Monday, 27 September 2021

शारीरिक प्रतिक्रियांचे विज्ञान

 प्रतिक्रिया हे आपल्या शरीराचे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. ह्या शरीर धर्मामुळे आपल्या जीवनाची जडण - घडण होत असते. आपण ज्या भवतालात, जगात आहोत, त्या जगताची कळत - नकळत आपल्यावर क्रिया होत असते आणि आपण तिला सुद्धा कळत - नकळत प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देत असतो. ह्या प्रतिक्रिया जेव्हा सातत्याने घडत जातात, तेव्हा त्यांना संस्कार म्हणतात. उदा. पावसाळ्यात घराबाहेर पडताना बरोबर छत्री, रेनकोट घेणे....ही आपली पाऊस ह्या नैसर्गिक क्रियेला प्रतिक्रिया आहे. त्याचप्रमाणे, येणाऱ्या कोणत्याही घटनेचे, बातमीचे, माणसांच्या क्रिया - प्रतिक्रियांचे पडसाद - प्रतिध्वनी आपल्या शरीरावर घडत असतात.

                    ह्या आपल्या प्रतिक्रिया किंवा आपले पडसाद ह्यांचे शरीराच्या विशिष्ट अशा संस्थेकडून घडत असतात. ह्या विशिष्ट संस्थाला HPA Axis म्हणतात. ह्यातील H म्हणजे Hypothalamus, P म्हणजे Pituitary आणि A म्हणजे Adrenal ह्या तीन ग्रंथी glands च्या समुच्चयाने आपल्या शरीराचे प्रतिक्रिया घडविण्याचे कार्य चालते. 

                                       1 - Hypothalamus gland secrets 

                                      Corticotropin Releasing Factor (CRF) into blood stream

                                      2 - Pituitary gland secrets

                                     Adrenocorticotropic Harmone ( ACTH ) into blood stream

                                     3- Adrenal Glands secret

                                    Adrenaline Harmone into blood stream

                                   4- Response mechanism 

                                   5- Stress Hormones are secreted into blood stream

                                  6- Constriction of Blood vessels of Digestive tracts.

                                  7- Response mechanism active - Flight Or Flight.    

            अशा प्रकारे आणि अशा ७ पातळींवर घडणाऱ्या शरीरांतर्गत क्रियांमुळे आपल्या प्रतिक्रिया पळून जाणे, पलायनवाद किंवा प्रतिकार, प्रतिहल्ला, आक्रमण अशा स्वरुपात प्रगट होत असतात. 

                                                                      ****************

                                                  

