Thursday, 23 December 2021

समाजभान

 माणसाच्या वृत्ती आणि प्रवृत्ती कौटुंबिक आणि सामाजिक परिप्रेक्षात घडत असतात. सामाजिक परिप्रेक्ष म्हणजे लोकांची मते, विचार, संकल्पना इत्यादी गोष्टींवरून आपली मते घडत जातात. परंतु आपण जेव्हा आपल्या व्यक्तिगत धारणा, विचार, संकल्पना इत्यादी गोष्टी आपण सामाजिक विचार प्रवाहांच्या संदर्भात तपासून न पाहता जशाच्या तशा स्वीकारतो ,तेव्हा आपण प्रवाहपतित होत असतो. 

                     मुळात आपण हे समजून घेत नाही की मी ही एक स्वतंत्र व्यक्ती असून, समाजाचे आणि माझे नाते काय आहे ? त्यामुळे, लोकांच्या मतांवरून ठरविलेली आपली अनुमाने, निष्कर्ष किंवा संकल्पना चुकीच्या आहेत, हे जेव्हा सिद्ध होते; तेव्हा मात्र आपल्या एकट्यालाच चुकलेल्या गोष्टींची फळे भोगावी लागतात. आपली मते, विचार, संकल्पना आपण किती प्रमाणात समाजाकडून मान्यता घेऊन सत्य - असत्य ठरविणार? ह्याचे भान न ठेवल्यामुळे जे काही भोगावे लागते, त्याला समाज नाही, तर आपण एकटेच जबाबदार असतो.

                       समाज आणि मी ह्यांचे नाते विविध पातळींवर कार्यरत असते आणि हे नाते नेहमीच एकोप्याचे नसते. कारण समाज ज्या विचारप्रवाहांवर कार्यरत असतो, त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर आपली वैयक्तिक जडणघडण झालेली असते. समाजाची मते ही बहुसंख्याक वादी असतात. ह्या बहुसंख्याकात वैयक्तिक विचार करणारे आणि त्या विचारांप्रमाणे समाजा बरोबर जाणारे अधिक असतात आणि विरुद्ध जाणारे फार थोडे असतात. कारण प्रत्येक माणसाची मनोबुद्धी एकसमान नसते. परंतु ज्याला ह्याची जाणीव असते की माझी प्रज्ञा, बुद्धी ही समाज म्हणतो, त्या विरुद्ध आहे; त्याला म्हणजे त्या व्यक्तीला समाजभान आहे, असे म्हणतात. 

                   थोडक्यात,समाज काय म्हणतो आणि मी काय म्हणतो; ह्यातील अंतर म्हणजे समाजभान होय.

                                                                   **************

Sunday, 12 December 2021

आत्मविश्वास

 आत्मविश्वास हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहे. हे व्यक्तिमत्व ज्या प्रमाणात विकास पावत जाते, त्या प्रमाणात ती व्यक्ती इतरांना प्रभावित करू शकते. त्यामुळे ती व्यक्ती इतरांचा विश्वास संपादन करून घेऊ शकते. ह्यामुळे ती व्यक्ती लोकप्रियतेची एकेक शिखरे पादाक्रांत करत जाते. त्या बरोबर सदर व्यक्तीचा इतर लोकांबद्दल वाटणारा विश्वास वाढत जातो. ह्याच लोकप्रियतेचा उपयोग आणि दुरुपयोग राजकीय पक्ष करून  घेऊ लागतात. त्या व्यक्तीला पक्षातील विविध पदे बहाल करणे, विविध ठिकाणी मिरवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, शासकीय विविध सांस्कृतिक समित्यांवर वर्णी लावणे, विविध प्रशस्ती पत्रे, विविध पुरस्कार, बक्षिसे इत्यादी गोष्टींचा वर्षाव करून सदर व्यक्ती सतत प्रसिद्धीच्या झोतात, विशेषत: पक्षांकित वृत्तपत्रे, मासिके इत्यादी मार्फत, सतत प्रसिद्धी माध्यमातून झळकत ठेवली जाते.. मग त्या व्यक्तीला वाटू लागते की मी आता नेता झालो आहे...कारण लोक ह्यांचे ऐकतात. ह्यांचा शब्द झेलण्यास तयार होतात. मग हळूच स्थानिक निवडणुकीचे तिकीट बहाल केले जाते. निवडून जिंकण्याचे प्रशिक्षण, पैशाचा वापर, प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे, त्याच्या खाजगी खऱ्या खोट्या प्रसारित करणे इत्यादी इत्यादी....ह्यातून सदर व्यक्तीला इतका आत्मविश्वास वाटू लागतो की प्रत्येक निवडणूक ही इर्षा होऊन जाते. आत्मविश्वास इतका बळावून जातो की तो अहंकार, गर्व, दर्प, आढ्यता, उर्मटपणा, उद्धटपणा कधी होऊन जातो, ह्याचा पत्ता त्या व्यक्तीला लागत नाही. अखेर अशी व्यक्ती राजकारणी होऊन जाते. 

