Friday, 29 November 2024

सौंदर्य म्हणजे काय ?

                                सौंदर्य म्हणजे काय? जे काल प्रवाहात नित्य नूतन होत राहते....त्याला सौंदर्य म्हणता येते. साहित्य, कला, वांगमय, निसर्ग आणि मानवी देह सुद्धा नित्य नूतन आविष्कार घडवित नसेल, तर ते किंवा त्यात सौंदर्य नसते.

मुळात सौंदर्य हा अनुभव आहे. सौंदर्य ज्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं आपल्याला दिसतं...ती वस्तू किंवा व्यक्ती निमित्तमात्र असते. सौंदर्य हे आपल्या दृष्टीचे,आपल्या विवेकाचे,आपल्या सकारात्मक अनुभवांचे भाग्यधेय असते. म्हणून ग्रॅहम म्हणतो, सौंदर्य टिकणारी, शाश्वत गोष्ट नाही.

ज्या साहित्यात किंवा कलेमध्ये नावीन्यपूर्णता नसेल, तर ते साहित्य किंवा कला सौंदर्यपूर्ण नाहीत. प्रत्येक कथा, कविता, चित्र, चित्रपट, नाटक यांच्यामध्ये नवे किंवा नाविन्यता दर्शविणारे काहीच नसेल, तर ती कथा, कविता, चित्र, नाटक इत्यादी दखलपात्र होत नाही.

साहित्याचे दोन मुख्य घटक आहेत. (१) मर्ढेकरांनी म्हणल्या प्रमाणे साहित्य ही रुपवेधी ललित कला ( Fine art) आहे.  त्यांना साहित्याचे रूप (सौंदर्यात्मक घाट आणि लय) महत्वाचे वाटतात. (२) तर करंदीकरांना साहित्यातून निर्माण होणारा जीवनवेधी आशय महत्वाचा वाटतो. ह्याचा अर्थ करंदीकरांना साहित्यातून व्यक्त होणा-या जीवन दर्शनावरून साहित्याची महात्मता सिद्ध होते, असे वाटते. इतर उदा. संगीत, चित्र, शिल्प इत्यादी कलांच्या बाबतीत व्यक्तिनिष्ठ अनुभव क्षमता, संवेदनशीलता आणि बौद्धिकता क्षमता ह्या घटकांना महत्व असते किंबहुना ह्या घटकांशिवाय ह्या कलांचा आस्वाद अशक्य आहे. कारण ह्या  कलांना प्रमाण भाषा किंवा बोली भाषा नाही. 

                  सौंदर्य ह्याचा अर्थ साहित्यातील संजीवक, आनंददायी, आल्हादक तत्व. ह्या तत्वामुळे साहित्यात कल्पना जन्य सौंदर्य निर्मिती होते. तसेच, साहित्यामध्ये  असणा-या आशय संपन्नतेमुळे यथार्थपणे जीवन दर्शन घडते. ही साहित्याची मुलभूत लक्षणे असली तरी ज्या वाचक वर्गासाठी, समाजासाठी साहित्य कार्य करत असते, त्याला दोन परिमाणे आवश्यक असतात. एक परिमाण आहे, स्वातंत्र्य आणि स्वावलंबन. ह्या परिमाणाची प्रपुर्ती ज्या समाजात होत असते, तो समाज...त्या समाजाने लेखकाला साहित्यिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन उपलब्ध करून देणे. हे साहित्याचे एक परिमाण आहे. 

                सौंदर्य हे एक तत्व आहे आणि अनुभव ही आहे. म्हणून असे म्हणतात की हा अनुभव तत्त्व दार्शनिक आहे. म्हणजे असे की ह्या तत्वामुळे जीवनातील संजीवक, आल्हादायक आनंद होतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की सौंदर्य केवळ तात्विक दर्शन आहे. कारण सौंदर्य हा संवेदनात्मक अनुभव आहे. मानसिक पातळीवर घडणारी अनुभूती आहे. साहित्यात, कलेत आणि व्यक्ती दर्शनात सौंदर्य भौतिक स्वरूपात आहे. एखादी वस्तू सुंदर असते, कारण त्या वस्तूमध्ये कलेचा आविष्कार झालेला असतो. व्यक्ती सौंदर्य शारीरिक असतेच, पण एखाद्या व्यक्तीच्या केवळ दर्शनात स्वाभाविक असे सौंदर्य असते. कारण सौंदर्याचे अभिवादन वैयक्तिक आवडही असते. व्यक्तिपरत्वे सौंदर्याचे परिमाण वेगवेगळे असते आणि तदनुसार सौंदर्याची गुणवत्ता सिद्ध होत असते. सुंदरता हा दृष्टीचा अनुभव असला तरी सौंदर्य ही अनुभवाची अभिव्यक्ती आहे. ह्याचाच अर्थ असा की सुंदर केवळ दिसणे नाही.अंध व्यक्ती सौदर्य आस्वाद घेऊ शकते. कारण सौंदर्याला केवळ रूप नसून गंध आहे, श्रवणीयता आहे, स्पर्शज्ञान आहे, समीपता आणि साहचर्य आहे. यश आणि त्यामुळे लाभलेले समाधान ही आनंदाची संवेदना आहे. कारण ह्या मध्ये अभिजात सौंदर्य आहे. विद्वत्तापूर्ण व्यक्ती दर्शनात ही सौंदर्य आहे.