Friday, 24 September 2021

स्वातंत्र्य.. एक जीवनमूल्य

नरहर कुरूंदकरांनी स्वातंत्र्य ही संकल्पना नाही, असे म्हणले आहे. कारण  स्वातंत्र्य हे मानवी सांस्कृतिक विकासाचे अनुस्यूत असे मूल्य आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव आणि स्वैर वर्तन नव्हे. मनमानी नव्हे. म्हणून कुरूंदकर म्हणतात, जबाबदारीच्या जाणिवे शिवाय स्वातंत्र्य हे असूच शकत नाही.
                सामूहिक जनजीवन हे कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव आहे. ह्यापालिकडे माझी भाषा, माझा धर्म, माझी जात-पात आणि अखेर माझा देश किंवा राष्ट्र ह्या वास्तविकता आहेत. हा मानवी जगण्याचा वास्तववादी परिप्रेक्ष आहे. पण जेव्हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा माझे मन आणि बुद्धी ह्यांचे कार्य दोन पातळीवर चालते. एक पातळी आहे, माझे मी पण.. जीव म्हणजे जिवंत राहणे, हे आहे. तिथे जीवाला भीती असेल तर मी जगण्यासाठी काहीही तडजोडी, अगदी गुलामगिरीही पत्करायला तयार असतो. तुरुंगवास ही शिक्षा का आहे.. ह्याचे उत्तर ह्यातच आहे की मरण्यापेक्षा जगणे स्वीकारले जाते, तेव्हा अस्तित्व महत्वाचे असते. म्हणून मग माझ्या स्वातंत्र्याचा बळी मी देत असतो. तुरुंगवास ही शिक्षा असते, कारण मी माझ्या स्वातंत्र्याचा बळी देऊन गुलामगिरी स्वीकारलेली असते. ही मला झालेली शिक्षा स्वातंत्र्याचा बळी दिल्याबद्दल असते.
                  नोकरी-चाकरी हा सुद्धा स्वातंत्र्याचा बळी असतो. कारण जगण्याचे एक संसाधन म्हणून मी नोकरी पत्करतो, तेव्हा एका विशिष्ट व्यवस्थेचे दास्य म्हणजे गुलामगिरी मी मान्य करीत असतो. म्हणूनच कोणत्याही व्यवस्थेमध्ये.. आणि ह्यामध्ये जगण्याची, जीव जगविण्याची व्यवस्था सुद्धा येते.. स्वातंत्र्य संकुचित असते. त्याचबरोबर, उरलेले स्वातंत्र्य टिकविणे ही एक जबाबदारी असते. नाहीतर मी व्यवस्थे बाहेर फेकला जातो. हयात जगण्याची व्यवस्था असल्यामुळे माझ्या अस्तित्वाचा, जगण्याचा प्रश्न उभा राहतो. म्हणून असे स्वातंत्र्य हे विशिष्ट व्यवस्थेच्या परिप्रेक्षातच, त्या व्यवस्थेच्या बंधनात, नियम, कायदे,इ इ च्या चाकोरीतच सत्य असते. सत्य हे आहे की स्वातंत्र्य हे जीवनमूल्य म्हणून मान्य करायचे असेल, तर अस्तित्वाचे प्रश्न नुसते बाजूला ठेवून चालत नाही. तर अस्तित्वा  पेक्षा महान असे मूल्य आहे, हे मान्य करावे लागते. तिथेच  स्वातंत्र्य ह्या मूल्याची चिकित्सा होऊ शकते.
                     मानवी विकास हा एक सांस्कृतिक जीवनाचा प्रवास आहे. इथे माणूस ही व्यक्ति, व्यष्टी, जीव, किंवा आकार असलेला प्राणी नाही. इथे माणूस हे समष्टी तत्व आहे. त्यामुळे जगणे, माझे अस्तित्व ही समस्या नाही किंवा वास्तविकता नाही. अस्तित्व हा प्रश्न एकदा निकालात निघाला की मग स्वातंत्र्य ह्या शब्दाला सांस्कृतिक  मूल्य म्हणून अर्थ प्राप्त होतो. कारण स्वातंत्र्य ही आदर्शवादी जीवनाची मांडणी आहे, रचना आहे, आणि म्हणून व्यक्ति स्वातंत्र्य अशी कोणतीही संकल्पना असू शकत नाही. व्यक्तीला मिळणारे स्वातंत्र्य हे नेहमीच सापेक्ष असते. काळ आणि परिस्थिति हे एक ह्या स्वातंत्र्याचे परिमाण आहे, तर दुसरे परिमाण मानव्यतेचे आहे. मानवी परिमाण म्हणजे समष्टी तत्व.. आदर्शवाद ही ह्या तत्वाची रचना आहे आणि मांडणी ही एक व्यवस्था आहे. उदा लोकशाही राज्य ह्या संकल्पनेच्या विवध रचना.
                         मुळात लोकशाही म्हणजे हुकुमशाही नाही.. असे म्हणणे किंवा मानणे, हे समजून घेण्याचे एक सुलभीकरण आहे.     

विषमता- वस्तुस्थिती की परिस्थिती ?

