Sunday, 28 September 2025

एका शापित बापाची व्यथा

 

   Let there be a death

   Soon enough as a boon.

   Because life is

   More than a curse to me.

          एखाद्या कुटुंबात बापाची अवहेलना खलपुरूष म्हणून केली जाते. तेव्हा आठवते, नियती क्रूर असते. शापित माणूस म्हणून जगणे....ही त्या पित्याची अवहेलना असते. मग काळीज पिळवटून टाकणारे हे गाणे सत्यार्थ शिकवून जाते.

         लळा जिव्हाळा शब्दच खोटे

         मासा माश्याला खाई.

         कुणी कुणाचे नाही, राजा.

         कुणी कुणाचे नाही.

पिसे तनसडी काड्या जमवी

चिमणी बांधे कोटे.

दाणा दाणा आणून जगवी

जीव कोवळे छोटे.

बळावता बळ पंखामधले 

पिल्लू उडुनी जाई.

              रक्तही जेथे सूड साधते 

              तेथे कसली माया?

              कोण कुणाची बहीण

              भाऊ पती पुत्र वा जाया.

             सांगायची नाती सगळी 

             जो तो अपुले पाही.

कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही.

                       

Friday, 8 August 2025

अपरिग्रह -योग साधनेतील पांचवा यम

धर्म म्हणजे काय, हे साने गुरुजींनी अत्यंत सुंदर शब्दांत सांगितले आहे. ते म्हणतात,
धर्म म्हणजे,
(१) निरपेक्ष प्रेम
(2) उपेक्षितांची सेवा
(३) अनासक्त व अपरिग्रह जीवनाचे आचरण
(४) दान, समता, ममता, करुणा आणि मानवता
(५) धर्मातून नैराश्याचा नाश होतो.
(५) धर्मातून अंधाराचे रुपांतरण प्रकाशात होते.
(६) धर्मातून अनाथांना आधार मिळतो.

           ह्यापैकी सर्व धर्म संकल्पना आहेत. कारण धर्म म्हणजे आपण जी वर्तणूक करतो, जसे वागतो, जसा आचार-विचार करतो....तो माझ्या दृष्टीने व्यष्टीनिष्ठ धर्म आहे.
           ह्यापुढील धर्माची पातळी आहे, सामाजिक परंपरा, आग्रह-निग्रह आणि सनातन असण्याचा हट्टीपणा, वेडेपणा आणि अतिरेकीपणा.
धर्माच्या संदर्भात, अपरिग्रह ही संज्ञा आणि संकल्पना समजून घ्यावी लागेल. अपरिग्रह हा योगसाधनेतील पांच यमापैकी पांचवा यम आहे. 

Sunday, 11 May 2025

घर म्हणजे काय?

 

(१) घराचे माझेपण म्हणजे एका घरात रहाणे, नव्हे.

घराचे घरपण सांभाळणारी माणसं एकत्र रहाणे, म्हणजे घर असते. 

(२)घराला घरपण बाईमुळे येते. ही बाई बायको नसली तरी तिचे घरात वावरणं, घरातली काम करणं, साफसफाई करणे... हे सर्व पुरुषही करू शकतात. पण स्त्रीने हीच केलेली काम त्याच कामात सौन्दर्य निर्मिती करते....तिच्या हाताला आणि तिच्या श्वासोच्छवासातच एक घरपणाचा सुगंध असतो, जो त्या घराचा वास्तुपुरुष जागृत करून त्याच्या जाणिवेच आणि मानवी अस्तित्वाचे कुंजन स्वरमय करून टाकतो.

ह्यामुळे स्त्री म्हणजे घराचे अस्तित्व आहे...तर पुरुष म्हणजे घराचे वास्तव आहे. स्त्री-पुरुष किंवा स्त्री-स्त्री आणि पुरुष-पुरुष ह्यांच्या मैत्र भावात घर हा नातेबंध असतो किंवा अनुबंध असतो...

स्त्रीचे स्त्रीपण किंवा स्त्रीत्व घर ह्या संकल्पनेशिवाय साकार होत नाही.

मानवी उत्क्रांती स्त्रीच्या अस्तित्वामुळे झाली आहे.

 (३) Home is statement of your life.

-Ayan Rand.

       घराला आपण वास्तू पुरुष म्हणतो. घर म्हणजे केवळ राहण्याचे ठिकाण नाही किंवा वस्तू नव्हे. घर म्हणजे एक कुटुंब, एक जीवन घडविणारी वास्तू, एक जीवनप्रवासातील विश्राम धाम, मुलाबाळांची जडणघडण करणारी जननी आणि संस्कारक्षम वसती गृह आहे.

       माझ्या घराची व्यवस्था, निगा आणि सौन्दर्य ही माझ्या मनाच्या व्यवस्थेचं आणि आरोग्याचे सन्निध्यान आहे. घरातील वातावरण, अतिथ्य आणि सहवास-साहचर्य ह्या माझ्या मनाच्या प्रतिमा आहेत,प्रतीक आहेत. मी वागतो कसा, जगतो कसा आणि स्वतःचे व्यवस्थापन कसा करतो, ह्याचे प्रतिबिंब म्हणजे माझे घर आहे.

       घरा बाहेर असणारा मी कुठेही गेलो, तरी माझ्या घराशी मी सदैव एका अनामिक, अलौकिक आणि नि:संदिग्ध नात्याने जोडलेला असतो, निगडीत असतो. कारण तिथे माझेपण, माझेपणाचे अस्तित्व आणि माझे कर्तृत्व संचित झालेले आहे.

        माझ्या जीवनाचे प्रत्येक अंश ह्या घराच्या वास्तव्याने  समृद्ध झालेले आहेत. माझ्या मनाचे, बुद्धीचे कौटुंबिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संविधान माझ्या घराने घडविले आहे. माझ्या शिक्षणाचे आणि कर्तृत्वाचे धडे ह्या घराने साक्षीभावाने पाहिले आहेत. माझी जीवन निष्ठा, प्रामाणिकपणा आणि इतर सर्व सद्गुणांचे संवर्धन ह्या घराने केले आहे.

            माझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ह्यांना घराचा अवकाश हा संदर्भ आहे. माझे बालपण हा भूतकाळ झाला असला तरी तो ह्या घराच्या कणाकणात वास करून राहिलेला आहे आणि माझी स्वप्ने साकार होताना माझे घर हा माझा साथीदार होता. आजचे वास्तव, वर्तमान हे माझे समर्पण, प्रार्थना, पूजा आणि मांगल्य असून त्यांचे परिशीलन माझे घर हेच आहे.

          ' प्रेमा, काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला" हेच मी माझ्या घराला म्हणतो. माझे सदभाग्य, दुर्भाग्य, सुखदुःख, संकटे-आपत्ती इ इ सर्वाचा विधाता माझे घर आहे.

 

                      *************

Monday, 5 May 2025

वाचन - माझा दृष्टीकोन (२)

 

         वाचन हे एक शिक्षितांचे भाषिक माध्यम आहे. वाचन निर्माण होण्यापूर्वी एक लेखक म्हणजे लिहिणारा असावा लागतो. लेखक स्वत:साठी लिहित असला तरी त्याला वाचक हवा असतो. ह्यादृष्टीने, पाहिलं तर वाचन ही प्रक्रिया असून ती लेखकाला वाचकाशी जोडत असते.

     वाचन कोणत चांगलं....ह्याच उत्तर नक्कीच देता येते. पण वाईट वाचन असू शकत नाही. तसेच, वाईट लेखक किंवा लेखन कोणत, ह्याचे उत्तर व्यक्तीसापेक्ष आहे. कारण जे चांगलं नाही, ते वाईट....असं म्हणता येत नाही. चांगलं काय ह्याबद्दल एकमत झालं नाही तरी कोणत्याही लेखनाला किंवा लेखकाला वाईट ठरवता येत नाही.

      मिलिंद बोकील म्हणतात “ चांगलं साहित्य म्हणजे काय, ह्याची एक आंतरिक जाण असावी लागते.” हेच सांगताना सुबोध जावडेकर म्हणतात,” साहित्यामुळे जाणिवेच्या कक्षा विस्तारतात.” ज्ञानेश्वर मुळे म्हणतात “ यातून सामाजिक जाणिवेचा अंकुर फुटला.” डॉ हमीद दाभोलकर म्हणतात “ साहित्य आणि त्याच्यामधून आलेली अनुभूती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर परत परत भेटत राहते.” विनोद शिरसाट म्हणतात,” माझे सामाजिक भान वाढवणारे, जाणिवांच्या कक्षा रुंदावणारे आणि सम्यक सकारात्मक दृष्टीकोन आकाराला देणारे असे (ते वाचन) होते.”

      चांगल्या लेखनाचे गुणधर्म चांगल्या लेखनात उतरतात आणि चांगले साहित्य आकाराला येते. असे साहित्य चांगले वाचन घडवते. अशा प्रकारे, चांगले वाचन म्हणजे काय ह्याचे आकलन प्रस्तुत १६ लेखकांच्या लेखांतून प्रतीत झाले आहे.  

      चांगले लेखन आपल्याला काय देते, हा दुसरा मुद्दा आहे. किंबहुना अशा चांगल्या लेखनातून निर्माण झालेले साहित्य ही चांगल्या वाचनाची सामुग्री आहे.

चांगले वाचन काय देते, याची अगदी यादीच करायची झाली तर खूप मोठी होईल. पण प्रस्तुत सर्व लेखकांच्या मते वाचन ही विविध स्तरांवर आणि स्थरांवर माणसाला समृद्ध करणारी ज्ञान प्रक्रिया आहे. मिलिंद बोकील ह्यांना वाचनाने आत्मशुद्ध साहित्याची जाण झाली आणि वान्गमयीन दृष्टीकोन तयार झाला. राजन गवस ह्यांना लेखनाची उर्जा प्राप्त झाली. आसाराम लोमटे ह्यांना वास्तवाला घडवणारे घटक कोणते आहेत ह्याचा शोध वाचनातून घडला. वाचनामुळे आपला स्वभाव बदलला, संयत झाला; असे ज्ञानेश्वर मुळे म्हणतात. तर शिल्पा कांबळे म्हणतात, “ माझ्या सांस्कृतिक दारिद्याच्या काळात (वाचनाने) टोनिकचे काम केले....” त्या पुढे म्हणतात,”परिस्थितीचे रडगाणे बाजूला पडले....” वाचन हे एक वैचारिक उन्नयन आहेच; त्यापलीकडे वास्तवतेला, विपरीत परिस्थितीला बाजूला सारून वाचन कृतिशील उर्जा पुरवते. शिल्पा कांबळे ह्याही पुढे जाऊन म्हणतात, “कवितेबरोबर माझे जैविक नाते आहे, हे मला कळले.”

        वाचनामुळे घडलेली अत्यंत ठळक क्रांती म्हणजे स्त्रीवाद जाज्वलाने पुढे आला. सानिया म्हणतात,” एक तरुण स्त्री म्हणून काय मानसिक भूमिका असू शकते, याचं स्पष्ट भान यायला सुरुवात झाली. स्त्रीचे कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय कर्तृत्व वाचन संस्कारामुळे आक्रमकपणे पुढे आले.” सानिया पुढे म्हणतात, ”आपल्याला कसं रहायला आवडतं आणि त्यामागे काय दृष्टीकोन असू शकतो, ते स्पष्टपणे उमगायला लागलं.” बहुतेक सर्व लेखकांनी हे आवर्जून मांडले आहे की जे माहित होत, कळत होत, जाणीवेच्या परिप्रेक्षात होत, पण जेव्हा वाचन सखोल चिंतन-मनन ह्या अवस्थेतून पार झालं, तेव्हा ज्या जाणीवा धूसर होत्या; त्या वाचनामुळे स्पष्ट झाल्या आणि स्वत:चे व्यक्तीत्व उजळून गेलं आहे; ह्याची प्रखर जाणीव झाली.                 

