रक्तसमाधी:
विचार-वाचन-व्याख्यानांनी होऊन वेडे आपण
खेडे शोधत गेलो;
आणि शेवट आलो धावत जेथे
आकाश निळे वरती;
आपण भूमीवरती;
हिरवळ आपुल्या भोवती;
आणिक देवीच्या राईतिल पक्षी कुजबुज करिती.
आतुरतेने संकल्प होऊन आलिस तू मग जवळी
आणिक त्या वेळी ! त्या अद्भुत काली !
अर्धोन्मीलित काळ्या डोळ्यांतुनिया
त्याहुन काळी उफाळली मग ज्वाळा;
गाल बोलले; नेत्र बोलले; ओठ बोलले; एकच ‘
माला...माला ‘
केस तुझे सुटलेले पाठीवरती;
उभारलेले स्तन टवटवते पुढती;
आणिक त्या उन्मादक
भरिव नितंबाच्या भवतीच्या नीटस रेषा मोहक;
नितंब गोरे, मृदुल, गोल नी
मांसल;
मस्त, पुष्ट, मादक
मांड्या थरथरती;
विवस्त्र झालेली तव कंबर माझ्या पुढती झुलती.
हृदयाशी घट्ट घेउनी आवळताना तुजला
देह जाहला घामाने ओला;
तीव्र, गूढ नि:श्वसने
गाउ लागली अनंत अपुरे गाणे;
मृत्युतुनही अमर लागले होऊ;
जीवाजिवांच्या तारा सा-या जुळल्या;
संगितलहरी उठल्या रुधिरामधुनी;
जुन्या काळची नव्या सुरातुन गाउ लागलो गाणी;
तुझ्यात गेलो, विरलो; आणिक
मेलो;
मजला पाजुन, तुजला गिळलो; प्यालो;
मीपण गेले; तूपण आले...आले.
जीवन संगित झाले, जीवन प्याले !
अव्यक्ताला व्यक्त करण्यासाठी
अद्वैतातच विरल्या सा-या गाठी;
विसरुनी गेलो अद्वैतातच मीपण,
स्वत्त्वाचे संरक्षण;
आणि त्या आत्यंतिक अद्भुत वेळी
दिक्कालाची बेडी भंगून गेली.
रक्तसमाधित दिव्य रवाने वदलो जेव्हा दोघे
तू- “ये...ये ...”, मी- “ घे....घे....”
रक्तसमाधी लागुन विरली माया;
रक्तातुनिया रक्त मिसळले जीवन पुढती न्याया !
- विंदा
एक काळ होता, जेव्हा ओशो “ संभोगातून समाधीकडे” ह्या विषयावर बोलले, तेव्हा त्यांच्यावर टीकेचे आसूड वगैरे ओढले गेले. ह्याच सुमारास
विंदा ‘ रक्त समाधी ‘ प्रसिद्ध करून
राहिले होते.
मराठी साहित्यात विशेषत: कथा, कादंबरी इ.... ह्यातून वैयक्तिक विचार करण्यास लावण्याच्या
स्वातंत्र्यावर समाजाने एक तर दुर्लक्ष करण्याची किंवा सहानुभूतीची भूमिका घेतली
आहे. आजही अश्लील नव्हे...किंबहुना अश्लील कशाला म्हणायचे, ह्यावर चर्चा, वादंग चालू आहेतच.
विंदांची ही कविता ह्या सा-या चर्चांना
कदाचित उत्तर ठरावे, इतकी धाडसी रचना आहे. ह्या रचनेला कविता
म्हणायचे तर समीक्षक किंवा आस्वादक म्हणून जे निकष मी लावीन ते इतर समीक्षक
लावतीलच, असं नाही. प्रश्न ही कविता आहे की नाही हा नसून ‘रक्त समाधी’ मध्ये मांडलेला विषय काय आहे, हे प्रथम समजून घेणे योग्य आहे.
विंदांच्या कवितेत तर्काधिष्ठता हा नेहमीच
वादग्रस्त प्रश्न राहिलेला आहे. ह्या कवितेत तर्काने काही जाणलेलं नाहीयेय.
