्या मार्गावर चालण्याची धडपड करतो आहे.
          सत्य म्हणजे परमेश्वर पण त्याला भिडण्याची, त्याला माझ्या अवकाशात घेण्याची कुवत माझ्यात नाहीयेय. म्हणून सत्याला वास्तवात घेण्यासाठी मी प्रयत्न करतो. पण माझी लायकी व कुवत जेव्हढी आहे, मला जेव्हढे परवडते, तेव्हढेच सत्य मी वास्तवात जगत असतो.

(12) इम्युलय kant (१७२४-१८०४) ह्या जर्मन तत्ववेत्याने नितांत आवश्यकतावाद या सिद्धांताची मांडणी केली आहे. तदनुसार, असे दिसते की, सामुहिक न्याय तत्वापेक्षा वैयक्तिक न्यायतत्व श्रेष्ठ आहे.
          परंतु व्यापक सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्य व्यवस्थापन शास्त्रानुसार, सामुहिक न्यायतत्व श्रेष्ठ आहे. आणि सामुहिक न्यायतत्व व्यक्तीपेक्षा माणुसकी ह्या व्यापकतेला श्रेष्ठ मानते. त्यामुळे गुणात्मकता व नैतिकता ही न्यायतत्वे व्यक्तिगत व सामुहिक पातळीवर श्रेष्ठ्व कनिष्ठ अशा परस्पर विरोधी मूल्यांत विभागली जातात.
          सत्य हे मूल्य आहे.पण त्यालाही व्यक्ती आणि समाज संदर्भ वेगवेगळ्या स्तरांवर आहेत. सत्योपासना ही केवळ सत्याकरिता नसते कारण सत्य हे उपयुक्तता मूल्य आहे. म्हणूनच लोकशाहीच्या संदर्भात सत्य गुणात्मक असण्याचा आग्रह एक तत्व म्हणून मान्य केला तरी त्याची उपयुक्तता संख्येच्या जोरावरच टिकू शकते. त्यामुळे न्यायालये, न्यायव्यवस्था व न्याय-संकल्पना लोकप्रतिनिधीत्व लोकशाही व्यवस्थेशी विसंगत भूमिका घेऊ शकते. संसद आणि राज्यविधान सभा ह्याच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया होऊ शकतात व होत आहेत. सुप्रीम कोर्टाला म्हणूनच अरुंधती रॉय ह्या निवाड्यात म्हणावे लागले की Truth by itself is not a defence to justify what is not judicial. ह्याचा अर्थ असा की सत्य हे कायद्याच्या चौकटीत जसं असतं तसचं हवं. थोडक्यात काय की न्यायालयीन सत्य वेगळे असतं! त्याचप्रमाणे प्रशासकीय सत्यही वेगळे असते. प्रत्येक सत्याला सत्य म्हणून मान्य करण्यासाठी सबंधित संदर्भ आवश्यक असतो, त्याशिवाय सत्याला सत्य म्हणून काही अर्थ नसतो.
              सत्याची गुणात्मकता ही अशी एक पातळी आहे की जी व्यक्तीसंदर्भित असते. त्यामुळे गुणात्मक तत्वे व्यक्ती संदर्भात श्रेष्ठ असली तरी तीच तत्वे सामाजिक संदर्भात कनिष्ठ असतात. कारण व्यक्ती संदर्भातील न्याय जसा अखिल समाजाला लागू नसतो. त्याचप्रमाणे. सामाजिक संदर्भातील न्याय व्यक्तीला लागू असायलाच पाहिजे, असं नाही. कारण दोन्ही तत्वांचे न्यायिक संदर्भ महत्वाचे असतात. म्हणूनच व्यक्तीनिष्ठ सिद्धांत व समाजनिष्ठ सिद्धांत न्ह्यांचे मूल्यमापन करताना ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी लागते की व्यक्ती ही समाज संदर्भात गुणात्मक मूल्यधारक(quality) असते; तर समाज किंवा सामुहिक मुल्यधाराकता ही उपयुक्तता (quantity) संदर्भात मोजावयाची असते. उदा. खरे बोलणे म्हणजे सत्य हे न्याय तत्व असले तरी न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधून (अंधपण?)असते. त्यामुळे सत्य स्वयंप्रकाशित असूनही सत्याचा उजेड पडण्यासाठी ते सत्य न्यायिक मूल्यधारक असले पाहिजे! म्हणून असे म्हणतात की सत्याचे किंवा असत्याचेही विश्लेषण न्यायालयात केवळ तांत्रिकदृष्टीने होते. ह्याउलट, सत्याची नैतिकता सामुहिक उपयुक्तेच्या संदर्भात तपासली जाते. व्यक्ती संदर्भात सत्याचं किंवा असत्याचा अशा प्रकरणांमध्ये अपलापच होत असतो.
          फौजदारी न्याय हा म्हणूनच सामुहिक उपयुक्तताधारक असतो; तर दिवाणी किवा नागरी न्याय वैयक्तिक उपयुक्तताधारक असतो.
                 
                         ********************