स्त्रीचे व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व वयपरत्वे जीर्ण, शीर्ण होत नाही, टवटवित, प्रसन्न राहते...कारण स्त्री हे शारीरिक सौंदर्य नाही आणि म्हणूनच हे त्रिकालाबाधित नसते.
देह असो किंवा देह निर्मित काहीही असो किंवा निसर्ग असो, जो मानव निर्मित नाही...ह्या सर्वांचे सौंदर्य सदासर्व काळ नूतन होत असल्याने ते निखळ सौंदर्य आहे.
व्यक्तीच्या स्वभावात सौंदर्य असते, व्यक्तिमत्त्वात सौंदर्य असते. ह्या पैकी व्यक्तिमत्व फसवं असू शकतं... पण व्यक्ती बदलत नाही. अशी व्यक्ती तिच्या शालीनते मधून, संयमी, आदरणीय आणि समजूतदार वागण्यातून प्रगट होत रहाते. कारण अशी व्यक्ती दुःखाच्या आघातातून जे विधायक शिकते, ते तिच्या चेहऱ्यावरील दुःखाच्या पडछाये सह दिसले तरी तिच्या वर्तनातून एक संयम शील, आदरणीय व्यक्तित्व फुलत रहातं...हेच त्या व्यक्तीचे सौंदर्य असते...तिला असे व्यक्तित्व सौंदर्य बहाल करते.
मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की, शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळतो. मनाचा गाभारा म्हणजे आपली सुसंस्कारित मनोबुद्धी होय. सुंदरता हे सौंदर्य शास्त्राचे मूलभूत तत्व आहे. आणि अभिरुची संपन्न आवड हे सौंदर्य शास्त्राचे एक लक्षण आहे.
रस्त्यावरील दगडातही सौंदर्य आहे," सत्यम, शिवम, सुंदरम " चा साक्षात्कार आहे...
साहित्यिक, कलाकार, अभियंता, स्थापत्य कलाकार, तत्वज्ञ, अध्यात्मिक संत इत्यादींच्या सृजनशीलतेमधून जीवनाचा अर्थ साक्षात्कारित होत असतो.
She is neither model nor glamour or item girl. She is beauty called Indian woman who knows her being is not her style but it is in her Grace, poise and simplicity.
ही स्त्री मॉडेल नाही की शृंगार आणि नेपथ्याचा आविष्कार नाही. भारतीय स्त्रीचे सौंदर्य दर्शनीय आहे. तिचे दिसणे, ही स्टाईल नसून हे तिचे स्वाभाविक, आदरणीय, आणि सहज साधेपण आहे आणि हे तिचे असणे, हेच तिचे अस्तित्वपूर्ण दर्शन आहे. कारण रंगात सौन्दर्य नसते. सौन्दर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, डोळ्यांवर झालेल्या संस्कारांवर, माणुसकीच्या भावनाशील मनाच्या संवेदनशीलतेवर निर्भर आणि निर्मळ असतं.
नातं बहुआयामी असे व्यक्तिमत्व आहे. पण हे व्यक्तिमत्व एकाचे नसून दोन व्यक्तींमध्ये असलेलं निरूपण आहे. सरळ सहज उमगल तर ते सौंदर्य अभिव्यक्त रूप असतं. त्या रुपात दिलीप गोसावी ह्या कवीला नात्याची गुंफण दिसते. मर्यादेच्या अवकाशात कुंपण दिसतं, तर रक्त बीजातून साकार झालेलं लिंपण दिसतं. काल प्रवाहात एकाकी पण असतं आणि ठेच -बीच लागली, तर ते मी- पणाचे आर्त रूप असतं. भूतकाळात डोकावून पाहिलं तर ते जगाच्या पाठीवरील नगण्य अस्तित्व असतं आणि अखेर नाते हे जगण्याचे बंधन मानले तर ते अमर्याद असे सत्य असते. पिढ्यान् पिढ्या रचित गेलेली परंपरा असते....महान संचित असतं.
स्मित हास्य ही संवेदनशील भाषा आहे. ह्या भाषेचे सौंदर्य वैश्विक आहे. शब्दांशिवाय, शब्दां पलीकडले अर्थ सांगणाऱ्या भाषेत मातृभाषा आहे, मायबोली आहे आणि अनिर्वचनीय समाधान - शांती आहे.
व्यक्ती स्त्री असो वा पुरुष.... शारीरिक सौदर्य हे आकर्षण आहे, व्यक्तिमत्व आहे...पण वयानुसार ते अस्ताला जाते. पण मानसिक सौंदर्य, बुद्धिमत्ता तेज....वयानुसार वाढत जाते....जेव्हा ती व्यक्ती शरीरापेक्षा मानसिक दृष्टीने सौंदर्य संपन्न असते.
Attraction म्हणजे आकर्षण ही एक स्थिती आहे आणि ह्या मध्ये दैहिक म्हणजे शारीरिक संवेदना मुख्य असतात. सौंदर्य शास्त्रानुसार, आकर्षण हे मुलभूत वैशिष्ट्य आहे. व्यक्तिमत्वाचे ते एक prima facia प्रमुख आणि वास्तववादी स्वरूप आहे. व्यावहारिक जग ह्याच आधारावर चालले आहे. Distraction म्हणजे अनाकर्षण हे नेमके ह्याच्या विरुद्ध म्हणजे नेणिवेच्या जाणीवेत आहे. कारण आकर्षण ही शाश्वत स्थिती नाही. म्हणजेच असं की, आकर्षण ही केवळ असोशीची जाणीव आहे आणि ती कालसापेक्ष आहे. म्हणूनच अनाकर्षण हे आकर्षणाचा जणू काही पाठलाग करीत असते......Distraction चा दुसरा अर्थ, अडथळा किंवा विक्षेप हा ही आहे. त्यानुसार आकर्षण न टिकणारे असल्यामुळे कालपरत्वे आकर्षणाला अडथळा किंवा विक्षेप प्राप्त होत असतो. उदा. स्त्रीचे देहिक सौदर्य हे आकर्षण आहे आणि ते कालसापेक्ष आहे म्हणुन वयोमानानुसार हे सौदर्य बाधित होत असते.
ह्या संदर्भात विचारात घ्याची गोष्ट आहे की एखादी गोष्ट, विचार सुचणे आणि अनुभव येणे....ह्यापलीकडे सौदर्य दृष्टी आहे. ही सौंदर्य दृष्टी म्हणजे सक्षम संवेदनशीलता आहे आणि ती नेमक्या शब्दांत अभिजातपणे मांडणे.....हे साहित्यिक, सांस्कृतिक आणि संस्कार सक्षम ज्ञान आहे.
अध्यात्मिक दृष्टीने देणाऱ्याचा हेतू काहीही असो, आपण ते दिलेलं प्रसाद म्हणून स्वीकारले की तो देण्या घेण्याचा व्यवहार होत नाही. अपेक्षारहित देण्या घेण्यामध्ये सौंदर्य आहेच; पण ते घेताना देणाऱ्यांच्या हेतूची शंका न घेणारा निरागस विनम्र भाव घेणाऱ्यापाशी असेल तर देण्या घेण्यातले सौंदर्य डागाळत नाही.
- महेश एलकुंचवार.
सापेक्षतावाद ही कवितेच्या आशयाची एकच अभिवृद्धी नसून संवेदन सक्षमता हा कवितेचा मुख्य अंक आहे. काव्य हा कवितेचा विषय आहे, ज्या ज्या विषयांना काव्यमयता आणि संवेदना प्रपूर्तीचे भान आहे, त्या कवितेला शब्द न्याय देत असतात. शब्दांचे कर्तव्य पूर्ण झाले की कविता थांबते, पण पूर्ण होत नसते.
अंक हा शब्द महत्त्वाचा आहे. महाकाव्य निर्मिती होत असताना काव्य रस निर्मिती होत असते. ती काव्य विषयाच्या अभिव्यक्तिला पूरक असेल तर कथानक निर्मिती हे एक महाकाव्याचे समृद्ध लक्षण आहे. ह्या दृष्टीने अंक ही संकल्पना काव्य शास्त्रात अंतर्भूत आहे.
महाभारत, रामायण, मेघदूत इत्यादी महाकाव्ये....म्हणजे प्रदीर्घ अशा काव्य रसाच्या निर्मितीचे स्तोत्र महाकाव्यातील कथानक हा कल्पना विलास आहे, तर संवेदन सक्षम अभिव्यक्ती हा महाकाव्याचा खरा नायक किंवा नायिका आहे. सौंदर्य हा कला आस्वाद आहे, पण महाकाव्यातील सौंदर्य निर्मिती म्हणजे कथानकाला लेखकाने दिलेला काव्यात्मक न्याय हा आहे.
कालिदासाचा ‘मेघदूत’ कविवर्य बापटांनी “जीवीचा जिवलग कालिदास’ ह्या लेखात उलगडून दाखविला व मला न दिसलेली अनेक सौंदर्य स्थळे सापडली. वसंत बापट मला प्राध्यापक म्हणून रुइयात भेटले आणि तिथंच त्यांच गुरुजन म्हणून स्थान पक्क झालं. शिक्षण घेतना सौ. सरोजिनी वैद्य, सौ पारनाईक, श्री क्षीरसागर इ गुरुजनांची तीव्रतेने आठवण झाली. असे गुरुजन आज नाहीत, ही जाणीव अस्वस्थ करते.
आषाढ-भाद्रपदाच्या हलक्या सरी येऊन गेल्या आहेत. कुंद,भरून गेलेलं आकाश, वर नजर टाकली तर संथपणे वाहणारे वारे,ढग; जलधारांच्या भाराने जड झालेले , त्यामुळे हलके-हलके सरकणारे ढग नाहीत, तर ‘मेघ’....मेघदूताच्या कालिदासातील एकाकी यक्षाची आठवण करून देतात........मी यक्ष नाही; पण हा यक्ष माझ्या अंतर्यामी येताच मला आपलासा करून टाकतो. तू माझी कांता नाहीस....तरीही “उपरि घनं घनरितं, दुरे दयिता किमेतद आपत्तित्वं” अशी मनाची तगमग का होते?
मानवी मन व निसर्ग ह्यांचे नातेबंध अतूट असतात. ज्या संचिताने आणि नियतीने आपली निर्मिती केली, त्याच नियतीने निसर्गाला तिच्या निर्मिती-क्षेत्रात आपल्याला बद्ध केलं आहे. कालिदासाने निसर्गाला आपलसं केलं व त्यामध्ये स्वत:ला विरून टाकलं. त्याचं निसर्गाशी नात काय? हा प्रश्न एकाच वेळी अनेक उत्तर देतो. गुरु-शिष्य,कलावंत-रसिक,प्रेमी-प्रमिका,पुरुष-प्रकृति अशी अनेक उत्तरे.....तीच उत्तरे मानवी नात्यांना आहेत. खर म्हणजे आपलं नात नात्यापलीकडचं....म्हणजे निसर्गाचं धरित्रीशी आहे तसं. म्हणजे द्वैतातच अद्वैत सामावल्या सारखं....सगुणातून निर्गुणाकडे जाणार....रूपातून अरुपात जाणार.
शब्दांवर प्रेम असल्याशिवाय साहित्यिक रचना करता येणार नाहीत. पण जेव्हा शब्दांवर श्रद्धा असते, तेव्हा शब्दांशी आपले नाते हळूहळू स्फुरण पावू लागते. शब्द आपल्याशी बोलू लागतात, आपल्या मनीचे अस्फुट, निराकार भाव जाणून घेऊ लागतात. अनुभवांतून आलेली प्रचीती आणि संवेदनांतून मनात उमटणा-या प्रतिमा निराकार असतात. त्यांना केवळ शब्दांनी आकार द्यायचा नसतो.... शब्दांशी असलेले उमलणारे नाते हे शब्दांचे लेणे असते. हे लेणे शब्दांत उतरताना त्या शब्दांची जी सखोल जाणीव व्यक्त होते.....त्या जाणिवेचे शब्दरूप म्हणजे कवितेचा आशय असतो. गद्य वांग्मया बाबतीत हीच जाणीव प्रतिमा आणि प्रतीके धारण करते. पुराण कथा, मिथके, ऐतिहासिक कथा, विविध घटना आणि त्यांतून झालेला बोध जेव्हा शब्दांकित होतो, तेव्हा ती साहित्य रचना सौंदर्य पूर्ण होते. ह्या दृष्टीने असे म्हणतात की सौंदर्य ही मानवी जाणिवेची प्रगल्भ अशी अभिव्यक्ती आहे.
****************
Al