 परिस्थितीचा फार बाऊ करून आपल्या अपयशाचे समर्थन करणे, ही आता आता फॅशन झाली आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे की माणसाची बुद्धिमत्ता व destiny प्रारब्ध हे परिस्थितीवर अवलंबून नसतं. कारण परिस्थिती माणसापेक्षा मोठी नाही. बौद्धिक विषमता हे जसे बरेचसे नैसर्गिक वास्तव आहे; तसे आर्थिक विषमता आणि समान संधी उपलब्ध नसणे, हे भौतिक वास्तव परिस्थितीजन्य नसून मानवी विकास क्षमतेचे मूलभूत तत्व आहे; म्हणून ते वस्तुनिष्ठ आहे, असं म्हणलं जाते. समान संधी मिळाल्या तरी बौद्धिक, मानसिक व आधिभौतिक क्षमतांची विषमता राहणारच. कारण सर्वांच्या गुण विकास क्षमता एकच, समान नाहीत आणि म्हणूनच मानवी प्रयत्नवादाला पर्याय नाही, पण अर्थ मात्र मर्यादित आहे.

यशामध्ये परिस्थितीचा वाटा असतो; पण तो 100% नसतो. कारण यश आणि अपयश हे 80-90 टक्के घडत असतं. म्हणून असं म्हणतात की यश-अपयशाचे आपण मालक नसतो. तर ' धनी ' म्हणजे वाहक carrier असतो. तर मग आपले कर्तृत्व.... उरलेले 10-20 टक्के एव्हढेच असते. जो माणूस स्वत:चे कर्तृत्व १००% आहे, असे मानतो; तो एकतर अहंकारी असतो किंवा थापाड्या, बालिश असतो. तर्कशास्त्र सुद्धा यशाच्या शक्यतेचे मोजमाप जास्तीत जास्त ५०% च करते. त्यापेक्षा अधिक यश कर्तृत्वाने मिळू शकते. पण ते १००% कधीच असू शकत नाही.

जर सर्वांना समान परिस्थिती, समान संधी उपलब्ध करून दिली तरीही विषमता दूर होणार नाही. कारण तिथे मग ‘ बळी तो कान पिळी ‘... हिंसा सामर्थ्य, सत्ता सामर्थ्य, भ्रष्टाचार इ मानवी दुर्गुण, धर्मश्रेष्ठ होऊन जातात.
राजकीय म्हणजे सत्तेच्या जोरावर यश मिळू शकते, पण ते मर्यादित असते. कारण असे यश कृत्रिम म्हणून अशाश्वत असते. डॉ आंबेडकरांना मिळाले यश हे त्यांना मिळालेल्या केवळ संधीवर, परिस्थितीवर नाही मिळालं. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर व आधिभौतिक (पूर्वजन्मातील पुण्यसंचय) बळावर मिळाले.
मानवी संस्कृतीने ही विषमता दूर करण्याचा प्रयत्न करणे, हा सुद्धा मानवी विकसनशीलतेचा अनिर्वाय भाग आहे. म्हणून आरक्षण हवे आहे, पण आता तो भस्मासुर, अनिर्बंध, राजकीय मुद्दा झाल्यामुळे मूळ मानवी विकासाचे तत्व, सामाजिक न्याय हे तत्व counter productive झाले आहे. म्हणजे असं की अर्थ शास्त्राच्या सिद्धांतानुसार एखादी गोष्ट अमर्यादित वाढली तर ती Reverse Return व्यस्त परतावा देऊ लागते. गणिताच्या भाषेत... सर्व किंवा काही घटकांचे प्रमाण अमर्याद वाढत गेले, तर परतावा व्यस्त होऊन जातो. मूळचे सम प्रमाण व्यस्त होऊन जाते.
प्रयत्न करणे, हे माणसाच्या क्षमतेवर पण आवाक्यात आहे, पण त्याला यश किती मिळावं, हे प्रयत्नांच्या मर्यादेवर किंवा क्षमतेवर अवलंबून नाही.
कर्मण्येव अधिकारास्ते । मा फलेशु कदाचन ।। - भ.गीता
कर्म करणे, प्रयत्न करणे, हा तुझा अधिकार आहे, त्याला यश द्यायचं की नाही आणि दिले तरी किती; हा माझा अधिकार आहे. इथे मी म्हणजे श्रीकृष्ण हा देव नसून कृष्ण ह्या व्यक्तीची समष्टी आहे’ व्यष्टीचा समष्टीभूत अविष्कार आहे.
*************

अद्वैत सिद्धांत - एक निरुपण


मातेच्या उदरात जन्म घेण्यापूर्वी मी कोण होतो? आई-वडील ह्यांच्या गुणसूत्रांत विलीन असे वास्तव होतो. वास्तव म्हणजे वस्तुरूप अस्तित्व. पण त्या मी असण्याला काही अर्थ नव्हता, आकार नव्हता. पण तरीही मी होतोच ना? तर हा मी त्यावेळी, त्या काळात आणि स्थळात (time & space) एक भास होतो. एक बिंब होतो.

