Sunday, 23 August 2020

हे प्रीय - एक कविता

 छांद्योग्य उपनिषदात एक गोड गोष्ट आहे.  उद्दालक आपला पुत्र, श्वेतकेतुला पिंपळाच्या झाडाची फळे काढून आणायला सांगतो. मग ती फळे कापून बिया काढायला सांगतो. शेवटी बिया फोडून आत काय आहे, हे विचारतो. श्वेतकेतू म्हणतो, " बियांच्या आत बियांचेच बीजमय पदार्थ कण दिसत आहेत. " तेव्हा उद्दालक म्हणतो, " बियांचे आत बीजकण म्हणजेच बियाच दिसतात ना ! पण त्यांच्यात असलेली प्रचंड शक्ती दिसत नाहीयेय. ही शक्तीच महान, प्रचंड वृक्ष निर्माण करते." 

                        हे प्रीय ह्या हिंदी कवितेत नेहा भांडारकर म्हणतात, " बीज में ताकद है वृक्ष बोनेकी " मानवी जीवन असेच महान आहे. हे प्रीय.....ये मानवा, माझ्या प्रीय बांधवांनो, तुमच्यामध्ये असेच बीज आहे..... ती तुमची अभीप्सा आहे ....दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. तिला जागृत करा....जगणे, ही सतत, अखंड चालणारी प्रक्रिया ....जन्म आणि मृत्यू ह्या दोन धृवांमध्ये असलेले अंतर हा संघर्ष आहे...." बीज अंकुरे, अंकुरे रे....ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे, माळरानी, खडकात " (कवी-मधुकर आरकडे ). हा संघर्ष सफल करण्यासाठी....ही कवयित्री म्हणते, " दृढ़ करो प्रेम की अस्मिता ".

                  उद्दालक श्वेतकेतुला जणू सांगतो आहे, " जीवन नहीं है, कोई भूल "  ह्याच्या अंत:करणात, बीज रुपात प्रचंड उर्जा आहे.....संवेदनांचा महासागर आहे. ही मानवी जीवनाची यथार्थ आणि कृतार्थ अशी संस्कृती मुल्ये आहे....नेहा जी म्हणतात, " मनुष्य के अंतरंग में छिपी संपदा विपुल...."                                  बीजामध्ये काहीच दिसत नाही....तेव्हा उद्दालक म्हणतो, परमेश्वर हे तत्व, म्हणजे " प्रेम की अस्मिता " आहे. डोळ्यांना दिसत नाही. पण त्याचे अस्तित्व म्हणजेच मानव हा अविष्कार आहे. नेहा जी म्हणतात, " जीवन नहीं है कोई भूल ". असंख्य निसर्ग चक्रातील मानव निर्मिती ही अशीच एक " अंकुरण की ओशोमय श्रृंखला " आहे. हे बीजांकुरण आहे, "प्रेम की अस्मिता " चे आहे; " जीवन संघर्ष " हे प्रसव संवेदनांचे स्फुरण आहे.

                     हे बीज अंकुरे, अंकुरे....ओल्या मातीच्या कुशीची ' अभीप्सा ' आणि  'प्रेम की अस्मिता " घेऊन "  जीवन संघर्ष " करीत आहे. त्याला जन्म आणि मृत्यू यांना जोडणारा " संवेदना पूल " हवा आहे...तरच मनुष्यत्व ' संभावना ' ह्या परिप्रेक्षातून बाहेर पडून..... " बीज है मगर फूल नहीं " मधून म्हणजे   " माळरानी, खडकात " जे सत्व आहे.....ते रुजून फुल होऊ शकेल.

                     नेहा भांडारकर यांची ही सघन, आशय संपन्नता... समग्र कवितेच्या शब्दाशब्दांत स्त्रवत जाणारी महान जाणीव आहे.....खरं तर हा माझ्या मानवी-जीवन जाणीवेचा एक प्रवास त्यांनी इथे रेखाटला आहे. हा प्रवास मी मांडण्याचा केवळ प्रयत्न केला आहे.....धन्यवाद !

                                               **************

Saturday, 22 August 2020

हिंदुत्व म्हणजे काय ?

                                                         हिंदुत्व म्हणजे काय ?

                            Why I am a Hindu ? मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आहे, ह्याचा अत्यंत विस्तृत उहापोह शशी थरूर यांनी ह्या इंग्रजी पुस्तकात केला आहे. हा विषय त्यांनी तीन भागात विशद केला आहे. भाग १- हिंदुत्व म्हणजे काय. भाग २- हिंदुत्वाचे राजकारण. भाग ३- आधुनिक परिप्रेक्षातील हिंदुत्व.

                           शशी जी, प्रस्तावनेतच हे स्पष्ट करतात की हिंदुत्व हा रूढार्थाने हिंदू हा धर्म नसून एक महान तत्वज्ञान आहे. म्हणूनच हिंदुत्व हे कुठल्याही एका पवित्र धर्म ग्रंथाचे सूत्र नाही. हिंदू हा जर धर्म म्हणून मान्य करायचा असेल तर ह्या धर्मात देवादिकांचे जेव्हढे महत्व आहे, म्हणजे आस्तिक हे तत्व मान्य केले आहे; तेव्हढेच देवाचे अस्तित्व अमान्यही केले आहे, नास्तिक ह्या संप्रदायामार्फत. हिंदूंमध्ये जैन, बौद्ध, शीख तत्वज्ञान इतके स्पष्ट आणि मान्य केले गेले आहे की ह्या परंपरा म्हणजे हिंदुत्वाच्या उपशाखा मानल्या गेल्या आहेत आणि संविधानाच्या चौकटीत ह्या परंपरा हिंदुत्वातच समाविष्ट मानल्या गेल्या आहेत.

                             आस्तिक हिंदुत्व षडदर्शन संहितेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे; तर नास्तिक हिंदुत्व बौद्ध, जैन, शीख ह्या परंपरांशिवाय चार्वाक आणि मिताक्षर परंपरांतून स्पष्ट होते. वेद-उपनिषदे आणि आरण्यके ह्या ग्रंथांतून आस्तिक परंपरा वर्णन केलेली आहे. महाभारत आणि रामायण हे ग्रंथ धर्म ग्रंथापेक्षा अधिक नीती-अनीती, राजधर्म, कर्तव्य, हिंसा इ अनेक तत्वांचे अवलोकन, चिकित्सा, आणि चिंतन-मनन करणा-या कथा आहेत.

                               केन उपनिषदाने म्हणले आहे की हिंदुत्व ही संकल्पना आणि तत्वज्ञान अशा लोकांना समजावून सांगणे सोपे आहे; ज्यांना हिंदुत्व म्हणजे काय, हे मुळातच समजत नाही. म्हणजे असं की जे हिंदू नाहीत, त्यांना हिंदुत्व समजावून देणे, सोपे आहे. पण जे हिंदू असून हिंदुत्व काय हे जाणत नाहीत; त्यांना हिंदुत्व म्हणजे काय, हे समजाविणे, अवघड आहे. 

                             ह्या संदर्भात एक गोड कथा सांगितली जाते. ती अशी - एका तत्वज्ञ ऋषींना परमेश्वर म्हणजे काय, हे समजावून सांगा, असे काही नास्तिक लोक म्हणाले. त्यावर ते काही न बोलता मौन झाले. त्यांच्या शिष्यांनी आणि नास्तिकवादी लोकांनी खूप आग्रह केल्यावर ते म्हणाले, " मौन, शांतता, ध्यानस्थ अवस्था हेच ह्याचे उत्तर आहे. कारण परमेश्वर शांत, निरामय आणि ध्यानस्थ अशी माणसाची खरी अवस्था आहे आणि ह्याच अवस्थेमध्ये ईश्वर, देव, परमेश्वर, आत्मा इत्यादिंचे समग्र ज्ञान संपादन होत असते."

                                                                 *************


                       

Friday, 21 August 2020

वास्तव आणि गृहितक

                                                              वास्तव आणि गृहितक 

गृहितक आणि वास्तव ह्यांचे दरम्यान काय अंतर आहे? गृहितक म्हणजे सुविहित पध्दतीने विचार मांडणे, आणि निर्णयाप्रत जाण्यासाठी काही ढोबळ निष्कर्ष काढणे. वास्तव ही एक वस्तुस्थिती आहे; आणि गृहितकाशी फारकत घेऊनच वास्तव समजून घेता येते. म्हणजेच असं की गृहित गोष्टींचा त्याग करूनच वास्तव नीटपणे समजून घेता येते. कारण वास्तव हे प्रथम दर्शनीच स्विकार करायचं, असं सत्य आहे आणि स्वीकारा नंतरच आपण वास्तवाला समजावून घेऊ शकतो, हे मुलभूत सूत्र आहे. 

                      पण वास्तव समजून घेण्यासाठी प्रथम आपल्या अहंकाराला हाकलून द्यावे लागते. कारण वास्तवाशी सामना करण्यासाठी फक्त वस्तुनिष्ठ विचारच आवश्यक असतात. अखेर असं आहे की वास्तव आणि गृहीतक यांच्या दरम्यान परस्पर अवलंबित्व नाहीयेय. वास्तव हे सत्य दर्शन आहे, तर गृहितक हे एक समस्यांचा मुकाबला करण्याचे साधन आहे. कधीही वास्तव ही एक समस्या आहे, असे समजून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणे, हे स्वत:ला गोंधळात टाकणारे माप आहे. वास्तव हे जीवनाचे अभेद्य सत्य आहे आणि ते आहे तसं स्वीकारण्याचे जे नाकारतात, त्यांना वास्तव ही समस्या वाटते.

                        वास्तवाचे सम्यक ज्ञान गृहितकावर आधारलेले नसते, कारण वास्तवाचे विश्लेषणात्मक अवलोकन करण्याचे भूतकाळातील अनुभव हे सूत्र आहे. म्हणूनच गतकाळातील सत्यामुळे... सत्य गोष्टींच्या आधारे पूर्वग्रहदूषित मते बनविणे, योग्य नव्हे. पण भूतकाळ म्हणजे इतिहास आणि इतिहास हे सम्यक ज्ञान असून त्याचा उपयोग वास्तववादी सत्याचे समग्र अवलोकन करण्यासाठी निश्चित आवश्यक आहे.

                                                              ******************







            


Friday, 27 March 2020

Albert Camus -Absurd Reasoning

Albert Camus has been acclaimed as one of stelwart proponents of Absurdity.  According to him, Absurdity means contradictions in human Life. His novels, writings and lectures have tried to explain that Life on planet named Earth is not unique for human being. In fact, the claims that it is unique on the basis of intelligence and culture are camouflages on the surface. Under the surface, little scratching reveals the wild and heinous animal the human being is.  The politically and or with religion induced agitations have invariably seen killings, lootings, and vandalism as cruel as wild animals. Only difference is that animals kill for eating, for hunger, for feeding their young ones because they are carnivorus.
                       The two world wars and other inumerous wars between kingdoms have shown killings of soldiers and the people. The victorious or otherwise uncontrolled mobs have killed, looted, stolen, raped as many people as in genocide or mass killings. The atrocities of people against people is thus a glaring history of past and also contemporary times.
                     This is the Truth and harsh truth of being inhuman. The people are, in spite of being intelligent, cultured and evolved beings, claimed as superior of all other living animals, are not so. Although, there is logic, rationality, purpose, aim and certain achievements, the very nature of barbarism is absurd to our claims of being educated, modern, intellectuals, highly mannered and sophisticated individuals.
                     This is the existentialism.....the struggle, the fights and superceding, ruling and blindness of forces to rule with the weapons of killings and tortures. Alber Camus gives an example from Greek epic written by Homar...the act of Sisyphus who was the most prudent and wisest of mortals. He was given punishment for his whatever wrongs, to carry on his shoulders heavy rock up on steep hill, then let it fall down to base of hill. Sisyphus was to caryy it again on his shoulder the same rock and climb up the hill.....how long? Till he dies. This is absurd. The people who wanted to kill him prefer to kill him by his own act of killing......and Sisyphus carries out such punishment. This is aburdity of Sisyphus....this is absurdity of whole inhaman behaviour.
                   Camus says that people think, they are intelligent enough to think, they have a reasoning, purpose and a method to do the things which are absurd.So, he says Absurd depends on absurd world. Because there are masses, the hooligans, the vicious politicians, the religious leaders and saffrone clad men and women who know what they are doing, is annihilation of huamanity and yet do it. Is it not absurdity?
                The perpetrators of absurdity are those who know that there is something they possess to take masses with them for whatever they ask masses to do. This something is a thought that does not arise in desert because unless it finds its bread, it can not survive. The absurdity survives where there is bread to feed upon. Food for thoughts has to be there and vicious leaders do know what bread must be served to sustain the thoughts. 
                Next tenet of Absurdity is that there are men , deployed and employed, and some blind enough to get carried away by propoganda and just be traditional supporters. These are the people who defend viciously and vociforously and at times violently the Rights of irrationalities under various names such as natioanlism and religion. Political games are part of irrationalities that never seem to stop. Then there is a tradition of what may be called humiliated thoughts that have never ceased to exist. There is always a weapon of humiliation, insults and intimidation that is practised more as the intensity of hope as against efficacy of the reason.
               The greatest achievements of absurdities are in terms of fear that it can inflict amongst the people who are rational and reasonable. However, the fear that becomes conscious of itself becomes anguish. Finally, there is also a consiousness of death that calls for anxiety and value of existencial life.
          To sum up, it is pertinent to note Albert Camus words. He said, " Thinking is learning...to see, to be attentive, to focus on consciousness,....so, what justifies as thought is actually the extreme of consciousness...I always fail to understand being the nonsense and the world that is peopled by irrational. I believe that the mind when it reaches its limits, must make a judgement and choose its conclusions and face it predacements and consequences, like Aristotle or Copernicus. The Absurdity arises due to confrontation between human neeeds and the unreasonable silence of the world to meet those demands and needs."