All reac
5


Sunday, 17 November 2024

समीक्षा म्हणजे काय ?

`

                      समीक्षा म्हणजे काय?

(१)  जगाच्या बदलण्याचा वेग संथ होता तेव्हा आम्ही आधी विचार करायचो. आता जग बदलण्याचा वेग वाढला आहे. आता आधी बरंच काही घडतं, आणि मग आम्ही विचार करतो! आपण प्रतिक्रियात्मक (reactive) झालो आहे. पूर्वी आपण क्रियात्मक (proactive) होतो. अस मला वाटत. म्हणूनच आपली साहित्य निर्मितीही सृजनशीलतेपेक्षा प्रतीकात्मक आणि प्रतिक्रियात्मक झाली आहे.

(२)  एक  काळ होता, जेव्हा कवी साहित्यिक निसर्गाच्या-मानवतेच्या खूप जवळ होते. मुख्य म्हणजे कवींची-साहित्यिकांची निसर्गाकडे-भवतालाकडे पाहण्याची वृत्ती-प्रकृती भावगर्भ-अनुभवजन्य होत्या. वैश्विकता आणि अनुभूतीक्षमता स्पष्ट, स्वच्छ आणि निरामय होत्या.

(३)  " समीक्षा म्हणजे समदृष्टीने पाहणे, सम्यकपणे किंवा समतोलपणाने अवलोकन करणे,होय. कारण समीक्षा ही साहित्याचा अनेक अंगांनी अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा आहे., एक 'discipline' आहे.

(४)              मनोरंजन, उदबोधन, आनंद याचा अनुभव एकेकांना येत असतो.पण अशा अनुभवाची चिकित्सा करून तो अधिक यथार्थ, समृद्ध व सुस्पष्ट करण्याचे कार्य समीक्षा आणि समीक्षक करीत असतात. म्हणून चांगल्या साहित्याला चांगल्या समीक्षेची आणि चांगल्या समीक्षेला चांगल्या साहित्याची तहान असते.

            चांगल्या व अभिजात साहित्यकृती अनेक सत्यता उराशी बाळगून असतात. प्रतिभावंत समीक्षक....... या सत्यता उलगडून स्पष्ट करतात.... व्यक्तीच्या व सामूहिक जीवनाच्या सुखदुखा:चा, प्रश्नोपप्रश्नांचा, स्वप्नांचा व स्वप्नभंगांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात......साहित्यकृती ही एक अपूर्व कलात्मक मिर्मिती असते. समीक्षा ह्या कलावस्तूचे रंगरूप मोठ्या प्रभावीपणे स्पष्ट करून सांगते.

                समीक्षेच्या वाचनामुळे साहित्यकृती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. तिच्यातील आवडणा-या व नावडणा-या गोष्टींचा तर्कशुद्ध खुलासा होतो. योग्य कारणांसाठी एखादे पुस्तक का आवडते किंवा का आवडत नाही, याचे बौद्धिक समाधान प्राप्त होते आणि आपली वान्गमयीन अभिरुची संपन्न होते.

                 समीक्षा म्हणजे काही फावल्या वेळेत व लहरीनुसार करावयाचा व वाचावयाचा उद्योग नाही, तर ती एक गांभीर्यपूर्वक करावयाची साधना आहे. कोणत्याही समाजातील साहित्यसंस्कृतीचा दर्जा केवळ साहित्य व साहित्यिक यांच्यामुळे ठरविता येत नाही; तर तो समीक्षा व समीक्षक याच्या गुणवत्तेवरून ठरविला जातो.

-रा ग जाधव.

(५) टीकाकार आणि समीक्षक हा सुद्धा आस्वादक असतो आणि त्यादृष्टीने कलेचे जे आणि जसं प्रतिबिंब त्याच्या मन:पटलावर उमटते, त्याप्रमाणे, तो टीका /समीक्षा करीत असतो. मनाची नितळता हा चारित्र्याचा भाग आहे. टीका आणि समीक्षा हा मात्र केवळ चारित्र्याचा भाग नसून समीक्षकाच्या सखोल अध्ययन, अभ्यास, विचारशक्ती आणि शब्द सामर्थ्य ह्यांचा समुच्चय असतो. कवितेला केवळ छान, सुंदर, अप्रतिम म्हणून कदाचित आस्वाद वृत्ती प्रगट होत असली तरी त्या आस्वाद वृत्तीचे आविष्करण झाल्या शिवाय कलाकृतीचे सम्यक अवलोकन होत नाही. असा एक मोठा वाचकवर्ग आहे, ज्यांना होत असलेला कलाकृतीचा आनंद स्वत:ला समजून घ्यायचा असतो....आनंद, आस्वादक वृत्ती सुद्धा खुलली, प्रसन्नपणे व्यक्त झाली तर त्या कलाकृतीचा विकास इतर वाचकांपर्यंत होतो आणि कलाकृतीचे महानपण विस्तृत पावते. ह्यादृष्टीने, ती कलाकृती सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य घडविते.

             आपल्याकडील साहित्यात आणि ब-याच साहित्यिकांना समीक्षा हा साहित्य प्रकार आहे, हेच मान्य नसते. त्यांच्या कलाकृतीची चिकित्सा होऊ नये; संशोधनात्मक, अभ्यासात्मक कार्य होऊ नये, असे वाटते. का? तर कलाकृतीचा आस्वाद घेणे, हेच वाचकाचे कार्य. काहीजण तर समीक्षा म्हणजे 'काथ्याकुट' म्हणतात!

