************
Friday, 28 February 2020
मन आणि दु:ख
************
अव्यक्त ते व्यक्त
पण बोलणार नाही.
देवळाच्या दारामध्ये,
भक्ती तोलणार नाही.
कल्पकुसुमांचा दाटे.
पण पोकळी तयाची,
कधी फुलणार नाही.
मला गावातले गुज.
परि अक्षरांचा संग,
त्याला मिळणार नाही.
राहे नभाच्या कडेला.
त्याचे रहस्य कोणाला,
कधी कळणार नाही.
एक गलबत रुपेरी.
त्याचा कोष किना-यास,
कधी लाभणार नाही.
झालो वणव्याचा धनी.
त्याच्या निखा-यात कधी,
तुला जाळणार नाही.
-कुसुमाग्रज
-यशवंत देव.
Renuka Khati Purohit, मला जे म्हणायचे आहे, ते पटो वा न पटो. पण श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज ह्या कवितेत, गीतात जे म्हणतात, तेच मला म्हणायचे आहे.
इतुके बोललो आम्ही,
बोलायचे नसूनी.
ज्ञानदेवे बोलिले
तरीही बोलिले वागयज्ञी.
व्यक्त-अव्यक्त, मूर्त-अमूर्त, निर्गुण-सगुण अवघे गोविंदू रे |....असे म्हणणारे संत.....
अस्फुट मनीचे गूज माझे.
स्फुट होतसे तेव्हा.
आम्ही रंगलो,
भक्तीत जेव्हा.
भक्ती हा काव्य रसाचा धनी आहे. माझे शब्दावरील प्रेम, माझे भाषेवरील प्रेम हा माझा भक्तीभाव आहे. ज्ञानदेव-नामदेव-तुकाराम आदी संतांनी अव्यक्त करुणेचा सागर व्यक्त करताना संयत, सम्यक आणि संयमी शब्द रचना करताना मनात आधी खूप आत्यंतिक असे चिंतन-मनन केले आणि "दाटुनी आले मन माझे, शब्दांकित केले सारे |" ....म्हणूनच कुसुमाग्रजांनी म्हणले आहे:
" आधी बोलायचे आहे,
पण बोलणार नाही.
देवळाच्या दारामध्ये,
भक्ती तोलणार नाही."
अस्तु.
Wednesday, 26 February 2020
मित्र आणि मैत्री
Monday, 17 February 2020
कवी, कविता आणि समीक्षा
विचार कोठून येतात? माझ्या मनातून, संस्कारांतून, बुद्धीतून आणि अनुभवांतून....ह्या सर्वांचा एक संकीर्ण परिणाम निर्माण होत असतो. ह्याच वेळेला माझी जाणीव ह्या विचारांबाबतीत काय असते? हे विचार फक्त माझे असले तर मी हा त्यांचा मालक म्हणून माझा अहंकार दृढ होत असतो. पण मला हे जाणवत असेल की हे विचार जरी माझे असले तर त्या विचारांची व्याप्ती, संपन्नता, विशालता आणि जीवन मूल्यांच्या दृष्टीने प्रभाव क्षमता मोठी आहे, तर मग माझ्या पेक्षा विचार मोठे होतात आणि मग मी त्या विचारांपुढे विनम्र होतो, नतमस्तक होतो. ह्या प्रक्रियेत, नेमकं काय घडतं? तर माझे व्यक्ती किंवा व्यष्टी मूल्य कमी होऊन समष्टी मूल्य व त्या मूल्याची जाणीव माझ्यातच तीव्र होऊन जाते. मी व्यक्ती न राहता अभिव्यक्ती होऊन जातो. ह्या प्रक्रियेत, नेमकं काय घडतं? तर माझे व्यक्ती किंवा व्यष्टी मूल्य कमी होऊन समष्टी मूल्य व त्या मूल्याची जाणीव माझ्यातच तीव्र होऊन जाते. मी व्यक्ती न राहता अभिव्यक्ती होऊन जातो.