        पुस्तक ही वस्तू आहे, तर वाचन ही मानवी मनो-धर्माची संजीवन परिस्थिती आहे. पुस्तक वाचले, तरच पुस्तकाची अपेक्षा पूर्ण होत असते; म्हणून पुस्तकाला माणसाची गरज असते. पुस्तक माणसासाठी आहे, कारण माणूस पुस्तका शिवाय अपूर्ण आहे. पुस्तक आणि आपण जोडले जाणे, ही भौतिक वस्तुस्थिती नसून, हे जोडले जाणे, ही ऐतिहासिक परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीमुळे मौखिक परंपरेतून आपण वाचन संस्कृती विकसित केली आहे.

       पुस्तक वस्तू आहे, तर वाचन ही परिस्थिती सापेक्ष घटना आहे. चांगली परिस्थिती वाचन संस्कृतीचा परिपोष करते. पुस्तक हे वाचन संस्कृतीचे केवळ साधन नसून मानवी संस्कृतीचे अवच्छेदक लक्षण आहे. कारण वाचनामुळे आपल्या विचारांना विशिष्ट दिशा मिळते. थोडक्यात असे की वाचन हा मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर होणारा संस्कार आहे. वाचन संस्कृती म्हणजे वाचनामुळे निर्माण होणारे सामाजिक उन्नयन होय. समाज मन प्रगल्भ होणे, हा वाचन संस्कृतीचा प्रभाव आहे.

       संकल्प गुजर ह्यांनी वाचनामुळे विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत विकसित केली आहे. ते म्हणतात, “ कोणत्याही विषयावर घाईघाईने मत न बनवता थोडे थांबावे, काही जवळच्या मित्रांशी चर्चा करून मगच निष्कर्ष काढावा.” पुढे ते म्हणतात,” माझा दृष्टीकोन आणि माझी विचारप्रक्रिया एकाच वेळी दोन कक्षांमध्ये फिरते.” हे दोन कक्ष म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा विचार आणि सद्य परिस्थितीमधील राजकारण. वाचनाने नेमके काय घडले आहे, ह्याचा सारांश संकल्प गुजर ह्यांनी मांडताना तीन मुद्दे अधोरेखित केले आहेत.

(१)मला जे वाटते आहे, ते इतरांपेक्षा वेगेळे आहे.(२) आवडत्या लेखकाच्या लेखन कर्तृत्वाची पुरेशी ओळख झाल्यामुळे त्या लेखकाकडून नवीन काही मिळणार नाही, हे कळू लागले आहे.(३) एखादी गोष्टीचे कथन कसे आहे, ह्याला महत्व न देता, हे कथन तसे का आहे; ह्याचा शोध घेणे.

     वाचनाचेच नव्हे तर वक्तृत्वाचे परिणाम म्हणजे दीर्घकालीन संस्कार असतो. हे स्पष्ट करताना विवेक सावंत गाडगेबाबांनी सांगितलेल्या कथांबद्दल म्हणतात, “ गाडगेबाबांमुळे मला त्या सगळ्याकडे करुणेने पण चिकित्सकपणे पाहण्याची वेगळीच दृष्टी मिळाली. तिला मानवतावादी दृष्टी म्हणतात.” विवेक सावंत ह्यांनी वाचन आणि भाषा ह्यांचे परस्पर नाते अत्यंत सूक्ष्मपणे तपासले आहे. ते म्हणतात,” आपल्या मराठी भाषेत समृद्ध अभिव्यक्तीची किती जबरदस्त शक्ती आहे, शब्दप्रभुत्व – भाषाप्रभुत्व कशाला म्हणतात आणि सर्जनशीलतेची उंच उंच शिखरे कशी असतात, हेही समजले.” विवेक सावंत ह्यांना वाचनाने दिलेले वरदान म्हणजे परिवर्तन चळवळीमध्ये सामील होणे. ते म्हणतात, “ सत्ताकारणाहून भिन्न असलेले राजकारण “ म्हणजे काय हे वाचनानेच त्यांना अवगत झाले. सर्वात महत्वाचे दान म्हणजे “स्वप्ने बघण्याची ताकद आणि विचार करून बंड करण्याचे तत्वज्ञान” होय. कारण स्वत: काहीतरी लिहित राहणे, समर्थ, सक्षम शब्दांत मांडणे, ही एक कला आहे आणि वाचन संस्कृतीचे हे एक फलित आहे, किंबहुना लिहिणे हा एक आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, साहित्यिक सेवेचा गौरव आहे.

          वाचून शिकणे आणि ऐकून शिकणे ह्यामध्ये जे अंतर आहे, ते गुरू-शिष्य नात्याचे आहे. वाणी हे विद्येचे माहेर आहे; तर वाचन हे तिचे सासर आहे!

ती दोन्हीकडे सुखाने नांदते; पण तिचा अधिक सहवास सासरी असतो !

ज्ञान हे ऐकून मिळत असते. पण प्रज्ञा मात्र सखोल अभ्यासाने म्हणजे मुख्यतः वाचूनच प्राप्त होत असते. संशोधन हा ज्ञान प्राप्तीचा महत्वाचा मार्ग आहे. संशोधन करून प्राप्त झालेल्या ज्ञानालाच प्रज्ञा किंवा प्रतिभा म्हणतात.

      अखेर सुरेश द्वादशीवार ह्यांचे विचार उधृत करून शेवट करतो.