                             व्यक्तिमत्व विकासाच्या एका टप्प्यावर अशी व्यक्ती पोहोचते, तेव्हा एकतर वर म्हणल्याप्रमाणे ती  राजकीय नेता बनून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीबद्दल लोकांना खात्री वाटू लागते की ही व्यक्ती विश्वासू आहे. ती आपला विश्वासघात करणार नाही. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मुळात आत्मविश्वास ह्या शब्दाचे गांभीर्य आपण जाणून घेत नाही. इथे आत्मा ह्या शब्दाचा विस्तार होऊन आत्मविश्वास हा शब्द तयार झाला आहे. इथे आत्मा म्हणजे अंतर्मन....आतला आवाज. हा आवाज...दैवाधीनता स्वीकारत असतो की मला मिळणारे यश हे माझे कर्तृत्व आहे ! देवाने मला मिळालेली देणगी आहे! इथेच खरी फसगत चालू होते. कारण आत्मविश्वास कसा विकसित झाला.? कोणी विकसित केला? का केला? ह्या प्रश्नांना समोर जायचे धाडस तीच व्यक्ती करू शकते, जिला अंतर्मन, अंतरात्मा म्हणजे काय आणि त्याचा संबंध आपल्या आत्मविश्वासाशी कसा आहे....ह्याची जाण असते.

                               अशी जाण अपोआप निर्माण होत नसते,कारण अध्यात्म साधनेत आत्मा + विश्वास हे अत्यंत कळीचे ( critical ) अनुभव आहेत. गुरु -शिष्य हे नाते द्वंद्वात्मक आहे...हे वास्तव आहे. पण जेव्हा हे नाते पूर्ण विकसित होते, तेव्हा मी - तु पणा गुरु - शिष्यामध्ये रहात नाही. ह्यालाच रामदास स्वामी " समर्पण " भाव म्हणतात. ही अवस्था म्हणजे ह्या ' हृदयीचे त्या हृदयी ' अपोआप म्हणजे नकळत होऊन जाते.  शिष्याचे गुरु सर्वस्व होऊन जातात. तेव्हा आप पर भाव, मी -तु पण, सर्व विसर्जित होऊन जाते.

                                                                    ********************

Tuesday, 9 November 2021

संवाद आणि साहित्य

 प्रत्येक साहित्य कृतीमध्ये संवाद म्हणजे बोलणे असते. व्यक्तीच्या माध्यमातून लेखकाची साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम संवाद करत असते. नाटक हे माध्यम तर संवादनिष्ठ आहे. नाटककार पात्रांच्याकरवी जे सांगत असतो, ते त्या नाटकाच्या कथानकापेक्षा अधिक महत्वाचे असते. कारण ह्या संवादांतून कथानक सजीव होत असते. कथानक आणि नाटक भावात्मक आणि व्यक्तिमत्व प्रधान होत असते. नाटक संहितेतील घटनांचे पात्रांवर घडणारे परिणाम, त्या पात्रांचे होणारे विचार मंथन, पात्रांचे आपापसांतील प्रतिसाद- प्रतिक्रिया- संघर्ष ह्यांचे निरुपण संवादात होत असते.