आईच्या उदरात मी गर्भ म्हणून जेव्हा वास्तव झालो, मला आकार आला....पण तरीही मी जगाच्या दृष्टीने मी निराकार होतो....निरर्थक होतो.....मग मी कोण होतो? गर्भ म्हणून माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय होतो? मी गर्भ....हा माझ्या आई-वडिलांच्या गुणसूत्रांचा आविष्कार होता. आई-वडील स्वत: कोण होते, माझ्या गर्भधारणेत? आई-वडील गुणसूत्र रूपाने भास होते, दोन बिंबे होती आणि मी तेव्हा ह्या भासांचा आभास होतो, प्रतिबिंब होतो.
थोडक्यात, मी हा विशिष्ट काळात आणि स्थळात (time & space) मुलत: भास किंवा आभास, बिंब किंवा प्रतिबिंब असतो. हे विश्व म्हणजे मुळात भास आहे, माया आहे.....असे वेदांनी म्हणले आहे. कारण विश्वाचा निर्माता आकाशगंगा आहे....ह्या आकाशगंगेत अनेक विश्वे, ब्रम्हांडे आहेत.....पण जो पर्यंत त्यांना स्वतंत्र वस्तू रूपाने अस्तित्व नाही, आकार नाही....तोपर्यंत ही सर्व विश्वे भासमय आहेत.
अशा प्रकारे मी हा भास आहे. तर मग मी-माझे-मला, तुझे-तुझ्यासाठी-तुला हा सर्व ह्या आभासाचा पसारा आहे....म्हणून माझे व तुझे हा संकीर्ण आभास आहे. वेदा पंडीत म्हणते, माझा विस्तार म्हणजे माझेपण आणि तू-तुझेपण आहे....हे एकमेकांवरील थर आहेत......म्हणून ते आभास आहेत......मी हा मुळात भास आहे, हे मला जाणवते....ही निर्गुणावस्था आहे. निराकार...मला आकार नाही, रूप नाही.....ही जाणीव म्हणजे विदेहावस्था आहे. अध्यात्मामध्ये ह्या अवस्थेला, निद्रा ह्या अवस्थे पलीकडील तुर्यावस्था म्हणतात. झोप-निद्रा-सुषुप्ती इ ह्या तात्कालिक म्हणजे स्थळ-काल (time & space) सापेक्ष अवस्था आहेत. तुर्यावस्था मात्र स्थळ-काळ सापेक्ष नसली तरी निर्विकल्प म्हणजे संकल्प, इच्छा, अपेक्षा नसताना घडणारी एक अवस्था आहे. आध्यात्मशास्त्रात ह्या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. समाधी म्हणण्याचे कारण असे की ह्या अवस्थेत मी ची जाणीव असली तरी मी देह, मी शरीर हे भान लुप्त झालेले असते. समाधी अवस्थेत शरीर काष्ठवत होऊन गेले, तरी त्यात प्राण असतो......पण तो चैतन्य रूपाने नसतो. प्राण हा मुळात चैतन्य आहे. पण त्याला शून्यावस्थेत स्थिर राखणे व जपणे.....ही योगविद्या आहे. योगीजन ती आत्यंतिक, खडतर, अखंड, आणि निरंतर साधनेने साध्य करू शकतात.
ह्या पलीकडील अवस्था म्हणजे सविकल्प समाधी.....ज्ञानेश्वर माऊलीनी घेतलेल्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. कारण त्यांनी समाधी घेण्याचा संकल्प केला व विधिवत समाधी अवस्थेत, काळ-स्थळ सापेक्ष असा, प्रवेश केला व देहत्याग केला. मी भास असून ह्या भासाला मी पाहतो...तेव्हा तो माझ्या अंत:करणात प्रतिभास-आभास-प्रतिबिंब इ चे अनुबंध असतात. ह्या संकीर्ण अशा भास-आभास-बिंब-प्रतिबिंब असलेल्या जगाला सोडून निर्द्वंद्व होणे.....म्हणजे द्वन्व्दातीत होणे....म्हणजेच अद्वैत होणे.....विश्वमय होणे....विश्वात्मक होणे.