 “जे वाचल्याने माणसांच्या विचारांना चालना मिळते, ते खर वाचन. एखाद्या घटनेचं -संकल्पनेच आकलन करून घेण, विश्लेषण करण, ही वैचारिक कृती मुख्यत: वाचनामुळेच होते. पण वैचारिक कृती करणा-या माणसांकडून प्रत्यक्ष कृतीचा आग्रह धरणे, म्हणजे शाळा-कॉलेजच्या अध्यापकाकडून तो शिकवत किंवा देत असलेल्या विचारांची त्यानेच प्रतिपूर्ती करावी अशी अपेक्षा करणे होय. अशा माणसांचे व त्यांच्या विचारांचे मूल्यमापन व्यावहारिक यशापयशावर ठरवू नये."

        "सखोल वाचन करण, ही पत्रकार, प्राध्यापक, साहित्यिक, विचारवंत लोकांची गरज असते. पण ह्या मंडळींनी आपल्या वाचनाचा उगाचच दबदबा निर्माण करू नये, इतरेजनांना तुच्छ लेखू नये. शक्य तितकं स्वत:ला, स्वत:च्या मी-पणाला ,अहंकाराला लपवावे; आपल्या सखोल वाचन असण्याचा तसेच खूप ग्रंथ संग्रह असण्याचा जास्त प्रचार करू नये. असे वागण्यातच आपले शहाणपण आहे, ह्याची मनोमन खात्री करून समाजात वावरावे.”

- आधार: सुरेश द्वादशीवार- “थर्ड अंगल”(Third Angle) मधून.

 

                 ************************

              

            

 

Tuesday, 29 April 2025

वाचन -माझा दृष्टीकोन

 

वाचन – माझा दृष्टीकोन (१)

 (१)आज जागतिक पुस्तक दिन आहे. पुस्तक दिन ही संकल्पना प्रकाशक मंडळींच्या आर्थिक विचारातून आलेली आहे. आपल्याला वाचन संस्कृती हा केवळ दिवस नको; जीवन शैली हवी आहे. वाचन ही विचारांना चालना देणारी, चिंतन - मनन प्रक्रियेसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. पुस्तक ही वस्तू आहे... पुस्तक हे एक  symbol आहे. प्रतिक आहे. तर वाचन हे मनोबुद्धी विकसित करणारे, संस्कार सक्षम, असे मानवी तत्वज्ञान आहे. ज्ञानार्जन ह्या प्रक्रियेत वाचन हा महत्त्वाचा घटक आहे. पुस्तक ही वस्तू आहे, तर वाचन ही मानवी मनो - धर्माची संजीवन परिस्थिती आहे. पुस्तक वाचले, तरच पुस्तकाची अपेक्षा पूर्ण होत असते; म्हणून पुस्तकाला माणसाची गरज असते. पुस्तक माणसासाठी आहे,कारण माणूस पुस्तका शिवाय अपूर्ण आहे. पुस्तक आणि आपण जोडले जाणे, ही भौतिक वस्तुस्थिती नसून, हे जोडले जाणे, ही ऐतिहासिक परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीमुळे मौखिक परंपरेतून आपण वाचन संस्कृती विकसित केली आहे.

       पुस्तक वस्तू आहे, तर वाचन ही परिस्थिती सापेक्ष घटना आहे. चांगली परिस्थिती वाचन संस्कृतीचा परिपोष करते. पुस्तक हे वाचन संस्कृतीचे केवळ साधन नसून मानवी संस्कृतीचे अवच्छेदक लक्षण आहे. कारण वाचनामुळे आपल्या विचारांना विशिष्ट दिशा मिळते.

      थोडक्यात, पुस्तक दिनाचे महत्व प्रतिकात्मक असून, पुस्तकांचे वाचन हे महत्त्वाचे ज्ञानोपासनेचे संवाहन आहे.

(२) वाचन हा मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर होणारा संस्कार आहे. वाचन संस्कृती म्हणजे वाचनामुळे निर्माण होणारे सामाजिक उन्नयन होय. समाज मन प्रगल्भ होणे, हा वाचन संस्कृतीचा प्रभाव आहे.

  हल्ली समाज माध्यमांच्या प्रभावामुळे पुस्तक - ग्रंथ वाचन कमी झाले असले, तरी समाज माध्यमांवर होणारे काही लेखन नक्कीच दर्जेदार आहे आणि ह्याचे संस्कार तितकेच महत्त्वाचे आहेत; जितके साहित्याचे आहेत, असे मला वाटते.

(३) भरपूर वाचन-मनन-चिंतन करणारा प्रत्येक वाचक हा इथे फेसबुक वर केवळ Like देत असला तरी त्याचे महत्व एक सुजाण वाचक म्हणून कमी होत नाही. कारण वाचन संस्कृतीचे संवर्धन प्रत्येक वाचक आपल्या क्षमतेनुसार करीत असतो.

        प्रतिसाद-प्रतिक्रिया देणे, ही एक शब्दरूप होण्याची क्षमता आहे. प्रत्येक वाचकाची ती एक अभिव्यक्ती असते. कारण वाचन ही एक क्रिया असते, तर अभिव्यक्त होणे, हे आविष्करण असते.

        ह्याशिवाय, स्वत: काहीतरी लिहित राहणे, समर्थ, सक्षम शब्दांत मांडणे, ही एक कला आहे आणि वाचन संस्कृतीचे हे एक फलित आहे, किंबहुना लिहिणे हा एक आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, साहित्यिक सेवेचा गौरव आहे.

(४)भाषण करायचे असते. वाचायचे नसते. वाचन हा कार्यक्रम होऊ शकत नाही. अभिवाचन हा कार्यक्रम आहे आणि असतो. वाचन करताना शब्द वाचले जात असतात, सांगितले जात नाहीत. भाषण किंवा वक्तृत्व हे एकतर्फी संभाषण असते, संवाद साधणे असते. शोध निबंध वाचले जातात, कारण संशोधन हा तांत्रिक विषय आहे आणि विषयाची तांत्रिकता हा विशेषज्ञ लोकांचा प्रांत आहे. सार्वजनिक किंवा साहित्यिक कार्यक्रमात वाचन अपेक्षित नसते. वाचताना लेखक सुद्धा स्वत:चे शब्द समजून घेऊ शकत नाही, इतक्या जलद गतीने वाचन होत असते. कविता सुद्धा नुसती वाचली गेली, तर बहुसंख्य लोकांच्या डोक्यावरून जाते. कारण कवितेतील शब्द आशयासह समजून घ्यायचे असतात. त्यामुळे कविता समजून घ्यावी लागते. कविता नुसती वाचून समजणे, कठीण आहे. पण ती नीट समजून उमजून वाचली तर इतरांना ती समजण्यास कठीण पडत नाही. 