                                          *************

Thursday, 26 March 2020

काही विचार


 (1) बुद्धीच्या आयमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे निर्मन होणे किंवा निर्मळ होणे, आहे. बुद्धी हा मानवी यष्टीचा उत्क्रांत होण्याचा क्रम आहे. तर बुद्धीच्या आयमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न हा समष्टीचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. संतांनी हेच साध्य केले, म्हणून ते इतके निर्मळ झाले की बुद्धी आणि मन ह्या द्वंद्वातून ते मुक्त झाले.
निर्द्वंद्व होणे आणि अद्वैताचा साक्षात्कार होणे, ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
                  ************

(2) माणूस म्हणून मला माझी प्रतिष्ठा आहे व ती जपण्याचा माझा अधिकार कोणीही कायदाबाह्य पद्धतीने हिरावून घेऊ शकत नाही. तसा यशस्वी प्रयत्न जो कोणी करेल, तो मानवी हक्क भंग कायद्याचा अपराधी असेल.

 मला बेजबाबदारपणे अटक करून 68 दिवस पोलीस कस्टडी व तुरुंगवास भोगावा लागला. कोर्टात मात्र माझ्या विरुद्ध लावलेलं एकही कलम पोलिसांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, म्हणून कोर्टाने मला निरपराध म्हणून जाहीर केले.
                         *********


(3) पाप हा अनेक दुर्गुणांचा समूह नाही. एकच वाईट कृत्य पाप असू  शकते. पण पुण्य मात्र अनेक चांगल्या गोष्टींचा, अहंकार शून्य एकत्रित समूह असतो. एकच चांगली गोष्ट किंवा कृत्य म्हणजे पुण्य नव्हे.
    ह्याचे कारण असे आहे की चांगली वर्तणूक, चांगल्या गोष्टी करणे, सत्शील वागणे ह्या सर्वसामान्य गोष्टी आहेत. त्या सर्वच गोष्टी सर्वांकडे नसतात. पण ह्यातील एखादी तरी नक्कीच असते. कारण मनुष्य जन्म हा अशाच एखाद्या सद्गुणांच्या प्रभावामुळे मिळत असतो.
म्हणूनच संपूर्ण पुण्यवान माणूस ही व्यक्ती नसते, ती अभिव्यक्ती असते. पण अंशतः पापी माणूस हा संपूर्ण पापी माणसापेक्षा वेगळा नसतो.
                             *************
(4) लॉक डाउन न होऊ देणे.. हे जितके irrational, तर्क शून्य आहे; तितकेच ते होऊ देणे irrational तर्क शून्य आहे... ह्या सर्व phenomena प्रकारामध्ये absurdity विवेकशून्यता आहे. सर्व जगाचे व्यवहार बंद पाडणे.... एका अदृश्य शत्रूला मारण्यासाठी.. आणि त्यासाठी शस्त्र काय? तर घरामध्ये स्वत;ला.. सर्वांना स्थानबद्ध करणे.. जगरहाटी बंद ठेवायची आणि शत्रूचा नायनाट करायचा.. जे बळी पडले आहेत, त्यांतील जायबंदी, जखमी. वाचवायचे.. आणि न वाचलेल्यांची काळजीपूर्वक विल्हेवाट लावायची.. बाकी सर्व स्तब्ध ! पण इतरांना जगायचे आहे म्हणून त्यांच्यासाठी जीवनावश्यक व्यवस्था चालू ठेवायच्या. ह्या वरून लक्षात येतं.. लोकांना जगवायचं, हा सुद्धा केव्हढा मोठा कारभार आहे.. व्यवस्था आहे..
ह्या पलीकडे जाऊन आपल्याला काय हवं असतं? स्वातंत्र्य.. नेमकं हेच.. खरे जीवनमूल्य आहे.. जे गमावल्या मुळे आपण जे जगतो आहोत, ते किती नीरस, बेचव आणि घुसमट करणारे जगणे आहे ! स्वातंत्र्याची किंमत अशा प्रकारे अनुभवायला मिळत आहे.. काश्मीर मध्ये तर लादलेले पारतंत्र्य.. स्थानबद्ध.. किती घुसमटविणारं असेल ???
                                                     **************
(5) गिरीश कुबेर यांनी एक मार्मिक आणि अचूक अवलोकन केलं आहे की " ज्यांचे अशक्त विचार आहेत; तेच सशक्त प्रचार करीत असून त्याला सामान्य लोक बळी पडत आहेत."
                                                    ****************


Friday, 28 February 2020

मन आणि दु:ख


आपले मन हे पानझडीच्या काळात उमललेल्या फुलासारख असतं. कोमेजून जाण्याची प्रक्रिया चालू असतानाच उमलण्याची धडपड ते करीत राहते.
- नरहर कुरुंदकर.
म्हणून Renuka Khati Purohit म्हणते,
वाटे जरी मनाला, हा अंत भावनांचा
सुरवात शेवटातून नक्कीच होत असते
दिशा जरी विखुरल्या, थोड्याच पावलांवर
देतील हाक पुन्हा, जुळण्या नवीन रस्ते.                
            अनंत हे गणपतीचे नाव. पण त्याची व्युत्पत्ती अन + अंत. ज्याला अंत नाही. ज्याला सुरवात असते, त्याला अंत असतोच. पण ज्याला अंत नाही, त्याला शेवट नसतो आणि सुरवातही नसते. असा अनंत.
आपल्या मन:पटलावर एक पातळी असते, वर्तमानाची. तर दुसरी असते, अतीताची, भूतकाळाची. ह्या दोन्ही पातळी जेव्हा समांतर होतात, तेव्हा अनंताचा infinity चा प्रवास दृश्यमान होतो.Renuka Khati Purohit, ह्या चारोळीत, दोन तत्वे मांडतात. एक " अंत भावनांचा " आणि दुसरे " सुरवात शेवटातुन ". ह्या दोन तात्विक संकल्पना... ही कवयित्री विखुरलेल्या दिशा, थोडी पावले आणि हाक जुळणे ह्यांच्याशी संक्रमित करत आहे. थोडी पावले ह्यातून सूचन आहे, दिशा विखुरल्या तरी नियंत्रित आहेत. जुळणारे रस्ते हे प्रतीक हाकेला प्रतिसाद देणारे रूपक आहे. अनंत ह्या संकल्पनेत सुरवात व शेवट एकमेकांशी विसंवादी होतात, त्याप्रमाणे हे नियंत्रित विखुरणारे आणि जुळणारे रस्ते आहेत. हाक व जुळणारे रस्ते ह्यातील आशय अनंत ह्या प्रतिमेत आहे.

हे समजून घेणे, चांगलंच अवघड असले तरी ह्या कवयित्रीच्या मनोगताचे सूत्र आहे. छान आहे. 
जसा सुख हा जाणिवेचा संस्कार आहे, तसा दुःख हा जाणिवेचाच सनातन संस्कार आहे. सुखाची साधने बदलतात, पण दुःखाची प्रयोजने मात्र सनातन होऊन राहिली आहेत.
              ह्यावर सुसंस्कृत मानवाने दुःखाचे परिमार्जन करणारी दृष्टी, उदात्तीकरण, तात्विक चिंतन आणि आध्यात्मिक सांत्वन शोधून काढले आहे. आशावाद हा दुःखाला मिळालेला उ:शाप आहे.
            नरहर कुरुंदकर म्हणतात, " जेव्हा अंधारच प्रकाशगर्भ अस्थी कुरवाळून जतन करू पहातो; तेव्हा उसळणाऱ्या आशावादामुळे दुःखांची विविधता व समृद्धी सारखी विकसन पावत असते. वर्तमानातले रंग विझून जातात, तेव्हा स्मृतीतून (nostalgia) रंग पुरविले जातात...गंध आणि स्वरसंवेदना अधिक जागरूक होतात...सळसळती लाट खळखळून फुटते व ओली रेती पायांना बिलगते...थंडगार जलस्पर्शातून अंग असे सुखावते की भोवतालचे हसरे-नाचरे विश्व त्यातून साकार होऊ लागते."
                  ************
                 

अव्यक्त ते व्यक्त

आधी बोलायचे आहे,
पण बोलणार नाही.
देवळाच्या दारामध्ये,
भक्ती तोलणार नाही.
माझ्या अंतरात गंध,
कल्पकुसुमांचा दाटे.
पण पोकळी तयाची,
कधी फुलणार नाही.
नक्षत्रांच्या गावातले,
मला गावातले गुज.
परि अक्षरांचा संग,
त्याला मिळणार नाही.
मेघ जांभळा एकला,
राहे नभाच्या कडेला.
त्याचे रहस्य कोणाला,
कधी कळणार नाही.
दूर बंदरात उभे,
एक गलबत रुपेरी.
त्याचा कोष किना-यास,
कधी लाभणार नाही.
तुझ्या कृपाकटाक्षाने,
झालो वणव्याचा धनी.
त्याच्या निखा-यात कधी,
तुला जाळणार नाही.
-कुसुमाग्रज
-यशवंत देव.
Renuka Khati Purohit, मला जे म्हणायचे आहे, ते पटो वा न पटो. पण श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज ह्या कवितेत, गीतात जे म्हणतात, तेच मला म्हणायचे आहे.
इतुके बोललो आम्ही,
बोलायचे नसूनी.
ज्ञानदेवे बोलिले
तरीही बोलिले वागयज्ञी.
व्यक्त-अव्यक्त, मूर्त-अमूर्त, निर्गुण-सगुण अवघे गोविंदू रे |....असे म्हणणारे संत.....
अस्फुट मनीचे गूज माझे.
स्फुट होतसे तेव्हा.
आम्ही रंगलो,
भक्तीत जेव्हा.
भक्ती हा काव्य रसाचा धनी आहे. माझे शब्दावरील प्रेम, माझे भाषेवरील प्रेम हा माझा भक्तीभाव आहे. ज्ञानदेव-नामदेव-तुकाराम आदी संतांनी अव्यक्त करुणेचा सागर व्यक्त करताना संयत, सम्यक आणि संयमी शब्द रचना करताना मनात आधी खूप आत्यंतिक असे चिंतन-मनन केले आणि "दाटुनी आले मन माझे, शब्दांकित केले सारे |" ....म्हणूनच कुसुमाग्रजांनी म्हणले आहे:
" आधी बोलायचे आहे,
पण बोलणार नाही.
देवळाच्या दारामध्ये,
भक्ती तोलणार नाही."
अस्तु.

