सौंदर्य म्हणजे काय? जे काल प्रवाहात नित्य नूतन होत राहते....त्याला सौंदर्य म्हणता येते. साहित्य, कला, वांगमय, निसर्ग आणि मानवी देह सुद्धा नित्य नूतन आविष्कार घडवित नसेल, तर ते किंवा त्यात सौंदर्य नसते.
मुळात सौंदर्य हा अनुभव आहे. सौंदर्य ज्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं आपल्याला दिसतं...ती वस्तू किंवा व्यक्ती निमित्तमात्र असते. सौंदर्य हे आपल्या दृष्टीचे,आपल्या विवेकाचे,आपल्या सकारात्मक अनुभवांचे भाग्यधेय असते. म्हणून ग्रॅहम म्हणतो, सौंदर्य टिकणारी, शाश्वत गोष्ट नाही.
ज्या साहित्यात किंवा कलेमध्ये नावीन्यपूर्णता नसेल, तर ते साहित्य किंवा कला सौंदर्यपूर्ण नाहीत. प्रत्येक कथा, कविता, चित्र, चित्रपट, नाटक यांच्यामध्ये नवे किंवा नाविन्यता दर्शविणारे काहीच नसेल, तर ती कथा, कविता, चित्र, नाटक इत्यादी दखलपात्र होत नाही.
साहित्याचे दोन मुख्य घटक आहेत. (१) मर्ढेकरांनी म्हणल्या प्रमाणे साहित्य ही रुपवेधी ललित कला ( Fine art) आहे. त्यांना साहित्याचे रूप (सौंदर्यात्मक घाट आणि लय) महत्वाचे वाटतात. (२) तर करंदीकरांना साहित्यातून निर्माण होणारा जीवनवेधी आशय महत्वाचा वाटतो. ह्याचा अर्थ करंदीकरांना साहित्यातून व्यक्त होणा-या जीवन दर्शनावरून साहित्याची महात्मता सिद्ध होते, असे वाटते. इतर उदा. संगीत, चित्र, शिल्प इत्यादी कलांच्या बाबतीत व्यक्तिनिष्ठ अनुभव क्षमता, संवेदनशीलता आणि बौद्धिकता क्षमता ह्या घटकांना महत्व असते किंबहुना ह्या घटकांशिवाय ह्या कलांचा आस्वाद अशक्य आहे. कारण ह्या कलांना प्रमाण भाषा किंवा बोली भाषा नाही.
सौंदर्य ह्याचा अर्थ साहित्यातील संजीवक, आनंददायी, आल्हादक तत्व. ह्या तत्वामुळे साहित्यात कल्पना जन्य सौंदर्य निर्मिती होते. तसेच, साहित्यामध्ये असणा-या आशय संपन्नतेमुळे यथार्थपणे जीवन दर्शन घडते. ही साहित्याची मुलभूत लक्षणे असली तरी ज्या वाचक वर्गासाठी, समाजासाठी साहित्य कार्य करत असते, त्याला दोन परिमाणे आवश्यक असतात. एक परिमाण आहे, स्वातंत्र्य आणि स्वावलंबन. ह्या परिमाणाची प्रपुर्ती ज्या समाजात होत असते, तो समाज...त्या समाजाने लेखकाला साहित्यिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन उपलब्ध करून देणे. हे साहित्याचे एक परिमाण आहे.
सौंदर्य हे एक तत्व आहे आणि अनुभव ही आहे. म्हणून असे म्हणतात की हा अनुभव तत्त्व दार्शनिक आहे. म्हणजे असे की ह्या तत्वामुळे जीवनातील संजीवक, आल्हादायक आनंद होतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की सौंदर्य केवळ तात्विक दर्शन आहे. कारण सौंदर्य हा संवेदनात्मक अनुभव आहे. मानसिक पातळीवर घडणारी अनुभूती आहे. साहित्यात, कलेत आणि व्यक्ती दर्शनात सौंदर्य भौतिक स्वरूपात आहे. एखादी वस्तू सुंदर असते, कारण त्या वस्तूमध्ये कलेचा आविष्कार झालेला असतो. व्यक्ती सौंदर्य शारीरिक असतेच, पण एखाद्या व्यक्तीच्या केवळ दर्शनात स्वाभाविक असे सौंदर्य असते. कारण सौंदर्याचे अभिवादन वैयक्तिक आवडही असते. व्यक्तिपरत्वे सौंदर्याचे परिमाण वेगवेगळे असते आणि तदनुसार सौंदर्याची गुणवत्ता सिद्ध होत असते. सुंदरता हा दृष्टीचा अनुभव असला तरी सौंदर्य ही अनुभवाची अभिव्यक्ती आहे. ह्याचाच अर्थ असा की सुंदर केवळ दिसणे नाही.अंध व्यक्ती सौदर्य आस्वाद घेऊ शकते. कारण सौंदर्याला केवळ रूप नसून गंध आहे, श्रवणीयता आहे, स्पर्शज्ञान आहे, समीपता आणि साहचर्य आहे. यश आणि त्यामुळे लाभलेले समाधान ही आनंदाची संवेदना आहे. कारण ह्या मध्ये अभिजात सौंदर्य आहे. विद्वत्तापूर्ण व्यक्ती दर्शनात ही सौंदर्य आहे.