                कथा - कादंबरी सारख्या साहित्य प्रकारांत संवाद हे व्यक्तीपेक्षा कथानकाला धरून आलेले असतात. नायक - नायिका, खलनायक इत्यादी व्यक्ती कथानकाची प्रपुर्ती करण्यासाठी असतात आणि जेव्हा व्यक्ती आणि कथानक एकरूप जातात; तेव्हा त्या कलाकृतीचा लेखक प्रभावी न होता, ती कथा - कादंबरी अधिक प्रभावी होते. लेखकाची ओळख अशा कलाकृती वरून होऊन जाते. उदा. कोसला ह्या कादंबरी वरून भालचंद्र नेमाडे ह्यांना साहित्यिक म्हणून लोक ओळखू लागले. कोसलाचा नायक आणि कोसलाच्या कथानकापेक्षा कथेच्या संवादात्मक मांडणीमुळे डॉ नेमाडे नव कथा -कादंबरी लेखनाचे प्रवर्तक झाले.

                 कविता - काव्य लेखनात संवाद हा त्या त्या साहित्य कृतीतील प्रासंगिक किंवा प्रतीकात्मक असा भाव असतो. कारण कविता हे कवी आणि वाचक ह्यांच्यातील संवादात्मक नाते आहे. काव्यात्मक शब्द म्हणजे कवितेची रचना असते. म्हणून कवितेत संवाद अभावानेच येतात. 

                    संवाद हे भाषिक दळणवळणाचे माध्यम आहे तर आहेच; पण ते बोलीभाषेचे सूत्र आहे. लोककथा आणि लोक वांग्मय हा संपूर्ण प्रकारच संवादात्मक लेखन अविष्कार आहे. बोलीभाषा हे संस्कृतीचे प्रतिक आहे, त्यामुळे बोली भाषेतील संवाद कौटुंबिक साधे, सोप्पे, मिथके, म्हणी, वाकप्रचारइत्यादी साहित्य रचनांनी संपन्न असतात, 

                  भाषा निर्मिती हीच मुळी संवादाच्या निकडीतून निर्माण झाली. बोलणे ही प्राथमिक अवस्था, तर एकमेकांचे विचार, म्हणणे, सांगणे ....मला काय वाटतं....हे प्रवर्तित करणे...हे संवादाचे मुख्य मागणे असते. संवाद घडला नाहीतर विसंवाद घडतो किंवा मौन निर्माण होते. मौन ही सुद्धा एक भाषा आहे. पण तो विषय वेगळा आहे. विसंवाद म्हणजे भांडण, वाद विवाद, आरोप प्रत्यारोप, द्वेष आणि हिंसक कृत्ये, शिव्यागाळी घडत असतात. रागाची किंवा हिंसक कृत्यांची अभिव्यक्ती विसंवादातूनच घडत असते. 

                                                        *****************

 

Wednesday, 3 November 2021

लेखन म्हणजे काय?

 लिहिणे म्हणजे काय ?

                  लिहिणे हे एक अनुभवांचे कथन आहे; अनुभवलेल्या घटनांचे वर्णन आहे; आकलन आहे आणि आपले प्रतिक्रियात्मक निवेदन आहे. मूळ मात्र अनुभव आहे.

                 मुख्यत: पहाणे, ह्या क्रियेतून अनुभव येत असतो. पण अंध व्यक्तीलाही अनुभव येतात. म्हणजे अनुभव न पाहता येत असतात. म्हणून अनुभव म्हणजे जाणीव....ही जाणींव जितकी परिपोक्त, विश्लेषणात्मक, सौंदर्यपूर्ण, अभिजात आणि परिपूर्ण .....तितका अनुभव संपन्न होत असतो. 