बिर्ला फौंडेशनचा सरस्वती पुरस्कार सन्मानित तेलगू लेखक-कवी डॉ शिव रेड्डी म्हणतात, " माझ्या साहित्य निर्मिती नंतर मी केवळ नावापुरता उरतो. वाचक, समीक्षक मला माझ्या साहित्य कृतीचे मूल्यमापन करून देतात. त्यामुळे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत नाही, उलट माझी अभिव्यक्ती अधिक डोळस व सक्षम होण्याची शक्यता बळावते. म्हणून मी माझ्या निर्मितीबद्दल स्वतः कधीही समर्थक होत नाही आणि माझ्या समर्थकांना बळही पुरवित नाही."
फेसबुकवर लेखन करणा-या लेखक-लेखिका ह्यांनी हे लक्षात घेतले तर त्यांची ग्रुपबाजी, गटबाजी कमी होईल व त्याचा फायदा त्यांनाच आपली साहित्य सेवा अधिक कसदार करण्यास मदत होईल.
ह्याच लोकसत्तेच्या अंकात गिरीश कुबेर यांनी असेच विचार शतखंडित महाराष्ट्र ह्या लेखात मांडले आहेत.
मी फेसबुक हे वैचारिक व्यासपीठ आहे, असे मानतो व तदनुसार माझ्या प्रतिक्रिया मांडत असतो आणि त्या मांडताना माझा प्रयत्न सृजनशील बुद्धीवादात्मक असतो. ते मांडण्यासाठी काहीतरी निमित्त झालेले असले तरी माझा रोख कधीही आणि केव्हाही मूळ पोस्टच्या मित्र-मैत्रिणीवर हेत्वारोप किंवा आगपाखड करणे, हा नव्हता आणि नसतो. हे मी मुद्दाम लिहित आहे, कारण काही माझे मित्र-मैत्रिणी माझ्या पोस्ट्स मुळे माझ्याबद्दल गैरसमज करून घेतात... व त्याचा मन:स्ताप त्यांच्यापेक्षा मलाच जास्त होतो आणि मला समजावून देण्यात मी अपुरा पडल्याच्या जाणीवेने मी अधिक व्यथित होतो. तर माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना नम्र प्रार्थना....आपले वाद, मतभेद, एकमेकांवर केलेली टीका, समीक्षा ही वैचारिक असते. त्यांचा उद्देश किंवा माझी भूमिका पोस्टकर्त्याची सृजनशीलता जपावी, वृद्धिंगत व्हावी...अशी बुद्धीप्रामाण्यवादी असते.
त्यातील काही उतारे इथे मुद्दाम ठेवत आहे.
" समीक्षा म्हणजे समदृष्टीने पाहणे, सम्यकपणे किंवा समतोलपणाने अवलोकन करणे,होय.कारण समीक्षा ही साहित्याचा अनेक अंगांनी अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा आहे., एक 'discipline' आहे. मनोरंजन, उदबोधन, आनंद याचा अनुभव एकेकांना येत असतो.पण अशा अनुभवाची चिकित्सा करून तो अधिक यथार्थ, समृद्ध व सुस्पष्ट करण्याचे कार्य समीक्षा आणि समीक्षक करीत असतात.म्हणून चांगल्या साहित्याला चांगल्या समीक्षेची आणि चांगल्या समीक्षेला चांगल्या साहित्याची तहान असते.
चांगल्या व अभिजात साहित्यकृती अनेक सत्यता उराशी बाळगून असतात. प्रतिभावंत समीक्षक....... या सत्यता उलगडून स्पष्ट करतात.... व्यक्तीच्या व सामूहिक जीवनाच्या सुखदुखा:चा, प्रश्नोपप्रश्नांचा, स्वप्नांचा व स्वप्नभंगांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात......साहित्यकृती ही एक अपूर्व कलात्मक मिर्मिती असते. समीक्षा ह्या कलावस्तूचे रंगरूप मोठ्या प्रभावीपणे स्पष्ट करून सांगते.