             मला वाटते, ह्याच दृष्टिकोनामुळे म्हणजे चिकित्सा आणि चिकित्सक वृत्ती नाकारणे.....ह्यामुळे आपले साहित्य दर्जेदारपणाच्या कसोट्या नाकारीत राहिले आहे. ह्याउलट, इतर भाषांमधील साहित्यात, विशेषत: इंग्रजी वान्गमयात, टीका आणि समीक्षा ह्यांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मासिके, ग्रंथ प्रकाशन इ. कार्यांत ही संपादन हे कार्य बरेचसे समीक्षेच्या/टीकेच्या अंगाने जाते. हे ज्यांना आवडत नाही, ते साहित्यिक, लेखक, कवी आपल्या निर्मितीबाबत अभ्यासू नाहीत...त्यांना आपल्यावर झालेली टीका सहन होत नाही...त्यामुळे त्यांना आपल्या प्रगतीच्या वाटा स्वयंभू आहेत, असं वाटू लागते...आणि तिथेच त्यांच्यातील अहंकार, कुपमंडूकता, भाटगिरी-प्रियता, मनोरंजकता, लोकप्रियतेची हौस वाढीस लागते आणि त्यांतूनच एकंदर त्या कवीचा/साहित्यिकाचा -हास होऊ लागतो....

(५)रसास्वाद,रसग्रहण आणि समीक्षा ही साहित्य शास्त्रातील वेगवेगळी दालने आहेत.वाचक ह्या भुमिकेपलीकडे जाऊन ज्यावेळी मी चिंतन-मनन ह्या अभ्यासक आणि वैचारिक पातळीवर जाऊन पोहोचतो, तेव्हा मला जे जाणवत असते, ते मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.

              तेव्हा मला सुधा जोशींच्या "वेध" मधील हे स्फुट आठवते:

"लेखनाचा तरल, उत्कट वृत्तीने अनुभव घेणे, चिंतन प्रक्रियेत त्यांचा नव्याने पडताळा घेत राहणे, उलगडा करीत जाणे आणि त्यांच्या अर्थांच्या संगती जुळवीत जाणे......जीवनचक्राच्या अटळ गतीचे भान,मानवी दुखा:ची आणि एकाकीपणाची अपरिहार्यता....आणि असे असूनही पुन्हा पुन्हा जागवला जाणारा चैतन्यमय नवा सूर, निर्मितीच्या प्रेरणा....."

              ह्या सगळ्यांची सुसंगत जाणीव मनाला स्पर्श करते, म्हणण्यापेक्षा येऊन भिडते....तेव्हा मी जे लिहितो....तो कधी रसास्वाद असतो.....रस निष्पत्ती ही एक कलाकृती असते....कलेच्या अंगाने जाणारे लेखन ह्या दालनात.....तर कधी रसग्रहण...काव्यात्म लेखन हे एक वेगळे दालन..... आणि समीक्षा हे दालन रसास्वाद आणि रसग्रहण ह्या दालनांसह फुलणारे पण कधी परखड, कधी अभ्यास-संशोधनपर, तर कधी कठोर टीकात्म.... अशा अंगांनी व्यक्त होत असते.

(१)  परिक्षण, समीक्षा, टीका, निरुपण आणि संपादन ह्यांत काय मुलभूत फरक आहेत? तसं पाहिलं तर ही सर्व संस्करण एकाच आस्वादक परिप्रेक्षाची रूपे आहेत...परिक्षण स्पर्धात्मक, शैक्षणिक अंग आहे. समीक्षा हे साहित्यिक आस्वादक अंग आहे...त्यात संशोधनात्मक, अभ्यासू जिज्ञासा आहे. निरुपण हे भक्तिमार्गाचे आस्वादक अंग आहे. टीका ही एक आस्वादक असली तरी कठोर परीक्षा आहे. तर संपादन हे एक अत्यंत प्रभावी आणि संक्षेपक आस्वादक अंग आहे.

(६)रवी परांजपे ह्यांनी १.५.२०१५ च्या लोकसत्तामधील पडसाद ह्या सदरात बुद्धीवादाचे दोन पंथ फार सुंदर मांडले आहेत.एक प्रकार आहे तर्कनिष्ठ आणि दुसरा सृजनशील. तर्कनिष्ठ बुद्धिवाद कठोर टीकेच्या अंगाने मांडला जातो; तर सृजनशील बुद्धिवाद सम्यक, सहिष्णू आणि समीक्षा अंगाने मांडला जातो. टीका असो वा समीक्षा दोन्हींचे अंतिम उद्दिष्ट साहित्यविचार किंवा कलाकृतीचा आस्वाद घेणे, हेच असते.

          आस्वादक जेव्हा प्रचारक, प्रेरित किंवा राजकीय-आर्थिक दबावाखाली असतो, तेव्हा त्याची आस्वादकता भंग पावते; ती भ्रष्ट पावते आणि विचारांत असहिष्णुता, अतिरेकीपणा आणि स्फोटकता येऊ लागते.                       

(७) कलाकृतीतून एकच आशय सूचित होण्यापेक्षा आशयाची अनेक वलये तयार व्हावीत. ह्याचा अर्थ संदिग्धता नव्हे, तर interpretation च्या अधिक शक्यता .... पण या शक्यता अजमाविण्यासाठीही मुळात स्पष्टता हवीच.

- सुधा जोशी. "वेध' ह्या समीक्षा लेख संग्रहातून.

सध्या ' कदंब ' हा रत्नाकर मतकरी ह्यांचा गूढ कथा संग्रह वाचत आहे.               

 रत्नाकर मतकरी यांचा एकूण साहित्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन..... त्यांच्या सर्व साहित्य निर्मिती मध्ये सुस्पष्टता हा आहे. ते स्वतःच म्हणतात की आपण लिहितो, त्यापेक्षा वेगळं वाचकाला, प्रेक्षकाला, श्रोत्याला वाटत असेल, तर ती त्यांची दिशाभूल करणारी कलाकृती असते. अर्थात दिशाभूल करणे हा सुद्धा कलात्मक आविष्कार असतो, पण अशा दिशाभूल करण्याला सुद्धा एक दिशा असते, एक सूत्रबद्ध विचार असतो. पण तो नसेल, तर मात्र असे साहित्य वाचक-साक्षेपी आणि सापेक्षित नसते.

              शेक्सपियरने म्हणले आहे की हम्लेटच्या वेडेपणातही एक शहाणपण होते. मात्र इथे फेबु वर प्रसिद्ध होणा-या कविता, लेख, कथा वाचताना मला ब-याच वेळा असं आढळलं आहे की त्या साहित्याचे लेखक,कवी जे लिहितात, ते इतकं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असतं की त्याचा मी केलेला सर्व सामान्य, साहित्यिक आणि तार्किक विचार चुकीचा आहे, हे ते लेखक, कवी मला सांगतात. कारण त्यांचे शब्द, जे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, त्याला समष्टीची आवश्यकता असते, आणि ती नसल्यामुळे सुस्पष्टता हा सद्गुण त्यांच्या साहित्यातुन हरवला जातो, असं मला वाटतं. 

                       लेखक-कवी इ साहित्यिकांनी आपले साहित्य स्वतःच्या भाव-भावना,अनुभव त्यांच्या व्यष्टीतून,व्यक्तीगत मात्रेतून लिहायचे नसते.

          थोडक्यात असे की साहित्यिक मूल्य असणारे लेखन समष्टीच्या संस्काराने प्रगल्भ होत असते... सुस्पष्ट होत असते आणि त्यातच लेखकाचं शब्द सामर्थ्य, अर्थ प्रवाहित्व आणि सुस्पष्ट अभिवचन सिद्ध होत असतं, असं मला वाटतं.