Wednesday, 26 February 2020

मित्र आणि मैत्री


                 मित्र आणि मैत्री
गोधने चारी, हाती घेऊन काठी |
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी |
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ||
रूपे सुंदर सावला गे माये .....
-संत एकनाथ
        एकनाथ हा महान संत तर आहेच, पण तो प्रगल्भ कवी आणि आशय संपन्न असा जगाचा दाता आहे. संतांचे दातृत्व हे मानवतेचे देणे आहे आणि लेणेही आहे.
          या अभंगात एकनाथ म्हणतात, वैकुंठीचा हा सुकुमार आहे, गोपवेष हा त्याचा अवतार जगाच्या उद्धाराकरिता आहे. जगजेठी म्हणजे जगाची जगण्याची एक रीत आहे, पद्धत आहे, शिस्त आहे. जगण्यासाठी काहीतरी प्रयोजन....हे माणसाच्या मुलभूत गरजांमधील एक महान तत्व आहे. माणसाचं जगणं हे केवळ जिवंत राहणे, एव्हढेच नसून जीवन घडविणे, हे आहे. म्हणून एकनाथ म्हणतात, “ गोधने चारी....हाती घेऊन काठी ! “ आपल्या मुलं-बाळांचे संगोपन, पालन-पोषण करायचे आहे, संसार चालवायचा आहे, जीवन घडवायचे आहे. पण त्यासाठी “हाती घेऊन काठी “ राहायचं आहे. काठी ह्याचा अर्थ दोन प्रकारचा आहे. एक अर्थ आहे, कठोरपणा, धारिष्ट, धैर्य, ठामपणा इ हे गुण आहेत. दुसरा अर्थ आहे, काठी हा आधार आहे....पैसा, संपत्ती, सुखसोयी इ गोष्टी ह्या काठी सारख्या आधारभूत आहेत. जगण्यासाठी आणि ह्या जगण्यातून जीवन घडविण्यासाठी “ काठी ” आधार मूल्य आहे. पण त्याला बाजारमूल्य करायचे नाहीयेय. प्रेम, वात्सल्य, स्नेह, बंधुभाव, समता, सम्यकता, संयम इ मुल्ये ही जीवनमूल्ये आहेत. नुसते जगणे महत्वाचे नाही; त्यातून जीवन घडवायचे असते आणि त्यासाठी स्वातंत्र्य हे सुद्धा इतर जीवन मूल्यांसारखे तत्व आहे.
           जगणे हे जीवन म्हणजे पाण्यासारखे मूलद्रव्य आहे. जमीनीतून उद्भवणारे, पण त्याचा उपयोग आयुष्याची दोर, मशागत, पालनपोषण करून अन्न उत्पादन करणे, हे जगण्याचे साधन आहे. माणसाची अन्न-पाणी ही मुलभूत गरज आहे. पण हे अन्न-पाणी ज्या जमीनीतून उत्पादित केले जाते, त्या जमिनीशी आपले नाते धरित्रीचं आहे. आईचे नाते आहे. हे जमीनीशी घट्ट असावे लागते. आपले पाय ह्या जमिनीशी घट्ट असेल, तर जगणे होत असते.
           जगणे म्हणजे पैसा आला. त्याशिवाय आजच्या युगात जगणे अशक्य आहे. पैशाशी माणसाचे नाते आहे आणि जगण्याशी निगडीत झाले आहे. जमिनीवर घट्ट उभे राहणे म्हणजे पैशाचे योग्य मूल्य जाणणे.
          आज सकाळी सकाळी चिरंजीव झोपलेले....पैसा कमाविण्यासाठी, ऑफिसला सकाळी लवकर उठून जाणे, ही आर्थिक गरज आहे. पैसा, पगार ही जगण्याची गरज आहे....जमीनीवर घट्ट उभे राहणे, ही जीवन घडविण्यासाठी नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. ह्या जमीनीची, पैशाची, नोकरीची मशागत करणे, ती सांभाळणे.....तिथे करियर घडविणे......हे कर्तृत्व आहे आणि ह्यातच जीवन घडविणे आहे. संसार आहे, मुळे-बाळें....त्यांचे पालनपोषण, शिक्षण इ सर्व काही ज्या पैशावर होते, ते सांभाळणे.....ही जीवनाला लावायची शिस्त आहे. जगण्याची पद्धत आहे......एक आपली जीवनशैली आहे. ह्यातूनच जीवन विकास साधणे शक्य आहे. पण त्यासाठी ज्या आर्थिक पायावर, जमीनीवर उभे राह्यचं आहे, तो मजबूत केला पाहिजे. तरच जीवनाची जडणघडण होत असते. थोडक्यात, जीवन विकासाचे मुलभूत तत्व आर्थिक पाया हे आहे.
         आपल्या जगण्याच्या पद्धतीत शिस्त आणि त्यावर आधारित आहे, जीवनमूल्यांचा पाया आणि विकास.....संवयी, मग त्या चांगल्या असोत की वाईट......त्या आपल्या जगण्याच्या पद्धतीचा नकळत एक अंगभूत आधार आणि मानसिक आधार होऊन जात असतात. मित्र हा एक मोठ्ठा भाग आजच्या तरुणाईचा झाला आहे. ह्यामध्ये गैर काहीच नाही. पण मैत्री आणि मित्र ह्या गोष्टी किंवा घटक एकच नाहीत. जगामध्ये जशा चांगल्या-वाईट गोष्टी आहेत, तसे चांगले-वाईट मित्रही आहेत. पण मैत्री म्हणजे मित्र नव्हे. म्हणजे असं की मैत्री ही संकल्पना आहे. अतिशय सुंदर, आकर्षक, आणि जीवाभावाचे सख्य मागणारी आणि देणारी अशी मैत्री हे माणसालाच नाही तर अवघ्या विश्वाला मिळालेले वरदान आहे. पण म्हणूनच मैत्रीला एक शिस्त असते, एक पद्धत असते आणि एक मर्यादाही असते किंबहुना असायला हवी. मित्र ही संवय आहे की व्यसन आहे, हे मात्र तपासून पहायचे असते. कारण ह्यातच व्यसनाधीनता होत नाहीयेय ना? आपले आत्मभान आपण हरवित नाही ना? मित्राच्या संगतीने, “ संगती संग दोषात “ होत नाही ना? हे वारंवार, सतत तपासून पाहिले पाहिजे....तरच मित्र-मैत्रीण हा आपल्या संवयीचा, आपल्या व्यसनाचा, आणि व्यसनाधीनतेचा भाग, हिस्सा होत नाही. आपल्या घरातील आई-वडील, बहिण-भाऊ, इतर नातेवाईक ह्यांच्यापेक्षा हा मित्र, ही मैत्रीण वरचढ, मोठी, महत्वाची होत नाही ना? ह्या मित्रांच्या आपण आहारी तर जात नाही ना? आपले आत्मभान आपण राखत आहोत की नाही? हे सतत तपासून पाहिलं पाहिजे. कारण जागतीकरणाच्या लोंढ्यात आपली अनेक जीवनमूल्ये आपण हरवित चाललो आहे किंवा गमावीत चाललो आहे......हे दुर्दैवी, भयानक आणि अस्वस्थ करणारे वास्तव आहे.  
                **************   



Monday, 17 February 2020

कवी, कविता आणि समीक्षा


 विचार कोठून येतात? माझ्या मनातून, संस्कारांतून, बुद्धीतून आणि अनुभवांतून....ह्या सर्वांचा एक संकीर्ण परिणाम निर्माण होत असतो. ह्याच वेळेला माझी जाणीव ह्या विचारांबाबतीत काय असते? हे विचार फक्त माझे असले तर मी हा त्यांचा मालक म्हणून माझा अहंकार दृढ होत असतो. पण मला हे जाणवत असेल की हे विचार जरी माझे असले तर त्या विचारांची व्याप्ती, संपन्नता, विशालता आणि जीवन मूल्यांच्या दृष्टीने प्रभाव क्षमता मोठी आहे, तर मग माझ्या पेक्षा विचार मोठे होतात आणि मग मी त्या विचारांपुढे विनम्र होतो, नतमस्तक होतो. ह्या प्रक्रियेत, नेमकं काय घडतं? तर माझे व्यक्ती किंवा व्यष्टी मूल्य कमी होऊन समष्टी मूल्य व त्या मूल्याची जाणीव माझ्यातच तीव्र होऊन जाते. मी व्यक्ती न राहता अभिव्यक्ती होऊन जातो. ह्या प्रक्रियेत, नेमकं काय घडतं? तर माझे व्यक्ती किंवा व्यष्टी मूल्य कमी होऊन समष्टी मूल्य व त्या मूल्याची जाणीव माझ्यातच तीव्र होऊन जाते. मी व्यक्ती न राहता अभिव्यक्ती होऊन जातो.