स्त्रीचे व्यक्तिमत्व आणि व्यक्तित्व वयपरत्वे जीर्ण, शीर्ण होत नाही, टवटवित, प्रसन्न राहते...कारण स्त्री हे शारीरिक सौंदर्य नाही आणि म्हणूनच हे त्रिकालाबाधित नसते. देह असो किंवा देह निर्मित काहीही असो किंवा निसर्ग असो, जो मानव निर्मित नाही...ह्या सर्वांचे सौंदर्य सदासर्व काळ नूतन होत असल्याने ते निखळ सौंदर्य आहे.
व्यक्तीच्या स्वभावात सौंदर्य असते, व्यक्तिमत्त्वात सौंदर्य असते. ह्या पैकी व्यक्तिमत्व फसवं असू शकतं... पण व्यक्ती बदलत नाही. अशी व्यक्ती तिच्या शालीनते मधून, संयमी, आदरणीय आणि समजूतदार वागण्यातून प्रगट होत रहाते. कारण अशी व्यक्ती दुःखाच्या आघातातून जे विधायक शिकते, ते तिच्या चेहऱ्यावरील दुःखाच्या पडछाये सह दिसले तरी तिच्या वर्तनातून एक संयम शील, आदरणीय व्यक्तित्व फुलत रहातं...हेच त्या व्यक्तीचे सौंदर्य असते...तिला असे व्यक्तित्व सौंदर्य बहाल करते.
मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की, शब्दातून संस्काराचा सुगंध दरवळतो. मनाचा गाभारा म्हणजे आपली सुसंस्कारित मनोबुद्धी होय. सुंदरता हे सौंदर्य शास्त्राचे मूलभूत तत्व आहे. आणि अभिरुची संपन्न आवड हे सौंदर्य शास्त्राचे एक लक्षण आहे.
रस्त्यावरील दगडातही सौंदर्य आहे," सत्यम, शिवम, सुंदरम " चा साक्षात्कार आहे...
साहित्यिक, कलाकार, अभियंता, स्थापत्य कलाकार, तत्वज्ञ, अध्यात्मिक संत इत्यादींच्या सृजनशीलतेमधून जीवनाचा अर्थ साक्षात्कारित होत असतो.
She is neither model nor glamour or item girl. She is beauty called Indian woman who knows her being is not her style but it is in her Grace, poise and simplicity.
ही स्त्री मॉडेल नाही की शृंगार आणि नेपथ्याचा आविष्कार नाही. भारतीय स्त्रीचे सौंदर्य दर्शनीय आहे. तिचे दिसणे, ही स्टाईल नसून हे तिचे स्वाभाविक, आदरणीय, आणि सहज साधेपण आहे आणि हे तिचे असणे, हेच तिचे अस्तित्वपूर्ण दर्शन आहे. कारण रंगात सौन्दर्य नसते. सौन्दर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, डोळ्यांवर झालेल्या संस्कारांवर, माणुसकीच्या भावनाशील मनाच्या संवेदनशीलतेवर निर्भर आणि निर्मळ असतं.
नातं बहुआयामी असे व्यक्तिमत्व आहे. पण हे व्यक्तिमत्व एकाचे नसून दोन व्यक्तींमध्ये असलेलं निरूपण आहे. सरळ सहज उमगल तर ते सौंदर्य अभिव्यक्त रूप असतं. त्या रुपात दिलीप गोसावी ह्या कवीला नात्याची गुंफण दिसते. मर्यादेच्या अवकाशात कुंपण दिसतं, तर रक्त बीजातून साकार झालेलं लिंपण दिसतं. काल प्रवाहात एकाकी पण असतं आणि ठेच -बीच लागली, तर ते मी- पणाचे आर्त रूप असतं. भूतकाळात डोकावून पाहिलं तर ते जगाच्या पाठीवरील नगण्य अस्तित्व असतं आणि अखेर नाते हे जगण्याचे बंधन मानले तर ते अमर्याद असे सत्य असते. पिढ्यान् पिढ्या रचित गेलेली परंपरा असते....महान संचित असतं. स्मित हास्य ही संवेदनशील भाषा आहे. ह्या भाषेचे सौंदर्य वैश्विक आहे. शब्दांशिवाय, शब्दां पलीकडले अर्थ सांगणाऱ्या भाषेत मातृभाषा आहे, मायबोली आहे आणि अनिर्वचनीय समाधान - शांती आहे.