(८) महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष सध्या श्री अक्षय कुमार हे समीक्षक आहेत. त्यांना विनंती की मराठी साहित्य सृष्टीमध्ये समीक्षेला मानाचे स्थान मिळवून द्यावे. समीक्षकांना मानाची स्थाने मिळत आहेत, पण समीक्षा दुर्लक्षित राहत असल्याने मराठी साहित्याच्या दर्जेदार, सकस, निकस आणि दृढ संस्कार क्षमते बद्दल आणि एकूणच सखोल चिंतनाबद्दल चर्चा होत नाहीयेय. एक काळ होता जेव्हा वा ल कुलकर्णी,व पु भागवत ह्यांच्या सारख्या समीक्षकांनी मराठी साहित्य विश्वाला खडबडून जागे केले..... गदिमा,ग्रेस,कुसुमाग्रज, विंदा,पु लं इ. साहित्यिकांच्या श्रेष्ठ, अमर मांदियाळी, संप्रदाय निर्माण झाले. आता सुद्धा साहित्य निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. पण ही निर्मिती बरीचशी प्रसिद्धी सन्मुख आणि लोलुप होत आहे, असं वाटतं.

         इतर भाषांतील साहित्य संस्कृतीचे वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे की तिथे प्रत्येक साहित्य प्रकाराची परखड, अचूक, सकस आणि साक्षेपी समीक्षा होत असते....साहित्यिकाची लोकप्रियता तो किती गर्दी जमवितो, आपला गोतावळा, आपल्याला पदे, पुरस्कार इ जमवितो..ह्यावर केली जात नाही...तर त्याने साहित्यात कोणते नवे प्रयोग केले आहेत, त्याची नाविन्यपूर्ण कलाकृती कितपत साहित्यिक निकषांवर यशस्वी आहे आणि तिला भविष्यकालीन दृष्टी आहे की नाही... ह्यावर साहित्याचे व साहित्यिकांचे मूल्यमापन केले जाते. तसे आपल्याकडे होत नाहीयेय.

         आपल्याकडे दिंड्या, संमेलने, व्याख्याने,करमणूक प्रधान कार्यक्रम ह्यांची रेलचेल असते. पण चर्चासत्रे, रसस्वाद किंवा रस ग्रहणात्मक कार्यक्रम, टीकात्मक साहित्य निर्मिती, संशोधनपर लेख इ इ ची उपस्थिती अत्यंत दुर्मिळ आहे. साहित्य कट्टा असो किंवा साहित्य परिषद असो....इथे सुद्धा करमणूक प्रधान कार्यक्रम असतात किंवा औपचारिक व्याख्याने, मुलाखती, कवि संमेलने, इ इ गोष्टींची रेलचेल असते.

          ही साहित्य संकृतीच्या संवर्धनाच्या दृष्टीने आणि भाषेच्या भविष्यकालीन वाटचालीच्या दृष्टीने गंभीर समस्या आहे.

मराठी साहित्यात समीक्षा इंग्रजी समीक्षेच्या सूत्रावर आधारित होत असते. कारण समीक्षा हा भाषा अभ्यासाचा विषय आहे, ही संकल्पनाच इंग्रजी साहित्यात गंभीरपणाने पहिल्यांदा मांडली गेली आहे. दुसरा मुद्दा असा की मराठी साहित्यिकांत आणि वाचकांतही समीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन निखळ नाहीयेय.  ह्याचे कारण मला वाटते की आपण व्यक्ती पूजेकडे अधिक झुकणारे आहोत आणि साहित्य कृतीपेक्षा लेखकाला किंवा कलावंताला अधिक महत्व आणि प्राधान्य देणारे आहोत.

          अनेक नामवंत, गुणी आणि प्रतिभावंत साहित्यिक सुद्धा स्व-निर्मित साहित्य कृतीचे हिरीरीने, आक्रमकपणे आपल्याला भावलेल्या अर्थानुसार समर्थन करीत असतात व समीक्षेला नाकारत असतात. त्यामुळे त्यांचे समर्थक सुद्धा आक्रमकपणे आपल्या लाडक्या. आवडत्या लेखकाच्या समर्थनार्थ समीक्षकांवर तुटून पडतात.....समीक्षा नुसती नाकारली जात नाही तर नाउमेद केली जाते. त्यामुळे समीक्षा ही चिकित्सक, प्रश्न विचारण्याची, आणि साहित्य समजून आणि समजावून घेण्याची आणि देण्याची भूमिकाच  नाकारली जाते.

        अर्थात, ह्यामध्ये काही समीक्षक जबाबदार नाहीत, असं मी मानत नाही. काही समीक्षक पूर्वग्रह दुषित आणि व्यक्ती केंद्रित टीका करीत असतात, हे वास्तव मी नाकारीत नाही. पण म्हणून समीक्षा नाकारणे, दुर्लक्षित करणे?.....ह्यामुळे मराठी साहित्याचा दर्जा कोणी तपासायचा? लोकप्रियता, पुस्तकाचा खप, जाहिरात, प्रसिद्धी हेच निकष दर्जा ठरविणार काय? मराठीत विपुल आणि फार मोठ्या प्रमाणात कविता, लेख, कथा इ वांग्मय प्रसिद्ध होत आहे. पण त्याची दर्जाबद्दल चिकित्सा न झाल्यामुळे सकस साहित्य कोणते ह्याचा बोध अबोध रहात आहे.पुस्तक घेतले, पण वाचता-वाचता कंटाळून ठेवून दिले....कारण हे वांग्मय कळतच नाही.....माझी वाचक, आस्वादक, आणि अभ्यासक वृत्ती पणाला लावण्यासाठी मला मार्गदर्शक नाही.....

 

         वाचन ही संस्कृती आहे, असे म्हणतो, त्याचा अर्थ काय? वाचन ही कला तर आहेच, पण त्यापेक्षा समजून घ्यायची व समजावून देण्याची आणि शिकण्याची विद्या आहे, हे आपण कधी मान्य करणार ?

(९) मी समीक्षा, रसास्वाद, रसग्रहण का करतो? ह्याचे उत्तर विंदांच्या शब्दांत: " मला माझे तसेच इतरांचे आकलन चांगले होते, त्या साहित्यकृतींनी माझी कल्पनात्मक दृष्टी विशालतर होते; मानवी स्थितीबद्दलची माझी जाण अधिक गहन होते; तसेच साहित्यातील सुप्त शक्ती आणि साहित्याचे घाट (forms) ह्यांबद्दलची माझी जाणीव समृद्ध होते आणि एकंदरीत माझ्यावर झालेला प्रभाव कल्पनात्मक, ज्ञानात्मक आणि सौन्दर्यात्मक असा होत असतो, ह्याची जाणीव मला आहे."

(१०) नकारवाद हे साहित्य मूल्य म्हणून स्वीकारले तर त्याच्या चांगले -वाईटपणाचा विचार दिलेल्या साहित्य प्रकार संदर्भात करता येतो. नकारवाद हा दृष्टीकोन नसून वास्तववादाचा एक प्रकार आहे. होकारात्मक हा मात्र दृष्टीकोन आहे आणि तो सुद्धा वास्तववादाचा एक भाग आहे. त्यामुळे नकारात्मक वास्तवाकडे होकारात्मक दृष्टीकोनातून पाहता येणे, शक्य असते. नकारात्मक म्हणजे अतृप्त राहिलेल्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन होकारात्मक म्हणजेच सकारात्मक आहे.

           जीवनातील अभाव, अतृप्ती, तृप्ती नसलेल्या गोष्टी मान्य करणे, ह्या विधानात पूर्वार्ध नकारात्मक असला तरी तो वास्तववाद आहे. त्याच्याकडे आपण आशावंत दृष्टीने पहात .....अतृप्तीची ओढ जीवन प्रवाहित करते. कारण नकार, अभाव, न्यूनता, शून्यता....इ सर्व भाव हे वास्तववाद आहेत.

