श्रद्धा ह्या घडविल्या जातात, तर संस्कार हे घडत असतात. श्रद्धा हे भूतकाळाचे, स्मृतींचे, आणि भवतालाचे माझ्यावर झालेले परिणाम असतात. माझी कुटुंब संस्था हा माझ्यावर होणारा आणि होत जात असलेला पहिला आयाम असतो. माझे आई-वडील आणि त्यांच्यापासून उद्भवलेली नाती....ह्यांच्या निरीक्षणातून माझ्या बुद्धीवर आणि मनावर जे परिणाम होत असतात, त्यामुळे मला जे आकलन होत असते, ते म्हणजे संस्कार होत.पण माझ्या श्रद्धा म्हणजे belief systems मात्र माझ्या कुटुंबा नंतर समाज, शाळा-महाविद्यालये, माझी नोकरी-व्यवसाय क्षेत्रे...ह्यातून मी माझी मते,माझे ज्ञान आणि माझे प्रगटीकरण घडविले जात असते. माझे यशापयशाचे धडे मी शिकत असतो. ह्यातून मला जे अनुभव येत असतात, त्यामुळे माझ्या श्रद्धा घडविल्या जात असतात. जसजसे वय वाढत जाते, आणि माझ्या यशापयशाचे अनुभव....जे मला बाहेरून म्हणजे समाजाकडून, कुटुंबाकडून,देशाच्या परिस्थितीतून येत असतात, त्यातून माझ्या श्रद्धा विकसित होतात.
संस्कार हे घडत असतात, ह्याचा अर्थ असा की माझ्या श्रद्धा जसजशा बाहेरून विकसित केल्या जातात. तसं तसे माझे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्यांचे नकळत एक साकल्य, एक प्रकारचे सामंजस्य घडत असते आणि त्यातून मानसिक जडणघडण होत जाते....ही जडणघडण नकळत होत असते...म्हणून ह्याला संस्कार म्हणतात.....कारण संस्कार ही एक घडत जाणारी अंतर्गत प्रक्रिया आहे. तर श्रद्धा ही बाह्य प्रक्रिया आहे. श्रद्धा ही inputs आहेत, तर संस्कार ही internal processing units आहेत आणि माझे वागणे हे output आहे.
अध्यात्माच्या परिभाषेत श्रद्धा हे जगणे आहे, तर संस्कार हे जीवन आहे. मी कोण आहे.... हा मानवाचा अखंड शोध आहे. ह्या शोध मानवी उत्क्रांतीचा जनक आहे. मानवतेचा भौतिक विकास हे एक परिमाण आहे, पण ह्या परिमाणाच्या पलीकडे....मी कोण आहे, ही जाणीव निरंतर, शाश्वत आणि अस्वस्थ करणारी आहे. सुख-दु:ख आणि यश-अपयश ह्या जगण्याच्या प्रेरणा आहेत. त्यामुळे ज्ञान संवर्धित होण्या ऐवजी संपत्ती धारणा क्षमता आणि आर्थिक सुरक्षितता ह्यांना अतोनात महत्व आले आहे. ह्यातून व्यक्तिविकास साधला जात नसून जगण्याच्या क्षमता वाढत आहेत, पण जीवन विकासाच्या प्रेरणा अवरुद्ध होत आहेत.....हे अध्यात्मिक भाषेतील अज्ञान आहे. म्हणून असं म्हणतात की शिक्षण आणि संपत्ती विकासातून जगण्याची परिमाणे, मानवाचा भौतिक विकास झाला आहे, पण जीवनाचे आकलन मात्र अवगुंठीत झाले आहे. थोडक्यात, माणसाचा विकास असंतुलित झाला आहे...जगणे आणि जीवन ह्यांतील दरी ....गरीब आणि श्रीमंत ह्यांच्यातील दरी प्रमाणे ...वाढत चालली आहे.
ह्यामुळे अध्यात्म म्हणते की सुखाची साधने,सुख मिळविण्याच्या संधी आणि क्षमता विकास पावल्या असल्या तरी माणूस असमाधानी, अशांत आणि अस्वस्थ झाला आहे...पूर्वीपेक्षा जास्तच, कारण मी कोण आहे हा शोध माझे काय आहे...ह्या मध्ये गुरफटून गेला आहे. माझेपण मी च्या बाह्य क्षेत्रात, परिप्रेक्षात आणि भौतिक परिमाणांत हरवून आपण..... मी कोण हा शोध घ्यायचं विसरून गेलो आहोत...हेच अज्ञान आहे आणि हेच मानवतेचे दारिद्र आहे.
विवाह समस्यांचे मूळ ह्याच अज्ञानात आहे. आर्थिक संपन्नता, क्षमता आणि सुरक्षितता हा वैवाहिक संबंधांचा पाया आहे, हे इतकं दृढतर झाले आहे की पती-पत्नी हे दोघेही व्यक्ती स्वतंत्र नाही तर एकत्रित असे विवाह संस्थेचे मुख्य आणि मुलभूत अंग आहे, हेच आपण दुर्लक्षित करून....घटस्फोट हे विवाह समस्येचे उत्तर आहे, असे समजून विवाह संस्थाच... आपण खिळखिळी करून टाकीत आहोत...हे अनेकांच्या अज्ञानाचे फलित आहे.
सहजीवन म्हणजे एकमेकांना समजून घेणे....एकमेकांचे दोष, कमतरता, वैगुण्ये,वागण्याच्या पद्धती, विचारांच्या बैठकी..समजून घेऊन त्या स्वीकारणे....हे समजून घेण्याच्या प्रक्रियेचे अनिवार्य घटक आहेत, हे अमान्य करून सहजीवनाचा पायाच मुळी उखडून टाकला हात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा ह्या घडविल्या जातात....ह्या belief systems पती-पत्नी ह्यांच्या वेगवेगळ्या आहेत, हे मान्य केले, तरच समजून घेण्याची प्रक्रिया घडे शकते. विवाह हा एक संस्कार आहे...असं आपली संस्कृती सांगते.... ह्याचा अर्थ वैवाहिक जीवन हे घडत जात असते.....सहजीवनाच्या आधारावर. श्रद्धा म्हणजे आपल्या belief systems च्या आधारावर नव्हे, तर वैवाहिक संस्कार, सहजीवन हे जसजसे घडत जाईल, तसतसे परस्पर समजून घेण्याच्या क्षमता विकसित होत जातात.
तरीसुद्धा काही समस्या ह्या सहजीवन संस्कारातून निरसन होऊ शकणार नाहीत, तिथे आणि तेव्हा घटस्फोट अनिवार्य असतो, हे सत्य आहे. वैवाहिक समस्या जे जसे सत्य आहे, तसे घटस्फोट अनिवार्य असतो, हे सिद्ध कटू सत्य आहे.
*************
No comments:
Post a Comment