द्वैत म्हणजे मी आणि माझेपण, मी आणि तू, मी आणि जग, सुख आणि दुख:, स्त्री आणि पुरुष, देव आणि दानव, देव आणि माणूस, सजीव आणि निर्जीव इ इ द्वंद्वे आहेत. ह्या द्वैतातून मुक्त होणे...हे अद्वैत आहे आणि हाच अद्वैताचा सिद्धांत आहे.
सगुण आणि निर्गुण हे सुद्धा एक द्वंद्व असून ते एकत्र संकीर्ण स्वरुपात जेव्हा साक्षात्कार पावते, तेव्हा अद्वैताचा अनुभव येत असतो. मुळात सगुण ह्याचा अर्थच मुळी वस्तुरूपता असा आहे. सगुण हा दृश्य आहे, देह किंवा शरीर आहे. म्हणून त्याला म्हणजे शरीर रुपी आत्म्याला हे जग सगुणात्मक आहे, असे जाणवते. पण जेव्हा मी हा निर्गुणात्मक असतो, अभिव्यक्ती असतो किंवा समष्टी असतो, तेव्हा माझा भवताल, आजूबाजूचे जग निर्गुण आहे, असे वाटू लागते......ही नेणीव आहे.... जगाची जाणीव ही नेणीव, शून्यत्व, किंवा माया वाटू लागते. भवताल नेणीवेत जातो, निराकार होऊन जातो, आणि मी-पणा हा त्यामध्ये विलय पावला तरी ह्या विलयातही माझे साक्षित्व मला जगासह, भवतालासह पाहता येते. भासांतर्गत भास म्हणजे प्रतिभास किंवा भास आणि अभास हे एकमेकांवरील थर किंवा स्थर किंवा पातळी मला दिसू लागतात.....हे साक्षित्व आहे. ह्यालाच निर्गुणाचा साक्षात्कार म्हणतात.
मी म्हणजे कोण? ह्याचे उत्तर देताना पतंजलीनी म्हणले आहे की हा मी म्हणजे बुद्धी-मन-चित्त आणि अहंकार ह्यांचा जोड complex आहे. ह्यातील अहंकार हा बुद्धी-मन-चित्त ह्यांना लपेटून घेणारा अत्यंत सूक्ष्म असा थर आहे. त्यामुळे अहंकाराचा भेद बुद्धी-मन-चित्त ह्यांच्या सहाय्याने करता येत नाही. त्यासाठी पतंजलींनी पातंजल योगदर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजेच असं की योगसाधनेने अहंकाराचा वेढा दूर करता येतो. ह्यावरून मी चा संबंध भास-आभास ह्या प्रभाव क्षेत्राखाली कसा येतो, हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे, अद्वैत सिद्धांतामध्ये मी चे स्थान आणि प्रभावक्षेत्र किती गुंतागुंतीचे आहे, हे लक्षात येते.
अद्वैत सिद्धांत हा विषय समजायला अवघड आहे. म्हणून ह्या विषयाचे निरुपण असंख्य संतांनी, विचारवंतांनी आणि तत्वज्ञानी लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून केले आहे. भगवत गीता, गीतेवरील शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वरांपासून ते आजच्या ओशो, जे. कृष्णमुर्ती, अनिरुद्धबापू आदि सद्गुरूंनी भाष्ये लिहिली आहेत, केली आहेत. तरीही ह्या विषयाचा आवाका आणि आकलन अपूर्ण आहे.