       तत्वज्ञानात आशावाद आणि निराशावाद ही दोन तत्वे आहेत. ही साहित्य मुल्ये नाहीत....असे स्पष्ट प्रतिपादन विंदा पान क्र.३२ ते ३६ वरील विवेचनात स्पष्ट करताना म्हणतात, “ सौदर्यात्मक मुल्ये आणि साहित्य मूल्ये एकच मानण्याची किंवा विशेष प्रकारची साहित्यिक मूल्ये दुय्यम समजून ती मूल्ये अधिक व्यापक अशा सौंदर्यात्मक मुल्यांतूनच काढण्याची इच्छा ही या गोंधळाला कारणीभूत आहे.”

        सौदर्यवाद ही तत्वज्ञान शाखेची निर्मिती आहे. आशावाद आणि निराशावाद ह्या तत्वज्ञान शाखेच्या विचारप्रणाली आहेत.

           मी सर्वसाधारण कोणत्याही साहित्य किंवा कलाकृतीचा अभ्यास करताना विंदांनी केलेली साहित्य मूल्यांची पुढील व्याख्या प्रमाणभूत धरतो.  “मानवी अनुभव-विश्वाच्या काही वस्तुनिष्ठ विशेषांना प्रतिबिंबित करणारा आणि सर्वसाधारणपणे कमी-अधिक प्रमाणात मानवी मनाच्या तत्संबद्ध पैलूंकडून स्वीकारला जाणारा उत्कृष्टतेचा निकष, म्हणजे साहित्य मूल्य होय.”

(११)  समीक्षा हे मूलतः साहित्यिक मूल्यांचे व्यवस्थापन शास्त्र आहे.

(१२) साहित्य किंवा कला समीक्षा हा साहित्य-कला आस्वादन करण्याचा स्वतंत्र प्रकार आहे, नव्हे तर ती अत्यन्त संवेदनक्षम अशी साहित्य-कलेची अभिव्यक्ती आहे. हे मूल्य साहित्यिक -कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित करीत नाही. त्यामुळे त्यांनी समीक्षा नाकारणे, हे जितके अयोग्य तितकेच ते एकूणच साहित्य-कला संस्कृतीच्या विकासाला त्यांच्यासह मारक आहे.

      बिर्ला फौंडेशनचा सरस्वती पुरस्कार सन्मानित तेलगू लेखक-कवी डॉ शिव रेड्डी म्हणतात, " माझ्या साहित्य निर्मिती नंतर मी केवळ नावापुरता उरतो. वाचक, समीक्षक मला माझ्या साहित्य कृतीचे मूल्यमापन करून देतात. त्यामुळे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत नाही, उलट माझी अभिव्यक्ती अधिक डोळस व सक्षम होण्याची शक्यता बळावते. म्हणून मी माझ्या निर्मितीबद्दल स्वतः कधीही समर्थक होत नाही आणि माझ्या समर्थकांना बळही पुरवित नाही."

(१३) समीक्षापर लेखनातून ज्या साहित्यकृतीची किंवा कलाकृतीची समीक्षा केली जाते, त्या लेखनातलं सोनं कुठलं आणि पितळ कोणतं...ह्याचा बोध वाचकाला होतो. पण त्याच बरोबर समीक्षकांच्या लायकीतलं सोनं आणि पितळ ही वाचकांच्या लक्षात येत असतं. निर्मितिरुप लेखन असो की समीक्षालेख असो, त्या त्या लेखकाचं व्यक्तिमत्व त्यातून प्रगट झाल्याशिवाय राहत नाही.

-पु लं." एक क्षेत्र: दोन व्यक्ती " मधून.

(१४) कोणत्याही चित्रपटाचं किंवा कलाकृतीचे मूल्यमापन करण्याच्या म्हणजे समीक्षा मूल्य ठरविण्याच्या कसोट्या विविधांगी आहेत.पण एक निश्चित आहे की कथा हे चित्रपटाचं बीज मूल्य आहे. त्यामुळे नैतिकता हा मुद्दा कथेतील समाज, कुटुंब आणि राजकीय पटल काय आहे, त्यावर निर्धारित आहे. उदा आधुनिकतेच्या संदर्भात राजकीय पटल जर भ्रष्ट असेल आणि तोच गाभा सामाजिक मूल्यांना छेद देणारा असेल, तर तिथे नैतिकतेची अपेक्षा अस्थायी आहे.

मूल्य व्यवस्था ही योग्य संदर्भात अवलोकन करायची असते. समीक्षा शास्त्राचे हे मूलभूत तत्त्व आहे. कथा वस्तू जितकी निश्चित व नि:संदिग्ध असेल, तितकी चित्रपट संहिता किंवा पटकथा सुसंगत होत असते. इथे दिग्दर्शक फार महत्वाचा व चित्रपटाचा केंद्रीयच नाही तर सेंद्रिय घटक असतो. अनैतिकतेचे विविध अविष्कार तो कसा मांडतो, त्यावर कलामुल्य ठरत असते. नैतिकता अधोरेखित करण्यासाठी अनैतिकता ठळक केली जाते, असं मला वाटते.

(१५) भाव कविता आणि अभाव कविता अशी काही कविता नसते, असं माझं अभ्यासक मत आहे. कारण कशाला कविता म्हणायचं, यावर साहित्यिकांच एकमत नाही. समीक्षा शास्त्र कवितेची व्याख्या करत नाही, पण संकल्पना विशद करताना असं म्हणते की कविता ही एक नादगम्य रचना असून कमीतकमी शब्दांत ती निर्मात्याचे विचार मांडत असते.

            मूलत: कविता ही विचारांची मांडणी आहे. म्हणजे बुद्धीच्या आवाक्यात आणि मानवी तर्काला धरून असणारी रचना असते. तेव्हा माणसाच्या मनाच्या हालचाली टिपताना कविता त्या हालचालींना, आंदोलनांना, संवेदनांना, एक प्रकारचा आकार किंवा विंदा म्हणतात, त्याप्रमाणे घाट (form) देत असते किंवा निर्माण करीत असते. हा आकार कवीला जितका सुस्पष्ट, बुद्धिगामी आणि सर्जनशील असेलतितकी ती कविता, त्या कवितेचा आशय, त्या कवितेचे आकलन सुस्पष्ट होत असते; किंबहुना ती कविता अधिक विशुद्ध आणि विश्वगामी होत असते. कवीला ज्ञात असणा-या अर्थापेक्षा किंवा भूमिकेपेक्षा ती अधिक किंवा त्याहीपलीकडे जाणारी असते.

ज्या कवितेत भावनांचे संवेदन आणि आंदोलन जास्त तितकी ती कविता भावनात्मक म्हणजे भाव कविता किंवा भावगीत होऊन जाते.

              कोणतीही बांधणी घेऊन कवितेचे सृजन होत नाही, असे मला वाटते. त्यामुळे भाव-अभाव असा काव्याचा प्रकार नाही आणि असलाच किंवा कोणाला अभिप्रेत असला, तर तो स्वीकारण्यापूर्वी ज्ञानकोषाचा आधार घेऊन मराठी साहित्याचा आणि पारंपारिक भाषाशास्त्राचा सखोल अभ्यास करून तशी भूमिका मांडावी लागेल, असं मला वाटते.

(१६) माझ्या दृष्टीने कला-साहित्य ही मानवी मनाची, त्याच्या अनुभवाची निर्मितीक्षम अशी संसाधने आहेत. लेखक, कवी, कलावंत हा त्या निर्मिती क्षणाचा अभिव्यक्त निर्माता असतो. कायद्याच्या भाषेत तो मालक असला तरी कलामूल्य संदर्भात तो निमित्तमात्र असतो. अशी विदग्धता नसेल, तर तो लेखक आपल्या निर्मितीचा जनक किंवा जननी राहत नाही. जिथे मालकी हक्क आला तिथे जगरहाटी, तडजोडी, राजकारण सर्व काही आलं, त्यामुळे कला विशुद्ध राहू शकत नाही, असे मला वाटते.

