Wednesday, 19 January 2022

सहानुभूती आणि सहसंवेदना

 अडम स्मिथ च्या The Theory of Moral sentiments ह्या ग्रंथाच्या पहिल्या भागात  सहानुभूती (sympathy) आणि सहसंवेदना (empathy) ह्या मानवी भावनांचे विस्तृत विश्लेषण आहे.

                सहानुभूती ही भावना स्वत:साठी दुसऱ्यांकडून अपेक्षित असते, तेव्हा आपली विचारांची पातळी खूप उथळ असते. कारण स्वत:साठी काहीही मागताना आपण नि:पक्षपाती नसतो. मुळात मी- पणा म्हणजे अहंकार हा जितका सूक्ष्म आहे, तितक्या प्रमाणात आपली सहानुभूतीची मागणी सखोल असते. पण सर्वसामान्यपणे, अहंकार दडविण्याचा किंवा झाकून ठेवण्याची आपली प्रवृत्ती असते. त्यामुळे,आपली विचारांची पातळी उथळ असते. अहंकाराची जाणीव सहसा होत नसते. कारण पुन्हा हेच की अहंकार सूक्ष्म आहे. दुसरे असे की आपण बहुसंख्य बाबतीत, अहंकाराला वेगवेगळ्या संकल्पना चिकटवून अहंकाराची जाणीव अज्ञानमूलक करत असतो. म्हणजे असं की आत्मकेंद्रित विचारसरणी किंवा स्वाभिमान, स्वानुभूति, तत्वाचा प्रश्न, अहंगंड, गर्व, उद्धटपणा, उर्मटपणा इत्यादी स्वभाव वैशिष्ट्यांमुळे आपल्याला सर्व अहंकाराच्या ह्या विविध रूपांची  जाणीवच होत नाही किंबहुना आपण आपल्या विचारांची इतकी सखोल चिकित्सा करत नाही. 

                    सहानुभूती स्वत:साठी जेव्हढ्या तीव्रतेने आपण मागतो, तेव्हढी तीव्रता दुसऱ्यांच्या बाबतीत किंवा दुसऱ्या करिता आपण बाळगत नाही. तरीही  जेव्हा स्वत: पलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या बद्दल आपल्याला सहानुभूती वाटू लागते, तेव्हा आपली मानसिकता काय असते? ह्याबद्दल अडम स्मिथ सखोल विश्लेषण करताना म्हणतात," The idea of utility of all this kind, is plainly an after thought". सहानुभूती हा पश्चात विचार आहे. दुसऱ्या बद्ल कळवळा, संवेदनशील असणे आणि मदत करण्याची इच्छा...ह्या गोष्टींचा विचार सहानुभूतीतून निर्माण होतो आणि मुख्यत: सदर भावना वैचारिक पातळीवर होत असते. प्रत्यक्ष काहीही कृती मात्र आपण लगेच करत नसतो. म्हणूनच सहानुभूती ही पश्चात बुद्धी आहे.....वैचारिक संभावना आहे. अडम स्मिथ म्हणतात, " the correspondance of sentiments with regard to such indifference.......concerns neither me nor my companion...." सहानुभूती मध्ये एक प्रकारचा दुरावा असतो. कारण मला स्वत:ला अशीच सहानुभूती इतरांकडून मिळत असते. 

                      सहानुभूतीचा हा पैलू महत्वाचा ह्या दृष्टीने आहे की ही  मी- पणाची मानवी भावना किती विशाल आहे आणि म्हणून सहानुभूतीचा पैंस किती संकुचित आहे, ह्याचे दिग्दर्शन होते. म्हणून असं म्हणतात की माणसाच्या सर्व भावनांचा परिपोष आणि विकास हा मी - पणाच्या सापेक्ष परिप्रेक्षातच होत असतो.

                       सहसंवेदना म्हणजे empathy ही भावना मात्र अत्यंत प्रगल्भ तर आहेच, पण मी- पणाच्या पलीकडे जाणारी मानवी संवेदनशीलता आहे. सहसंवेदना म्हणजे स्वत: च्या बाबतीत आपण जितके संवेदनशील असतो; तितकेच दुसऱ्याच्या बाबतीत असतो. म्हणून सहसंवेदना ही मानवी मनाच्या विकसनशील प्रभावाचे क्षेत्र आहे. सहसंवेदनेचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की ही भावना कृतीशील आहे. संवेदनशीलता ही केवळ मनाची अवस्था नसून ती मानवी संस्कृतीची व्यवस्था आहे. सद्भावनेच्या विविध आविष्कारातील सहसंवेदना आत्यंतिक विकास पावलेली मानवी मनाची सांस्कृतिक व्यवस्था आहे. पण ह्या भावनेला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. म्हणून सहसंवेदना मूळ सद्भावना असली तरी ती जेव्हा नकारात्मक अंगाने विकसित होते, तेव्हा तिचे परिवर्तन विपरीत, दुषित आणि हिंसक वर्तनात होऊ शकते. विशेषत: सहसंवेदना सामुहिक पातळींवर कार्यरत होते, तेव्हा ह्या भावनेचे सकारात्मक दृष्टीने नियंत्रण करणे, ही जेव्हढी आपली  वैयक्तिक कसोटी असते; तितकीच ती सामुहिक पातळीवर नेत्याची असते...

