Monday, 17 February 2020

कवी, कविता आणि समीक्षा


 विचार कोठून येतात? माझ्या मनातून, संस्कारांतून, बुद्धीतून आणि अनुभवांतून....ह्या सर्वांचा एक संकीर्ण परिणाम निर्माण होत असतो. ह्याच वेळेला माझी जाणीव ह्या विचारांबाबतीत काय असते? हे विचार फक्त माझे असले तर मी हा त्यांचा मालक म्हणून माझा अहंकार दृढ होत असतो. पण मला हे जाणवत असेल की हे विचार जरी माझे असले तर त्या विचारांची व्याप्ती, संपन्नता, विशालता आणि जीवन मूल्यांच्या दृष्टीने प्रभाव क्षमता मोठी आहे, तर मग माझ्या पेक्षा विचार मोठे होतात आणि मग मी त्या विचारांपुढे विनम्र होतो, नतमस्तक होतो. ह्या प्रक्रियेत, नेमकं काय घडतं? तर माझे व्यक्ती किंवा व्यष्टी मूल्य कमी होऊन समष्टी मूल्य व त्या मूल्याची जाणीव माझ्यातच तीव्र होऊन जाते. मी व्यक्ती न राहता अभिव्यक्ती होऊन जातो. ह्या प्रक्रियेत, नेमकं काय घडतं? तर माझे व्यक्ती किंवा व्यष्टी मूल्य कमी होऊन समष्टी मूल्य व त्या मूल्याची जाणीव माझ्यातच तीव्र होऊन जाते. मी व्यक्ती न राहता अभिव्यक्ती होऊन जातो.

          सर्वोत्तम कला किंवा साहित्य कृतीचे रहस्य हे आहे की मूर्त शब्दांतून अमूर्त संकल्पना, प्रतिमा, प्रतिकांचे दर्शन घडविणे. म्हणूनच साहित्य आणि कला ही इतर दर्शन शास्त्रांप्रमाणे दर्शने आहेत, मानवी संस्कृतीच्या भव्यतेची, वास्तवतेची आणि कळी-काळाची !
            कवितेचा वाचक म्हणून स्वागत रसिक म्हणून करायचं. मग रसग्रहण करताना काही खडे बोचले, टोचले तर दुर्लक्षित न करता चांगल्या भाषेत, म्हणजे समीक्षेच्या भाषेत नोंदवायचे आणि ह्या कवितेने मला काय दिलं ह्यापेक्षा या कवितेने साहित्य क्षेत्राच्या परिप्रेक्षात काय दिलं आहे, ह्याचे मूल्यमापन करावं, असा माझा दृष्टिकोन असतो. विंदा नी कवीच्या बाबतीत ' निरंकुशता ' हा शब्द कवीची मस्ती या अर्थाने वापरला आहे. ही मस्ती अशी आहे, जी प्रतिभेला असलेला अंकुश मानते, पण प्रतिभा बाह्य अंकुश नाकारते. त्यामुळे कविता मुक्त मनाचे सृजन होतेच पण त्या पलीकडे तिला नवतेचं परिमाण लाभण्याची शक्यता वाढते.
                पण समीक्षा कवितेचे वाङ्मयीन मूल्य ठरविते, हे जितकं खरं आहे, त्यापेक्षा मोठे समीक्षा मूल्य हे आहे की ते दादागिरी न करता किंवा शिकविण्याचा आव न आणता कवीच्या प्रतिभेचे, सृजनाचे बीज वर्धित करते. कारण     साहित्य किंवा कला समीक्षा हा साहित्य-कला आस्वादन करण्याचा स्वतंत्र प्रकार आहे, नव्हे तर ती अत्यन्त संवेदनक्षम अशी साहित्य-कलेची अभिव्यक्ती आहे. हे मूल्य साहित्यिक -कलाकाराचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित करीत नाही. त्यामुळे त्यांनी समीक्षा नाकारणे, हे जितके अयोग्य तितकेच ते एकूणच साहित्य-कला संस्कृतीच्या विकासाला त्यांच्यासह मारक आहे.
                        बिर्ला फौंडेशनचा सरस्वती पुरस्कार सन्मानित तेलगू लेखक-कवी डॉ शिव रेड्डी म्हणतात, " माझ्या साहित्य निर्मिती नंतर मी केवळ नावापुरता उरतो. वाचक, समीक्षक मला माझ्या साहित्य कृतीचे मूल्यमापन करून देतात. त्यामुळे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत नाही, उलट माझी अभिव्यक्ती अधिक डोळस व सक्षम होण्याची शक्यता बळावते. म्हणून मी माझ्या निर्मितीबद्दल स्वतः कधीही समर्थक होत नाही आणि माझ्या समर्थकांना बळही पुरवित नाही."