          सर्वोत्तम कला किंवा साहित्य कृतीचे रहस्य हे आहे की मूर्त शब्दांतून अमूर्त संकल्पना, प्रतिमा, प्रतिकांचे दर्शन घडविणे. म्हणूनच साहित्य आणि कला ही इतर दर्शन शास्त्रांप्रमाणे दर्शने आहेत, मानवी संस्कृतीच्या भव्यतेची, वास्तवतेची आणि कळी-काळाची !
            कवितेचा वाचक म्हणून स्वागत रसिक म्हणून करायचं. मग रसग्रहण करताना काही खडे बोचले, टोचले तर दुर्लक्षित न करता चांगल्या भाषेत, म्हणजे समीक्षेच्या भाषेत नोंदवायचे आणि ह्या कवितेने मला काय दिलं ह्यापेक्षा या कवितेने साहित्य क्षेत्राच्या परिप्रेक्षात काय दिलं आहे, ह्याचे मूल्यमापन करावं, असा माझा दृष्टिकोन असतो. विंदा नी कवीच्या बाबतीत ' निरंकुशता ' हा शब्द कवीची मस्ती या अर्थाने वापरला आहे. ही मस्ती अशी आहे, जी प्रतिभेला असलेला अंकुश मानते, पण प्रतिभा बाह्य अंकुश नाकारते. त्यामुळे कविता मुक्त मनाचे सृजन होतेच पण त्या पलीकडे तिला नवतेचं परिमाण लाभण्याची शक्यता वाढते.
                पण समीक्षा कवितेचे वाङ्मयीन मूल्य ठरविते, हे जितकं खरं आहे, त्यापेक्षा मोठे समीक्षा मूल्य हे आहे की ते दादागिरी न करता किंवा शिकविण्याचा आव न आणता कवीच्या प्रतिभेचे, सृजनाचे बीज वर्धित करते. कारण     साहित्य किंवा कला समीक्षा हा साहित्य-कला आस्वादन करण्याचा स्वतंत्र प्रकार आहे, नव्हे तर ती अत्यन्त संवेदनक्षम अशी साहित्य-कलेची अभिव्यक्ती आहे. हे मूल्य साहित्यिक -कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित करीत नाही. त्यामुळे त्यांनी समीक्षा नाकारणे, हे जितके अयोग्य तितकेच ते एकूणच साहित्य-कला संस्कृतीच्या विकासाला त्यांच्यासह मारक आहे.
                        बिर्ला फौंडेशनचा सरस्वती पुरस्कार सन्मानित तेलगू लेखक-कवी डॉ शिव रेड्डी म्हणतात, " माझ्या साहित्य निर्मिती नंतर मी केवळ नावापुरता उरतो. वाचक, समीक्षक मला माझ्या साहित्य कृतीचे मूल्यमापन करून देतात. त्यामुळे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत नाही, उलट माझी अभिव्यक्ती अधिक डोळस व सक्षम होण्याची शक्यता बळावते. म्हणून मी माझ्या निर्मितीबद्दल स्वतः कधीही समर्थक होत नाही आणि माझ्या समर्थकांना बळही पुरवित नाही."
                        फेसबुकवर लेखन करणा-या लेखक-लेखिका ह्यांनी हे लक्षात घेतले तर त्यांची ग्रुपबाजी, गटबाजी कमी होईल व त्याचा फायदा त्यांनाच आपली साहित्य सेवा अधिक कसदार करण्यास मदत होईल.
                     रसास्वाद,रसग्रहण आणि समीक्षा ही साहित्य शास्त्रातील वेगवेगळी दालने आहेत. वाचक ह्या भुमिकेपलीकडे जाऊन ज्यावेळी मी चिंतन-मनन ह्या अभ्यासक आणि वैचारिक पातळीवर जाऊन पोहोचतो, तेव्हा मला जे जाणवत असते, ते मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.
                    तेव्हा मला सुधा जोशींच्या "वेध" मधील हे स्फुट आठवते: "लेखनाचा तरल, उत्कट वृत्तीने अनुभव घेणे, चिंतन प्रक्रियेत त्यांचा नव्याने पडताळा घेत राहणे, उलगडा करीत जाणे आणि त्यांच्या अर्थांच्या संगती जुळवीत जाणे...... जीवनचक्राच्या अटळ गतीचे भान,मानवी दुखा:ची आणि एकाकीपणाची अपरिहार्यता....आणि असे असूनही पुन्हा पुन्हा जागवला जाणारा चैतन्यमय नवा सूर, निर्मितीच्या प्रेरणा.....हे समीक्षेचे कार्यक्षेत्र आहे."
                    ह्या सगळ्यांची सुसंगत जाणीव मनाला स्पर्श करते, म्हणण्यापेक्षा येऊन भिडते....तेव्हा मी जे लिहितो....तो कधी रसास्वाद असतो.....रस निष्पत्ती ही एक कलाकृती असते....कलेच्या अंगाने जाणारे लेखन ह्या दालनात.....तर कधी रसग्रहण...काव्यात्म लेखन हे एक वेगळे दालन..... आणि समीक्षा हे दालन रसास्वाद आणि रसग्रहण ह्या दालनांसह फुलणारे पण कधी परखड, कधी अभ्यास-संशोधनपर, तर कधी कठोर टीकात्म.... अशा अंगांनी व्यक्त होत असते.
                  लोकसत्तेच्या चतुरंग मधील 'बेडकांचे डबके' हा लेख जे सांगतो, तेच इथे फेसबुकवर ही दिसते. इथे पुरस्कार नसला तरी एकंदरीत बहुसंख्य लेखक-लेखिका, कवि-कवयित्री इत्यादींना मिळणारे प्रतिसाद सरसकट स्तुतिकारक असतात आणि असेच प्रतिसाद ह्या साहित्यिक मंडळींना आवडत असतात, हवे असतात. अशा साहित्यिकांच्या पोस्टवर जरा वेगळा टिकात्मक किंवा समिक्षणात्मक सूर लावला की ते साहित्यिक नाराज असतात. त्यांचे चाहते, स्तुतिपाठक ही जो वेगळा सूर लावतो, त्याच्यावर आगपाखड करतात.
                   मराठी साहित्यिकांना टीका, समीक्षा, चिकित्सा नकोच असते. फक्त स्तुती, वाहव्वा हवी असते, ह्या अपवृत्तीला सक्रीय पाठींबा देणारे त्यांच्या झुंडी, अनुयायी, चाहते असतातच. पुन्हा वेगळा सूर लावणा-यावर असे आरोप- " तुम्हाला मी काय म्हणतो आहे, ते कळतच नाही, मी असे म्हणालोच नाही, फेकाफेक करू नका ...." इत्यादी इत्यादी....असे हे साहित्यिक त्यांच्या चाहत्यांसह आरडाओरड करणार. थोडक्यात, राजकीय असहिष्णुतेची साथ साहित्य विश्वात ही मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे.
                     रवी परांजपे ह्यांनी १.५.च्या लोकसत्तामधील पडसाद ह्या सदरात बुद्धीवादाचे दोन पंथ फार सुंदर मांडले आहेत.एक प्रकार आहे तर्कनिष्ठ आणि दुसरा सृजनशील. तर्कनिष्ठ बुद्धिवाद कठोर टीकेच्या अंगाने मांडला जातो; तर सृजनशील बुद्धिवाद सम्यक, सहिष्णू आणि समीक्षा अंगाने मांडला जातो. टीका असो वा समीक्षा दोन्हींचे अंतिम उद्दिष्ट साहित्य, विचार किंवा कलाकृतीचा आस्वाद घेणे, हेच असते.
                   आस्वादक जेव्हा प्रचारक, प्रेरित किंवा राजकीय-आर्थिक दबावाखाली असतो, तेव्हा त्याची आस्वादकता भंग पावते; ती भ्रष्ट पावते आणि विचारांत असहिष्णुता, अतिरेकीपणा आणि स्फोटकता येऊ लागते.
                   ह्याच लोकसत्तेच्या अंकात गिरीश कुबेर यांनी असेच विचार शतखंडित महाराष्ट्र ह्या लेखात मांडले आहेत.
मी फेसबुक हे वैचारिक व्यासपीठ आहे, असे मानतो व तदनुसार माझ्या प्रतिक्रिया मांडत असतो आणि त्या मांडताना माझा प्रयत्न सृजनशील बुद्धीवादात्मक असतो. ते मांडण्यासाठी काहीतरी निमित्त झालेले असले तरी माझा रोख कधीही आणि केव्हाही मूळ पोस्टच्या मित्र-मैत्रिणीवर हेत्वारोप किंवा आगपाखड करणे, हा नव्हता आणि नसतो. हे मी मुद्दाम लिहित आहे, कारण काही माझे मित्र-मैत्रिणी माझ्या पोस्ट्स मुळे माझ्याबद्दल गैरसमज करून घेतात... व त्याचा मन:स्ताप त्यांच्यापेक्षा मलाच जास्त होतो आणि मला समजावून देण्यात मी अपुरा पडल्याच्या जाणीवेने मी अधिक व्यथित होतो. तर माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना नम्र प्रार्थना....आपले वाद, मतभेद, एकमेकांवर केलेली टीका, समीक्षा ही वैचारिक असते. त्यांचा उद्देश किंवा माझी भूमिका पोस्टकर्त्याची सृजनशीलता जपावी, वृद्धिंगत व्हावी...अशी बुद्धीप्रामाण्यवादी असते.
                                                  समीक्षा व समीक्षक- एक चिंतन.
                    इथे फेबू वर अनेक चांगल्या साहित्यिक कलाकृती सादर होत असतात. त्या आपल्या मित्र, नातेवाईक परिवारापर्यंत पोहोचाव्या एव्हढीच माफक अपेक्षा सर्वसामान्यपणे असते. पण ह्या पलीकडे जाऊन पोस्ट्स मधून निर्माण होणारा 'मी' समजून घेणे, हा एक अभ्यास असतो. मला असा अभ्यास करताना माझ्यामध्ये मला एक समीक्षक सापडला. मग मी विचार करू लागलो, हा समीक्षक म्हणजे नक्की काय आहे? तेव्हा जेष्ठ समीक्षक रा.ग. जाधव ह्यांचा 'समीक्षा व समीक्षक' हा नितांत सुंदर लेख वाचनात आला. त्यांना २०१६ चा महाराष्ट्र शासन पुरस्कृत विंदा करंदीकर पुरस्कार मिळाला. त्यांचे अलीकडेच २७ में २०१६ रोजी निधन झाले.
त्यातील काही उतारे इथे मुद्दाम ठेवत आहे.
                       " समीक्षा म्हणजे समदृष्टीने पाहणे, सम्यकपणे किंवा समतोलपणाने अवलोकन करणे,होय.कारण समीक्षा ही साहित्याचा अनेक अंगांनी अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा आहे., एक 'discipline' आहे. मनोरंजन, उदबोधन, आनंद याचा अनुभव एकेकांना येत असतो.पण अशा अनुभवाची चिकित्सा करून तो अधिक यथार्थ, समृद्ध व सुस्पष्ट करण्याचे कार्य समीक्षा आणि समीक्षक करीत असतात.म्हणून चांगल्या साहित्याला चांगल्या समीक्षेची आणि चांगल्या समीक्षेला चांगल्या साहित्याची तहान असते.
                       चांगल्या व अभिजात साहित्यकृती अनेक सत्यता उराशी बाळगून असतात. प्रतिभावंत समीक्षक....... या सत्यता उलगडून स्पष्ट करतात.... व्यक्तीच्या व सामूहिक जीवनाच्या सुखदुखा:चा, प्रश्नोपप्रश्नांचा, स्वप्नांचा व स्वप्नभंगांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात......साहित्यकृती ही एक अपूर्व कलात्मक मिर्मिती असते. समीक्षा ह्या कलावस्तूचे रंगरूप मोठ्या प्रभावीपणे स्पष्ट करून सांगते.
                      समीक्षेच्या वाचनामुळे साहित्यकृती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. तिच्यातील आवडणा-या व नावडणा-या गोष्टींचा तर्कशुद्ध खुलासा होतो. योग्य कारणांसाठी एखादे पुस्तक का आवडते किंवा का आवडत नाही, याचे बौद्धिक समाधान प्राप्त होते आणि आपली वान्गमयीन अभिरुची संपन्न होते.
                    समीक्षा म्हणजे काही फावल्या वेळेत व लहरीनुसार करावयाचा व वाचावयाचा उद्योग नाही, तर ती एक गांभीर्यपूर्वक करावयाची साधना आहे. कोणत्याही समाजातील साहित्यसंस्कृतीचा दर्जा केवळ साहित्य व साहित्यिक यांच्यामुळे ठरविता येत नाही; तर तो समीक्षा व समीक्षक याच्या गुणवत्तेवरून ठरविला जातो."
                                  समीक्षा हे मुलत: साहित्य मूल्यांचे व्यवस्थापन शास्त्र आहे.                      
                  साहित्यमूल्य म्हणजे काय ह्या चर्चेत न जाता, आपण नकारवाद आणि होकारवाद ही साहित्यमुल्ये आहेत, असं मान्य केले तर आपल्याला पुढे चर्चा करता येईल.
                   नकारवाद हे साहित्य मूल्य म्हणून स्वीकारले तर त्याच्या चांगले -वाईटपणाचा विचार दिलेल्या साहित्य प्रकार संदर्भात करता येतो. नकारवाद हा दृष्टीकोन नसून वास्तववादाचा एक प्रकार आहे. होकारात्मक हा मात्र दृष्टीकोन आहे आणि तो सुद्धा वास्तववादाचा एक भाग आहे. त्यामुळे नकारात्मक वास्तवाकडे होकारात्मक दृष्टीकोनातून पाहता येणे, शक्य असते.
                     तत्वज्ञानात आशावाद आणि निराशावाद ही दोन तत्वे आहेत. ही साहित्य मुल्ये नाहीत....असे स्पष्ट प्रतिपादन विंदा पान क्र.३२ ते ३६ वरील विवेचनात स्पष्ट करताना म्हणतात, “ सौदर्यात्मक आणि साहित्य मूल्ये एकच मानण्याची किंवा विशेष प्रकारची साहित्यिक मूल्ये दुय्यम समजून ती मूल्ये अधिक व्यापक अशा सौंदर्यात्मक मुल्यांतूनच काढण्याची इच्छा ही या गोंधळाला कारणीभूत आहे.”
                      सौदर्यवाद ही तत्वज्ञान शाखेची निर्मिती आहे. आशावाद आणि निराशावाद ह्या तत्वज्ञान शाखेच्या विचारप्रणाली आहेत. 
                   मी सर्वसाधारण कोणत्याही साहित्य किंवा कलाकृतीचा अभ्यास करताना विंदांनी केलेली साहित्य मूल्यांची पुढील व्याख्या प्रमाणभूत धरतो. “ मानवी अनुभव-विश्वाच्या काही वस्तुनिष्ठ विशेषांना प्रतिबिंबित करणारा आणि सर्वसाधारणपणे कमी-अधिक प्रमाणात मानवी मनाच्या तत्संबद्ध पैलूंकडून स्वीकारला जाणारा उत्कृष्टतेचा निकष.” 
                     समीक्षा हे साहित्य मूल्यमापन व्यवस्थेचे व्यवच्छेदक व मापदंड निर्धारण शास्त्र आहे. समीक्षक रसास्वाद व रसग्रहण ह्यांच्या साकल्याने साहित्य किंवा कलाकृतीचे संशोधनात्मक, अभ्यासात्मक विवेचन मांडत असतो. समीक्षेच्या परिप्रेक्षात साहित्य किंवा कलाकृतीची अभिव्यक्ती मुख्य असते. समीक्षेचा केंद्रबिंदू साहित्यिक किंवा कलावन्त नसतो, हे लक्षात घेऊनच साहित्यिकांनी समीक्षेचा विचार आणि आस्वाद घ्यायचा असतो.   
                   जेव्हा माझी कविता, माझी कथा, माझी निर्मिती, माझी कला....जो पर्यंत मी-माझे हे अहंकार जाणवत राहतील, असतील... तो पर्यंत ती साहित्य कृती, कलाकृती विशुद्ध असणार नाही, होऊ शकणार नाही. जे लेखक, कवी, कलावंत समीक्षा, टीका सहन करू शकत नाहीत; टीका झाल्यास समीक्षक किंवा टीकाकारावर उलट वैयक्तिक टीका, त्याला दूषणे, त्याची निंदानालस्ती करू लागतात, ह्यातच त्यांची न्यूनता, अहंकार सुदृढता दिसून येते आणि असा माणूस सदैव आत्मपूजक होऊन राहतो.
