Saturday, 21 October 2017

मैत्री, नाते आणि विवाह

शेक्सपियर म्हणतो, " जग ही एक रंगभूमी आहे "....आजच्या लोकसत्तेच्या लोकरंग मध्ये नसिरुद्धीन शहाच्या  मुलाखतीचा वृत्तांत आला आहे. त्यामध्ये नसिरुद्धीनने अनेक समाजिक गैरसमजांचा धांडोळा घेतला आहे. तो मार्मिक आहेच, साक्षेपी आहेच, पण त्यापेक्षा तो अत्यंत मुक्त असा संवाद आहे.
                      जग हे आपले जगण्याचे ठिकाण आहे, धर्मशाळा नाही. आपल्या जन्मापासून आपण आपली ह्या जगामध्ये काय भूमिका आहे, हे नकळत शिकत जात असतो. बालपणी, मी कोण, ही ओळख, आपल्याला परिचय करून देते, वात्सल्य म्हणजे काय...ह्याची. कुटुंबातून कळत जात...ह्या जगाच्या पाठीवर माझी माणसे कोण आहेत आणि कोण नाहीत....इथेच आपल्या आवडी-निवडी घडू लागतात. हळू-हळू शाळा-महाविद्यालयातून आपलं जग विस्तारित होऊन घराच्या बाहेर आपली नवीन नाती घडू लागतात. त्यातून मित्रत्व हे नात आकार घेऊ लागत. पण ह्या नात्याचे संदर्भ आणि ह्या नात्याच्या क्षमता जाणून घेण्याचे वय त्यावेळी आपल्याला नसते....ह्याचे भान येण्यासाठी आपल्या श्रद्धा आणि त्यांचे आपल्या जगण्यापेक्षा, आपल्या जीवनातील नेमके काय स्थान आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्या आवडी-निवडी तपासून घेण्याची नितांत गरज ह्याच वयात असते. आपल्या जीवनातील नात्यांचे अग्रक्रम ह्याच काळात आपल्याला समजून घेण्याची अत्यावश्यकता असते. अशा वेळी शाळा-महाविद्यालयीन शिक्षण, आपली वाचन संस्कृती आणि घराचे आपल्या नकळत आपल्यावर घडणारे संस्कार फार महत्वाचे असतात. हेच नेमके ह्या वेळी कमी पडले, तर आपल्या सह आपल्या कुटुंबाचे घडणारे नाते... ह्या समस्या बनू शकतात, नव्हे आजच्या काळात ह्या समस्या फार मोठ्ठ्या प्रमाणात गंभीर होऊ लागल्या आहेत....हे माझे आकलन नसून हे ह्या पिढीचे समाजभान आहे.....जे मला अस्वस्थ करीत आहे.
                    प्रत्येक व्यक्तीच्या जगाच्या रंगभूमीवर विवाह हे एक स्थित्यंतर असते, मन्वंतर असते. आपल्याला लाभणारा जोडीदार हा सहजीवन प्रवासी म्हणून आपण त्याला स्वीकारायचे असते. हे विसरून आपण आपले अहंकार, आपली अस्मिता, माझ्या पदव्या, माझे शिक्षण, माझी आर्थिक-सामाजिक प्रतिष्ठा....ही सर्व माझे\पणाची वस्त्रे,अलंकार,आणि प्रतिमा आहेत...हे न ओळखल्यामुळे आपण आपल्यातील एक कुटुंब-पुरुष-स्त्री ही संवेदनाच समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. जग ही रंगभूमी आहे तर ह्या रंगभूमीवर माझी कुटुंब-पुरुष-स्त्री म्हणून माझी ओळख मी करून घेण्यासाठी कमालीचे धैर्य, कमालीचे मानसिक आणि बौद्धिक श्रम-कष्ट घेतले पाहिजेत.....मुख्य म्हणजे माझी मानसिकता, बौद्धिक क्षमता आणि माझी स्वत:ची भूमिका नेमकी ह्या संदर्भात काय आहे, हे समजून घेणे, ही आपली सत्व कसोटी आहे, हे समजून घेण्यास आपण इथे कमी पडलो, अपयशी झालो, म्हणजे घटस्फोट घेणे भाग पडत असेल, तर पुढील जीवन प्रवास, जगाच्या रंगभूमीवरील आपली पावले अवरुद्ध होणार आहेत, अडखळणार आहेत...आणि ह्यातून आपण स्वत:ला सावरून पुन्हा नव्या दमाने उभे राहण्याची क्षमता आपली आहे की नाही? आपण जीवनाच्या दीर्घकाल पटाचा विचार करीत आहोत की नाही?.......ह्यामध्ये आपल्या उमेदीचा काळ खर्ची पडणार आहे.....ह्याचा सम्यक, सकारात्मक आणि स्पष्ट विचार करण्याची आपली क्षमता आहे का? आणि असेल तरीसुद्धा हे सक्तीने करणे, ही काळाची आणि आपल्या जीवनाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अनिर्वाय, पर्याय नसलेली घटना, परिस्थिती आहे का? आणि ह्याचा निर्णय आपण एकट्याने घेणे बरोबर आहे का? ज्या निर्णयामुळे आपल्या विवाहाची केवळ समस्याच  नाही तर संपूर्ण विवाह संस्थेच्या योग्यायोग्यतेवर आपण एक भले मोठ्ठे प्रश्नचिन्ह उभे करीत आहोत, ह्याचे भान आपण ठेवत आहोत का? जगाच्या रंगभूमीवरील आपला हा प्रयोग यशस्वी होणार आहे का ?
                     हे अनेक प्रश्न आपण स्वत:ला विचारले पाहिजे, तरच जगाच्या रंगभूमीवरील आपल्या भूमिकेला आपण न्याय दिला असणार आहे किंवा देणार आहोत, असे मला वाटते.
                                          **************