(१७) साहित्य समीक्षेचे तीन टप्पे -

(1) कलाकृतीचा आस्वाद घेऊन त्यातील अनुभूति, आशय आणि सौन्दर्य यांची चिकित्सा करणे.

(2) सौन्दर्य प्रतितीचे विवरण करणे, हा टप्पा समीक्षेमध्ये केंद्रीय असतो. या साठी मानसशात्रीय व समाजशास्त्रीय निष्ठांची तपासणी करणे महत्वाचे असते. ज्या मनोभूमिकेतून व्यक्तिमनाची वैशिष्ट्ये फुलून येतात, त्या भूमिकेचे विशेषत्व लक्षात घ्यावे लागते. साहित्याच्या परंपरा, संकेत आणि तार्किक सुसंगती, ह्यांचे भान ठेवणे आवश्यक असते.

(3) अनुभूती व अभिव्यक्ती यांचे जीवन मूल्यांच्या निकषांवर मूल्यमापन करणे, हा निष्कर्षपद अखेरचा  टप्पा आहे. इथे जीवन सत्याचे दिग्दर्शन हा आग्रह असतो.

      कुसुमावती देशपांडे यांनी वरील विवेचन आपल्या समीक्षा ग्रंथांची मूलभूत आखणी आहे, असे प्रतिपादन केले आहे. डॉ जया द्वादशीवार यांनी कुसुमावतींच्या साहित्याचा परामर्ष घेताना वरील निवेदन केले आहे.

       माझे समीक्षात्मक लेखन प्रस्तुत टप्प्यांना धरून केलेले असते, म्हणून ही सूत्रे मी समीक्षेची प्रमाण मूल्ये मानतो.

(१८) सत्य शोधन हे मुद्दाम करावे लागेल, असे कार्य नाही. कारण ते प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत कार्य आहे. सत्य काय आहे, हे शोधून च कोणताही सद्विचार करता येतो. सामाजिक विचार विविध अंगांनी करता येतो. सत्य शोधक असावे लागते, कारण असत्य इतके माजले आहे, की सत्य टिकविण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आणि सृजन होण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. ह्यातूनच संस्कृती घडत असते....सांस्कृतिक विकास घडत असतो.

                       साहित्य ही केवळ निर्मिती नाही. सृजनशील निर्मिती, सौंदर्यवादी दृष्टी, अभिजात संस्कृती निर्माण करणे, हे साहित्याचे कार्य आहे. या दृष्टीने साहित्य निर्मिती ही त्या त्या साहित्यिकाकडून चळवळ घडत असते. ह्या चळवळीतून विविध जीवन मूल्यांचा विकास घडत असतो. म्हणून साहित्यिकावरती फार मोठी जबाबदारी असते. समीक्षा, टीका आणि अवलोकन, रसग्रहण इ विविध अंगांनी साहित्याचे परिक्षण विविध पातळींवर आणि विविध निमित्ताने होत असते. उदा. एखादा लेख किंवा कविता पारितोषिकासाठी निवडताना त्याचे परिक्षण केले जाते. त्या लेखकाची इतर साहित्य संपदा, वैचारिक सातत्य, विचार प्रणाली, इ अनेक घटक समीक्षा आणि चिकित्सा दृष्टिकोनातून तपासले जातात. हे योग्य की अयोग्य?...हे स्वातंत्र्य निवड समितीला द्यावेच लागते. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यावर टीका होते. ती सुद्धा टाळता येत नाही किंवा तिला प्रत्युत्तर देण्यासाठी सव्यापसव्य कोणी सहसा करत नाही! तरीही जे कोण करतात, ते आपल्या पायावर आपण स्वतः च धोंडा मारून घेत असतात. उदा ग्रेस वर   दुर्बोधतेचा शिक्का अनेक टीकाकारांनी मारला, म्हणून ग्रेस ने कोणालाही अद्वातद्वा उत्तर दिले नाही !!

(१९) कविता ही प्रत्येक व्यक्तीची आगळी वेगळी, वैविध्यपूर्ण अशी कलाकृती असते, अनुभवाच्या मुशीतून प्रगट होणारी शारदा असते!

           कविता हा विविध आशयाचा संस्कार असतो. कविता हा काव्यरस असतो, त्याच बरोबर कवी / कवयित्रीची विविधांगी अभिव्यक्ती असते. अनेक जीवनानुभवातून खुलत जाणारी प्रतिभा असते. कविता त्या त्या साहित्यिकाच्या चारित्र्याचा आणि चरित्राचा विविध अंगांनी विकसित होत जाणारा अविष्कार असतो.

                 काव्य शास्त्र हा साहित्याचा आगळा-वेगळा असा भाग असला आणि ज्ञान शाखा असली तरी रसिकांच्या दृष्टीने कविता हा आस्वादक मानवी चेहरा असतो आणि मनाचा संवेदनशील कप्पा असतो. कवितेचे गीत होणे, सूर आणि आवाज होणे, हा मानवी मनाचा सांगीतिक अविष्कार असतो. तेव्हा कविता जनमानसाचा विविध अंगांनी ओठावरील, मनातील आणि बुद्धीच्या परिप्रेक्षातील अनुभव होत असतो. कवितेचा कला म्हणून अविष्कार गीतातून  होत असताना कवितेला अनेक, बहुमूल्य असे आयाम प्राप्त होतात. त्या आयामांतून प्रत्येकाला आपली स्वत:ची प्रतिमा दिसु लागते. तेव्हा कविता कधी भक्ती, कधी भजन, कधी मार्मिक प्रबोधन, कधी विडंबन, तर कधी प्रार्थना होते. राग-रागिणी आणि संगीत कलेची विविध रूपे हा काव्य रसाचा व काव्याचा विशिष्ट असा प्रवास आहे. स्वरांच्या आंदोलनांतून आणि आविष्कारातून प्रगट होणारी गायक-गायिकांची प्रतिभा हा कवितेचा अभिजात साक्षात्कार आहे.

         समीक्षा हा कवितेचा आणि मराठी साहित्यात काहीसा दुर्लक्षित आणि बराचसा बहुसंख्य लोकांनाच नाहीतर साहित्यिकांनाही न आवडणारा प्रकार आहे. समीक्षा हे संशोधनात्मक, विश्लेषक आणि अभ्यासात्मक असे शास्त्र आहे. समीक्षा जितकी बुद्धिवंत आहे, तितकीच चिकित्सक आहे. चिकित्सा करणे आणि ती खुल्या मनाने स्वीकारणे, अनेकांना अवघड जाते. कारण समीक्षा करण्यासाठी समीक्षकाला कवितेच्या नुसत्या अंतरंगातून शिरून चालत नाही; त्याला भाषा शास्त्र आणि अभिजात कला ह्या  दृष्टीने कवितेचे अवलोकन करावे लागते आणि समर्थ शब्दांत मांडावे लागते.

             थोडक्यात काय, तर कविता स्मरावी लागते, अभ्यासावी लागते, परिक्षण करावी लागते आणि आस्वादक वृत्तीने चाखावी लागते. तरच तिचे खरे मूल्यमापन आणि ऐतिहासिक परिक्षेत्र विकसित होत असते.

(२०)He who dares not offend; cannot be honest.

    -Thomas Paine.

     चूक दाखविणे, तू चुकत आहेस...तू सुधारणा केलीस तर आत्मकोशातून बाहेर पडशील....असे मी म्हणालो की काहीजणांच्या स्वातंत्र्याला बाधा पडते, तर काही जणींना अपमान वाटतो....