                        फेसबुकवर लेखन करणा-या लेखक-लेखिका ह्यांनी हे लक्षात घेतले तर त्यांची ग्रुपबाजी, गटबाजी कमी होईल व त्याचा फायदा त्यांनाच आपली साहित्य सेवा अधिक कसदार करण्यास मदत होईल.
                     रसास्वाद,रसग्रहण आणि समीक्षा ही साहित्य शास्त्रातील वेगवेगळी दालने आहेत. वाचक ह्या भुमिकेपलीकडे जाऊन ज्यावेळी मी चिंतन-मनन ह्या अभ्यासक आणि वैचारिक पातळीवर जाऊन पोहोचतो, तेव्हा मला जे जाणवत असते, ते मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.
                    तेव्हा मला सुधा जोशींच्या "वेध" मधील हे स्फुट आठवते: "लेखनाचा तरल, उत्कट वृत्तीने अनुभव घेणे, चिंतन प्रक्रियेत त्यांचा नव्याने पडताळा घेत राहणे, उलगडा करीत जाणे आणि त्यांच्या अर्थांच्या संगती जुळवीत जाणे...... जीवनचक्राच्या अटळ गतीचे भान,मानवी दुखा:ची आणि एकाकीपणाची अपरिहार्यता....आणि असे असूनही पुन्हा पुन्हा जागवला जाणारा चैतन्यमय नवा सूर, निर्मितीच्या प्रेरणा.....हे समीक्षेचे कार्यक्षेत्र आहे."
                    ह्या सगळ्यांची सुसंगत जाणीव मनाला स्पर्श करते, म्हणण्यापेक्षा येऊन भिडते....तेव्हा मी जे लिहितो....तो कधी रसास्वाद असतो.....रस निष्पत्ती ही एक कलाकृती असते....कलेच्या अंगाने जाणारे लेखन ह्या दालनात.....तर कधी रसग्रहण...काव्यात्म लेखन हे एक वेगळे दालन..... आणि समीक्षा हे दालन रसास्वाद आणि रसग्रहण ह्या दालनांसह फुलणारे पण कधी परखड, कधी अभ्यास-संशोधनपर, तर कधी कठोर टीकात्म.... अशा अंगांनी व्यक्त होत असते.
                  लोकसत्तेच्या चतुरंग मधील 'बेडकांचे डबके' हा लेख जे सांगतो, तेच इथे फेसबुकवर ही दिसते. इथे पुरस्कार नसला तरी एकंदरीत बहुसंख्य लेखक-लेखिका, कवि-कवयित्री इत्यादींना मिळणारे प्रतिसाद सरसकट स्तुतिकारक असतात आणि असेच प्रतिसाद ह्या साहित्यिक मंडळींना आवडत असतात, हवे असतात. अशा साहित्यिकांच्या पोस्टवर जरा वेगळा टिकात्मक किंवा समिक्षणात्मक सूर लावला की ते साहित्यिक नाराज असतात. त्यांचे चाहते, स्तुतिपाठक ही जो वेगळा सूर लावतो, त्याच्यावर आगपाखड करतात.
                   मराठी साहित्यिकांना टीका, समीक्षा, चिकित्सा नकोच असते. फक्त स्तुती, वाहव्वा हवी असते, ह्या अपवृत्तीला सक्रीय पाठींबा देणारे त्यांच्या झुंडी, अनुयायी, चाहते असतातच. पुन्हा वेगळा सूर लावणा-यावर असे आरोप- " तुम्हाला मी काय म्हणतो आहे, ते कळतच नाही, मी असे म्हणालोच नाही, फेकाफेक करू नका ...." इत्यादी इत्यादी....असे हे साहित्यिक त्यांच्या चाहत्यांसह आरडाओरड करणार. थोडक्यात, राजकीय असहिष्णुतेची साथ साहित्य विश्वात ही मोठ्या प्रमाणात येताना दिसत आहे.
                     रवी परांजपे ह्यांनी १.५.च्या लोकसत्तामधील पडसाद ह्या सदरात बुद्धीवादाचे दोन पंथ फार सुंदर मांडले आहेत.एक प्रकार आहे तर्कनिष्ठ आणि दुसरा सृजनशील. तर्कनिष्ठ बुद्धिवाद कठोर टीकेच्या अंगाने मांडला जातो; तर सृजनशील बुद्धिवाद सम्यक, सहिष्णू आणि समीक्षा अंगाने मांडला जातो. टीका असो वा समीक्षा दोन्हींचे अंतिम उद्दिष्ट साहित्य, विचार किंवा कलाकृतीचा आस्वाद घेणे, हेच असते.