                  माझ्या दृष्टीने कला-साहित्य ही मानवी मनाची, त्याच्या अनुभवाची निर्मितीक्षम अशी संसाधने आहेत. लेखक, कवी, कलावंत हा त्या निर्मिती क्षणाचा अभिव्यक्त निर्माता असतो. कायद्याच्या भाषेत तो मालक असला तरी कलामूल्य संदर्भात तो निमित्तमात्र असतो. अशी विदग्धता नसेल, तर तो लेखक आपल्या निर्मितीचा जनक किंवा जननी राहत नाही. जिथे मालकी हक्क आला तिथे जगरहाटी, तडजोडी, राजकारण सर्व काही आलं, त्यामुळे कला विशुद्ध राहू शकत नाही, असे मला वाटते.
                  मराठी साहित्यात समीक्षा इंग्रजी समीक्षेच्या सूत्रावर आधारित होत असते. कारण समीक्षा हा भाषा अभ्यासाचा विषय आहे, ही संकल्पनाच इंग्रजी साहित्यात गंभीरपणाने पहिल्यांदा मांडली गेली आहे. दुसरा मुद्दा असा की मराठी साहित्यिकांत आणि वाचकांतही समीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन निखळ नाहीयेय. ह्याचे कारण मला वाटते की आपण व्यक्ती पूजेकडे अधिक झुकणारे आहोत आणि साहित्य कृतीपेक्षा लेखकाला किंवा कलावंताला अधिक महत्व आणि प्राधान्य देणारे आहोत.
                  अनेक नामवंत, गुणी आणि प्रतिभावंत साहित्यिक सुद्धा स्व-निर्मित साहित्य कृतीचे हिरीरीने, आक्रमकपणे आपल्याला भावलेल्या अर्थानुसार समर्थन करीत असतात व समीक्षेला नाकारत असतात. त्यामुळे त्यांचे समर्थक सुद्धा आक्रमकपणे आपल्या लाडक्या. आवडत्या लेखकाच्या समर्थनार्थ समीक्षकांवर तुटून पडतात.....समीक्षा नुसती नाकारली जात नाही तर नाउमेद केली जाते. त्यामुळे समीक्षा ही चिकित्सक, प्रश्न विचारण्याची, आणि साहित्य समजून आणि समजावून घेण्याची आणि देण्याची भूमिकाच नाकारली जाते.
अर्थात, ह्यामध्ये काही समीक्षक जबाबदार नाहीत, असं मी मानत नाही. काही समीक्षक पूर्वग्रह दुषित आणि व्यक्ती केंद्रित टीका करीत असतात, हे वास्तव मी नाकारीत नाही. पण म्हणून समीक्षा नाकारणे, दुर्लक्षित करणे?.....ह्यामुळे मराठी साहित्याचा दर्जा कोणी तपासायचा? लोकप्रियता, पुस्तकाचा खप, जाहिरात, प्रसिद्धी हेच निकष दर्जा ठरविणार काय? मराठीत विपुल आणि फार मोठ्या प्रमाणात कविता, लेख, कथा इ वांग्मय प्रसिद्ध होत आहे. त्यांची दर्जाबद्दल चिकित्सा न झाल्यामुळे सकस साहित्य कोणते, पुस्तक घेतले, पण वाचता-वाचता कंटाळून ठेवून दिले....कारण हे वांग्मय कळतच नाही.....माझी वाचक, आस्वादक, आणि अभ्यासक वृत्ती पणाला लावण्यासाठी मला मार्गदर्शक नाही.
                  वाचन ही संस्कृती आहे, असे म्हणतो, त्याचा अर्थ काय? वाचन ही कला तर आहेच, पण त्यापेक्षा समजून घ्यायची व समजावून देण्याची आणि शिकण्याची विद्या आहे, हे आपण कधी मान्य करणार ?
                  ही गोष्ट आहे, एका पुस्तक प्रकाशन समारंभाची. विशेषत: त्या पुस्तकाच्या लेखिकेने समारंभाला बोलाविलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाबद्दल.
                  ह्या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापिका आहेत. सदर पाहुण्यांना त्यांनीच आदरपूर्वक बोलाविले आहे. तसेच, ते पाहुणे साहित्यिक नाहीत, हे ही त्यांना माहित आहे. पण त्या पाहुण्यांना प्रसिद्धीचे मोठे वलय आहे. ते लोकप्रिय वक्ते आहेत. म्हणून की काय त्यांनी ह्या पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. आता प्रत्यक्ष समारंभात ह्या पाहुण्यांनी भाषण करताना ह्या लेखिकेच्या काही चुका किंवा अनुचित साहित्य विषयक समस्या आणि गैरसमज विषद केले. थोडक्यात, त्यांनी ह्या पुस्तकाची योग्य, संयमित आणि संयत समीक्षा केली. ही ह्या लेखिकेला आणि समारंभाच्या आयोजकांना आवडली नाही. का तर, त्यांच्या दृष्टीने पुस्तक प्रकाशन समारंभ हा लेखिकेचा कौतुक करण्याचा सोहळा असतो. त्यामुळे ह्या पाहुण्यांनी औचित्य भंग केला, हा आयोजकांचा आणि लेखिकेचा मुख्य मुद्दा. बर, ह्या लेखिकेने पाहुण्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर पाहुण्यांची एकंदरीत त्यांच्या सदर पुस्तकावर काय प्रतिक्रिया आहे, हे ही जाणून घेतले नाही. तरीही त्यांनी केलेली समीक्षा ह्यांना खूप अयोग्य वाटते.
                थोडक्यात काय, तर हल्ली बहुसंख्य लेखक-लेखिका, कवि-कवयित्री ह्यांना आपल्या साहित्य कृतीवर टीका किंवा समीक्षा नको असते. स्तुतिपाठक लोक हवे असतात. आपलेच दिवे, आपल्या स्तुतीपाठकांकडून ओवाळून हवे असतात.
                मराठी साहित्यात कसदार, दर्जेदार साहित्य फारसे निर्माण होत नाही. पण निर्मिती, प्रकाशने, छपाई भरपूर होत आहे, असे सर्वसाधारणपणे, सर्वच लोक म्हणत असतात. ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी इ बहुमान मराठी साहित्याच्या वाट्याला इतर भाषिक साहित्याच्या तुलनेत खूपच कमी आहेत. ह्याची अनेक कारणे आहेत. त्यातील, प्रमुख कारण हेच असावे की थोड्याशा, स्थानिक प्रसिद्धीवर, लोकप्रियतेवर व प्रती खपविण्यावरच ही मंडळी खूष आणि समाधानी असतात. हे दुर्दैव आहे. आपल्या कलाकृती किंवा साहित्याची स्वयं प्रसिद्धी करणे, आपली पुस्तके फुकट वाटणे, आपल्या पुस्तकांचा स्वत:च अनेक ठिकाणी प्रचार आणि प्रसार करणे..... हे अहंगंड, narcissism वृत्तीचे लक्षण आहे, नाहीतर काय आहे? टीका, समीक्षा सहन न करणे, ह्याला असहिष्णुता म्हणायचे, नाही तर काय म्हणायचे?
                इथे फेबुवर सुद्धा जे काही साहित्य प्रकाशित होते, त्यावर माझ्या सारख्या अत्यंत सामान्य वाचकाने चिकित्सक किंवा समीक्षणात्मक टीका केली की त्या लेखक-कविसह त्याचे समर्थक माझ्यावर वैयक्तिक टीका, टोमणे, निंदानालस्ती इत्यादी करण्यात स्वत:ला धन्य समजतात !
                 मराठी साहित्यिकांना समीक्षा आवडत नाही.(तरीही समीक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात !). ह्याचे एक मुख्य कारण आहे, भावनिकता ! आणि भावनिकता आली की चिकित्सा कमी होते ! आपल्या साहित्यावर आपण स्वतः प्रेम करणे, गैर मुळीच नाही. पण ह्या प्रवाहात वाहून जाताना आपला अहंकार साहित्य मुल्यांपेक्षा बलिष्ठ होत आहे, व त्यामुळे असहिष्णू वर्तन आणि चिकित्सेला नाकारणे, होत आहे...ह्याकडे साहित्यिकांसह त्यांच्या चाहत्यांचे -समर्थकांचे दुर्लक्ष होत आहे, ही मराठी साहित्यिक दुर्दैवी गोष्ट आहे, असं मला वाटतं. हे मांडताना मला कुठेही निर्णायक ( Judgemental ) व्हायचे नसून माझं प्रामाणिक मत नोंदवायचे आहे.
                कायद्याच्या भाषेत मी माझ्या साहित्य निर्मितीचा मालक असलो किंवा तार्किक दृष्टीने पालक असलो, तरी वाङ्मयीन दृष्टीने मी माझ्या निर्मितीचा साक्षीदार होत असतो, त्यामुळे माझ्या निर्मितीची मी परखडपणे चिकित्सा व समीक्षा करू शकतो आणि करीत असतो.
    साहित्य किंवा कोणत्याही कलाकृतीत कलावंत किंवा साहित्यिकाचे प्रतिबिंब उमटलेले असते का?
               ह्या बाबतीत, काही जणांचे मत ' हो ' असे असले तरी समीक्षा शास्त्रानुसार कलाकृतीच्या मागे तिचा निर्माता किंवा निर्माती ही अभिव्यक्ती असते, व्यक्ती नसते. अभिव्यक्तीचा साहित्यिक किंवा कला आविष्कार हा त्याच्या संवेदनशील मनाचा भावनात्मक-बौद्धिक संवाद असतो. त्याच्या वैयक्तिक जीवनानुभवाशी त्याचा संबंध असतोच,असं नाही. उदा. महादेवी वर्मा यांच्या जीवनात दुःख असं काहीही नव्हतं. तरीही त्यांच्या कविता वेदनेतून प्रगट झाल्या आहेत, असं वाटत राहतं.
              थोडक्यात, साहित्य किंवा कलाकृतीत भावनेचा अस्सलपणा, सच्चेपणा जाणवतो की नाही, ह्या वरून कलाकृतीचे मूल्यमापन होत असते, किंबहुना करावयाचे असते. कलावंत तो अनुभव जगला की नाही, ह्यावरून नाही !
             रसास्वाद,रसग्रहण आणि समीक्षा ही साहित्य शास्त्रातील वेगवेगळी दालने आहेत. वाचक ह्या भुमिकेपलीकडे जाऊन ज्यावेळी मी चिंतन-मनन ह्या अभ्यासक आणि वैचारिक पातळीवर जाऊन पोहोचतो, तेव्हा मला जे जाणवत असते, ते मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.
             टीकाकार आणि समीक्षक हा सुद्धा आस्वादक असतो आणि त्यादृष्टीने कलेचे जे आणि जसं प्रतिबिंब त्याच्या मन:पटलावर उमटते, त्याप्रमाणे, तो टीका /समीक्षा करीत असतो. मनाची नितळता हा चारित्र्याचा भाग आहे. टीका आणि समीक्षा हा मात्र केवळ चारित्र्याचा भाग नसून समीक्षकाच्या सखोल अध्ययन, अभ्यास, विचारशक्ती आणि शब्द सामर्थ्य ह्यांचा समुच्चय असतो. कवितेला केवळ छान, सुंदर, अप्रतिम म्हणून कदाचित आस्वाद वृत्ती प्रगट होत असली तरी त्या आस्वाद वृत्तीचे आविष्करण झाल्या शिवाय कलाकृतीचे सम्यक अवलोकन होत नाही. असा एक मोठा वाचकवर्ग आहे, ज्यांना होत असलेला कलाकृतीचा आनंद स्वत:ला समजून घ्यायचा असतो....आनंद, आस्वादक वृत्ती सुद्धा खुलली, प्रसन्नपणे व्यक्त झाली तर त्या कलाकृतीचा विकास इतर वाचकांपर्यंत होतो आणि कलाकृतीचे महानपण विस्तृत पावते. ह्यादृष्टीने, ती कलाकृती सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य घडविते.
             आपल्याकडील साहित्यात आणि ब-याच साहित्यिकांना समीक्षा हा साहित्य प्रकार आहे, हेच मान्य नसते. त्यांच्या कलाकृतीची चिकित्सा होऊ नये; संशोधनात्मक, अभ्यासात्मक कार्य होऊ नये, असे वाटते. का? तर कलाकृतीचा आस्वाद घेणे, हेच वाचकाचे कार्य. काहीजण तर समीक्षा म्हणजे 'काथ्याकुट' म्हणतात !
मला वाटते, ह्याच दृष्टिकोनामुळे म्हणजे चिकित्सा आणि चिकित्सक वृत्ती नाकारणे.....ह्यामुळे आपले साहित्य दर्जेदारपणाच्या कसोट्या नाकारीत राहिले आहे. ह्याउलट, इतर भाषांमधील साहित्यात, विशेषत: इंग्रजी वान्गमयात, टीका आणि समीक्षा ह्यांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मासिके, ग्रंथ प्रकाशन इ. कार्यांतही संपादन कार्य बरेचसे समीक्षेच्या/टीकेच्या अंगाने जाते. हे ज्यांना आवडत नाही, ते साहित्यिक, लेखक, कवी आपल्या निर्मितीबाबत अभ्यासू नाहीत...त्यांना आपल्यावर झालेली टीका सहन होत नाही...त्यामुळे त्यांना आपल्या प्रगतीच्या वाटा स्वयंभू आहेत, असं वाटू लागते...आणि तिथेच त्यांच्यातील अहंकार, कुपमंडूकता, भाटगिरी-प्रियता, मनोरंजकता, लोकप्रियतेची हौस वाढीस लागते आणि त्यांतूनच एकंदर त्या कवीचा/साहित्यिकाचा -हास होऊ लागतो.
                सुधा जोशी. "वेध' ह्या समीक्षा लेख संग्रहात म्हणतात : कलाकृतीतून एकच आशय सूचित होण्यापेक्षा आशयाची अनेक वलये तयार व्हावीत. ह्याचा अर्थ संदिग्धता नव्हे, तर interpretation च्या अधिक शक्यता .... पण या शक्यता अजमाविण्यासाठीही मुळात स्पष्टता हवीच.
                    रत्नाकर मतकरी यांचा एकूण साहित्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन..... त्यांच्या सर्व साहित्य निर्मिती मध्ये सुस्पष्टता हा आहे. ते स्वतःच म्हणतात की आपण लिहितो, त्यापेक्षा वेगळं वाचकाला, प्रेक्षकाला, श्रोत्याला वाटत असेल, तर ती त्यांची दिशाभूल करणारी कलाकृती असते. अर्थात दिशाभूल करणे हा सुद्धा कलात्मक आविष्कार असतो, पण अशा दिशाभूल करण्याला सुद्धा एक दिशा असते, एक सूत्रबद्ध विचार असतो. पण तो नसेल, तर मात्र असे साहित्य वाचक-साक्षेपी आणि सापेक्षित नसते.
                  शेक्सपियरने म्हणले आहे की हम्लेटच्या वेडेपणातही एक शहाणपण होते. मात्र इथे फेबु वर प्रसिद्ध होणा-या कविता, लेख, कथा वाचताना मला ब-याच वेळा असं आढळलं आहे की त्या साहित्याचे लेखक,कवी जे लिहितात, ते इतकं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असतं की त्याचा मी केलेला सर्व सामान्य, साहित्यिक आणि तार्किक विचार चुकीचा आहे, हे ते लेखक, कवी मला सांगतात. कारण त्यांचे शब्द, जे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, त्याला समष्टीची आवश्यकता असते,आणि ती नसल्यामुळे सुस्पष्टता हा सद्गुण त्यांच्या साहित्यातुन हरवला जातो, असं मला वाटतं. लेखक-कवी इ साहित्यिकांनी आपले साहित्य स्वतःच्या भाव-भावना,अनुभव त्यांच्या यष्टीतून,व्यक्तीगत मात्रेतून लिहायचे नसते.
                 थोडक्यात असे की साहित्यिक मूल्य असणारे लेखन समष्टीच्या संस्काराने प्रगल्भ होत असते... सुस्पष्ट होत असते आणि त्यातच लेखकाचं शब्द सामर्थ्य, अर्थ प्रवाहित्व आणि सुस्पष्ट अभिवचन सिद्ध होत असतं, असं मला वाटतं. 
                    