समीक्षेच्या वाचनामुळे साहित्यकृती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. तिच्यातील आवडणा-या व नावडणा-या गोष्टींचा तर्कशुद्ध खुलासा होतो. योग्य कारणांसाठी एखादे पुस्तक का आवडते किंवा का आवडत नाही, याचे बौद्धिक समाधान प्राप्त होते आणि आपली वान्गमयीन अभिरुची संपन्न होते.
समीक्षा म्हणजे काही फावल्या वेळेत व लहरीनुसार करावयाचा व वाचावयाचा उद्योग नाही, तर ती एक गांभीर्यपूर्वक करावयाची साधना आहे. कोणत्याही समाजातील साहित्यसंस्कृतीचा दर्जा केवळ साहित्य व साहित्यिक यांच्यामुळे ठरविता येत नाही; तर तो समीक्षा व समीक्षक याच्या गुणवत्तेवरून ठरविला जातो."
नकारवाद हे साहित्य मूल्य म्हणून स्वीकारले तर त्याच्या चांगले -वाईटपणाचा विचार दिलेल्या साहित्य प्रकार संदर्भात करता येतो. नकारवाद हा दृष्टीकोन नसून वास्तववादाचा एक प्रकार आहे. होकारात्मक हा मात्र दृष्टीकोन आहे आणि तो सुद्धा वास्तववादाचा एक भाग आहे. त्यामुळे नकारात्मक वास्तवाकडे होकारात्मक दृष्टीकोनातून पाहता येणे, शक्य असते.
तत्वज्ञानात आशावाद आणि निराशावाद ही दोन तत्वे आहेत. ही साहित्य मुल्ये नाहीत....असे स्पष्ट प्रतिपादन विंदा पान क्र.३२ ते ३६ वरील विवेचनात स्पष्ट करताना म्हणतात, “ सौदर्यात्मक आणि साहित्य मूल्ये एकच मानण्याची किंवा विशेष प्रकारची साहित्यिक मूल्ये दुय्यम समजून ती मूल्ये अधिक व्यापक अशा सौंदर्यात्मक मुल्यांतूनच काढण्याची इच्छा ही या गोंधळाला कारणीभूत आहे.”
सौदर्यवाद ही तत्वज्ञान शाखेची निर्मिती आहे. आशावाद आणि निराशावाद ह्या तत्वज्ञान शाखेच्या विचारप्रणाली आहेत.
मी सर्वसाधारण कोणत्याही साहित्य किंवा कलाकृतीचा अभ्यास करताना विंदांनी केलेली साहित्य मूल्यांची पुढील व्याख्या प्रमाणभूत धरतो. “ मानवी अनुभव-विश्वाच्या काही वस्तुनिष्ठ विशेषांना प्रतिबिंबित करणारा आणि सर्वसाधारणपणे कमी-अधिक प्रमाणात मानवी मनाच्या तत्संबद्ध पैलूंकडून स्वीकारला जाणारा उत्कृष्टतेचा निकष.”
समीक्षा हे साहित्य मूल्यमापन व्यवस्थेचे व्यवच्छेदक व मापदंड निर्धारण शास्त्र आहे. समीक्षक रसास्वाद व रसग्रहण ह्यांच्या साकल्याने साहित्य किंवा कलाकृतीचे संशोधनात्मक, अभ्यासात्मक विवेचन मांडत असतो. समीक्षेच्या परिप्रेक्षात साहित्य किंवा कलाकृतीची अभिव्यक्ती मुख्य असते. समीक्षेचा केंद्रबिंदू साहित्यिक किंवा कलावन्त नसतो, हे लक्षात घेऊनच साहित्यिकांनी समीक्षेचा विचार आणि आस्वाद घ्यायचा असतो.