व्यक्ती स्त्री असो वा पुरुष.... शारीरिक सौदर्य हे आकर्षण आहे, व्यक्तिमत्व आहे...पण वयानुसार ते अस्ताला जाते. पण मानसिक सौंदर्य, बुद्धिमत्ता तेज....वयानुसार वाढत जाते....जेव्हा ती व्यक्ती शरीरापेक्षा मानसिक दृष्टीने सौंदर्य संपन्न असते.
Attraction म्हणजे आकर्षण ही एक स्थिती आहे आणि ह्या मध्ये दैहिक म्हणजे शारीरिक संवेदना मुख्य असतात. सौंदर्य शास्त्रानुसार, आकर्षण हे मुलभूत वैशिष्ट्य आहे. व्यक्तिमत्वाचे ते एक prima facia प्रमुख आणि वास्तववादी स्वरूप आहे. व्यावहारिक जग ह्याच आधारावर चालले आहे. Distraction म्हणजे अनाकर्षण हे नेमके ह्याच्या विरुद्ध म्हणजे नेणिवेच्या जाणीवेत आहे. कारण आकर्षण ही शाश्वत स्थिती नाही. म्हणजेच असं की, आकर्षण ही केवळ असोशीची जाणीव आहे आणि ती कालसापेक्ष आहे. म्हणूनच अनाकर्षण हे आकर्षणाचा जणू काही पाठलाग करीत असते......Distraction चा दुसरा अर्थ, अडथळा किंवा विक्षेप हा ही आहे. त्यानुसार आकर्षण न टिकणारे असल्यामुळे कालपरत्वे आकर्षणाला अडथळा किंवा विक्षेप प्राप्त होत असतो. उदा. स्त्रीचे देहिक सौदर्य हे आकर्षण आहे आणि ते कालसापेक्ष आहे म्हणुन वयोमानानुसार हे सौदर्य बाधित होत असते. ह्या संदर्भात विचारात घ्याची गोष्ट आहे की एखादी गोष्ट, विचार सुचणे आणि अनुभव येणे....ह्यापलीकडे सौदर्य दृष्टी आहे. ही सौंदर्य दृष्टी म्हणजे सक्षम संवेदनशीलता आहे आणि ती नेमक्या शब्दांत अभिजातपणे मांडणे.....हे साहित्यिक, सांस्कृतिक आणि संस्कार सक्षम ज्ञान आहे. अध्यात्मिक दृष्टीने देणाऱ्याचा हेतू काहीही असो, आपण ते दिलेलं प्रसाद म्हणून स्वीकारले की तो देण्या घेण्याचा व्यवहार होत नाही. अपेक्षारहित देण्या घेण्यामध्ये सौंदर्य आहेच; पण ते घेताना देणाऱ्यांच्या हेतूची शंका न घेणारा निरागस विनम्र भाव घेणाऱ्यापाशी असेल तर देण्या घेण्यातले सौंदर्य डागाळत नाही.
- महेश एलकुंचवार.
सापेक्षतावाद ही कवितेच्या आशयाची एकच अभिवृद्धी नसून संवेदन सक्षमता हा कवितेचा मुख्य अंक आहे. काव्य हा कवितेचा विषय आहे, ज्या ज्या विषयांना काव्यमयता आणि संवेदना प्रपूर्तीचे भान आहे, त्या कवितेला शब्द न्याय देत असतात. शब्दांचे कर्तव्य पूर्ण झाले की कविता थांबते, पण पूर्ण होत नसते.
अंक हा शब्द महत्त्वाचा आहे. महाकाव्य निर्मिती होत असताना काव्य रस निर्मिती होत असते. ती काव्य विषयाच्या अभिव्यक्तिला पूरक असेल तर कथानक निर्मिती हे एक महाकाव्याचे समृद्ध लक्षण आहे. ह्या दृष्टीने अंक
ही संकल्पना काव्य शास्त्रात अंतर्भूत आहे.