समीक्षा आणि चिकित्सा हा विषय लहान मुलांचा म्हणजे प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाचा विषय नसून उच्य शिक्षणाचा म्हणजे महाविद्यालयीन अभ्यासाचा विषय आहे....सामन्यातून आणि असामान्यत्वाकडे जाण्याचे प्रयत्न, धडपड, संघर्ष हा मानवी सांस्कृतिक शीलतेचा अखंड चालणारा प्रवास आहे. हा प्रवास मानवाला सामान्यातून असामान्यतेकडे नेणारा आहे. त्यामुळे समीक्षा बोजड आहे; क्लिष्ट आहे ; समजण्यास अवघड आहे....इत्यादी इत्यादी आक्षेप योग्य असले; तरी सापेक्ष आहेत....म्हणजे असं की समीक्षा हा हलका-फुलका, सोप्पा, मनोरंजनाचा किंवा time pass असा विषय नाही. हा विषय निश्चितच गंभीर प्रकृतीचा, जबाबदार अभ्यासाचा आणि साहित्य-कला विषयक जाणिवांचा आहे. इथे काहीसा पण सुयोग्य अशा वाचक वर्गाचा संबंध आहे किंबहुना त्यांच्या अभ्यासाचा आणि बारकाईने समजून घेण्याच्या प्रक्रियेचा विषय आहे. त्यामुळे, मी मार्मिकतेने असे म्हणेन की समीक्षा क्लिष्ट आणि बोजड वगैरे असेल तर तो समीक्षकाचा दोष नसून वाचकाच्या इयत्तेचा दोष आहे ! 
 