      तुम्हाला  वक्तृत्व गुण विकसित करायचा असेल, तर  केवळ मुद्दे पुढे ठेवून बोलले पाहिजे. वक्तृत्व हा गुण आहे आणि कला आहे. हा गुण, ही कला विकसित करावी लागते.

(५) वाचन ही संस्कृती आहे की अभ्यास आहे?

वाचन हा विविध जीवन कथांचा संग्रह आहे. जीवन संबंधित जे जे घडतं, ते केवळ कथानक नसतं. त्यातून तत्कालीन सामाजिक, कौटुंबिक आचार विचार ह्यांचे ज्ञान होते...हे ज्ञान म्हणजेच संस्कृती...

वाचन आपलं जीवन घडवत नसतं. पण वैचारिक दृष्ट्या सर्व समावेशक प्रश्न हाताळण्याचे काही मंत्र, काही दिशा दिग्दर्शन करण्याचे सामर्थ्य निश्चित प्रदान करते.

म्हणून वाचन हा अभ्यास आहे, शाळा महाविद्यालय...आणि ह्यापेक्षा महान असा जीवन हा अभ्यास आहे.

(६) वाचन संस्कृती ह्याचा अर्थ वाचनाने समृद्ध होऊन सुसंस्कृत होणे.

    समाज माध्यमांमुळे हल्ली बहुसंख्य लोक वाचन टाळतात. चार-पाच ओळींचा एखादा परिच्छेद.....ह्या पलीकडे वाचनाचा कंटाळा आणि वेळ नाही, पुस्तके महाग, दर्जेदार पुस्तके नाहीत, साहित्यिक सुमार दर्जाचे इ इ सबबी पुढे करतात.

               पुरेसे वाचन गांभीर्य नसल्यामुळे काय होते ?

माणसं अपु-या, फुटकळ माहितीच्या आधारावर तावातावाने बोलतात, लिहितात...सनसनाटी विधाने बिनधास्त करतात...ऐकीव माहितीच्या तुकड्यांवर आपली मते ठामपणे बनवितात; वितंड वाद घालीत असतात. संकुचित दृष्टीकोनाची बनतात. दुस-यांच्या मतांबद्दल खुश्याल अनादर व्यक्त करतात. असं असूनही आपल्या अज्ञानाबद्दल किंवा वाचन नसल्याबद्दल निर्लज्य असतात व जे अभ्यासू, गंभीरपणे मते मांडतात...त्यांच्याबद्दल अनुद्गार काढतात.... ' बुद्धिवादी ' म्हणून त्यांची टिंगलटवाळी करण्यात खूष राहतात !

(७) वाचून शिकणे आणि ऐकून शिकणे ह्यामध्ये जे अंतर आहे, ते गुरू-शिष्य नात्याचे आहे. वाणी हे विद्येचे माहेर आहे; तर वाचन हे तिचे सासर आहे !

ती दोन्हीकडे सुखाने नांदते; पण तिचा अधिक सहवास सासरी असतो !

ज्ञान हे ऐकून मिळत असते. पण प्रज्ञा मात्र सखोल अभ्यासाने म्हणजे मुख्यतः वाचूनच प्राप्त होत असते. संशोधन हा ज्ञान प्राप्तीचा महत्वाचा मार्ग आहे. संशोधन करून प्राप्त झालेल्या ज्ञानालाच प्रज्ञा किंवा प्रतिभा म्हणतात.

 Listening is most comprehensive than reading.

However, for deeper understanding of knowledge, reading is most important.

   Difference between reading and listening is difference between teaching- learning and research- knowledge.

Intellect is still deepest level of knowledge... intellectual knowledge is a creation arising out of Mind-body complex.

(८) लेखन करणे, हे वाचन होण्यासाठी असते. त्यामुळे लेखन म्हणजे साहित्य, कला आणि भाषा कालबाह्य होत नसतात. जो पर्यंत वाचन संस्कृती कालबाह्य होत नाही, तो पर्यंत लेखन कालबाह्य होत नाही.

   सत्ताधीश मात्र इतिहास पुर्नलेखन सारखे राजकीय परिहास घडवून आणतात, तेव्हा सुद्धा मूळ लेखन, मूळ इतिहास कालबाह्य होत नाही. साहित्य आणि कला ह्यांचे अस्तित्व मानवी अस्तित्वाशी निगडित आहे. म्हणून साहित्य - कला शास्वत असे मानवी अनुबंध आहेत.

          कोणतेही लेखन कालबाह्य होत नसते. कालबाह्य ठरविले जाते!

(९) काही विद्वान लोकांना आपले वाचन, आपला अभ्यास वगैरे इतका दांडगा असतो, असे केवळ दाखविण्यासाठीच नव्हे तर दुसऱ्यांवर वार करण्यासाठी प्रदर्शित करण्याची इतकी हौस असते की आपण दुसऱ्यांना " पुरोगामी " म्हणताना स्वतः प्रतिगामी होतो, ह्याचे भान रहात नाही ! मग ही आपली गफलत लपविण्यासाठी " नव पुरोगामी" म्हणायचे !

   अशा राजकीय हिंदुत्ववाद्यांना मग इतर त्यांचे टोळीवाले साथ देताना विचारांची किंवा चर्चेची पातळी आणखी खाली आणून माझी चक्क वैयक्तिक निंदानालस्ती करताना द्वेषमूलक शब्दांची आतशबाजी सुरू करतात. मग माझ्या लक्षात येतं की ही तर विशिष्ट राजकीय पक्षांची ट्रोलिंग टीम आहे !! असो. तर असे गमतीशीर अनुभव येतात. तेव्हा... अशा लोकांची संगत नको रे बाबा !!