Friday, 20 October 2017

ब्रम्हचर्य.. पातंजल योग दर्शन

पतंजलींनी चौथा यम 'ब्रम्हचर्य ' म्हणजे काय हे सांगताना म्हणले आहे, " ब्रम्हणि चरति इति ब्रम्हचारी ".जो ब्रम्हपदात स्थित असतो, तिथे राहून, जो सर्वत्र वावरतो, किंवा ज्याला जीवनाच्या परम अद्वैत तत्वाचे अखंड भान असते, जीवनाच्या एकमेवाद्वितीय सत्तेच्या जाणीवेत जगतो....तो ब्रम्हचारी होय. अद्वैत हीच जीवनाची सत्यता आहे. आपण द्वैताचे प्रामाण्य स्वीकारतो आणि ' मी-तू-तो ' इत्यादी तुकड्यांत जगतो. त्यामुळे आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण होत असतात.
             ब्रम्हचर्य ह्या संज्ञेत चर्या म्हणजे चालणे,हालचाल करणे,वागणे-बोलणे इ क्रिया येतात. जगण्याच्या क्रियेचे हे अनिवार्य भाग आहेत. तर ब्रम्हन म्हणजे अरूप-निर्गुण आणि रूप-सगुण ह्या अस्तित्वाच्या जाणीवांचे अखंड चिन्तन-मनन होय. थोडक्यात, जगणे ह्या वास्तविकतेचे आपल्या अस्तित्वाच्या परिप्रेक्षात भान ठेवून आचरण करणे.
              ब्रम्हचर्य म्हणजे लैंगिक किंवा संभोग क्रिया न करणे, हा रुढार्थ अतिशय उथळ आहे. वैवाहिक जीवन म्हणजे अब्रम्हचर्य नव्हे. वैवाहिक जीवनात संभोग हे प्रेमाचे आविष्करण आहे. प्रेम हे कौटुंबिक-सामाजिक पातळीवर वेगवेगळ्या नात्यांनी व्यक्त होत असते, प्रगट होत असते. आई-वडील व आपण ह्यांतील प्रेमाच्या नात्याला वात्सल्य म्हणतात, बहिण-भाऊ ह्याच्यातील प्रेमाच्या नात्याला स्नेह म्हणतात, मैत्रीतील प्रेमाच्या नात्याला मित्रत्व म्हणतात, इत्यादी नाती म्हणजे प्रेमाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर होणारे आपल्या अस्तित्वाचे भान आहेत.
             विमला ठकार म्हणतात, " Bramhacharya is a triple dedication to Perception, understanding and awareness.....It is not a code of conduct. These are Absolute values of human life because these values cannot be bargained away or compromised.....Without these values, it seems to me that sane & healthy societies can not come into existence."
                      **************