                   आस्वादक जेव्हा प्रचारक, प्रेरित किंवा राजकीय-आर्थिक दबावाखाली असतो, तेव्हा त्याची आस्वादकता भंग पावते; ती भ्रष्ट पावते आणि विचारांत असहिष्णुता, अतिरेकीपणा आणि स्फोटकता येऊ लागते.
                   ह्याच लोकसत्तेच्या अंकात गिरीश कुबेर यांनी असेच विचार शतखंडित महाराष्ट्र ह्या लेखात मांडले आहेत.
मी फेसबुक हे वैचारिक व्यासपीठ आहे, असे मानतो व तदनुसार माझ्या प्रतिक्रिया मांडत असतो आणि त्या मांडताना माझा प्रयत्न सृजनशील बुद्धीवादात्मक असतो. ते मांडण्यासाठी काहीतरी निमित्त झालेले असले तरी माझा रोख कधीही आणि केव्हाही मूळ पोस्टच्या मित्र-मैत्रिणीवर हेत्वारोप किंवा आगपाखड करणे, हा नव्हता आणि नसतो. हे मी मुद्दाम लिहित आहे, कारण काही माझे मित्र-मैत्रिणी माझ्या पोस्ट्स मुळे माझ्याबद्दल गैरसमज करून घेतात... व त्याचा मन:स्ताप त्यांच्यापेक्षा मलाच जास्त होतो आणि मला समजावून देण्यात मी अपुरा पडल्याच्या जाणीवेने मी अधिक व्यथित होतो. तर माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना नम्र प्रार्थना....आपले वाद, मतभेद, एकमेकांवर केलेली टीका, समीक्षा ही वैचारिक असते. त्यांचा उद्देश किंवा माझी भूमिका पोस्टकर्त्याची सृजनशीलता जपावी, वृद्धिंगत व्हावी...अशी बुद्धीप्रामाण्यवादी असते.
                                                  समीक्षा व समीक्षक- एक चिंतन.
                    इथे फेबू वर अनेक चांगल्या साहित्यिक कलाकृती सादर होत असतात. त्या आपल्या मित्र, नातेवाईक परिवारापर्यंत पोहोचाव्या एव्हढीच माफक अपेक्षा सर्वसामान्यपणे असते. पण ह्या पलीकडे जाऊन पोस्ट्स मधून निर्माण होणारा 'मी' समजून घेणे, हा एक अभ्यास असतो. मला असा अभ्यास करताना माझ्यामध्ये मला एक समीक्षक सापडला. मग मी विचार करू लागलो, हा समीक्षक म्हणजे नक्की काय आहे? तेव्हा जेष्ठ समीक्षक रा.ग. जाधव ह्यांचा 'समीक्षा व समीक्षक' हा नितांत सुंदर लेख वाचनात आला. त्यांना २०१६ चा महाराष्ट्र शासन पुरस्कृत विंदा करंदीकर पुरस्कार मिळाला. त्यांचे अलीकडेच २७ में २०१६ रोजी निधन झाले.
त्यातील काही उतारे इथे मुद्दाम ठेवत आहे.
                       " समीक्षा म्हणजे समदृष्टीने पाहणे, सम्यकपणे किंवा समतोलपणाने अवलोकन करणे,होय.कारण समीक्षा ही साहित्याचा अनेक अंगांनी अभ्यास करणारी एक ज्ञानशाखा आहे., एक 'discipline' आहे. मनोरंजन, उदबोधन, आनंद याचा अनुभव एकेकांना येत असतो.पण अशा अनुभवाची चिकित्सा करून तो अधिक यथार्थ, समृद्ध व सुस्पष्ट करण्याचे कार्य समीक्षा आणि समीक्षक करीत असतात.म्हणून चांगल्या साहित्याला चांगल्या समीक्षेची आणि चांगल्या समीक्षेला चांगल्या साहित्याची तहान असते.
                       चांगल्या व अभिजात साहित्यकृती अनेक सत्यता उराशी बाळगून असतात. प्रतिभावंत समीक्षक....... या सत्यता उलगडून स्पष्ट करतात.... व्यक्तीच्या व सामूहिक जीवनाच्या सुखदुखा:चा, प्रश्नोपप्रश्नांचा, स्वप्नांचा व स्वप्नभंगांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात......साहित्यकृती ही एक अपूर्व कलात्मक मिर्मिती असते. समीक्षा ह्या कलावस्तूचे रंगरूप मोठ्या प्रभावीपणे स्पष्ट करून सांगते.