(१०) जे वाचल्याने माणसांच्या विचारांना चालना मिळते, ते खर वाचन. एखाद्या घटनेचं -संकल्पनेच आकलन करून घेण, विश्लेषण करण, ही वैचारिक कृती मुख्यत: वाचनामुळेच होते. पण वैचारिक कृती करणा-या माणसांकडून प्रत्यक्ष कृतीचा आग्रह धरणे, म्हणजे शाळा-कॉलेजच्या अध्यापकाकडून किंवा General Manager तो शिकवत किंवा देत असलेल्या विचारांची त्यानेच प्रतिपूर्ती करावी अशी अपेक्षा करणे होय. अशा माणसांचे व त्यांच्या विचारांचे मूल्यमापन व्यावहारिक यशापयशावर ठरवू नये.

            सखोल वाचन करण, ही पत्रकार, प्राध्यापक, साहित्यिक, विचारवंत लोकांची गरज असते. पण ह्या मंडळींनी आपल्या वाचनाचा उगाचच दबदबा निर्माण करू नये, इतरेजनांना तुच्छ लेखू नये. शक्य तितकं स्वत:ला, स्वत:च्या मी-पणाला ,अहंकाराला लपवावे; आपल्या सखोल वाचन असण्याचा तसेच खूप ग्रंथ संग्रह असण्याचा जास्त प्रचार करू नये. असे वागण्यातच आपले शहाणपण आहे, ह्याची मनोमन खात्री करून समाजात वावरावे.

- आधार: सुरेश द्वादशीवार- “थर्ड अंगल”(Third Angle) मधून.

(११) वाचन संस्कृती हे जसे सुसंस्कृत समाजाचे जीवन मूल्य आहे, त्यापेक्षा लेखन हे अधिक सदृढ असे जीवनमूल्य आहे, हे मान्य केले तर सुनीताबाई म्हणतात, ते शब्दशः खरे आहे. ह्यादृष्टीने माझे लेखन हा माझा आत्मशोध राहिलेला नव्हे झालेला दृष्टिकोन आहे.माझ्या वैयक्तिक आणि अत्यंत खाजगी धारणा आणि अनुभव बौद्धिक पातळीवर मांडण्याचे लेखन हे अतिशय उमाळ्याचे आणि दृढ मैत्री पूर्ण असे माध्यम आहे.

      मूलत: मी लिहीतो, ती माझी अभिव्यक्ती असते. पण त्यापलीकडे सुनीताबाई म्हणतात; त्याप्रमाणे, तो एक आत्मबोध असतो आणि माझे मी-पण कशात प्रगट होत जाते, माझ्या अस्तित्वाच्या खुणा, माझ्या प्रतिमा..... ह्या सर्वांचे समग्र, शक्य तितके नि:पक्ष अवलोकन मीच करत असतो.

       लिहिणे, ही कृती असली तरी लेखन हा आविष्कार असतो आणि त्यांचे प्रकाशन, फेसबुक किंवा पुस्तक रूपात होणे, हा वाचन संस्कृती मध्ये जाण्याचा प्रयत्न असतो.

(१२) साहित्यिक ज्ञानक्षमता म्हणजे नक्की काय? वाचन ही साक्षरता आहे. म्हणून वाचन करणारे सर्व लोक वाचक नसतात. कारण वाचनातून माहिती संग्रह करणे, ह्या माहितीचे विश्लेषण, संशोधन आणि मनन - चिंतन करणे...ह्या प्रक्रियेतून वाचन हा संस्कार घडत असतो. म्हणजे असं की वाचन ही केवळ साक्षरता नसून एक साहित्यिक ज्ञान संपादन करणारी केवळ व्यक्ती नव्हे तर अभिव्यक्ती असते. म्हणून वाचक ही संज्ञा ज्ञान क्षमता संपादन करणे, ह्या अनुभवाशी निगडित आहे.

      आपण जेव्हा वाचकाच्या भूमिकेत शिरतो, तेव्हा आपण ज्ञान संपादन सक्षम होत असतो. हा वाचक साहित्यिक वाचन करतो, तेव्हा तो साहित्यिक वाचन ज्ञानक्षमता समृद्ध होऊ लागतो.

(१३) लिहिलेलं वाचणं ही  कला आहे, पण काहीजण फक्त शब्दच वाचतात ........

       शब्द वाचन ही क्रिया महत्वाची आहेच, पण त्या पुढे शब्दांवर मनोबुद्धीची प्रक्रिया करून अर्थ समजून घेणे, आवश्यक आहे. याला वाचन म्हणतात. ह्याच्याही पुढे जाऊन वाचन केलेल्या विचारांवर चिंतन मनन केल्यावर ज्ञान संपदा गोळा होत असते.

(१४) वाचन माणसाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करतं. संवाद माणसाला जीवन जगण्यास समृद्ध बनवित आणि लेखन आपल्या जगण्याला नेमकेपणा देते.

      Communication म्हणजे आपले जगणे संवाहक असणे. संवाहनाच्या तीन पातळी आहेत. त्यांचे आपल्याशी काय नाते आहे, हे बेकन ह्यांनी येथे थोडक्यात सांगितले आहे.

         Reading makes a full man; conference a ready man and writing an exact man.

-    Francis Beakan.

(१५) आपले लेखन म्हणजे आपले विचार मूर्त स्वरूपात प्रगट करणे, होय. विचारांना मूर्त म्हणजे लिखित करण्याचे दोन मुख्य उद्देश असतात. एक म्हणजे वाचन संस्कृतीची सेवा करणे. कारण आपले लेखन हे आपल्यासह इतरांसाठी वाचन असते. ह्यापेक्षा माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा व उद्देश आहे, माझ्या मनाचे दस्तऐवजिकरण करणे. माझे मन माझ्यासाठी नोंदविणे, महत्वाचे आहे....

