Friday, 28 February 2020

मन आणि दु:ख


आपले मन हे पानझडीच्या काळात उमललेल्या फुलासारख असतं. कोमेजून जाण्याची प्रक्रिया चालू असतानाच उमलण्याची धडपड ते करीत राहते.
- नरहर कुरुंदकर.
म्हणून Renuka Khati Purohit म्हणते,
वाटे जरी मनाला, हा अंत भावनांचा
सुरवात शेवटातून नक्कीच होत असते
दिशा जरी विखुरल्या, थोड्याच पावलांवर
देतील हाक पुन्हा, जुळण्या नवीन रस्ते.                
            अनंत हे गणपतीचे नाव. पण त्याची व्युत्पत्ती अन + अंत. ज्याला अंत नाही. ज्याला सुरवात असते, त्याला अंत असतोच. पण ज्याला अंत नाही, त्याला शेवट नसतो आणि सुरवातही नसते. असा अनंत.
आपल्या मन:पटलावर एक पातळी असते, वर्तमानाची. तर दुसरी असते, अतीताची, भूतकाळाची. ह्या दोन्ही पातळी जेव्हा समांतर होतात, तेव्हा अनंताचा infinity चा प्रवास दृश्यमान होतो.Renuka Khati Purohit, ह्या चारोळीत, दोन तत्वे मांडतात. एक " अंत भावनांचा " आणि दुसरे " सुरवात शेवटातुन ". ह्या दोन तात्विक संकल्पना... ही कवयित्री विखुरलेल्या दिशा, थोडी पावले आणि हाक जुळणे ह्यांच्याशी संक्रमित करत आहे. थोडी पावले ह्यातून सूचन आहे, दिशा विखुरल्या तरी नियंत्रित आहेत. जुळणारे रस्ते हे प्रतीक हाकेला प्रतिसाद देणारे रूपक आहे. अनंत ह्या संकल्पनेत सुरवात व शेवट एकमेकांशी विसंवादी होतात, त्याप्रमाणे हे नियंत्रित विखुरणारे आणि जुळणारे रस्ते आहेत. हाक व जुळणारे रस्ते ह्यातील आशय अनंत ह्या प्रतिमेत आहे.

हे समजून घेणे, चांगलंच अवघड असले तरी ह्या कवयित्रीच्या मनोगताचे सूत्र आहे. छान आहे. 
जसा सुख हा जाणिवेचा संस्कार आहे, तसा दुःख हा जाणिवेचाच सनातन संस्कार आहे. सुखाची साधने बदलतात, पण दुःखाची प्रयोजने मात्र सनातन होऊन राहिली आहेत.
              ह्यावर सुसंस्कृत मानवाने दुःखाचे परिमार्जन करणारी दृष्टी, उदात्तीकरण, तात्विक चिंतन आणि आध्यात्मिक सांत्वन शोधून काढले आहे. आशावाद हा दुःखाला मिळालेला उ:शाप आहे.
            नरहर कुरुंदकर म्हणतात, " जेव्हा अंधारच प्रकाशगर्भ अस्थी कुरवाळून जतन करू पहातो; तेव्हा उसळणाऱ्या आशावादामुळे दुःखांची विविधता व समृद्धी सारखी विकसन पावत असते. वर्तमानातले रंग विझून जातात, तेव्हा स्मृतीतून (nostalgia) रंग पुरविले जातात...गंध आणि स्वरसंवेदना अधिक जागरूक होतात...सळसळती लाट खळखळून फुटते व ओली रेती पायांना बिलगते...थंडगार जलस्पर्शातून अंग असे सुखावते की भोवतालचे हसरे-नाचरे विश्व त्यातून साकार होऊ लागते."
                  ************
                 

No comments:

Post a Comment