Thursday, 19 October 2017

श्रद्धा आणि संस्कार



श्रद्धा ह्या घडविल्या जातात, तर संस्कार हे घडत असतात. श्रद्धा हे भूतकाळाचे, स्मृतींचे, आणि भवतालाचे माझ्यावर झालेले परिणाम असतात. माझी कुटुंब संस्था हा माझ्यावर होणारा आणि होत जात असलेला पहिला आयाम असतो. माझे आई-वडील आणि त्यांच्यापासून उद्भवलेली नाती....ह्यांच्या निरीक्षणातून माझ्या बुद्धीवर आणि मनावर जे परिणाम होत असतात, त्यामुळे मला जे आकलन होत असते, ते म्हणजे संस्कार होत.पण माझ्या श्रद्धा म्हणजे belief systems मात्र माझ्या कुटुंबा नंतर समाज, शाळा-महाविद्यालये, माझी नोकरी-व्यवसाय क्षेत्रे...ह्यातून मी माझी मते,माझे ज्ञान आणि माझे प्रगटीकरण घडविले जात असते. माझे यशापयशाचे धडे मी शिकत असतो. ह्यातून मला जे अनुभव येत असतात, त्यामुळे माझ्या श्रद्धा घडविल्या जात असतात. जसजसे वय वाढत जाते, आणि माझ्या यशापयशाचे अनुभव....जे मला बाहेरून म्हणजे समाजाकडून, कुटुंबाकडून,देशाच्या परिस्थितीतून येत असतात, त्यातून माझ्या श्रद्धा विकसित होतात.
                    संस्कार हे घडत असतात, ह्याचा अर्थ असा की माझ्या श्रद्धा जसजशा बाहेरून विकसित केल्या जातात. तसं तसे माझे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्यांचे नकळत एक साकल्य, एक प्रकारचे सामंजस्य घडत असते आणि त्यातून मानसिक जडणघडण होत जाते....ही जडणघडण नकळत होत असते...म्हणून ह्याला संस्कार म्हणतात.....कारण संस्कार ही एक घडत जाणारी अंतर्गत प्रक्रिया आहे. तर श्रद्धा ही बाह्य प्रक्रिया आहे. श्रद्धा ही inputs आहेत, तर संस्कार ही internal processing units आहेत आणि माझे वागणे हे output आहे.
                  अध्यात्माच्या परिभाषेत श्रद्धा हे जगणे आहे, तर संस्कार हे जीवन आहे. मी कोण आहे....  हा मानवाचा अखंड शोध आहे. ह्या शोध मानवी उत्क्रांतीचा जनक आहे. मानवतेचा भौतिक विकास हे एक परिमाण आहे, पण ह्या परिमाणाच्या पलीकडे....मी कोण आहे, ही जाणीव निरंतर, शाश्वत आणि अस्वस्थ करणारी आहे. सुख-दु:ख आणि यश-अपयश ह्या जगण्याच्या प्रेरणा आहेत. त्यामुळे ज्ञान संवर्धित होण्या ऐवजी संपत्ती धारणा क्षमता आणि आर्थिक सुरक्षितता ह्यांना अतोनात महत्व आले आहे. ह्यातून व्यक्तिविकास साधला जात नसून जगण्याच्या क्षमता वाढत आहेत, पण जीवन विकासाच्या प्रेरणा अवरुद्ध होत आहेत.....हे अध्यात्मिक भाषेतील अज्ञान आहे. म्हणून असं म्हणतात की शिक्षण आणि संपत्ती विकासातून जगण्याची परिमाणे, मानवाचा भौतिक विकास झाला  आहे, पण जीवनाचे आकलन मात्र अवगुंठीत झाले आहे. थोडक्यात, माणसाचा विकास असंतुलित झाला आहे...जगणे आणि जीवन ह्यांतील दरी ....गरीब आणि श्रीमंत ह्यांच्यातील दरी प्रमाणे ...वाढत चालली आहे.