थोडक्यात, मी का लिहितो, ह्याचे उत्तर माझी ती एक नितांत गरज आहे. जसं अन्न, पाणी आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत; त्याप्रमाणे, माझे विचार मी नोंदविणे, ही माझी एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सुविद्य म्हणून वैयक्तिक गरज आहे. माझ्या मनाची विविध विषयांवर काय प्रतिक्रिया आहे, ही एक प्राथमिक गरज आणि तिचे दस्तऐवजिकरण होणे, ही आवश्यकता आहे. कारण माझ्या मनाची मांडणी कालानुरूप कशी बदलत जाते, ती परिवर्तनशील कितपत आहे आणि ती विकसित होते की नाही, ह्याची नोंद मला माझ्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यन्त आवश्यक आहे....म्हणून मी लिहीत असतो, हा माझ्या लेखनाचा मूलभूत आधार आणि उद्देश असतो आणि आहे.

ह्या दृष्टीने इतरांच्या माझ्या लेखनावरील प्रतिक्रिया गौण असतात. तरीही माझ्या लेखनाचा उद्देश वाचन संस्कृती संवर्धक असला पाहिजे, ह्या दृष्टीने वाचकांच्या प्रतिक्रिया निश्चित माझ्या ही वाचन परिप्रेक्षात येतात. इतर वाचकांप्रमाणे मी ही माझ्या लेखनाचा वाचक असतो, त्यामुळे इतरांची मते, त्यांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद यांना मर्यादित महत्व निश्चितच आहे. पण त्या पलीकडे वाचक म्हणून मी आणि इतरांनी आपली भूमिका आणि मर्यादा निश्चितपणे सांभाळल्या पाहिजेत. तरच वाचन ही संस्कृती असते. वाचकाला वाचक मूल्य नसेल, तर असे वाचक निरर्थक, अज्ञानी असतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यातच आपली योग्यता सिद्ध होत असते.

(१६) वाचन ही एक बौद्धिक क्रिया आहे. वाचन आचरणशील झालं तर तो संस्कार होऊन जातो. बौद्धिक क्रिया जेव्हा मनाच्या पातळीवर कार्यरत होते, तेव्हा ती संस्कारजन्य प्रक्रिया होऊन जाते.

संस्कार माणसाचे जीवन घडवितात. म्हणून वाचन ही क्रिया मनन-चिंतन-निदिध्यासन अशा प्रक्रियेतून जाते, तेव्हा आपलीच आपल्या मनात जी प्रतिमा तयार होते, ती म्हणजे अभिव्यक्ती असते आणि तिच्यातून सकस, श्रेष्ठ आणि शाश्वत साहित्य किंवा कलाकृती जन्माला येते.

(१७) मी आवर्जून एकाच लेखकाची अनेक विविध विषयांवरची पुस्तके सलग पण सावकाश वाचतो. दुसरे म्हणजे पुस्तक वाचणे, हा माझा उद्देश नसतो. तो लेखक किंवा लेखिका वाचणे, हा एक उद्बोधक, प्रत्ययकारी, मनोरम्य, आणि समग्र असा प्रवास असतो.... लेखन हीच मुळात एक मानवी मन आणि बुद्धी यांची सकल प्रक्रिया असते आणि पुस्तक हे ह्या प्रक्रियेचे एक बांधीव, नि:संदिग्ध आणि रचनात्मक फलित असते. तिसरी गोष्ट अशी की माझ्यातील वाचन संस्कृती आणि समीक्षक ह्यांचा हा एक मनोज्ञ असा अभ्यास असतो. लेखकाला समजून घेताघेता मी स्वतःलाही खूप खूप समजून घेत असतो. माझ्यातील व्यष्टीला समष्टी रूपात समजून घेता येते. कारण माझा आणि त्या लेखक-लेखिकेचा एक भावबंध तयार होत जातो; एक प्रकारचा संवाद साधला जातो; आणि रम्य असा साहित्यिक प्रवास घडत जातो.

लेखकाचे काही दोष दिसून येतात, पण त्याच बरोबर ह्या दोषांमागे कोणती मनोभूमिका, कोणते वैचारिक सूत्र असेल, ह्या गोष्टी मला समजून घ्यायला आवडते. साहित्य-कला यांचा निखळ आस्वाद, अभ्यास आणि वाचन साधना, वाचन संस्कृती या सर्वांचा समग्र विचार समग्र लेखक वाचूनच चांगल्या प्रकारे करता येतो, असे मला वाटते.

(१८) वाचन ही साक्षरता आहे. वाचनाचा उपयोग विचार करणे, हा आहे आणि त्या विचारांवर मनन -चिंतन करणे, हे मनाच्या अस्तित्वाचे निरुपण आहे.

मनन म्हणजे नुसते मनात साठविणे नाही, तर विचारांवर शिक्षणाचे व पूर्वस्मृतीचे संस्कार घडविणे होय.

चिंतन हे मनन झालेल्या विचारांवर सखोल अभ्यास करणे होय. चिंतनात्मक विचार हे प्रतिभा साधन intuition आहे.

(१९) वाचन संस्कृतीचे घटक

लेखक आणि वाचक ह्यांचे एक नाते असते....माझ्या आवडीचा लेखक हा माझ्या सख्या नात्यांपेक्षा मला अधिक जवळचा असतो....तो माझा मित्र, सखा, पिता, बंधू, आणि गुरु अशा अनेक नात्यांनी माझ्याशी बोलत असतो,माझी समजूत काढीत असतो.मार्गदर्शन करीत असतो.आणि माझ्या सर्व सुख-दुखा:चा वाटेकरी असतो.

