Wednesday, 26 February 2020

मित्र आणि मैत्री


                 मित्र आणि मैत्री
गोधने चारी, हाती घेऊन काठी |
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी |
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ||
रूपे सुंदर सावला गे माये .....
-संत एकनाथ
        एकनाथ हा महान संत तर आहेच, पण तो प्रगल्भ कवी आणि आशय संपन्न असा जगाचा दाता आहे. संतांचे दातृत्व हे मानवतेचे देणे आहे आणि लेणेही आहे.
          या अभंगात एकनाथ म्हणतात, वैकुंठीचा हा सुकुमार आहे, गोपवेष हा त्याचा अवतार जगाच्या उद्धाराकरिता आहे. जगजेठी म्हणजे जगाची जगण्याची एक रीत आहे, पद्धत आहे, शिस्त आहे. जगण्यासाठी काहीतरी प्रयोजन....हे माणसाच्या मुलभूत गरजांमधील एक महान तत्व आहे. माणसाचं जगणं हे केवळ जिवंत राहणे, एव्हढेच नसून जीवन घडविणे, हे आहे. म्हणून एकनाथ म्हणतात, “ गोधने चारी....हाती घेऊन काठी ! “ आपल्या मुलं-बाळांचे संगोपन, पालन-पोषण करायचे आहे, संसार चालवायचा आहे, जीवन घडवायचे आहे. पण त्यासाठी “हाती घेऊन काठी “ राहायचं आहे. काठी ह्याचा अर्थ दोन प्रकारचा आहे. एक अर्थ आहे, कठोरपणा, धारिष्ट, धैर्य, ठामपणा इ हे गुण आहेत. दुसरा अर्थ आहे, काठी हा आधार आहे....पैसा, संपत्ती, सुखसोयी इ गोष्टी ह्या काठी सारख्या आधारभूत आहेत. जगण्यासाठी आणि ह्या जगण्यातून जीवन घडविण्यासाठी “ काठी ” आधार मूल्य आहे. पण त्याला बाजारमूल्य करायचे नाहीयेय. प्रेम, वात्सल्य, स्नेह, बंधुभाव, समता, सम्यकता, संयम इ मुल्ये ही जीवनमूल्ये आहेत. नुसते जगणे महत्वाचे नाही; त्यातून जीवन घडवायचे असते आणि त्यासाठी स्वातंत्र्य हे सुद्धा इतर जीवन मूल्यांसारखे तत्व आहे.
           जगणे हे जीवन म्हणजे पाण्यासारखे मूलद्रव्य आहे. जमीनीतून उद्भवणारे, पण त्याचा उपयोग आयुष्याची दोर, मशागत, पालनपोषण करून अन्न उत्पादन करणे, हे जगण्याचे साधन आहे. माणसाची अन्न-पाणी ही मुलभूत गरज आहे. पण हे अन्न-पाणी ज्या जमीनीतून उत्पादित केले जाते, त्या जमिनीशी आपले नाते धरित्रीचं आहे. आईचे नाते आहे. हे जमीनीशी घट्ट असावे लागते. आपले पाय ह्या जमिनीशी घट्ट असेल, तर जगणे होत असते.
           जगणे म्हणजे पैसा आला. त्याशिवाय आजच्या युगात जगणे अशक्य आहे. पैशाशी माणसाचे नाते आहे आणि जगण्याशी निगडीत झाले आहे. जमिनीवर घट्ट उभे राहणे म्हणजे पैशाचे योग्य मूल्य जाणणे.
          आज सकाळी सकाळी चिरंजीव झोपलेले....पैसा कमाविण्यासाठी, ऑफिसला सकाळी लवकर उठून जाणे, ही आर्थिक गरज आहे. पैसा, पगार ही जगण्याची गरज आहे....जमीनीवर घट्ट उभे राहणे, ही जीवन घडविण्यासाठी नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. ह्या जमीनीची, पैशाची, नोकरीची मशागत करणे, ती सांभाळणे.....तिथे करियर घडविणे......हे कर्तृत्व आहे आणि ह्यातच जीवन घडविणे आहे. संसार आहे, मुळे-बाळें....त्यांचे पालनपोषण, शिक्षण इ सर्व काही ज्या पैशावर होते, ते सांभाळणे.....ही जीवनाला लावायची शिस्त आहे. जगण्याची पद्धत आहे......एक आपली जीवनशैली आहे. ह्यातूनच जीवन विकास साधणे शक्य आहे. पण त्यासाठी ज्या आर्थिक पायावर, जमीनीवर उभे राह्यचं आहे, तो मजबूत केला पाहिजे. तरच जीवनाची जडणघडण होत असते. थोडक्यात, जीवन विकासाचे मुलभूत तत्व आर्थिक पाया हे आहे.
         आपल्या जगण्याच्या पद्धतीत शिस्त आणि त्यावर आधारित आहे, जीवनमूल्यांचा पाया आणि विकास.....संवयी, मग त्या चांगल्या असोत की वाईट......त्या आपल्या जगण्याच्या पद्धतीचा नकळत एक अंगभूत आधार आणि मानसिक आधार होऊन जात असतात. मित्र हा एक मोठ्ठा भाग आजच्या तरुणाईचा झाला आहे. ह्यामध्ये गैर काहीच नाही. पण मैत्री आणि मित्र ह्या गोष्टी किंवा घटक एकच नाहीत. जगामध्ये जशा चांगल्या-वाईट गोष्टी आहेत, तसे चांगले-वाईट मित्रही आहेत. पण मैत्री म्हणजे मित्र नव्हे. म्हणजे असं की मैत्री ही संकल्पना आहे. अतिशय सुंदर, आकर्षक, आणि जीवाभावाचे सख्य मागणारी आणि देणारी अशी मैत्री हे माणसालाच नाही तर अवघ्या विश्वाला मिळालेले वरदान आहे. पण म्हणूनच मैत्रीला एक शिस्त असते, एक पद्धत असते आणि एक मर्यादाही असते किंबहुना असायला हवी. मित्र ही संवय आहे की व्यसन आहे, हे मात्र तपासून पहायचे असते. कारण ह्यातच व्यसनाधीनता होत नाहीयेय ना? आपले आत्मभान आपण हरवित नाही ना? मित्राच्या संगतीने, “ संगती संग दोषात “ होत नाही ना? हे वारंवार, सतत तपासून पाहिले पाहिजे....तरच मित्र-मैत्रीण हा आपल्या संवयीचा, आपल्या व्यसनाचा, आणि व्यसनाधीनतेचा भाग, हिस्सा होत नाही. आपल्या घरातील आई-वडील, बहिण-भाऊ, इतर नातेवाईक ह्यांच्यापेक्षा हा मित्र, ही मैत्रीण वरचढ, मोठी, महत्वाची होत नाही ना? ह्या मित्रांच्या आपण आहारी तर जात नाही ना? आपले आत्मभान आपण राखत आहोत की नाही? हे सतत तपासून पाहिलं पाहिजे. कारण जागतीकरणाच्या लोंढ्यात आपली अनेक जीवनमूल्ये आपण हरवित चाललो आहे किंवा गमावीत चाललो आहे......हे दुर्दैवी, भयानक आणि अस्वस्थ करणारे वास्तव आहे.  
                **************   



No comments:

Post a Comment