                      समीक्षेच्या वाचनामुळे साहित्यकृती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. तिच्यातील आवडणा-या व नावडणा-या गोष्टींचा तर्कशुद्ध खुलासा होतो. योग्य कारणांसाठी एखादे पुस्तक का आवडते किंवा का आवडत नाही, याचे बौद्धिक समाधान प्राप्त होते आणि आपली वान्गमयीन अभिरुची संपन्न होते.
                    समीक्षा म्हणजे काही फावल्या वेळेत व लहरीनुसार करावयाचा व वाचावयाचा उद्योग नाही, तर ती एक गांभीर्यपूर्वक करावयाची साधना आहे. कोणत्याही समाजातील साहित्यसंस्कृतीचा दर्जा केवळ साहित्य व साहित्यिक यांच्यामुळे ठरविता येत नाही; तर तो समीक्षा व समीक्षक याच्या गुणवत्तेवरून ठरविला जातो."
                                  समीक्षा हे मुलत: साहित्य मूल्यांचे व्यवस्थापन शास्त्र आहे.                      
                  साहित्यमूल्य म्हणजे काय ह्या चर्चेत न जाता, आपण नकारवाद आणि होकारवाद ही साहित्यमुल्ये आहेत, असं मान्य केले तर आपल्याला पुढे चर्चा करता येईल.
                   नकारवाद हे साहित्य मूल्य म्हणून स्वीकारले तर त्याच्या चांगले -वाईटपणाचा विचार दिलेल्या साहित्य प्रकार संदर्भात करता येतो. नकारवाद हा दृष्टीकोन नसून वास्तववादाचा एक प्रकार आहे. होकारात्मक हा मात्र दृष्टीकोन आहे आणि तो सुद्धा वास्तववादाचा एक भाग आहे. त्यामुळे नकारात्मक वास्तवाकडे होकारात्मक दृष्टीकोनातून पाहता येणे, शक्य असते.
                     तत्वज्ञानात आशावाद आणि निराशावाद ही दोन तत्वे आहेत. ही साहित्य मुल्ये नाहीत....असे स्पष्ट प्रतिपादन विंदा पान क्र.३२ ते ३६ वरील विवेचनात स्पष्ट करताना म्हणतात, “ सौदर्यात्मक आणि साहित्य मूल्ये एकच मानण्याची किंवा विशेष प्रकारची साहित्यिक मूल्ये दुय्यम समजून ती मूल्ये अधिक व्यापक अशा सौंदर्यात्मक मुल्यांतूनच काढण्याची इच्छा ही या गोंधळाला कारणीभूत आहे.”
                      सौदर्यवाद ही तत्वज्ञान शाखेची निर्मिती आहे. आशावाद आणि निराशावाद ह्या तत्वज्ञान शाखेच्या विचारप्रणाली आहेत. 
                   मी सर्वसाधारण कोणत्याही साहित्य किंवा कलाकृतीचा अभ्यास करताना विंदांनी केलेली साहित्य मूल्यांची पुढील व्याख्या प्रमाणभूत धरतो. “ मानवी अनुभव-विश्वाच्या काही वस्तुनिष्ठ विशेषांना प्रतिबिंबित करणारा आणि सर्वसाधारणपणे कमी-अधिक प्रमाणात मानवी मनाच्या तत्संबद्ध पैलूंकडून स्वीकारला जाणारा उत्कृष्टतेचा निकष.” 
                     समीक्षा हे साहित्य मूल्यमापन व्यवस्थेचे व्यवच्छेदक व मापदंड निर्धारण शास्त्र आहे. समीक्षक रसास्वाद व रसग्रहण ह्यांच्या साकल्याने साहित्य किंवा कलाकृतीचे संशोधनात्मक, अभ्यासात्मक विवेचन मांडत असतो. समीक्षेच्या परिप्रेक्षात साहित्य किंवा कलाकृतीची अभिव्यक्ती मुख्य असते. समीक्षेचा केंद्रबिंदू साहित्यिक किंवा कलावन्त नसतो, हे लक्षात घेऊनच साहित्यिकांनी समीक्षेचा विचार आणि आस्वाद घ्यायचा असतो.   
                   जेव्हा माझी कविता, माझी कथा, माझी निर्मिती, माझी कला....जो पर्यंत मी-माझे हे अहंकार जाणवत राहतील, असतील... तो पर्यंत ती साहित्य कृती, कलाकृती विशुद्ध असणार नाही, होऊ शकणार नाही. जे लेखक, कवी, कलावंत समीक्षा, टीका सहन करू शकत नाहीत; टीका झाल्यास समीक्षक किंवा टीकाकारावर उलट वैयक्तिक टीका, त्याला दूषणे, त्याची निंदानालस्ती करू लागतात, ह्यातच त्यांची न्यूनता, अहंकार सुदृढता दिसून येते आणि असा माणूस सदैव आत्मपूजक होऊन राहतो.
