वाचन हे एक शिक्षितांचे भाषिक माध्यम आहे. वाचन निर्माण होण्यापूर्वी एक लेखक म्हणजे लिहिणारा असावा लागतो. लेखक स्वत:साठी लिहित असला तरी त्याला वाचक हवा असतो. ह्यादृष्टीने, पाहिलं तर वाचन ही प्रक्रिया असून ती लेखकाला वाचकाशी जोडत असते.
वाचन कोणत चांगलं....ह्याच उत्तर नक्कीच
देता येते. पण वाईट वाचन असू शकत नाही. तसेच, वाईट लेखक किंवा लेखन कोणत, ह्याचे
उत्तर व्यक्तीसापेक्ष आहे. कारण जे चांगलं नाही, ते
वाईट....असं म्हणता येत नाही. चांगलं काय ह्याबद्दल एकमत झालं नाही तरी कोणत्याही
लेखनाला किंवा लेखकाला वाईट ठरवता येत नाही.
मिलिंद बोकील म्हणतात “ चांगलं साहित्य
म्हणजे काय, ह्याची एक आंतरिक जाण असावी लागते.” हेच सांगताना सुबोध जावडेकर म्हणतात,” साहित्यामुळे जाणिवेच्या कक्षा
विस्तारतात.” ज्ञानेश्वर मुळे म्हणतात “ यातून सामाजिक जाणिवेचा अंकुर फुटला.” डॉ
हमीद दाभोलकर म्हणतात “ साहित्य आणि त्याच्यामधून आलेली अनुभूती आयुष्याच्या
वेगवेगळ्या टप्प्यांवर परत परत भेटत राहते.” विनोद शिरसाट म्हणतात,” माझे सामाजिक भान वाढवणारे, जाणिवांच्या कक्षा रुंदावणारे आणि सम्यक
सकारात्मक दृष्टीकोन आकाराला देणारे असे (ते वाचन) होते.”
चांगल्या लेखनाचे गुणधर्म चांगल्या लेखनात
उतरतात आणि चांगले साहित्य आकाराला येते. असे साहित्य चांगले वाचन घडवते. अशा
प्रकारे, चांगले वाचन म्हणजे काय ह्याचे आकलन
प्रस्तुत १६ लेखकांच्या लेखांतून प्रतीत झाले आहे.
चांगले लेखन आपल्याला काय देते, हा दुसरा
मुद्दा आहे. किंबहुना अशा चांगल्या लेखनातून निर्माण झालेले साहित्य ही चांगल्या
वाचनाची सामुग्री आहे.
चांगले
वाचन काय देते, याची अगदी यादीच करायची
झाली तर खूप
मोठी होईल. पण प्रस्तुत सर्व लेखकांच्या मते वाचन ही विविध स्तरांवर आणि स्थरांवर
माणसाला समृद्ध करणारी ज्ञान प्रक्रिया आहे. मिलिंद बोकील ह्यांना वाचनाने
आत्मशुद्ध साहित्याची जाण झाली आणि वान्गमयीन दृष्टीकोन तयार झाला. राजन गवस
ह्यांना लेखनाची उर्जा प्राप्त झाली. आसाराम लोमटे ह्यांना वास्तवाला घडवणारे घटक
कोणते आहेत ह्याचा शोध वाचनातून घडला. वाचनामुळे आपला स्वभाव बदलला, संयत झाला;
असे ज्ञानेश्वर मुळे म्हणतात. तर शिल्पा कांबळे म्हणतात, “ माझ्या सांस्कृतिक
दारिद्याच्या काळात (वाचनाने) टोनिकचे काम केले....” त्या पुढे म्हणतात,”परिस्थितीचे रडगाणे बाजूला पडले....” वाचन हे एक
वैचारिक उन्नयन आहेच; त्यापलीकडे वास्तवतेला, विपरीत परिस्थितीला बाजूला सारून
वाचन कृतिशील उर्जा पुरवते. शिल्पा कांबळे ह्याही पुढे जाऊन म्हणतात, “कवितेबरोबर माझे जैविक नाते आहे, हे मला कळले.”