अर्थात, ह्यामध्ये काही समीक्षक जबाबदार नाहीत, असं मी मानत नाही. काही समीक्षक पूर्वग्रह दुषित आणि व्यक्ती केंद्रित टीका करीत असतात, हे वास्तव मी नाकारीत नाही. पण म्हणून समीक्षा नाकारणे, दुर्लक्षित करणे?.....ह्यामुळे मराठी साहित्याचा दर्जा कोणी तपासायचा? लोकप्रियता, पुस्तकाचा खप, जाहिरात, प्रसिद्धी हेच निकष दर्जा ठरविणार काय? मराठीत विपुल आणि फार मोठ्या प्रमाणात कविता, लेख, कथा इ वांग्मय प्रसिद्ध होत आहे. त्यांची दर्जाबद्दल चिकित्सा न झाल्यामुळे सकस साहित्य कोणते, पुस्तक घेतले, पण वाचता-वाचता कंटाळून ठेवून दिले....कारण हे वांग्मय कळतच नाही.....माझी वाचक, आस्वादक, आणि अभ्यासक वृत्ती पणाला लावण्यासाठी मला मार्गदर्शक नाही.
वाचन ही संस्कृती आहे, असे म्हणतो, त्याचा अर्थ काय? वाचन ही कला तर आहेच, पण त्यापेक्षा समजून घ्यायची व समजावून देण्याची आणि शिकण्याची विद्या आहे, हे आपण कधी मान्य करणार ?
ह्या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापिका आहेत. सदर पाहुण्यांना त्यांनीच आदरपूर्वक बोलाविले आहे. तसेच, ते पाहुणे साहित्यिक नाहीत, हे ही त्यांना माहित आहे. पण त्या पाहुण्यांना प्रसिद्धीचे मोठे वलय आहे. ते लोकप्रिय वक्ते आहेत. म्हणून की काय त्यांनी ह्या पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. आता प्रत्यक्ष समारंभात ह्या पाहुण्यांनी भाषण करताना ह्या लेखिकेच्या काही चुका किंवा अनुचित साहित्य विषयक समस्या आणि गैरसमज विषद केले. थोडक्यात, त्यांनी ह्या पुस्तकाची योग्य, संयमित आणि संयत समीक्षा केली. ही ह्या लेखिकेला आणि समारंभाच्या आयोजकांना आवडली नाही. का तर, त्यांच्या दृष्टीने पुस्तक प्रकाशन समारंभ हा लेखिकेचा कौतुक करण्याचा सोहळा असतो. त्यामुळे ह्या पाहुण्यांनी औचित्य भंग केला, हा आयोजकांचा आणि लेखिकेचा मुख्य मुद्दा. बर, ह्या लेखिकेने पाहुण्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर पाहुण्यांची एकंदरीत त्यांच्या सदर पुस्तकावर काय प्रतिक्रिया आहे, हे ही जाणून घेतले नाही. तरीही त्यांनी केलेली समीक्षा ह्यांना खूप अयोग्य वाटते.
थोडक्यात काय, तर हल्ली बहुसंख्य लेखक-लेखिका, कवि-कवयित्री ह्यांना आपल्या साहित्य कृतीवर टीका किंवा समीक्षा नको असते. स्तुतिपाठक लोक हवे असतात. आपलेच दिवे, आपल्या स्तुतीपाठकांकडून ओवाळून हवे असतात.
मराठी साहित्यात कसदार, दर्जेदार साहित्य फारसे निर्माण होत नाही. पण निर्मिती, प्रकाशने, छपाई भरपूर होत आहे, असे सर्वसाधारणपणे, सर्वच लोक म्हणत असतात. ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी इ बहुमान मराठी साहित्याच्या वाट्याला इतर भाषिक साहित्याच्या तुलनेत खूपच कमी आहेत. ह्याची अनेक कारणे आहेत. त्यातील, प्रमुख कारण हेच असावे की थोड्याशा, स्थानिक प्रसिद्धीवर, लोकप्रियतेवर व प्रती खपविण्यावरच ही मंडळी खूष आणि समाधानी असतात. हे दुर्दैव आहे. आपल्या कलाकृती किंवा साहित्याची स्वयं प्रसिद्धी करणे, आपली पुस्तके फुकट वाटणे, आपल्या पुस्तकांचा स्वत:च अनेक ठिकाणी प्रचार आणि प्रसार करणे..... हे अहंगंड, narcissism वृत्तीचे लक्षण आहे, नाहीतर काय आहे? टीका, समीक्षा सहन न करणे, ह्याला असहिष्णुता म्हणायचे, नाही तर काय म्हणायचे?