                  तरीही कोणताही अनुभव पूर्णपणे संकीर्ण किंवा संपूर्ण नसतो. म्हणूनच साहित्य आणि कला निर्मिती ही जाणीवेच्या परिप्रेक्षात संपत नसते, संपूर्ण होत नसते. उदा. यमन राग गाणारा गायक त्या रागाचे आकलन, सौंदर्य, आणि स्वरांच्या जाणीवा कलात्मक दृष्टीने स्थळ - काळाच्या सापेक्षते मध्ये सादर करत असतो. पण ही स्वर - जाणीव किंवा अनुभवांची सजगता संपूर्ण कधीच होत नसते. म्हणून तोच गायक किंवा इतर कोणताही गायक हाच राग सादर करताना त्याला आणि श्रोत्यांना येणारा अनुभव नित्य नूतन असतो.

                  तेव्हा मला म्हणायचं आहे की जाणीव हा एक अनुभवाचा सिद्धांत आहे. स्वत:शी किंवा दुसऱ्यांशी संवाद साधणे, ही मूळ प्रेरणा आहे; किंबहुना ह्या प्रेरणेची जाणीव होणे, हे सजीव असण्याचे अधिष्ठान किंवा स्वसंवेद्य प्रतिपादन आहे. पण हे संवाद साधण्याचे प्रयत्न किंवा प्रयोग.... निराश करणारे आहेत. कारण खूप काही सांगून, लिहून, बोलूनही मला जे सांगायचे आहे, सांगायचे असते.....ते अपूर्ण आहे.....ही जाणीव संजीवन आहे. कालप्रवाहात सतत येणारे अनुभव आणि जाणीवा ह्यांचा प्रवास अनंत आहे, अमर्याद आहे. माझ्या जाणिवांचा प्रवास.....माझी अनुभव घेण्याची क्षमता जितकी मर्यादित आहे, तितका माझा लेखन प्रवास मर्यादित, अपूर्ण असा आहे. त्यामुळे मी असं म्हणतो की माझ्या जाणिवांचा प्रवास सतत विकसित होणारा अनुभव आहे; म्हणूनच तो सदैव अपूर्ण आहे. 

                                                                ************

            

Monday, 27 September 2021

शारीरिक प्रतिक्रियांचे विज्ञान

 प्रतिक्रिया हे आपल्या शरीराचे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. ह्या शरीर धर्मामुळे आपल्या जीवनाची जडण - घडण होत असते. आपण ज्या भवतालात, जगात आहोत, त्या जगताची कळत - नकळत आपल्यावर क्रिया होत असते आणि आपण तिला सुद्धा कळत - नकळत प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देत असतो. ह्या प्रतिक्रिया जेव्हा सातत्याने घडत जातात, तेव्हा त्यांना संस्कार म्हणतात. उदा. पावसाळ्यात घराबाहेर पडताना बरोबर छत्री, रेनकोट घेणे....ही आपली पाऊस ह्या नैसर्गिक क्रियेला प्रतिक्रिया आहे. त्याचप्रमाणे, येणाऱ्या कोणत्याही घटनेचे, बातमीचे, माणसांच्या क्रिया - प्रतिक्रियांचे पडसाद - प्रतिध्वनी आपल्या शरीरावर घडत असतात.

                    ह्या आपल्या प्रतिक्रिया किंवा आपले पडसाद ह्यांचे शरीराच्या विशिष्ट अशा संस्थेकडून घडत असतात. ह्या विशिष्ट संस्थाला HPA Axis म्हणतात. ह्यातील H म्हणजे Hypothalamus, P म्हणजे Pituitary आणि A म्हणजे Adrenal ह्या तीन ग्रंथी glands च्या समुच्चयाने आपल्या शरीराचे प्रतिक्रिया घडविण्याचे कार्य चालते. 

                                       1 - Hypothalamus gland secrets 

                                      Corticotropin Releasing Factor (CRF) into blood stream

                                      2 - Pituitary gland secrets

                                     Adrenocorticotropic Harmone ( ACTH ) into blood stream

                                     3- Adrenal Glands secret

                                    Adrenaline Harmone into blood stream

                                   4- Response mechanism 

                                   5- Stress Hormones are secreted into blood stream

                                  6- Constriction of Blood vessels of Digestive tracts.

                                  7- Response mechanism active - Flight Or Flight.    