                  माझ्या दृष्टीने कला-साहित्य ही मानवी मनाची, त्याच्या अनुभवाची निर्मितीक्षम अशी संसाधने आहेत. लेखक, कवी, कलावंत हा त्या निर्मिती क्षणाचा अभिव्यक्त निर्माता असतो. कायद्याच्या भाषेत तो मालक असला तरी कलामूल्य संदर्भात तो निमित्तमात्र असतो. अशी विदग्धता नसेल, तर तो लेखक आपल्या निर्मितीचा जनक किंवा जननी राहत नाही. जिथे मालकी हक्क आला तिथे जगरहाटी, तडजोडी, राजकारण सर्व काही आलं, त्यामुळे कला विशुद्ध राहू शकत नाही, असे मला वाटते.
                  मराठी साहित्यात समीक्षा इंग्रजी समीक्षेच्या सूत्रावर आधारित होत असते. कारण समीक्षा हा भाषा अभ्यासाचा विषय आहे, ही संकल्पनाच इंग्रजी साहित्यात गंभीरपणाने पहिल्यांदा मांडली गेली आहे. दुसरा मुद्दा असा की मराठी साहित्यिकांत आणि वाचकांतही समीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन निखळ नाहीयेय. ह्याचे कारण मला वाटते की आपण व्यक्ती पूजेकडे अधिक झुकणारे आहोत आणि साहित्य कृतीपेक्षा लेखकाला किंवा कलावंताला अधिक महत्व आणि प्राधान्य देणारे आहोत.
                  अनेक नामवंत, गुणी आणि प्रतिभावंत साहित्यिक सुद्धा स्व-निर्मित साहित्य कृतीचे हिरीरीने, आक्रमकपणे आपल्याला भावलेल्या अर्थानुसार समर्थन करीत असतात व समीक्षेला नाकारत असतात. त्यामुळे त्यांचे समर्थक सुद्धा आक्रमकपणे आपल्या लाडक्या. आवडत्या लेखकाच्या समर्थनार्थ समीक्षकांवर तुटून पडतात.....समीक्षा नुसती नाकारली जात नाही तर नाउमेद केली जाते. त्यामुळे समीक्षा ही चिकित्सक, प्रश्न विचारण्याची, आणि साहित्य समजून आणि समजावून घेण्याची आणि देण्याची भूमिकाच नाकारली जाते.
अर्थात, ह्यामध्ये काही समीक्षक जबाबदार नाहीत, असं मी मानत नाही. काही समीक्षक पूर्वग्रह दुषित आणि व्यक्ती केंद्रित टीका करीत असतात, हे वास्तव मी नाकारीत नाही. पण म्हणून समीक्षा नाकारणे, दुर्लक्षित करणे?.....ह्यामुळे मराठी साहित्याचा दर्जा कोणी तपासायचा? लोकप्रियता, पुस्तकाचा खप, जाहिरात, प्रसिद्धी हेच निकष दर्जा ठरविणार काय? मराठीत विपुल आणि फार मोठ्या प्रमाणात कविता, लेख, कथा इ वांग्मय प्रसिद्ध होत आहे. त्यांची दर्जाबद्दल चिकित्सा न झाल्यामुळे सकस साहित्य कोणते, पुस्तक घेतले, पण वाचता-वाचता कंटाळून ठेवून दिले....कारण हे वांग्मय कळतच नाही.....माझी वाचक, आस्वादक, आणि अभ्यासक वृत्ती पणाला लावण्यासाठी मला मार्गदर्शक नाही.
                  वाचन ही संस्कृती आहे, असे म्हणतो, त्याचा अर्थ काय? वाचन ही कला तर आहेच, पण त्यापेक्षा समजून घ्यायची व समजावून देण्याची आणि शिकण्याची विद्या आहे, हे आपण कधी मान्य करणार ?
                  ही गोष्ट आहे, एका पुस्तक प्रकाशन समारंभाची. विशेषत: त्या पुस्तकाच्या लेखिकेने समारंभाला बोलाविलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाबद्दल.