इथे फेबुवर सुद्धा जे काही साहित्य प्रकाशित होते, त्यावर माझ्या सारख्या अत्यंत सामान्य वाचकाने चिकित्सक किंवा समीक्षणात्मक टीका केली की त्या लेखक-कविसह त्याचे समर्थक माझ्यावर वैयक्तिक टीका, टोमणे, निंदानालस्ती इत्यादी करण्यात स्वत:ला धन्य समजतात !
थोडक्यात, साहित्य किंवा कलाकृतीत भावनेचा अस्सलपणा, सच्चेपणा जाणवतो की नाही, ह्या वरून कलाकृतीचे मूल्यमापन होत असते, किंबहुना करावयाचे असते. कलावंत तो अनुभव जगला की नाही, ह्यावरून नाही !
मला वाटते, ह्याच दृष्टिकोनामुळे म्हणजे चिकित्सा आणि चिकित्सक वृत्ती नाकारणे.....ह्यामुळे आपले साहित्य दर्जेदारपणाच्या कसोट्या नाकारीत राहिले आहे. ह्याउलट, इतर भाषांमधील साहित्यात, विशेषत: इंग्रजी वान्गमयात, टीका आणि समीक्षा ह्यांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मासिके, ग्रंथ प्रकाशन इ. कार्यांतही संपादन कार्य बरेचसे समीक्षेच्या/टीकेच्या अंगाने जाते. हे ज्यांना आवडत नाही, ते साहित्यिक, लेखक, कवी आपल्या निर्मितीबाबत अभ्यासू नाहीत...त्यांना आपल्यावर झालेली टीका सहन होत नाही...त्यामुळे त्यांना आपल्या प्रगतीच्या वाटा स्वयंभू आहेत, असं वाटू लागते...आणि तिथेच त्यांच्यातील अहंकार, कुपमंडूकता, भाटगिरी-प्रियता, मनोरंजकता, लोकप्रियतेची हौस वाढीस लागते आणि त्यांतूनच एकंदर त्या कवीचा/साहित्यिकाचा -हास होऊ लागतो.
शेक्सपियरने म्हणले आहे की हम्लेटच्या वेडेपणातही एक शहाणपण होते. मात्र इथे फेबु वर प्रसिद्ध होणा-या कविता, लेख, कथा वाचताना मला ब-याच वेळा असं आढळलं आहे की त्या साहित्याचे लेखक,कवी जे लिहितात, ते इतकं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असतं की त्याचा मी केलेला सर्व सामान्य, साहित्यिक आणि तार्किक विचार चुकीचा आहे, हे ते लेखक, कवी मला सांगतात. कारण त्यांचे शब्द, जे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, त्याला समष्टीची आवश्यकता असते,आणि ती नसल्यामुळे सुस्पष्टता हा सद्गुण त्यांच्या साहित्यातुन हरवला जातो, असं मला वाटतं. लेखक-कवी इ साहित्यिकांनी आपले साहित्य स्वतःच्या भाव-भावना,अनुभव त्यांच्या यष्टीतून,व्यक्तीगत मात्रेतून लिहायचे नसते.
थोडक्यात असे की साहित्यिक मूल्य असणारे लेखन समष्टीच्या संस्काराने प्रगल्भ होत असते... सुस्पष्ट होत असते आणि त्यातच लेखकाचं शब्द सामर्थ्य, अर्थ प्रवाहित्व आणि सुस्पष्ट अभिवचन सिद्ध होत असतं, असं मला वाटतं.