            अशा प्रकारे आणि अशा ७ पातळींवर घडणाऱ्या शरीरांतर्गत क्रियांमुळे आपल्या प्रतिक्रिया पळून जाणे, पलायनवाद किंवा प्रतिकार, प्रतिहल्ला, आक्रमण अशा स्वरुपात प्रगट होत असतात. 

                                                                      ****************

                                                  

Friday, 24 September 2021

स्वातंत्र्य.. एक जीवनमूल्य

नरहर कुरूंदकरांनी स्वातंत्र्य ही संकल्पना नाही, असे म्हणले आहे. कारण  स्वातंत्र्य हे मानवी सांस्कृतिक विकासाचे अनुस्यूत असे मूल्य आहे. पण स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव आणि स्वैर वर्तन नव्हे. मनमानी नव्हे. म्हणून कुरूंदकर म्हणतात, जबाबदारीच्या जाणिवे शिवाय स्वातंत्र्य हे असूच शकत नाही.
                सामूहिक जनजीवन हे कौटुंबिक आणि सामाजिक वास्तव आहे. ह्यापालिकडे माझी भाषा, माझा धर्म, माझी जात-पात आणि अखेर माझा देश किंवा राष्ट्र ह्या वास्तविकता आहेत. हा मानवी जगण्याचा वास्तववादी परिप्रेक्ष आहे. पण जेव्हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा माझे मन आणि बुद्धी ह्यांचे कार्य दोन पातळीवर चालते. एक पातळी आहे, माझे मी पण.. जीव म्हणजे जिवंत राहणे, हे आहे. तिथे जीवाला भीती असेल तर मी जगण्यासाठी काहीही तडजोडी, अगदी गुलामगिरीही पत्करायला तयार असतो. तुरुंगवास ही शिक्षा का आहे.. ह्याचे उत्तर ह्यातच आहे की मरण्यापेक्षा जगणे स्वीकारले जाते, तेव्हा अस्तित्व महत्वाचे असते. म्हणून मग माझ्या स्वातंत्र्याचा बळी मी देत असतो. तुरुंगवास ही शिक्षा असते, कारण मी माझ्या स्वातंत्र्याचा बळी देऊन गुलामगिरी स्वीकारलेली असते. ही मला झालेली शिक्षा स्वातंत्र्याचा बळी दिल्याबद्दल असते.
                  नोकरी-चाकरी हा सुद्धा स्वातंत्र्याचा बळी असतो. कारण जगण्याचे एक संसाधन म्हणून मी नोकरी पत्करतो, तेव्हा एका विशिष्ट व्यवस्थेचे दास्य म्हणजे गुलामगिरी मी मान्य करीत असतो. म्हणूनच कोणत्याही व्यवस्थेमध्ये.. आणि ह्यामध्ये जगण्याची, जीव जगविण्याची व्यवस्था सुद्धा येते.. स्वातंत्र्य संकुचित असते. त्याचबरोबर, उरलेले स्वातंत्र्य टिकविणे ही एक जबाबदारी असते. नाहीतर मी व्यवस्थे बाहेर फेकला जातो. हयात जगण्याची व्यवस्था असल्यामुळे माझ्या अस्तित्वाचा, जगण्याचा प्रश्न उभा राहतो. म्हणून असे स्वातंत्र्य हे विशिष्ट व्यवस्थेच्या परिप्रेक्षातच, त्या व्यवस्थेच्या बंधनात, नियम, कायदे,इ इ च्या चाकोरीतच सत्य असते. सत्य हे आहे की स्वातंत्र्य हे जीवनमूल्य म्हणून मान्य करायचे असेल, तर अस्तित्वाचे प्रश्न नुसते बाजूला ठेवून चालत नाही. तर अस्तित्वा  पेक्षा महान असे मूल्य आहे, हे मान्य करावे लागते. तिथेच  स्वातंत्र्य ह्या मूल्याची चिकित्सा होऊ शकते.
                     मानवी विकास हा एक सांस्कृतिक जीवनाचा प्रवास आहे. इथे माणूस ही व्यक्ति, व्यष्टी, जीव, किंवा आकार असलेला प्राणी नाही. इथे माणूस हे समष्टी तत्व आहे. त्यामुळे जगणे, माझे अस्तित्व ही समस्या नाही किंवा वास्तविकता नाही. अस्तित्व हा प्रश्न एकदा निकालात निघाला की मग स्वातंत्र्य ह्या शब्दाला सांस्कृतिक  मूल्य म्हणून अर्थ प्राप्त होतो. कारण स्वातंत्र्य ही आदर्शवादी जीवनाची मांडणी आहे, रचना आहे, आणि म्हणून व्यक्ति स्वातंत्र्य अशी कोणतीही संकल्पना असू शकत नाही. व्यक्तीला मिळणारे स्वातंत्र्य हे नेहमीच सापेक्ष असते. काळ आणि परिस्थिति हे एक ह्या स्वातंत्र्याचे परिमाण आहे, तर दुसरे परिमाण मानव्यतेचे आहे. मानवी परिमाण म्हणजे समष्टी तत्व.. आदर्शवाद ही ह्या तत्वाची रचना आहे आणि मांडणी ही एक व्यवस्था आहे. उदा लोकशाही राज्य ह्या संकल्पनेच्या विवध रचना.
                         मुळात लोकशाही म्हणजे हुकुमशाही नाही.. असे म्हणणे किंवा मानणे, हे समजून घेण्याचे एक सुलभीकरण आहे.     