                  ह्या पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापिका आहेत. सदर पाहुण्यांना त्यांनीच आदरपूर्वक बोलाविले आहे. तसेच, ते पाहुणे साहित्यिक नाहीत, हे ही त्यांना माहित आहे. पण त्या पाहुण्यांना प्रसिद्धीचे मोठे वलय आहे. ते लोकप्रिय वक्ते आहेत. म्हणून की काय त्यांनी ह्या पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. आता प्रत्यक्ष समारंभात ह्या पाहुण्यांनी भाषण करताना ह्या लेखिकेच्या काही चुका किंवा अनुचित साहित्य विषयक समस्या आणि गैरसमज विषद केले. थोडक्यात, त्यांनी ह्या पुस्तकाची योग्य, संयमित आणि संयत समीक्षा केली. ही ह्या लेखिकेला आणि समारंभाच्या आयोजकांना आवडली नाही. का तर, त्यांच्या दृष्टीने पुस्तक प्रकाशन समारंभ हा लेखिकेचा कौतुक करण्याचा सोहळा असतो. त्यामुळे ह्या पाहुण्यांनी औचित्य भंग केला, हा आयोजकांचा आणि लेखिकेचा मुख्य मुद्दा. बर, ह्या लेखिकेने पाहुण्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर पाहुण्यांची एकंदरीत त्यांच्या सदर पुस्तकावर काय प्रतिक्रिया आहे, हे ही जाणून घेतले नाही. तरीही त्यांनी केलेली समीक्षा ह्यांना खूप अयोग्य वाटते.
                थोडक्यात काय, तर हल्ली बहुसंख्य लेखक-लेखिका, कवि-कवयित्री ह्यांना आपल्या साहित्य कृतीवर टीका किंवा समीक्षा नको असते. स्तुतिपाठक लोक हवे असतात. आपलेच दिवे, आपल्या स्तुतीपाठकांकडून ओवाळून हवे असतात.
                मराठी साहित्यात कसदार, दर्जेदार साहित्य फारसे निर्माण होत नाही. पण निर्मिती, प्रकाशने, छपाई भरपूर होत आहे, असे सर्वसाधारणपणे, सर्वच लोक म्हणत असतात. ज्ञानपीठ किंवा साहित्य अकादमी इ बहुमान मराठी साहित्याच्या वाट्याला इतर भाषिक साहित्याच्या तुलनेत खूपच कमी आहेत. ह्याची अनेक कारणे आहेत. त्यातील, प्रमुख कारण हेच असावे की थोड्याशा, स्थानिक प्रसिद्धीवर, लोकप्रियतेवर व प्रती खपविण्यावरच ही मंडळी खूष आणि समाधानी असतात. हे दुर्दैव आहे. आपल्या कलाकृती किंवा साहित्याची स्वयं प्रसिद्धी करणे, आपली पुस्तके फुकट वाटणे, आपल्या पुस्तकांचा स्वत:च अनेक ठिकाणी प्रचार आणि प्रसार करणे..... हे अहंगंड, narcissism वृत्तीचे लक्षण आहे, नाहीतर काय आहे? टीका, समीक्षा सहन न करणे, ह्याला असहिष्णुता म्हणायचे, नाही तर काय म्हणायचे?
                इथे फेबुवर सुद्धा जे काही साहित्य प्रकाशित होते, त्यावर माझ्या सारख्या अत्यंत सामान्य वाचकाने चिकित्सक किंवा समीक्षणात्मक टीका केली की त्या लेखक-कविसह त्याचे समर्थक माझ्यावर वैयक्तिक टीका, टोमणे, निंदानालस्ती इत्यादी करण्यात स्वत:ला धन्य समजतात !
                 मराठी साहित्यिकांना समीक्षा आवडत नाही.(तरीही समीक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात !). ह्याचे एक मुख्य कारण आहे, भावनिकता ! आणि भावनिकता आली की चिकित्सा कमी होते ! आपल्या साहित्यावर आपण स्वतः प्रेम करणे, गैर मुळीच नाही. पण ह्या प्रवाहात वाहून जाताना आपला अहंकार साहित्य मुल्यांपेक्षा बलिष्ठ होत आहे, व त्यामुळे असहिष्णू वर्तन आणि चिकित्सेला नाकारणे, होत आहे...ह्याकडे साहित्यिकांसह त्यांच्या चाहत्यांचे -समर्थकांचे दुर्लक्ष होत आहे, ही मराठी साहित्यिक दुर्दैवी गोष्ट आहे, असं मला वाटतं. हे मांडताना मला कुठेही निर्णायक ( Judgemental ) व्हायचे नसून माझं प्रामाणिक मत नोंदवायचे आहे.
                कायद्याच्या भाषेत मी माझ्या साहित्य निर्मितीचा मालक असलो किंवा तार्किक दृष्टीने पालक असलो, तरी वाङ्मयीन दृष्टीने मी माझ्या निर्मितीचा साक्षीदार होत असतो, त्यामुळे माझ्या निर्मितीची मी परखडपणे चिकित्सा व समीक्षा करू शकतो आणि करीत असतो.
    साहित्य किंवा कोणत्याही कलाकृतीत कलावंत किंवा साहित्यिकाचे प्रतिबिंब उमटलेले असते का?