                                                        ****************
                               
                          
                      
                                               समीक्षा हे मूलतः साहित्यिक मूल्यांचे व्यवस्थापन शास्त्र आहे

                                 
समीक्षा हे मूलतः साहित्यिक मूल्यांचे व्यवस्थापन शास्त्र आहे

तडजोड

                                               तडजोड - एक अनिर्वाय जीवनरेखा


तडजोड-१
आमची पिढी बरीचशी एकत्र कुटुंबात वाढली. घरात पाच-सहा माणसं सहज व नेहमी असायची. संकटं, आपत्ती, दु:खं आणि सुखंसुध्दा वाटून घ्यायची. सगळं काही निवारुन नेणारी, पाठबळ देणारी, दिलासा देणारी जेष्ठ, वृध्द, अनुभवी माणसं असायची. अशा वातावरणात मन, बुध्दी आणि माणूसकी ह्यांचा विकास करणारी व संवर्धन करणारी शक्ती वास करीत होती. एकटेपणा, एकाकीपणा सहसा कधी आला नाही. त्यामुळे मला वाटतं, आजच्या पिढीत जो स्वार्थ, अप्पलपोटेपणा, सुडबुध्दी आढळते तीच त्यांना आज समाजात सतत चाललेल्या स्पर्धेला, स्वार्थाला, फसवणूकीला तोंड देण्यास समर्थ बनवित आहे काय? साहजिकच आपणच आपलं कवच होणं, त्यांना आवश्यक झालं आहे काय? पूर्वी नात्या-गोत्यात, जवळचे-शेजार-पाजारचे मध्यस्थी करायचे, सगळ्या बाजू ऐकून एकोपा करत. आजकाल तडजोड, मध्यस्थी करायला कोण करतोय, कुणाला वेळ आहे आणि मी बरा, माझं बरं, अशा मनोवृत्तीच विकसित केल्या जातायत व संवर्धितही केल्या जातायत. कुणाच्या भानगडीत पडू नका, ही शिकवण लहानपणापासून दिली जात आहे. एव्हढेच नव्हे तर हा शिक्षणशास्त्राचा, प्रतिष्ठितपणाचा आणि सुशिक्षितपणाचा तो मानदंड बनला आहे.
      पण तडजोड ह्याचा अर्थ अन्याय निमूटपणे सहन करणे, .असा नव्हे. तडजोड ह्याचा अर्थ आपला अहंकार ओळखणे, आपल्या प्रमाणेच दुस-यालाही अहंकार आहे, ह्याची नोंद घेणे किंवा जाणीव ठेवणे व हा अहंकार दोघांनीही बाजूला ठेवून समस्येवर किंवा अडचणींवर किंवा संबंध तुटण्यापासून, वाचविण्याचा मार्ग काढणे, शोधणे, होय.
परस्परांत प्रेमभाव आणि आदरभाव असला की तडजोड मानहानीकारक नसते. संसार करायचा असेल तर आपला अहंकार, बुद्धिमत्ता, आपला अनेक बाबतीत असणारा मोठेपणा इ सर्व गोष्टी बाजुला ठेवाव्या लागतात.
ह्या संदर्भात, पुलंनी म्हणलं आहे ," ज्या तडजोडीमुळे आपण ज्या जीवन मूल्यांना पवित्र मानून जगत आलो, तीच टाकून द्यावी लागत असतील तर तसली तडजोड करण्यापेक्षा आपल्या मूल्यांना उराशी धरल्यामुळे भोगाव्या लागणा-या यातना अधिक सुखकारक ठरतील."
            पण घटस्फोटाचा निर्णय घेताना कोणती जीवनमूल्ये पवित्र आणि कोणत्या तडजोडी असह्य ह्याचा सखोल धांडोळा घेता आला पाहिजे. कारण विवाह हे बंधन आहे.... जबाबदारीचे, समजूतदारपणाचे, आणि नात्यांची जपणूक करण्याचे....म्हणून असे म्हणतात, परस्परांना असलेलं, पण एकमेकांपासून विलग असे नसलेलं स्वातंत्र्य म्हणजे विवाह हे बंधन आहे. स्त्री-पुरुष शक्तीचा, व्यक्तिमत्वाचा आणि अभिव्यक्तीचा विकास हे विवाह ह्या बंधनाचे सूत्र आहे. एकाचा विकास आणि दुस-याचा ही विकास हे वैवाहिक जीवन प्रणालीचे आदर्श असले तरी ते वास्तववादी नसतात किंवा नाहीत, हे मान्य करून सुद्धा दोघांनाही विवाह हा जीवन धारणेचा विकास करण्यासाठी त्यांचात त्यांनी तडजोड क्षमतेची आवश्यकता आहे, हे मान्य केले पाहिजे. ती नसेल किंवा नसल्यामुळे घटस्फोटांचे वाढते प्रमाण आणि अविवाहित किंवा विवाह वंचित स्त्री-पुरुषांचे प्रमाण वाढत आहे. ह्यातून सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या आणि लोकसंख्येची रचनात्मक बांधणी बिघडतं आहे, असे तज्ञ म्हणतात.
            दुस-याच मन जपण्यासाठी अहंकाराचा बळी द्यावा लागतो, स्वत्वाच समर्पण करावयाचे असते आणि आपलं व्यक्तित्व परिपोक्त (matured) बनवावं लागतं.....हे अत्यंत कठीण आहे, अवघड आहे...त्यासाठी दीर्घकाळ तपस्या करावी लागते, आध्यात्मिक समरसता आचार-विचारांत यावी लागते. आपल्या मनासारखं वागण पण कठीण असतं....कारण अशी मनमानी दुस-यांना असह्य असते. समाजात, कुटुंबात सुखी-समाधानी रहायचे असले तर आपलं मन आणि दुस-याच मन ह्यांचा सम्यक आणि सकारात्मक स्वीकार करता आला पाहिजे.
           असे म्हणतात की निवड करण्याचे स्वातंत्र्य हे लोकशाहीचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे निवडणुकीत मत देताना म्हणजे मी मतदान केलेला उमेदवार मला आवडलेला असतोच असं नाही. कारण आवड ही व्यक्तिगत आणि बरीचशी किंवा बहुतांशी आपली एक प्रकारची मानसिक संवेदना किंवा अभिव्यक्तीची क्षमता असते. निवड करणे, ही बौद्धिक प्रक्रिया आहे, तर आवड ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ह्या आवडीला बौद्धिक प्रक्रियेची जोड देऊन आपण बरेचशे निर्णय घेत असतो, असे मला वाटते.
           आयुष्यात म्हणण्यापेक्षा ज्याला आपलं जीवन घडवायचे आहे, त्याला किंवा तिला अनेक गोष्टींशी तडजोड करून, आपल्या आवडी-निवडींशी सांगड घालावी लागते, तरच संसाराची गाडी चालते आणि कालांतराने अवघा संसार, कुटुंब आणि कुटुंब संस्था विकसित होण्यास मदत होत असते.
१९९० नंतर असं म्हणतात की जागतिकीकरणाचे Globalization वारे आपल्या देशात वाहू लागले. त्याचबरोबर आधुनिक जीवन मूल्यांचे आव्हान तरुण पिढी पुढे उभे राहिले.
             ही आधुनिक मुल्ये कोणती? स्वयं किंवा स्व केन्द्रित तत्वे. त्यामध्ये स्त्रीवाद feminism आणि कुटुंब संस्था ह्या जीवन मूल्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. स्त्री-पुरुष समानता आणि कौटुंबिक असहिष्णुता...ही दोन तत्वे आत्यंतिक वादग्रस्त झाली आहेत. आधुनिक पोशाख आणि आधुनिक खाण्या-पिण्याच्या पद्धती व समजुती आणि पारंपारिक नैतिक संकेत ह्यांचा संघर्ष जुन्या म्हणजे फार जुन्या नव्हे, तर मागच्या पिढीशी, आई-वडील ह्या पिढीशी टोकाचे होत असताना दिसत आहेत. मुळात अनैतिक कशाला म्हणायचे, हाच संघर्षाचा केंद्र बिंदू झाला आहे. कायदा आणि राजकीय वातावरण आधुनिक मूल्यांना जवळ करू पहात आहे. ह्यातून आधुनिक आणि पारंपारिक मूल्यांची वैचारिक, तात्विक आणि आचरणात्मक घुसळण होत आहे.
            राजकीय आणि सामाजिक समस्या आणि वातावरण ह्यामुळे तरुण पिढीला असुरक्षितता वाटू लागली आहे. आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य ह्यांच्या संकल्पना संकुचित झाल्या आहेत. मला माझी space हवी आहे, ही हाकाटी, हेच दर्शविते आहे. एकटेपणा हवा आहे. कारण आर्थिक व व्यक्तिभूत अस्तित्वाचे प्रश्न निकरावर आले आहेत. तरुण पिढीला हे प्रश्न सोडविण्यासाठी कालची पिढी निरुपयोगी आहे, ही समजूत अगदी चूक नसली तरी ही समजूत एकांगी आणि परिपक्व नाहीयेय. कालची पिढी आमचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यास असमर्थ आहे, ही समजूत जेव्हढी घट्ट होत जाईल, तेव्हढे कौटुंबिक नाते आणि इतर नाती केवळ औपचारिक होत जातील, हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे.
            ह्या सर्व परिस्थितीचा परिपाक अर्थवाद बळकट होण्यात झालेला आहे. आयुष्याची क्षण भंगुरता एका टोकाला आहे, तर दुस-या टोकाला चंगळवाद आहे. ह्या दोन टोकांमध्ये तरुण पिढीची होणारी ओढाताण आणि त्यामुळे येणारे मानसिक अस्वास्थ्य....हा आज न दिसणारा प्रश्न उद्या उग्र स्वरुपात पुढे येणार आहे. ह्यातून कौटुंबिक जीवनाला आवश्यक असणारी जबाबदारी टाळण्याची वृत्ती तरुण पिढीमध्ये प्रकर्षाने दिसू लागली आहे. विवाह हा कौटुंबिक जीवनाचा पाया आहे आणि ती जबाबदारी आहे, ह्याची जाणीव आजच्या पिढीला नकोशी झाली आहे. मग आर्थिक सुरक्षा आणि तद्संबंधित अपेक्षा करणे, हे सुरक्षा कवच आहे, असे विशेषत: मुलींना वाटू लागले आहे. मुलांच्या क्षमता आर्थिक निकषांवर मोजणे, मुलींना आवश्यक वाटू लागले आहे.
थोडक्यात, आजच्या परिस्थितीची आव्हाने पेलण्याची क्षमता आणि धाडस तरुण पिढीत कमी पडत आहे, असं मला वाटते.              
          ह्या संदर्भात, हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्यामध्ये स्वार्थ, परमार्थ आणि नि:स्वार्थ एकाच वेळी वास्तव करून असतात.पण ह्यातील स्वार्थ ही प्रेरणा आदि मानवापासून असलेली मूलभूत धारणा इतर प्रेरणांवर कशी मात करत असते, हा अभ्यासाचा विषय असून मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा संशोधनात्मक विचाराचा पाया आहे. अनेकदा आपली कृती किंवा आपला कृतिशील विचार नेमका स्वार्थी आहे की इतर काही आहे, ह्यामध्ये आपण गोंधळून जातो. तरीही आपल्याला एक नक्की कळत असते...स्वार्थ प्रेयस असला तरी श्रेयस नाही. आपण व्यक्ती म्हणून हे स्वीकारून ह्या मूल्याचा योग्य तेव्हढा अंगिकारही करीत असतो.तरीही आपण समूहात असताना मात्र ह्या मूल्याशी तडजोड करत असतो. कारण समुदायाचे /समूहाचे मानसशास्त्र आपल्या व्यक्ती मनावर वर्चस्व गाजवित असते. व्यक्ती म्हणून आदरणीय,श्रेष्ठ आणि आदर्श वाटणारी अनेक माणसे समाजात, समूहात मात्र जेव्हा वेगळी वागताना अनुभवाला येतात, तेव्हां आपला भ्रम निरास होऊ लागतो किंवा आपण गोंधळून जातो.
          व्यक्ती म्हणून जो नि:स्वार्थ तो समूहाचा स्वार्थीपणा इतका असतो की तो समूह अमानवी, अमानुष वर्तन करताना दिसतो. दंगली,हत्याकांड,अतिरेकी हिंसक कृत्ये ह्यातील एकेक व्यक्ती जर नीट अभ्यासली तर मात्र ती तशी हिंसक प्रवृत्तीची नाही, असे अनुभवाला येते. त्यामुळे शासकीय धोरणे, कायदा, सामाजिक /राजकीय किंवा कामगार चळवळ चालविताना आणि ह्या चळवळींचे व्यवस्थापन करताना नेते लोकांची,शासकीय अधिका-यांची, आणि न्यायाधीशांची कसोटी,सत्व परीक्षा असते. समोर आलेल्या माणसाला व्यक्ती म्हणून वागवायचे की समूहवादी व्यक्ती म्हणून तिला हाताळावे?....?                   
        दुसरे असे की आपल्या हवे-नको पणाशी आपले आयुष्य बांधलेले असते. त्यापलीकडे एक जीवनाची कृतार्थता असते. आयुष्य म्हणजे जगण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती आपण वैयक्तिक स्तरावर अनुभवीत असतो. जीवन ही गोष्ट आपण एकाच वेळेला वैयक्तिक आणि वैश्विक स्तरावर अनुभवीत असतो. अशा जीवनाचे मूल्यमापन करताना आपल्या वैयक्तिक अनुभवांना फारशी किंमत नसते.....आपण मानवी जीवनधारा कशाप्रकारे हाताळत असतो.....हा माझ्या चिंतनाचा विषय आहे. ह्या दृष्टीकोनातून जीवनातील श्रेयस ही अनुभूती आपण समष्टी स्तरावर अवलोकित करीत असतो, तर प्रेयस आपण यष्टी स्तरावर अनुभवीत असतो. जीवनाचे अवलोकन आणि मूल्यमापन कसे करावे आणि तसे करीत असताना तडजोड करणे, हा एक वेदनादायक क्लेश आहे.... त्याची व्याप्ती आणि अपरिहार्यता समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो, तर कर्तव्य आणि जबाबदारी हा एक आपला जीवन-यज्ञाचा भाग आहे, हे समजून घेऊन कर्तव्य कर्म करीत रहायचे असते.
        आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही. हाच तर श्रेयस आणि प्रेयस मधला संघर्ष आहे.त्यामध्ये प्रेयस बळी जाते अन मग उरते श्रेयस्कर विवंचना... जगत राहण्याची.... कर्तव्याच्या वेदीवर.
        पण हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की तत्व आणि आदर्श कधीच पराभूत होत नसतात. त्यांचा पाठपुरावा करण्यात आपण कमी पडतो, म्हणून आपण पराभूत होत असतो. ध्येय आणि तत्व ह्यापासून आपण ढळलो की आपण तडजोडवादी नवी मांडणी करू लागतो.