वाचनामुळे घडलेली अत्यंत ठळक क्रांती
म्हणजे स्त्रीवाद जाज्वलाने पुढे आला. सानिया म्हणतात,” एक तरुण स्त्री म्हणून काय
मानसिक भूमिका असू शकते, याचं स्पष्ट भान यायला सुरुवात झाली. स्त्रीचे कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय कर्तृत्व वाचन संस्कारामुळे
आक्रमकपणे पुढे आले.” सानिया पुढे म्हणतात, ”आपल्याला कसं रहायला आवडतं आणि
त्यामागे काय दृष्टीकोन असू शकतो, ते स्पष्टपणे उमगायला लागलं.” बहुतेक
सर्व लेखकांनी हे आवर्जून मांडले आहे की जे माहित होत, कळत होत, जाणीवेच्या परिप्रेक्षात होत, पण
जेव्हा वाचन सखोल चिंतन-मनन ह्या अवस्थेतून पार झालं, तेव्हा ज्या जाणीवा धूसर
होत्या; त्या वाचनामुळे स्पष्ट झाल्या आणि स्वत:चे व्यक्तीत्व उजळून गेलं आहे;
ह्याची प्रखर जाणीव झाली.
पुस्तक
ही वस्तू आहे, तर वाचन ही मानवी मनो-धर्माची संजीवन परिस्थिती आहे. पुस्तक वाचले, तरच
पुस्तकाची अपेक्षा पूर्ण होत असते; म्हणून पुस्तकाला माणसाची गरज असते. पुस्तक माणसासाठी आहे, कारण
माणूस पुस्तका शिवाय अपूर्ण आहे. पुस्तक आणि आपण जोडले जाणे, ही
भौतिक वस्तुस्थिती नसून, हे जोडले जाणे, ही ऐतिहासिक परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीमुळे मौखिक परंपरेतून आपण
वाचन संस्कृती विकसित केली आहे.
पुस्तक वस्तू आहे, तर वाचन ही परिस्थिती सापेक्ष घटना आहे. चांगली परिस्थिती वाचन
संस्कृतीचा परिपोष करते. पुस्तक हे वाचन संस्कृतीचे केवळ साधन नसून मानवी
संस्कृतीचे अवच्छेदक लक्षण आहे. कारण वाचनामुळे आपल्या विचारांना विशिष्ट दिशा
मिळते. थोडक्यात असे की वाचन
हा मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर होणारा संस्कार आहे. वाचन संस्कृती म्हणजे
वाचनामुळे निर्माण होणारे सामाजिक उन्नयन होय. समाज मन प्रगल्भ होणे, हा वाचन संस्कृतीचा प्रभाव आहे.
संकल्प गुजर ह्यांनी वाचनामुळे विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत विकसित
केली आहे. ते म्हणतात, “ कोणत्याही विषयावर घाईघाईने मत न
बनवता थोडे थांबावे, काही जवळच्या मित्रांशी चर्चा करून मगच निष्कर्ष काढावा.”
पुढे ते म्हणतात,” माझा दृष्टीकोन आणि माझी विचारप्रक्रिया एकाच वेळी दोन कक्षांमध्ये
फिरते.” हे दोन कक्ष म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा विचार आणि सद्य परिस्थितीमधील
राजकारण. वाचनाने नेमके काय घडले आहे,
ह्याचा सारांश संकल्प गुजर ह्यांनी मांडताना तीन मुद्दे अधोरेखित केले आहेत.
(१)मला जे वाटते आहे, ते इतरांपेक्षा वेगेळे आहे.(२) आवडत्या लेखकाच्या लेखन कर्तृत्वाची
पुरेशी ओळख झाल्यामुळे त्या लेखकाकडून नवीन काही मिळणार नाही, हे कळू लागले आहे.(३) एखादी गोष्टीचे कथन कसे आहे, ह्याला महत्व न
देता, हे कथन तसे का आहे; ह्याचा शोध घेणे.