    पण मला विश्वास आहे, त्या सगळ्यांना एक दिवस नक्की ज्ञात होणार आहे की जो अधिक्षेप, समीक्षा, चिकित्सा करत नाही, केवळ स्तुती करतो, तो प्रामाणिक असू शकत नाही.

    प्रामाणिकपणे बोलणे, लिहिणे, व्यक्त होणे...हा जसा अधिकार आहे; तसे कर्तव्य ही आहे.

(21) समीक्षा शास्त्रात, कलाकृतीच्या मागे कलावंता पर्यंत जायचा मार्ग उपलब्ध नसतो. कलाकृती आणि तिचा निर्माता यांच्या संबंधांचे ज्ञान, हे आस्वाद अंतर्गत ज्ञान नाही. ते आस्वाद बाह्य आहे.

        - नरहर कुरुंदकर." थेंब अत्तराचे ".

    अलिकडे कवितेत आत्मनिष्ठ या शब्दाचे महत्त्व बरेच वाढले आहे. कवीने आपल्या अनुभवाशी प्रामाणिक रहावे...इथ पर्यंत ठीक आहे. पण कवितेतून व्यक्त होणारा अनुभव रसिकांना, वाचकांना किंवा समीक्षकाला प्रामाणिक वाटतो की नाही, ही त्या काव्याची अभिव्यक्ती असते आणि ती तशी जाणवते की नाही....ह्यावर कवितेचे यश अपयश अवलंबून असते.

     प्रकाशित काव्य सामाजिक मालकीचे असते. त्याचा अभ्यास ज्याला जसा करायचा असेल, तसा त्याने करावा. हे स्वातंत्र्य वाचकाला निश्चित असले पाहिजे.  जे काव्य काव्य म्हणून डोळ्यांसमोर येते, ते काव्य ह्या कसोटीवर कितपत यशस्वी आहे, हे ठरविण्याचा अधिकार वाचकांना आहे.

(22)Accept both criticism and compliments….it takes both rain and sun for a flower to grow.

            समीक्षा म्हणजे टीका आलीच. पण साहित्य कृतीची चिकित्सा...कोणालाच नको असते. इथे फेसबुक वर तर मी कोणत्याही लेख किंवा कविते वर अगदी शास्त्र तत्वानुसार टीका केली की त्या लेखक, कवी ह्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या सारखे होते आणि लेखक कवी सह त्यांच्या समर्थकांचा माझ्यावर हल्ला होतो ! कारण उघड आहे की मराठी साहित्यिकांना समीक्षा नको असते ! फक्त स्तुती पाठक हवे असतात !!

इथे कोणाला खरी फुलझाडं वाढवायची नसतात, इथे लोकांना आपला narcissism  हवा असतो!

(23) एखाद्या शब्दाचा वापर आपण नेहमी करतो आणि मग त्याचा अर्थ समजून घेण्याच्या फारशा फंदात पडत नाही. अशा अनेक शब्दांमधील एक शब्द आहे, स्वातंत्र्य. विचारवंत असे मानतात की ह्या शब्दा मागे असणाऱ्या सुमारे 200 व्याख्या आहेत !

        सर्व साधारण समज असा आहे की स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव आणि वैचारिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, राजकीय इ प्रकारच्या गुलामीतून सुटका.

     म्हणजेच असं की स्वातंत्र्य ही कशाच्या पासून तरी सुटका आहे. म्हणजे मुळात बंधन आहे, हे खरे आहे का? त्यावर तत्वज्ञानाचे अभ्यासक म्हणतात, बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य. पण मग समाजात वावरताना, कुटुंबातही वागताना इच्छानुसारी वर्तनाची मुभा...असा अर्थ आहे का? दुसरे असे की समाज, कुटुंब, संविधान मान्य करेल त्या परिघात वावरणे म्हणजे स्वातंत्र्य आहे का?

     एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की एका व्यक्तीचे स्वातंत्र्य सिद्ध होण्यासाठी इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करणे अनिवार्य आहे!

      खरं तर असे आहे की बंधने आणि स्वातंत्र्य ह्या कल्पना परस्पर विरोधी नसून एकमेकांना सुसंगत आहेत. कारण ह्या दोन्ही कल्पना समाज,कुटुंब, देश आणि साहित्य यांच्या व्यवस्थेचा भाग आहेत. स्व रचित, स्व समज आणि स्व निर्मित विचार किंवा वर्तन म्हणजे स्वातंत्र्य नाही, हे आपण मान्य करणार असलो तर आपण हे स्वीकारत असतो की समाज, साहित्य, संविधान यांनी मान्य केलेले व्यक्तीचे हक्क हे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे रूप असते.

       कोणतीही व्यवस्था मग ती सामाजिक असो, राजकीय असो किंवा साहित्यिक असो...अशी व्यवस्था स्वातंत्र्य संपविण्यासाठी नसते. कारण माणूस म्हणून जगणे ही सुद्धा एक व्यवस्था आहे. डोळ्याने पाहून अन्नाचा शोध घ्यावा लागतो, हाताने अन्न गोळा करावे लागते, तोंडाने त्याचा स्वीकार करावा लागतो, पोटाने पचन क्रिया करावी लागते...ह्या सर्व व्यवस्था जगण्याच्या प्रक्रियेचे अनिवार्य घटक आहेत. ह्यातील कोणताही एक घटक मी स्वातंत्र्य घेऊ म्हणतो, तेव्हा शरीराचे आणि त्या बरोबर मनाचेही आरोग्य बिघडते. तसे आपल्या साहित्यिक स्वातंत्र्याचे आहे. अनेक घटक आहेत, ह्या सर्व घटकांवर वर समीक्षा आधारित आहे. साहित्याचे मूल्य ठरविताना ज्या घटकांची आवश्यकता समीक्षा विचारात घेते, ती बंधने नसतात. साहित्य, कला, समाज, इ सर्वांना एका आदर्श व्यवस्थेत बघण्याचा, मूल्यमापन करण्याचा आणि आस्वादक चिकित्सा करण्याचा तो एक प्रयत्न असतो.

संदर्भ - नरहर कुरुंदकर.' अभयारण्य '.

(24) समीक्षा हे कलाकृतीचे किंवा साहित्यकृतीचे आकलन असते., सौन्दर्य संपादन असते आणि वाचकप्रेमी असा काही अविष्कार असतो.

       कवितेची समीक्षा म्हणजे समीक्षा शास्त्राचा अभ्यास नसून ती आस्वादक मीमांसा असते. असे असेल तरच समीक्षा बोजड न होता वाचकाला सरळ, सोप्या आणि निर्मळ जवळीकतेने आपलीशी करणारी अशी समीक्षकाची अभिव्यक्ती होत असते. समीक्षा हे चिंतन असते; आणि ते वाचकप्रेमी असते.

मी असे मानतो किंबहुना माझ्या समीक्षेचे सूत्र, वाचकाला समीक्षा शास्त्रदर्शन घडविणे नसून प्रस्तुत कलाकृती मला जशी भावली, जाणवली आणि मला आनंदित, पुलकित आणि काहीशी नाविन्यपूर्ण तात्विक बोध करती झाली, तशीच ती रसिकांपर्यंत मला पोहोचवता आली, तरच मी स्वतःला यशस्वी समीक्षक मानतो.

ह्याचा अर्थ असा नाही की इतर प्रकारची समीक्षा कनिष्ठ किंवा प्रभावशाली नसते, असं नाही. काही समीक्षेमध्ये अत्यंत सखोल आणि गंभीर अशी सूत्रबद्ध मांडणी असते. अशा समीक्षकाचे सखोल वाचन असते आणि त्या मध्ये क्लिष्टता असली  तरीही त्याने गांभीर्याने अभ्यास केलेला दिसतो. समीक्षेचे अष्टपैलू असे वास्तव त्याच्या लेखनातून दिसते.

                      ***********