        ह्या दृष्टीने आपल्याला हे समजून घ्यायला हवे की वस्तुस्थिती आणि परिस्थिती ह्या मध्ये काय फरक आहे? परिस्थिती माणसाला वेढून टाकते. म्हणून तो परिस्थितीशी झगडत असतो किंवा तडजोड करतो किंवा बळी पडतो. माणूस वस्तुस्थितीला आपणहून वेढून घेत असतो. त्यामुळे तो वस्तुस्थितीचा अलिप्तपणे विचार करू शकतो. वस्तुस्थितीचा अभ्यास करून तो निर्णय घेऊ शकतो, तिच्यात उतरायचं की नाही, ह्याचा निर्णय घेऊ शकतो. परिस्थिती मात्र त्याला व्याप्त करून टाकत असल्याने त्याला परिस्थितीचा अभ्यास करूनही तिच्यात उतरणे किंवा न उतरणे हा पर्याय नसतो.
         माणसाची वस्तुस्थिती हा भवताल आहे, तर परिस्थिती हा त्याच्या शारीरिक-मानसिक स्थितीचा परिपाक आहे. परिस्थिती संचित-प्रारब्ध-नियती ह्यांच्या अधीन असते. वस्तुस्थिती व्यक्तीनिष्ठ नसते. ती भवताल सापेक्ष असते. माणसाचं जगण परिस्थिती घडवत असते; पण जीवन मात्र ह्या दोन्हींच्या साकल्याने घडत असतं.
         दुस-याच मन जपण्यासाठी अहंकाराचा बळी द्यावा लागतो, स्वत्वाच समर्पण करावयाचे असते आणि आपलं व्यक्तित्व परिपोक्त (matured) बनवावं लागतं.....हे अत्यंत कठीण आहे, अवघड आहे...त्यासाठी दीर्घकाळ तपस्या करावी लागते, आध्यात्मिक समरसता आचार-विचारांत यावी लागते. आपल्या मनासारखं वागण पण कठीण असतं....कारण अशी मनमानी दुस-यांना असह्य असते. समाजात, कुटुंबात सुखी-समाधानी रहायचे असले तर आपलं मन आणि दुस-याच मन ह्यांचा सम्यक आणि सकारात्मक स्वीकार करता आला पाहिजे.
          कर्तव्य आणि कर्तृत्व हे दोन्ही शब्द नसून संकल्पना आहेत. ह्या दोन्हींत कर म्हणजे कर्म ही संकल्पना अनुस्युत, समाविष्ट आहे.
कर्म म्हणजे काय आणि त्या संदर्भात कर्तव्य काय, ह्याची मीमांसा भगवत गीतेत भगवंतांनी अर्जुनाला विषाद योगापासून मोक्ष संन्यास योगापर्यंत सांगितली आहे. कर्माच्या संदर्भात कर्तृत्व म्हणजे काय, ह्याची चर्चा अहंकार, मी-पणा-माझेपण, स्वार्थ, स्वाभिमान आणि अस्मिता ह्या अनुषंगाने केली आहे.
कर्तव्य हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते प्रेयस म्हणजे प्राप्त परिस्थितीत श्रेयस नसले तरी मानवी जीवनाचे मूल्य आहे. व्यक्ती म्हणून आपल्याला अनेक समस्या असतात, कारण जगणे ही एक तडजोड आहे. ह्या स्तरावरील जीवन हे व्यष्टी म्हणून असते. त्या मध्ये अंतर्भूत असणा-या सर्व गोष्टी ह्या नैसर्गिक असतात. ह्या दृष्टीने, मानवी नाती फक्त दोनच...नर आणि मादी. हे एकमेव आणि खरे नैसर्गिक नाते आहे. ह्या नात्यातून निर्माण होणारे प्रजनन आणि नर-मादी ह्यांच्यात नैसर्गिक नाते नाही. कारण कुटुंब ही एक मूलत: व्यवस्था आहे. प्राचीन मानव एकटाच गुहेत रहात होता. त्याला आपल्या स्वत:च्या व आपण मिळविलेल्या उपजीविकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टोळी करून राहण योग्य वाटू लागलं. इथेच त्याला प्रथम स्वार्थी प्रवृत्तीशी पहिली तडजोड करावी लागली. मिळालेली शिकार, उपजीविका टोळीमध्ये वाटून घ्यावी लागली. राहण्याची जागा, खाणे-पिणे इ प्राथमिक आणि मुलभूत गरजा ह्या टोळीच्या जबाबदा-या झाल्या आणि येथून एक प्रकारची व्यवस्था निर्माण झाली. ह्या व्यवस्थेचा एक भाग टोळी प्रमुख...मग त्याची योग्यता, श्रेष्ठत्व, अधिकार हे एक शास्त्र म्हणजे व्यवस्थापन निर्माण झाले. त्यातून टोळी प्रमुखाचे अधिकार, हक्क ह्या बरोबरच त्याची कर्तव्ये हे व्यवस्थापनेचे एक सूत्र तयार झाले. थोडक्यात, जिथे अधिकार, हक्क निर्माण झाले त्याबरोबरच कर्तव्ये निर्माण झाली. अधिकार हा कर्तव्याचा आणि कर्तव्य हा अधिकाराचा एक अविभाज्य असा जोड तयार झाला.
            अशा प्रकारे, कर्तव्य ह्या संकल्पनेचा उगम झाला. कारण ती समूहाची, टोळीची व्यवस्था होती. ह्यातूनच मानव उत्क्रांत होऊन कुटुंब आणि समाज ह्या व्यवस्था विकसित पावल्या. म्हणजेच असं की कुटुंब ही गोष्ट गरज म्हणून निर्माण झाली व ती कृत्रिम होती. कारण ती मादी-पुरुष ह्या नैसर्गिक नात्यातून होणारे प्रजनन.... ह्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्था म्हणून  कुटुंब ही संस्था निर्माण झाली. मानवी हस्तक्षेपामुळे तयार झालेली ही एक व्यवस्था होती आणि आजच्या काळात तिला तडे जात असले तरी ही व्यवस्था टिकून आहे..... कालक्रमा मध्ये नंतर राज्य, राजा,प्रजा इ संकल्पना विकसित होऊन नवनव्या व्यवस्था निर्माण झाल्या. ह्या व्यवस्था म्हणजे जगण्याच्या गरजा बनल्या... ह्या गरजांतून अधिक गरजा निर्माण झाल्या......ह्या गरजांच्या पूर्ततेसाठी मानवाला विचार करण्याची गरज निर्माण झाली आणि ह्यातून बुद्धी ही संकल्पना निर्माण झाली. ह्याची जाणीव माणसाला होऊ लागली आणि मग बुद्धी विकासातून निरनिराळी अवजारे तयार करणे असे शोध माणूस घेऊ लागला. बुद्धीची जाणीव हा सर्वात मोठा उत्क्रांतीचा टप्पा होय.
           पण बुद्धीचे प्रमाण सर्व माणसांच्यात एक सारखे नव्हते आणि नाही. कारण कोणीतरी एक माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शोध लावीत होता,  शारीरिक व बुद्धी बळाचा वापर करून टोळी प्रमुख, कुटुंब प्रमुख, राज्य प्रमुख बनत होता. म्हणजेच अधिकार आणि हक्क प्रस्थापित करीत होता......थोडक्यात, व्यक्ती महत्वाची आहे. त्याने मिळविलेले यश, शोध, प्रमुखत्व हे त्याचे कर्तृत्व आहे, हे त्याच्या कर्माचे वैयक्तिक समाधान आहे, यश आहे. ह्याची जाणीव निर्माण झाली. म्हणजेच असं की प्रथम अधिकार, हक्क ही संकल्पना आली आणि तिचाच व्यत्यास किंवा पूरक म्हणून कर्तव्य ही संकल्पना विकसित झाली.
          अशा प्रकारे, हक्क आणि कर्तव्य ह्या दोन्ही भावना नैसर्गिकतेच्या जवळ जाणा-या संकल्पना आहेत, कारण त्या समूहाच्या, कुटुंबाच्या संकल्पनेतून निर्माण झाल्या आहेत. पण कर्तृत्व ही संकल्पना मात्र बुद्धीचे किंवा शक्तीचे व्यक्तीगामी प्राबल्य, त्या व्यक्तीला मिळणारे हक्क, अधिकार ह्यामुळे मिर्माण झालेली संपदा आहे. कर्तृत्व हे व्यक्ती केंद्रित असल्यामुळे त्यांतूनच स्वामित्व, स्वाभिमान, स्वार्थ आणि अहंकार ह्या धारणा विकसित झाल्या आहेत.
आजच्या आधुनिक काळात, अधिकार आणि हक्क परंपरेने आणि कायदयाने प्रमाणित standardized  झाले आहेत. बरेचशे परंपरागत अधिकार-हक्क कायदयाच्या सहाय्याने संकुचित होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती विकास, नीती-नैतिकता, सामाजिक आणि माणुसकीच्या जाणीवा इ अनेक संकल्पना टोकदार आणि जगण्यापेक्षा अधिक मूल्यवान झाल्या आहेत. हे वास्तवतेचे विस्तीर्ण असे अवकाश तयार झाले आहे आणि त्यातून निघणारे अस्तित्वाचे हुंकार मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध बनवित आहेत.
ह्यावरून असे दिसते की कर्तव्य हे मानवी जीवनाचे संविधान आहे किंबहुना माणसाची कर्तव्याशी असलेली बांधिलकी ही त्याच्या अस्तित्व ह्या प्रकृतीशी घटनात्मक आहे. Duty is a constitution of human mind.... Wherever man goes, he creates a civilization along with woman as his second being.... Not as first being! There is no either historical, mythological or even psychological evidence to show that two women created civilization. In fact, there is evidence in history that when there were two women, they sought a man to create family which subsequently became society and then a civilization.
                        ************
                        तडजोड -२
               श्वास ही सजीवांच्या अस्तित्ववादाची भौतिक अभिव्यक्ती आहे. ती प्रेम-विरह इत्यादी सर्व द्वंद्व पार करून जगत असते. सजीवतेची अभिव्यक्ती जेव्हा व्यक्त होवु लागली, तेव्हां द्वंद्वात्मक आविष्कार होऊन मानवी मनाचे प्राबल्य व मानसिकता ह्यातून संस्कृतीची वाटचाल निर्माण झाली.
मानवी मन हे मुख्यतः भूतकाळात म्हणजे आठवणीत सहज रमते, कारण मग त्या जीवाला त्या आठवणींना घेऊन भविष्यकाळाचे पंख देता येतात. भूतकाळातील सत्य हे अर्धसत्य आणि असत्य अशा दोन पंखांवर वर्तमानाचे जगणे सुसह्य करण्यासाठी उपयुक्त होते. पण ख-या वर्तमानाची जाणीव होताच ही माणसं कावरीबावरी होतात आणि आपल्या मानसिक व्यवस्थेशी तडजोड करून जगू लागतात, एक नि:श्वास टाकून पुन्हा श्वास घेतात व जीवनाचे अनुबंध पुनश्च जुळवून घेतात.
           बहिणाबाईंनी, त्या काळा मध्ये, स्वतः अशिक्षित असून सुद्धा म्हणलं आहे, " अरे, संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर". आता स्त्रिया सुशिक्षित झाल्या आहेत. ज्ञानार्जन, अर्थाजन करून ब-याच मोठ्या प्रमाणात मुक्त झाल्या आहेत. संसाराची दोन्ही चाके खर तर अधिक सक्षम झाली आहेत. तरी समस्या बिकट होत आहेत! असं का होत आहे?
बहिणाबाईच्या कवितेचा अभ्यास केला तर हे लक्षात येते की स्त्री-पुरुष दोघांचाही अहंकार आधुनिक काळात अधिक टोकदार झाला आहे आणि मग हाताला चटके न लागता, भाकरी मात्र पाहिजे,  ह्या अपेक्षेमुळे संसार भौतिक दृष्टीने सुखाचा आहे, पण मानसिक समस्यांचा अधिक झाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या फाजील आकांक्षा जीवन / कुटुंब अस्तित्वाच्या मुळावरच आघात करू लागल्या आहेत, असं मला वाटतं.
              सुखी संसाराच्या अनेक सूत्रांतील एक सूत्र तडजोड करणे, हे होय. मग ती तडजोड माणसांशी असते, परिस्थितीशी असते आणि स्वतःशी, आपला अहंकार, दुराग्रह,तथाकथित बौद्धिक मोठेपणा इ इ अनेक गोष्टींशी तडजोड संसारातच नव्हे तर जगातील सर्वच घटकांशी करावी लागते. जे अशा तडजोडी न करता जीवन घडवितात, ते विवेकानंद, महात्माजी, आदी थोर लोकोत्तर महान विभूती होतात.
             पण तडजोड, चर्चा कशासाठी करायची? एकामेकांना समजून घेण्यासाठी की एकमेकांचे विचार समजून घेण्यासाठी? जिथे मनमोकळी चर्चा होत असते, तिथे नेहमी देवाण-घेवाण म्हणजे तडजोडी होत असतात आणि त्या होत नसतील तर चर्चा कशाला? पती-पत्नी ह्या नात्यात विचारांपेक्षा व्यक्ती समजून घेणे आवश्यक असते. कारण वैचारिक मतभेद असणे, हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे....पण व्यक्ती म्हणजे तिचे केवळ विचार नव्हे. व्यक्तीला समग्र समजून घेणे आवश्यक असते आणि त्या साठी नुसती वैचारिक तडजोड नाही तर शारीरिक,मानसिक, बौद्धिक अशा अनेक तडजोडी करावयाच्या असतात, तरच संसार, यशस्वी म्हणाला नाहीतरी, टिकून राहू शकतो......व्यक्ती विकास मोठा, श्रेष्ठ आणि अत्यावश्यक की कुटुंब टिकविणे, कुटुंब ह्या संस्थेचे सातत्य टिकविणे श्रेष्ठ?....समाज स्वास्थ्य हे कौटुंबिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. कुटुंब ही संस्था मोडकळीस येणे किंवा कोलमडून पडणे म्हणजे व्यक्ती विकास नव्हे. अशा कुटुंब संस्था खच्चीकरणातूनच मानसिक अनारोग्य, समाज विघातक प्रवृत्ती निर्माण होतात. अमेरिका आणि इतर अनेक युरोपियन आर्थिक संपन्न देशांतील कुटुंब संस्था खूप कमकुवत झाल्यामुळे तिथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आर्थिक विवंचना नाहीत, पण मानसिक समाधान नाही, अशी परिस्थिती अनेक देशांत आहे. तडजोडी करणे हा समग्र एकरूप होण्याचा किंवा समग्रतेने समजून घेण्याचा अनिवार्य भाग आहे. बहिणाबाईच्या कवितांचा हाच मुलभूत गाभा आहे, असं मला वाटतं.
            प्रेम ह्या जीवन मूल्याच्या विरोधात अर्चि-परचा ह्यांचा जीव घेतला जातो, हे मंजुनाथने वास्तव आहे, म्हणून पूढे आणलं आहे. जुन्या चित्रपटांप्रमाणे अर्चिचा संघर्ष यशस्वी होतो, हे दिग्दर्शित केलं असतं, तर समाज परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असते. कला-गुणांशी,सत्याशी कदाचित तडजोड झाली असती. पण एका चांगल्या मूल्याचा गौरव झाला असता, असं मला ह्या निमित्ताने मांडावस वाटतं.
                     ***********