               ह्या बाबतीत, काही जणांचे मत ' हो ' असे असले तरी समीक्षा शास्त्रानुसार कलाकृतीच्या मागे तिचा निर्माता किंवा निर्माती ही अभिव्यक्ती असते, व्यक्ती नसते. अभिव्यक्तीचा साहित्यिक किंवा कला आविष्कार हा त्याच्या संवेदनशील मनाचा भावनात्मक-बौद्धिक संवाद असतो. त्याच्या वैयक्तिक जीवनानुभवाशी त्याचा संबंध असतोच,असं नाही. उदा. महादेवी वर्मा यांच्या जीवनात दुःख असं काहीही नव्हतं. तरीही त्यांच्या कविता वेदनेतून प्रगट झाल्या आहेत, असं वाटत राहतं.
              थोडक्यात, साहित्य किंवा कलाकृतीत भावनेचा अस्सलपणा, सच्चेपणा जाणवतो की नाही, ह्या वरून कलाकृतीचे मूल्यमापन होत असते, किंबहुना करावयाचे असते. कलावंत तो अनुभव जगला की नाही, ह्यावरून नाही !
             रसास्वाद,रसग्रहण आणि समीक्षा ही साहित्य शास्त्रातील वेगवेगळी दालने आहेत. वाचक ह्या भुमिकेपलीकडे जाऊन ज्यावेळी मी चिंतन-मनन ह्या अभ्यासक आणि वैचारिक पातळीवर जाऊन पोहोचतो, तेव्हा मला जे जाणवत असते, ते मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.
             टीकाकार आणि समीक्षक हा सुद्धा आस्वादक असतो आणि त्यादृष्टीने कलेचे जे आणि जसं प्रतिबिंब त्याच्या मन:पटलावर उमटते, त्याप्रमाणे, तो टीका /समीक्षा करीत असतो. मनाची नितळता हा चारित्र्याचा भाग आहे. टीका आणि समीक्षा हा मात्र केवळ चारित्र्याचा भाग नसून समीक्षकाच्या सखोल अध्ययन, अभ्यास, विचारशक्ती आणि शब्द सामर्थ्य ह्यांचा समुच्चय असतो. कवितेला केवळ छान, सुंदर, अप्रतिम म्हणून कदाचित आस्वाद वृत्ती प्रगट होत असली तरी त्या आस्वाद वृत्तीचे आविष्करण झाल्या शिवाय कलाकृतीचे सम्यक अवलोकन होत नाही. असा एक मोठा वाचकवर्ग आहे, ज्यांना होत असलेला कलाकृतीचा आनंद स्वत:ला समजून घ्यायचा असतो....आनंद, आस्वादक वृत्ती सुद्धा खुलली, प्रसन्नपणे व्यक्त झाली तर त्या कलाकृतीचा विकास इतर वाचकांपर्यंत होतो आणि कलाकृतीचे महानपण विस्तृत पावते. ह्यादृष्टीने, ती कलाकृती सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य घडविते.
             आपल्याकडील साहित्यात आणि ब-याच साहित्यिकांना समीक्षा हा साहित्य प्रकार आहे, हेच मान्य नसते. त्यांच्या कलाकृतीची चिकित्सा होऊ नये; संशोधनात्मक, अभ्यासात्मक कार्य होऊ नये, असे वाटते. का? तर कलाकृतीचा आस्वाद घेणे, हेच वाचकाचे कार्य. काहीजण तर समीक्षा म्हणजे 'काथ्याकुट' म्हणतात !
मला वाटते, ह्याच दृष्टिकोनामुळे म्हणजे चिकित्सा आणि चिकित्सक वृत्ती नाकारणे.....ह्यामुळे आपले साहित्य दर्जेदारपणाच्या कसोट्या नाकारीत राहिले आहे. ह्याउलट, इतर भाषांमधील साहित्यात, विशेषत: इंग्रजी वान्गमयात, टीका आणि समीक्षा ह्यांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मासिके, ग्रंथ प्रकाशन इ. कार्यांतही संपादन कार्य बरेचसे समीक्षेच्या/टीकेच्या अंगाने जाते. हे ज्यांना आवडत नाही, ते साहित्यिक, लेखक, कवी आपल्या निर्मितीबाबत अभ्यासू नाहीत...त्यांना आपल्यावर झालेली टीका सहन होत नाही...त्यामुळे त्यांना आपल्या प्रगतीच्या वाटा स्वयंभू आहेत, असं वाटू लागते...आणि तिथेच त्यांच्यातील अहंकार, कुपमंडूकता, भाटगिरी-प्रियता, मनोरंजकता, लोकप्रियतेची हौस वाढीस लागते आणि त्यांतूनच एकंदर त्या कवीचा/साहित्यिकाचा -हास होऊ लागतो.
