निळा पक्षी
निळा पक्षी
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
प्रकाशाचे
पंख सान
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
बिम्बावरी;
पृथ्वीवरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
....अनंताचा
खड्डा खोल.
तर्काच्या या गोफणीने
फेकीतसे काही जड;
आणि पाने आघाताने
करतात तडफड;
टिकाळीला निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा अवघड.
याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही. मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.
याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
....चोचीमध्ये धरी चंद्र.
काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.
-विंदा.
विंदांच्या आणि
नारायण सुर्वेंच्या कवितांनी विद्रोही भाव -भावनांना अभिजात दर्जा दिला. तोपर्यंत
विद्रोह ही एक चळवळ मानण्या इतपतच कवितेकडे पाहिले जात होते. विंदांच्या कवितांचे
आगळेपण मराठी साहित्याने मुख्यत: नमूद करून घेतले आहे, ते त्यांच्या विसंगतीतून
सुसंगती शोधून सत्याच्या विविध अंगांची तपासणी करण्याच्या विंदांच्या मुलभूत
प्रवृत्तीमुळे. विंदा बुद्धिवादी आहेत, नास्तिकत्वाकडे
त्यांचा ओढ आहे. पण त्यांचा पिंड आत्म निष्ठेचा असल्यामुळे अध्यात्मिक तत्वज्ञान
त्यांच्या कवितेतून डोकावत राहते. आत्मतत्वाची तार्किक सुसंगती न सापडल्याने ते
व्यथित होतात.
निळा पक्षी मध्ये “ असली ही जात
न्यारी, बसे माझ्या निम्बावरी, पृथ्वीवरी | पृथ्वीमध्ये पाळे खोल, तरी
सुद्धा जाई तोल.....अनंताचा खोल खड्डा.” माझं निळा पक्षी हे त्यांच्या अतींद्रिय
अनुभवाचे प्रतिक आहे.....पृथ्वी हे आत्मविश्व आहे....ह्या विश्वात्म संवेदनेला
निळा पक्षी अनंताच्या खोल गाभा-यात विंदांना घेऊन जातो. तेव्हा त्यांना आढळते, गूढ
गर्भित विवर. इथे विंदांची विज्ञान निष्ठा निळ्या पक्ष्याला घेऊन जाते black hole ह्या संकल्पनेत. विंदांची प्रतिभा एकाच ठिकाणी
कधी स्थिर नसते. ते एकाच अनुभवाच्या परिप्रेक्षात साहित्याचे, विज्ञानाचे आणि त्यांच्या आत्म प्रज्ञेचे विविध संस्कार प्रगट करते.
निळा पक्षी हे खर तर एक प्रहसन आहे. “
तर्काच्या या गोफणीने फेकीतसे काही जड “ अशा आविर्भावाने मध्ये व्यक्त होते. मग विचारांची
आंदोलने आविष्कृत होतात, “ आणि पाने आघाताने करतात तडफड.” तरीही वास्तवाचे भान न सुटल्यामुळे “ ...उंच जागा, अवघड “ हे ही
त्यांना एका ‘टिकाळीला’ बसल्यावर कळते. पण तिथेही हा निळा पक्षी गातो... त्यांचे
गान “ अमृताची जणू सुई “ आणि “ पांघरूण
घेतो जाड, तरी टोचे.” पक्ष्याचे गाणे ऐकताना विंदांची प्रतिभा शांत नाही....त्या
गाण्यातील अमृताची गोडी त्यांना चाखता येत नसल्याने ते गाणे सुई सारखे टोचते. कान
बंद केले तरी टोचत राहते. ही विद्रोही कवीची व्यथा आहे. विंदा एकाच अनुभवात रमत
नाहीत, त्यांना वास्तवाची प्रखर जाणीव सतत अस्वस्थ करत
राहते. म्हणून ते म्हणतात, “ झोप नाही. जागविते मेलेल्याला; जाग्रुतांना
करी घाई. “ निळ्याचे गान कसे आहे...कवीचा थंड, गाढ झोपी गेलेला आत्मा जागविणारे
आहे आणि जागेपणात उठून उड्डाण करण्यास
प्रवृत्त करणारे आहे. कारण ह्याच्या गाण्यात सुरांचेही भान हरपते ! ह्याच्या
सुरांना मंद्र सप्तकाचा आधार नाही की तार सप्तकाची धार ! चोचीमध्ये चंद्र घेऊन
उडणारा हा आहे, विंदांचा आशावाद.
अखेरीस हा निळा पक्षी आहे तरी कोण ?
अतींद्रिय अनुभवांना कवेत घेऊन माणसाच्या जगण्याचा शोध घेणारा हा आहे विंदांचा
परमात्मा. आत्म निष्ठेच्या पंखांचे आधार घेऊन माणसाच्या अंतर्यामी परमात्म्याचा
शोध घेणारा विंदा हा एक महान प्रतिभावंत आहे.
************
No comments:
Post a Comment