वाचनाचेच नव्हे तर वक्तृत्वाचे परिणाम म्हणजे दीर्घकालीन संस्कार असतो. हे
स्पष्ट करताना विवेक सावंत गाडगेबाबांनी सांगितलेल्या कथांबद्दल म्हणतात, “ गाडगेबाबांमुळे मला त्या सगळ्याकडे करुणेने पण चिकित्सकपणे
पाहण्याची वेगळीच दृष्टी मिळाली. तिला मानवतावादी दृष्टी म्हणतात.” विवेक सावंत
ह्यांनी वाचन आणि भाषा ह्यांचे परस्पर नाते अत्यंत सूक्ष्मपणे तपासले आहे. ते
म्हणतात,” आपल्या मराठी भाषेत समृद्ध अभिव्यक्तीची किती जबरदस्त शक्ती आहे,
शब्दप्रभुत्व – भाषाप्रभुत्व कशाला म्हणतात आणि सर्जनशीलतेची उंच उंच शिखरे कशी
असतात, हेही समजले.” विवेक सावंत ह्यांना वाचनाने दिलेले वरदान म्हणजे परिवर्तन
चळवळीमध्ये सामील होणे. ते म्हणतात, “ सत्ताकारणाहून भिन्न असलेले राजकारण “
म्हणजे काय हे वाचनानेच त्यांना अवगत झाले. सर्वात महत्वाचे दान म्हणजे “स्वप्ने
बघण्याची ताकद आणि विचार करून बंड करण्याचे तत्वज्ञान” होय. कारण स्वत: काहीतरी
लिहित राहणे, समर्थ, सक्षम शब्दांत मांडणे, ही एक कला आहे आणि वाचन संस्कृतीचे हे एक फलित आहे, किंबहुना लिहिणे हा एक आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, साहित्यिक सेवेचा गौरव आहे.
वाचून शिकणे आणि ऐकून शिकणे ह्यामध्ये
जे अंतर आहे, ते गुरू-शिष्य नात्याचे आहे. वाणी हे विद्येचे माहेर आहे; तर वाचन हे तिचे सासर आहे!
ती दोन्हीकडे सुखाने नांदते; पण तिचा अधिक सहवास सासरी असतो !
ज्ञान हे ऐकून मिळत असते. पण प्रज्ञा
मात्र सखोल अभ्यासाने म्हणजे मुख्यतः वाचूनच प्राप्त होत असते. संशोधन हा ज्ञान
प्राप्तीचा महत्वाचा मार्ग आहे. संशोधन करून प्राप्त झालेल्या ज्ञानालाच प्रज्ञा
किंवा प्रतिभा म्हणतात.
अखेर सुरेश द्वादशीवार ह्यांचे विचार उधृत करून शेवट करतो.
“जे वाचल्याने माणसांच्या विचारांना चालना मिळते, ते खर वाचन. एखाद्या घटनेचं -संकल्पनेच आकलन करून घेण, विश्लेषण करण, ही वैचारिक कृती मुख्यत: वाचनामुळेच होते. पण वैचारिक कृती करणा-या माणसांकडून प्रत्यक्ष कृतीचा आग्रह धरणे, म्हणजे शाळा-कॉलेजच्या अध्यापकाकडून तो शिकवत किंवा देत असलेल्या विचारांची त्यानेच प्रतिपूर्ती करावी अशी अपेक्षा करणे होय. अशा माणसांचे व त्यांच्या विचारांचे मूल्यमापन व्यावहारिक यशापयशावर ठरवू नये."
"सखोल वाचन करण, ही पत्रकार, प्राध्यापक, साहित्यिक, विचारवंत लोकांची गरज असते. पण ह्या मंडळींनी आपल्या वाचनाचा उगाचच दबदबा निर्माण करू नये, इतरेजनांना तुच्छ लेखू नये. शक्य तितकं स्वत:ला, स्वत:च्या मी-पणाला ,अहंकाराला लपवावे; आपल्या सखोल वाचन असण्याचा तसेच खूप ग्रंथ संग्रह असण्याचा जास्त प्रचार करू नये. असे वागण्यातच आपले शहाणपण आहे, ह्याची मनोमन खात्री करून समाजात वावरावे.”
- आधार: सुरेश द्वादशीवार- “थर्ड अंगल”(Third Angle) मधून.
************************
No comments:
Post a Comment