                सुधा जोशी. "वेध' ह्या समीक्षा लेख संग्रहात म्हणतात : कलाकृतीतून एकच आशय सूचित होण्यापेक्षा आशयाची अनेक वलये तयार व्हावीत. ह्याचा अर्थ संदिग्धता नव्हे, तर interpretation च्या अधिक शक्यता .... पण या शक्यता अजमाविण्यासाठीही मुळात स्पष्टता हवीच.
                    रत्नाकर मतकरी यांचा एकूण साहित्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन..... त्यांच्या सर्व साहित्य निर्मिती मध्ये सुस्पष्टता हा आहे. ते स्वतःच म्हणतात की आपण लिहितो, त्यापेक्षा वेगळं वाचकाला, प्रेक्षकाला, श्रोत्याला वाटत असेल, तर ती त्यांची दिशाभूल करणारी कलाकृती असते. अर्थात दिशाभूल करणे हा सुद्धा कलात्मक आविष्कार असतो, पण अशा दिशाभूल करण्याला सुद्धा एक दिशा असते, एक सूत्रबद्ध विचार असतो. पण तो नसेल, तर मात्र असे साहित्य वाचक-साक्षेपी आणि सापेक्षित नसते.
                  शेक्सपियरने म्हणले आहे की हम्लेटच्या वेडेपणातही एक शहाणपण होते. मात्र इथे फेबु वर प्रसिद्ध होणा-या कविता, लेख, कथा वाचताना मला ब-याच वेळा असं आढळलं आहे की त्या साहित्याचे लेखक,कवी जे लिहितात, ते इतकं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी निगडित असतं की त्याचा मी केलेला सर्व सामान्य, साहित्यिक आणि तार्किक विचार चुकीचा आहे, हे ते लेखक, कवी मला सांगतात. कारण त्यांचे शब्द, जे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, त्याला समष्टीची आवश्यकता असते,आणि ती नसल्यामुळे सुस्पष्टता हा सद्गुण त्यांच्या साहित्यातुन हरवला जातो, असं मला वाटतं. लेखक-कवी इ साहित्यिकांनी आपले साहित्य स्वतःच्या भाव-भावना,अनुभव त्यांच्या यष्टीतून,व्यक्तीगत मात्रेतून लिहायचे नसते.
                 थोडक्यात असे की साहित्यिक मूल्य असणारे लेखन समष्टीच्या संस्काराने प्रगल्भ होत असते... सुस्पष्ट होत असते आणि त्यातच लेखकाचं शब्द सामर्थ्य, अर्थ प्रवाहित्व आणि सुस्पष्ट अभिवचन सिद्ध होत असतं, असं मला वाटतं. 
                    
समीक्षा आणि चिकित्सा हा विषय लहान मुलांचा म्हणजे प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाचा विषय नसून उच्य शिक्षणाचा म्हणजे महाविद्यालयीन अभ्यासाचा विषय आहे....सामन्यातून आणि असामान्यत्वाकडे जाण्याचे प्रयत्न, धडपड, संघर्ष हा मानवी सांस्कृतिक शीलतेचा अखंड चालणारा प्रवास आहे. हा प्रवास मानवाला सामान्यातून असामान्यतेकडे नेणारा आहे. त्यामुळे समीक्षा बोजड आहे; क्लिष्ट आहे ; समजण्यास अवघड आहे....इत्यादी इत्यादी आक्षेप योग्य असले; तरी सापेक्ष आहेत....म्हणजे असं की समीक्षा हा हलका-फुलका, सोप्पा, मनोरंजनाचा किंवा time pass असा विषय नाही. हा विषय निश्चितच गंभीर प्रकृतीचा, जबाबदार अभ्यासाचा आणि साहित्य-कला विषयक जाणिवांचा आहे. इथे काहीसा पण सुयोग्य अशा वाचक वर्गाचा संबंध आहे किंबहुना त्यांच्या अभ्यासाचा आणि बारकाईने समजून घेण्याच्या प्रक्रियेचा विषय आहे. त्यामुळे, मी मार्मिकतेने असे म्हणेन की समीक्षा क्लिष्ट आणि बोजड वगैरे असेल तर तो समीक्षकाचा दोष नसून वाचकाच्या इयत्तेचा दोष आहे ! 
 
                                                        ****************
                               
                          
                      
                                               समीक्षा हे मूलतः साहित्यिक मूल्यांचे व्यवस्थापन शास्त्र आहे

                                 
समीक्षा हे मूलतः साहित्यिक मूल्यांचे व्यवस्थापन शास्त्र आहे

No comments:

Post a Comment