पण ह्या लेखकाचा माझ्या जीवनात असे अलौकिक स्थान निर्माण करणारा अत्यंत महत्वाचा आणि श्रेष्ठ तिसरा एक माणूसच नव्हे तर एक संस्था असते.... प्रकाशन संस्था.....तिचे आणि लेखकाचं नात फार महत्वाचं.... कारण ते नात छान जुळलेले असलं तर केवळ लेखकच नव्हे तर वाचक आणि आपली अवघी वाचन संस्कृती समृद्ध होऊन जाते.कारण वाचन संस्कृती आणि ग्रंथ प्रसाराची मोठी जबाबदारी प्रकाशक आणि प्रकाशन संस्थेची असते.प्रकाशन ही रोखठोक व्यवहाराची, तसं पाहिलं तर असांस्कृतिक,काहीशी कडू-कठोर पण तरीही साहित्याची आणि समाजाची मोलाची अमौलिक कामगिरी बजावणारी ही संस्था. अलीकडच्या काळात ह्या संस्थेचे महत्व अतोनात पण योग्य असे वाढले आहे.कारण लेखकाला अभिजात, सुसंस्कृत,प्रतिष्ठीत आणि आर्थिकदृष्टीने संपन्न करणारी ही संस्था आपलं स्थानिक वर्चस्व टिकवून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करू लागली आहे. त्यामुळे लेखकाला सुद्धा आंतरराष्ट्रीय,नोबेल वगैरे शिखरांवर पोहोचण्यासाठी उत्तम,दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय व्यापकता असणारी प्रकाशन संस्था आवश्यक आहे.

आपला भाषाभिमान आणि भाषा अस्मिता टिकविण्यासाठी राजकीय चळवळी नको आहेत. आपल्याला हव्यात अशा प्रकाशन संस्था ज्या आपले चांगले, दर्जेदार,सुसंकृत साहित्य सर्वत्र म्हणजे स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवू शकतील.

सुदैवाने आपल्याकडे अशा प्रकाशन संस्था आणि प्रकाशक आहेत. मी कोणाचाही नामोल्लेख करत नाही...कारण अशा संस्था सवांना परिचित आहेत. एक संपूर्ण साहित्य तपच नव्हे तर युग ज्यांनी संपन्न केले, ते म्हणजे श्री पु भागवत... ते केवळ एक प्रकाशकच नव्हते, तर त्यांनी अनेक लेखक तयार केले, असलेले लेखक अधिक सक्षम, सबल आणि कार्यक्षम बनविले.एका यथार्थाने ते 'एक व्रतस्थ साहित्यकर्मी' आणि ' साहित्ययोगी' (संदर्भ - डॉ सुधा जोशी-वेध साहित्याचा) होते.

थोडक्यात असे की वाचक आणि वाचन संस्कृती घडविण्याचे कार्य लेखक आणि प्रकाशक-प्रकाशनगृहाचे असून आपल्या भाषेची जडणघडण करणे, तिचा उत्कर्ष साधणे, तिला संपन्न करणे, तिचे पावित्र्य, मांगल्य रक्षण करणे आणि पिढ्या-पिढ्यांचे सांस्कृतिक,शैक्षणिक आणि आस्मितक पोषण करणे....हे महान कार्य लेखक-प्रकाशक ह्यांचे आहे. आपल्याकडे ते बरचसं यशस्वीपणे होत आहे,असं मला वाटते.

(२०) अनुभव आणि वाचन ह्यामध्ये फरक हा आहे की अनुभव हा माझा वैयक्तिक आणि एक प्रकारे जगण्याचा घटक आहे. वाचन हा मात्र लेखकाच्या विविध अनुभवांचा आणि अनुभवांच्या परिणामाचा केवळ एकच नाही, तर अनेकार्थ असतो.

   दुसरे असं की माझ्या अनुभवात निर्मितीचे काही घटक असतात. उदा प्रतिमा असतात, आशयघन असतात. ह्यांचा वापर नकळत माझ्या लेखनात, कला साधनात होत असतो.

(२१) संशोधनात आणि समीक्षे मध्ये वाचन आणि आस्वादना पलीकडे जाण्याची मानवी अभिलाषा असते.

(२२) कवीचे किंवा वाचकाचे एक तत्वज्ञान असते. ते सातत्याने त्याच्या विचारांत प्रगट होत असते. प्रत्येक रचनेत हे तत्व विसंगत होत असेल, तर आपली विचार प्रणाली अविकसित होऊन स्वयं विरोधी विचारधारा मात्र विकसित होण्याचा धोका असतो.

                  माणूस वैचारिक दृष्टीनेही बदलत असतो. पण हे होणारे बद्दल आपल्या मूळ तत्वज्ञानाशी विसंगत सातत्याने होत असतील, तर आपली मनोभूमिका अजूनही तयार करण्यासाठी वाचन संस्कृती अधिक विस्तृत broad करणे, आवश्यक आहे. मुख्य म्हणजे मी निरनिराळ्या संदर्भात सुसंगत विचार करू शकतो का? विशिष्ट सूत्र धरून विचार करू शकतो का? आणि करू शकत नसेन तर मला अजून माझी वैचारिक बैठक सापडली नाही, ती शोधावी लागेल.

                   पोथीनिष्ठ किंवा स्थितिनिष्ठ असणे आणि तत्वनिष्ठ असणे, ह्यात आमूलाग्र स्वरूपाचा फरक आहे. बदल किंवा परिवर्तन हा वैचारिक आणि बौद्धिक विकास असून तो झालाच पाहिजे. आपले मत बदलणे, म्हणजे तत्व बदलणे नव्हे. उदा. गांधीजी आपल्या भूमिका परिस्थिती व काळानुसार सातत्याने बदलत होते, तरीही गांधीवाद हे एक तत्वज्ञान म्हणून रुजले.

(२३) पुस्तक वाचन हा व्यामिश्र अनुभव आहे. पुस्तक जसे आपल्या अस्तित्वाचे संदर्भ देते; तसेच पुस्तके वास्तवाचेही संदर्भ आपल्या जीवनाला देत असतात.

                         ****************