Saturday, 27 July 2024

प्रेम आणि स्वातंत्र्य

 प्रेम आणि स्वातंत्र्य ह्यांचा घनिष्ठ संबंध आहे. प्रेम बंध असा एक शब्द आहे. ह्यामध्ये प्रेमाचे बंधन हा भाव आहे की प्रेम हेच बंधन आहे ?  प्रेम ही एक अशी संवेदना आहे, जी मुळात भावात्म आहे. बंध हा शब्द बंधन ह्या नकारात्मक भावातून आलेला आहे. कारण बंध म्हणजे बांधण्याचे साधन. ह्यावरून असे दिसते की प्रेम बंध हे एक भावात्म नाते आहे. कारण प्रेम ही वस्तू नसून अमूर्त अशी भावनात्मक वृत्ती आहे. 

     स्वातंत्र्य ही संवेदना नसून वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्य ही वस्तुस्थिती असल्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की  स्वातंत्र्य कोणत्या संदर्भात वस्तुस्थिती आहे ? स्वातंत्र्य कोणापासून हवे आहे ? विशिष्ट व्यवस्था, परिस्थिती, माणसे आणि मनाच्या - शरीराच्या व्यथा...हे सर्वसाधारणपणे स्वातंत्र्याचे वैरी आहेत. मनोबुद्धी जे निर्णय देते, ते पाळणे अथवा न पाळणे, हा पर्याय असतो, तेव्हा जे स्वातंत्र्य उपलब्ध असते; असे स्वातंत्र्य संकुचित करणारे घटक म्हणजे विशिष्ट परिस्थिती, माणसे, आणि शारीरिक दुर्बलता, मानसिक दुर्बलता किंवा आर्थिक क्षमता. थोडक्यात,  मी आणि माझा भवताल हे स्वातंत्र्याचे वास्तव आहे आणि त्या संदर्भात कोणत्याही कारणामुळे मी नाराज होणे, दु:खी होणे, हतबल होणे, पराभूत होणे, इत्यादी घडणे....हे वास्तव आहे. हे स्वातंत्र्य व्यक्तिगत आहे. 

        पण आपण जेव्हा समूहाचा किंवा  समाजाचा विचार करतो, तेव्हा स्वातंत्र्य सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक अशा विविध परिस्थितीमध्ये वास्तव असते. ह्या वास्तवाला धक्का देणारी कोणतीही व्यवस्था बंधनात्मक असते; स्वातंत्र्याचा संकोच करणारी किंवा स्वातंत्र्य मर्यादित करणारी व्यवस्था असते. 

       प्रेम आणि स्वातंत्र्य ह्यांचा विचार करताना एक मूलभूत तत्त्व मान्य केले पाहिजे की प्रेम अनिर्बंध नसते. प्रेमाला बंधने असतात किंवा असावीत, हे तत्त्व मान्य केले, तर स्वातंत्र्याचा प्रश्न विचारात घेता येतो. निर्बंध म्हणजे विशिष्ट अशी बंधने. बंधने अशी नसावीत की ज्यामुळे व्यक्ती विकास संकुचित होतो किंवा होऊ शकतो. व्यक्ती विकासाला बंधने आणणारा कोणताही विचार किंवा कोणतीही कृती स्वातंत्र्याचा लोप करणारी असते. कारण स्वातंत्र्याचा मूलभूत उद्देश व्यक्ती विकास हाच आहे. पण व्यक्ती विकास सुद्धा अनिर्बंध असू शकत नाही. अनिर्बंध ह्याचा अर्थ कोणत्याही बंधनांचा, मर्यादांचा अभाव. असे वर्तन स्वैराचारी असते. ज्या वर्तनामध्ये कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि नैतिक न्यायाचा अभाव आहे, असे वर्तन पूर्ण स्वातंत्र्याचा आविष्कार आहे, असे म्हणायचे का ? म्हणजे ह्याचा अर्थ असा की अनिर्बंध जसे प्रेम असू शकत नाही तसेच स्वातंत्र्यही अनिर्बंध असू शकत नाही. प्रेम आणि स्वातंत्र्य एकमेकांना पूरक असे मानवी विकासाचे, राजकीय संहितेचे आणि आर्थिक उदारीकरणाचे मुद्दे आहेत. ज्या प्रेमात स्वातंत्र्याला वाव नाही, त्या प्रेमाचे रूप अविश्वासू, संशयग्रस्त आणि धोकेदायक होऊन जाते. प्रेम विश्वासाच्या मूलभूत पायावर दृढमूल असलेले आदर्श वास्तव आहे. जिथे विश्वास नाही, तिथे विश्वासघात होण्याची भीती असते. स्वातंत्र्य हे वास्तव भय विरहित, निर्भय आणि आत्मविश्वास विकसित करणारे मानवी नात्याचे निरूपण आहे. म्हणून प्रेमामध्ये स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यामध्ये प्रेम असणे, अनिवार्य आहे.

***********