                                                      **************

  

Thursday, 13 January 2022

प्रामाणिकपणा

 

व्यवस्थापन म्हणजे जीवनातील केवळ व्यवहारच नाही, तर जगणे सुद्धा सुनियोजित, आयोजित, अग्रक्रम ठरवून आणि काळाचे भान ठरवून निर्माण केलेली जीवन व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थापनामध्ये काळ आणि स्थळ ह्यांचे महत्त्व आत्यंतिक आहे. प्रामाणिकपणा, साधेपणा, विनम्रता आणि संयम, शांतपणा...हे सद्गुण आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन करायचे म्हणजे त्यांचा उपयोग, ह्या गुणांचे तारतम्य, ह्या गुणांची सखोलता, व्याप्ती इत्यादी अनेक सार्वजनिक आणि खाजगी गोष्टी सक्षमपणे हाताळता आल्या पाहिजेत. तरच हे सद्गुण आपले जीवन सार्थ आणि कृतार्थ करतात.                 

           Stars can't shine unless in darkness.

        इथे तारे म्हणजे आपले सद्गुण, आपली सत्य निष्ठा, आपला प्रामाणिकपणा आणि आपले चारित्र्य ह्यांची सत्व परिक्षा संकटकाळात, आपत्ती विपत्ती आल्यावर आणि सगळे जग आपल्या विरुद्ध असतानाच होत असते...ही विपरीत परिस्थिती म्हणजे अंध:कार..

         प्रामाणिकपणा हे बुद्धीचे अधिष्ठान आहे आणि वस्तुस्थितीचा स्वीकार ही मनोधारणा आहे. ह्या दोन्हींच्या सामंजस्यातून येणारा अनुभव हा अनुभूतींमध्ये प्रवर्तित होत असतो. तेव्हा काव्याविष्कार घडत असतो. प्रामाणिकपणा अशी शक्ती आहे की ती शक्ति धारकासह सर्वांना धक्कादायक सत्य सांगत असते. सत्य आणि प्रामाणिकपणा एकच नाहीत, पण एकमेकांचे पाठीराखे नक्कीच आहेत.

          सत्य स्वयंभू, स्वसंवेद्य आहे. पण न्यायालयात मात्र सिद्ध करावे लागते....प्रामाणिकपणा हा न्याय तत्वाचा प्राण आहे. मात्र तो सिद्ध करावा लागत नाही. प्राणपणाने जपावा लागतो. सत्य तडजोड सक्षम आहे. प्रामाणिकपणाला तडजोड अमान्य असते. त्यामुळे सत्य हे असत्य झाले नाही, तरी दडवावे लागते, लपवून, झाकून ठेवावे लागते...हा अप्रामाणिकपणा आहे. म्हणून सत्याने प्रामाणिकपणाची पाठराखण सोडू नये. एकदा ही अशी संवय मनाला लागली की ती अधोगती कडे वाटचाल होऊन जाते. चारित्र्य अस्वच्छ होते आणि सत्यासत्या मधील फरक, अंतर कळेनासे होते... एक प्रकारचे अंधत्व येते, अंध भक्ती स्वार होते आणि व्यक्ती मनोरुग्ण बनून जाते.....

              प्रामाणिकपणा ही माझी नुसती श्रद्धा नाहीतर जगण्याचे एक सूत्र आहे. उदा. प्रामाणिकपणा व सत्य निष्ठा. ह्या माझ्या गेल्या ७० वर्षे जपलेल्या नैतिक आधारभूत जीवनेच्छा आहेत. ज्यावेळी वास्तवात ह्या निष्ठा असून ही माझ्यावर गुन्हेगारीचे आरोप ठेवून माझ्यावर खोटी, अप्रामाणिक आणि भ्रष्टचारयुक्त कारवाई झाली, तेव्हा मला जबदस्त धक्का बसलो. पण त्यावेळी माझ्या अंगभूत मानसिक शक्तीच्या जोरावर मी सर्व सहन केले. कालांतराने मात्र हा मनाच्या तळाशी गेलेला धक्का अचानक उसळी मारून, ज्व्लामुखीसारखा उद्रेक पावला. त्यामुळे मी कामावर असताना माझी बुद्धी, कार्यक्षमता अवगुंठीत होऊन जाऊ लागली. मी एकदम blank, शून्य होऊ लागलो. काहीच आठवत नाही, सुचत नाही, हातपाय गळून गेले आहेत....अशी अवस्था होऊन जायची. मग मी कामावरून घरी परत येत असे आणि सतत झोपून जात असे. अर्धवट जागेपण अनेकदा जाणवत असे आणि पूर्वी घडून गेलेल्या घटनांची काल्पनिक भीती स्वप्नवत माझ्या मनांत घिरट्या घालू लागत असे.

             जगण्याचा दर्जा म्हणजे नक्की काय? आपण जगण्यासाठी जी मूल्ये प्रमाण मानतो, ज्याला आपण जीवननिष्ठा म्हणतो...त्यावरून जगण्याचा दर्जा ठरत असतो. उदा. देशप्रेम, श्रद्धा, गुरुतत्व, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा इत्यादी मूल्ये सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यांच्या रक्षणासाठी प्राण सुद्धा पणाला लावणे. ह्यावरून आपली जीवनमूल्ये किंवा जीवन प्रणाली सिद्ध होत असते. ही जीवनमूल्य निष्ठा म्हणजे जगण्याचा दर्जा आणि ह्याबाबत नुसता विचार नाही तरी जीवनाची जडण घडण करणे. ह्याबद्दल परिस्थिती निरपेक्ष आपली वर्तणूक असणे, ह्यावरून आपल्या जगण्याचा उच्च किंवा निम्न दर्जा ठरत असतो.

           प्रामाणिकपणा हा गुण असतो, तेव्हा तो गरजेप्रमाणे वापरता येतो. पण प्रामाणिकपणा हा स्वभाव असतो, तेव्हा अप्रामाणिकपणा हे बळी पडणे असते.

      थोडक्यात, अप्रामाणिकपणा हा प्रामाणिकपणाला पर्याय नाही. प्रामाणिकपणा जितका संकुचिततितका भ्रष्टाचार विस्तृत होत जातो.

                       ****************