प्रत्येक माणसामध्ये एक आत्मतत्व असतं. ते आदीम संस्कृती पासून संभोग हे राहिलेलं
आहे. म्हणूनच रक्तसमाधीची सुरुवात विचार-चिंतन-व्याख्यानांनी वेडे
झालेल्या आपण ने होते. मग निसर्गाच्या सान्निध्यात निळे आकाश, हिरवळ, पक्षांची कुजबुज आहे. ह्यातून विंदांनी एक
प्रतिमा निर्मिती साधली आहे. ‘ आपण भूमीवरती ‘ ह्या वास्तवाच्या संकल्प योजनेतून विंदा निसर्गाचे आणि भूमी म्हणजे
पृथ्वीचे नाते सूचित करीत आहेत. निसर्ग हा पुरुष आणि पृथ्वी ही स्त्री हा संकेत ते
करीत आहेत; आणि त्याचवेळी “आपण भूमीवरती” ह्या वास्तवाचे
भान राखून मनुष्य मात्र वेडा आहे, हे मार्मिकपणे
मांडत आहेत. आणखी एक शब्द आहे: ‘ देवीच्या राईतिल ‘ देवी देवळात असते. पण विंदांची देवी ज्या राईत म्हणजे राऊळीत म्हणजे
गावात आहे, तेथील पक्षी कुजबुज करून संकेत देत आहेत, पुढील कडव्यात येणा-या ‘ अद्भुत ‘ काळाचा म्हणजे घटिकेचा ! माला ही स्त्री आहे, तिच्या मागे लागलेला उन्माद...कसा आहे...विंदा म्हणतात, “ अर्धोन्मीलित काळ्या डोळ्यातून....” हा आहे काळा डोह म्हणजे
वासनेचा डंख आहे. तो तिला भेटतो. हे वर्णन म्हणजे विंदांचा शृंगार प्रगट करण्याचा
एक झपाटा आहे, झंझावात आहे.....त्या झपाट्याचा उत्तरार्ध मात्र
काहीसा शांत होताना तीव्र आहे पण गूढतेच्या नि:श्वसनात मग्न झाला आहे.
ह्या पुढील वर्णन संभोगा नंतर जी एक
अवस्था निर्माण होते, ती मांडताना विंदा भावूक होत नाहीत, माणसाच्या आत्मतत्वाच्या निष्ठा शोधू लागतात. म्हणून ते म्हणतात, “ मीपण गेले, तूपण आले...आले ”. ह्या तूपणाची “आले..आले” ही
प्रतिध्वनीत्व प्रतिमा “ माला...माला “ ह्या अभिव्यक्तीच्या टोकाशी आहे.....संकेत
हा आहे की पुरुष हा स्त्री मध्ये विरून जातो...ध्वनीच्या मागून प्रतिध्वनी विरून
जावा तसा.....हीच प्रतिमा विंदा तिस-यादा
वापरतात, : तू “ ये...ये “ आणि मी “ घे...घे “ ह्या
समारोपात. पुरुष स्त्री तत्वात विलीन होत असतो. शिवाची पिंड हे ह्या तत्वाचे
प्रतिक आहे. स्त्रीचे जननेन्द्रिय खोल आहे तर पुरुषाचे त्या सखोलपणात शिरून
स्वत:ला समर्पित करणारे इंद्रिय आहे.
द्वैत-अद्वैत किंवा व्यक्त-अव्यक्त ह्या
शब्दांच्या प्रतिमा अध्यात्मिक
असून संभोगाच्या अनुभवाशी समाधी हे नाते किती
सुसंगत आहे. हे स्पष्ट करण्याचा विंदांचा प्रयत्न आहे. “ दिक्कालाची बेडी भंगून
गेली.” आणि “ रक्तातुनिया रक्त
मिसळले जीवन पुढती न्याया “ हा अनुभव वास्तव पातळीवर
समजून घेता येतो. गर्भ निर्मितीचा क्षण हा पुरुष-स्त्री ह्याच्या रक्तमय
स्त्रावातून होत असतो. हे विज्ञान विंदा काव्यात्म पद्धतीने मांडतात.
ओशोंनी जो अध्यात्मिक सिद्धांत
मांडला आहे, तोच काव्यात्म पद्धतीने विंदांनी मांडला आहे.
संभोगातील पुरुष-स्त्री ह्यांचे सख्खलन ज्या अतिउच्च बिंदूला, climax ला , क्षणाला होते, त्या क्षणाला त्या दोघांच्या मीलनातून गर्भ निर्मितीची प्रक्रिया
सुरु होत असते. तो क्षण म्हणजे त्या गर्भाचा शून्य 0 काळ असतो. त्या 0 क्षणापासून
टप्प्याटप्प्याने जीव विकसित होऊन ९ महिन्यांनी जन्म पावतो. ही शून्यावस्था
म्हणजेच समाधी होय. हा जीव निर्मितीचा क्षण असतो. त्या जीवाची कालगणना त्या
क्षणापासून सुरु होते. आणि ही अवस्था ज्या दोघांच्या म्हणजे ज्या द्वैतातून घडते व
गर्भ किंवा जीव ह्या अद्वैतातून विराम पावते......त्या अवस्थेला वैज्ञानिक सत्याचे
अन्वेषण म्हणजे काव्यात्म न्याय विंदांनी ‘रक्तसमाधी’ ह्या रचनेद्वारा दिला आहे.
***************