                 ह्यामुळे अध्यात्म म्हणते की सुखाची साधने,सुख मिळविण्याच्या संधी आणि क्षमता विकास पावल्या असल्या तरी माणूस असमाधानी, अशांत आणि अस्वस्थ झाला आहे...पूर्वीपेक्षा जास्तच, कारण मी कोण आहे हा शोध माझे काय आहे...ह्या मध्ये गुरफटून गेला आहे. माझेपण मी च्या बाह्य क्षेत्रात, परिप्रेक्षात आणि भौतिक परिमाणांत हरवून आपण..... मी कोण हा शोध घ्यायचं विसरून गेलो आहोत...हेच अज्ञान आहे आणि हेच मानवतेचे दारिद्र आहे.
                विवाह समस्यांचे मूळ ह्याच अज्ञानात आहे. आर्थिक संपन्नता, क्षमता आणि सुरक्षितता हा वैवाहिक संबंधांचा पाया आहे, हे इतकं दृढतर झाले आहे की पती-पत्नी  हे दोघेही  व्यक्ती स्वतंत्र नाही तर एकत्रित असे  विवाह संस्थेचे मुख्य आणि मुलभूत अंग आहे, हेच आपण दुर्लक्षित करून....घटस्फोट हे विवाह समस्येचे उत्तर आहे, असे समजून विवाह संस्थाच... आपण खिळखिळी करून टाकीत आहोत...हे अनेकांच्या अज्ञानाचे फलित आहे.
                सहजीवन म्हणजे एकमेकांना समजून घेणे....एकमेकांचे दोष, कमतरता, वैगुण्ये,वागण्याच्या पद्धती, विचारांच्या बैठकी..समजून घेऊन त्या स्वीकारणे....हे समजून घेण्याच्या प्रक्रियेचे अनिवार्य घटक आहेत, हे अमान्य करून सहजीवनाचा पायाच मुळी उखडून टाकला हात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा ह्या घडविल्या जातात....ह्या belief systems पती-पत्नी ह्यांच्या वेगवेगळ्या आहेत, हे मान्य केले, तरच समजून घेण्याची प्रक्रिया घडे शकते. विवाह हा एक संस्कार आहे...असं आपली संस्कृती सांगते.... ह्याचा अर्थ वैवाहिक जीवन हे घडत जात असते.....सहजीवनाच्या आधारावर. श्रद्धा म्हणजे आपल्या belief systems च्या आधारावर नव्हे, तर वैवाहिक संस्कार, सहजीवन हे जसजसे घडत जाईल, तसतसे परस्पर समजून घेण्याच्या क्षमता विकसित होत जातात.
                   तरीसुद्धा काही समस्या ह्या सहजीवन संस्कारातून निरसन होऊ शकणार नाहीत, तिथे आणि तेव्हा घटस्फोट अनिवार्य असतो, हे सत्य आहे. वैवाहिक समस्या जे जसे सत्य आहे, तसे घटस्फोट अनिवार्य असतो, हे सिद्ध कटू सत्य आहे.
                                     *************