महाभारत, रामायण, मेघदूत इत्यादी महाकाव्ये....म्हणजे प्रदीर्घ अशा काव्य रसाच्या निर्मितीचे स्तोत्र महाकाव्यातील कथानक हा कल्पना विलास आहे, तर संवेदन सक्षम अभिव्यक्ती हा महाकाव्याचा खरा नायक किंवा नायिका आहे. सौंदर्य हा कला आस्वाद आहे, पण महाकाव्यातील सौंदर्य निर्मिती म्हणजे कथानकाला लेखकाने दिलेला काव्यात्मक न्याय हा आहे.
कालिदासाचा ‘मेघदूत’ कविवर्य बापटांनी “जीवीचा जिवलग कालिदास’ ह्या लेखात उलगडून दाखविला व मला न दिसलेली अनेक सौंदर्य स्थळे सापडली. वसंत बापट मला प्राध्यापक म्हणून रुइयात भेटले आणि तिथंच त्यांच गुरुजन म्हणून स्थान पक्क झालं. शिक्षण घेतना सौ. सरोजिनी वैद्य, सौ पारनाईक, श्री क्षीरसागर इ गुरुजनांची तीव्रतेने आठवण झाली. असे गुरुजन आज नाहीत, ही जाणीव अस्वस्थ करते. आषाढ-भाद्रपदाच्या हलक्या सरी येऊन गेल्या आहेत. कुंद,भरून गेलेलं आकाश, वर नजर टाकली तर संथपणे वाहणारे वारे,ढग; जलधारांच्या भाराने जड झालेले , त्यामुळे हलके-हलके सरकणारे ढग नाहीत, तर ‘मेघ’....मेघदूताच्या कालिदासातील एकाकी यक्षाची आठवण करून देतात........मी यक्ष नाही; पण हा यक्ष माझ्या अंतर्यामी येताच मला आपलासा करून टाकतो. तू माझी कांता नाहीस....तरीही “उपरि घनं घनरितं, दुरे दयिता किमेतद आपत्तित्वं” अशी मनाची तगमग का होते?
मानवी मन व निसर्ग ह्यांचे नातेबंध अतूट असतात. ज्या संचिताने आणि नियतीने आपली निर्मिती केली, त्याच नियतीने निसर्गाला तिच्या निर्मिती-क्षेत्रात आपल्याला बद्ध केलं आहे. कालिदासाने निसर्गाला आपलसं केलं व त्यामध्ये स्वत:ला विरून टाकलं. त्याचं निसर्गाशी नात काय? हा प्रश्न एकाच वेळी अनेक उत्तर देतो. गुरु-शिष्य,कलावंत-रसिक,प्रेमी-प्रमिका,पुरुष-प्रकृति अशी अनेक उत्तरे.....तीच उत्तरे मानवी नात्यांना आहेत. खर म्हणजे आपलं नात नात्यापलीकडचं....म्हणजे निसर्गाचं धरित्रीशी आहे तसं. म्हणजे द्वैतातच अद्वैत सामावल्या सारखं....सगुणातून निर्गुणाकडे जाणार....रूपातून अरुपात जाणार.
शब्दांवर प्रेम असल्याशिवाय साहित्यिक रचना करता येणार नाहीत. पण जेव्हा शब्दांवर श्रद्धा असते, तेव्हा शब्दांशी आपले नाते हळूहळू स्फुरण पावू लागते. शब्द आपल्याशी बोलू लागतात, आपल्या मनीचे अस्फुट, निराकार भाव जाणून घेऊ लागतात. अनुभवांतून आलेली प्रचीती आणि संवेदनांतून मनात उमटणा-या प्रतिमा निराकार असतात. त्यांना केवळ शब्दांनी आकार द्यायचा नसतो.... शब्दांशी असलेले उमलणारे नाते हे शब्दांचे लेणे असते. हे लेणे शब्दांत उतरताना त्या शब्दांची जी सखोल जाणीव व्यक्त होते.....त्या जाणिवेचे शब्दरूप म्हणजे कवितेचा आशय असतो. गद्य वांग्मया बाबतीत हीच जाणीव प्रतिमा आणि प्रतीके धारण करते. पुराण कथा, मिथके, ऐतिहासिक कथा, विविध घटना आणि त्यांतून झालेला बोध जेव्हा शब्दांकित होतो, तेव्हा ती साहित्य रचना सौंदर्य पूर्ण होते. ह्या दृष्टीने असे म्हणतात की सौंदर्य ही मानवी जाणिवेची प्रगल्भ अशी अभिव्यक्ती आहे.
****************
No comments:
Post a Comment