विषमता- वस्तुस्थिती की परिस्थिती ?

 परिस्थितीचा फार बाऊ करून आपल्या अपयशाचे समर्थन करणे, ही आता आता फॅशन झाली आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे की माणसाची बुद्धिमत्ता व destiny प्रारब्ध हे परिस्थितीवर अवलंबून नसतं. कारण परिस्थिती माणसापेक्षा मोठी नाही. बौद्धिक विषमता हे जसे बरेचसे नैसर्गिक वास्तव आहे; तसे आर्थिक विषमता आणि समान संधी उपलब्ध नसणे, हे भौतिक वास्तव परिस्थितीजन्य नसून मानवी विकास क्षमतेचे मूलभूत तत्व आहे; म्हणून ते वस्तुनिष्ठ आहे, असं म्हणलं जाते. समान संधी मिळाल्या तरी बौद्धिक, मानसिक व आधिभौतिक क्षमतांची विषमता राहणारच. कारण सर्वांच्या गुण विकास क्षमता एकच, समान नाहीत आणि म्हणूनच मानवी प्रयत्नवादाला पर्याय नाही, पण अर्थ मात्र मर्यादित आहे.

यशामध्ये परिस्थितीचा वाटा असतो; पण तो 100% नसतो. कारण यश आणि अपयश हे 80-90 टक्के घडत असतं. म्हणून असं म्हणतात की यश-अपयशाचे आपण मालक नसतो. तर ' धनी ' म्हणजे वाहक carrier असतो. तर मग आपले कर्तृत्व.... उरलेले 10-20 टक्के एव्हढेच असते. जो माणूस स्वत:चे कर्तृत्व १००% आहे, असे मानतो; तो एकतर अहंकारी असतो किंवा थापाड्या, बालिश असतो. तर्कशास्त्र सुद्धा यशाच्या शक्यतेचे मोजमाप जास्तीत जास्त ५०% च करते. त्यापेक्षा अधिक यश कर्तृत्वाने मिळू शकते. पण ते १००% कधीच असू शकत नाही.

जर सर्वांना समान परिस्थिती, समान संधी उपलब्ध करून दिली तरीही विषमता दूर होणार नाही. कारण तिथे मग ‘ बळी तो कान पिळी ‘... हिंसा सामर्थ्य, सत्ता सामर्थ्य, भ्रष्टाचार इ मानवी दुर्गुण, धर्मश्रेष्ठ होऊन जातात.
राजकीय म्हणजे सत्तेच्या जोरावर यश मिळू शकते, पण ते मर्यादित असते. कारण असे यश कृत्रिम म्हणून अशाश्वत असते. डॉ आंबेडकरांना मिळाले यश हे त्यांना मिळालेल्या केवळ संधीवर, परिस्थितीवर नाही मिळालं. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर व आधिभौतिक (पूर्वजन्मातील पुण्यसंचय) बळावर मिळाले.
मानवी संस्कृतीने ही विषमता दूर करण्याचा प्रयत्न करणे, हा सुद्धा मानवी विकसनशीलतेचा अनिर्वाय भाग आहे. म्हणून आरक्षण हवे आहे, पण आता तो भस्मासुर, अनिर्बंध, राजकीय मुद्दा झाल्यामुळे मूळ मानवी विकासाचे तत्व, सामाजिक न्याय हे तत्व counter productive झाले आहे. म्हणजे असं की अर्थ शास्त्राच्या सिद्धांतानुसार एखादी गोष्ट अमर्यादित वाढली तर ती Reverse Return व्यस्त परतावा देऊ लागते. गणिताच्या भाषेत... सर्व किंवा काही घटकांचे प्रमाण अमर्याद वाढत गेले, तर परतावा व्यस्त होऊन जातो. मूळचे सम प्रमाण व्यस्त होऊन जाते.
प्रयत्न करणे, हे माणसाच्या क्षमतेवर पण आवाक्यात आहे, पण त्याला यश किती मिळावं, हे प्रयत्नांच्या मर्यादेवर किंवा क्षमतेवर अवलंबून नाही.
कर्मण्येव अधिकारास्ते । मा फलेशु कदाचन ।। - भ.गीता
कर्म करणे, प्रयत्न करणे, हा तुझा अधिकार आहे, त्याला यश द्यायचं की नाही आणि दिले तरी किती; हा माझा अधिकार आहे. इथे मी म्हणजे श्रीकृष्ण हा देव नसून कृष्ण ह्या व्यक्तीची समष्टी आहे’ व्यष्टीचा समष्टीभूत अविष्कार आहे.
*************

अद्वैत सिद्धांत - एक निरुपण


मातेच्या उदरात जन्म घेण्यापूर्वी मी कोण होतो? आई-वडील ह्यांच्या गुणसूत्रांत विलीन असे वास्तव होतो. वास्तव म्हणजे वस्तुरूप अस्तित्व. पण त्या मी असण्याला काही अर्थ नव्हता, आकार नव्हता. पण तरीही मी होतोच ना? तर हा मी त्यावेळी, त्या काळात आणि स्थळात (time & space) एक भास होतो. एक बिंब होतो.

आईच्या उदरात मी गर्भ म्हणून जेव्हा वास्तव झालो, मला आकार आला....पण तरीही मी जगाच्या दृष्टीने मी निराकार होतो....निरर्थक होतो.....मग मी कोण होतो? गर्भ म्हणून माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय होतो? मी गर्भ....हा माझ्या आई-वडिलांच्या गुणसूत्रांचा आविष्कार होता. आई-वडील स्वत: कोण होते, माझ्या गर्भधारणेत? आई-वडील गुणसूत्र रूपाने भास होते, दोन बिंबे होती आणि मी तेव्हा ह्या भासांचा आभास होतो, प्रतिबिंब होतो.
थोडक्यात, मी हा विशिष्ट काळात आणि स्थळात (time & space) मुलत: भास किंवा आभास, बिंब किंवा प्रतिबिंब असतो. हे विश्व म्हणजे मुळात भास आहे, माया आहे.....असे वेदांनी म्हणले आहे. कारण विश्वाचा निर्माता आकाशगंगा आहे....ह्या आकाशगंगेत अनेक विश्वे, ब्रम्हांडे आहेत.....पण जो पर्यंत त्यांना स्वतंत्र वस्तू रूपाने अस्तित्व नाही, आकार नाही....तोपर्यंत ही सर्व विश्वे भासमय आहेत.
अशा प्रकारे मी हा भास आहे. तर मग मी-माझे-मला, तुझे-तुझ्यासाठी-तुला हा सर्व ह्या आभासाचा पसारा आहे....म्हणून माझे व तुझे हा संकीर्ण आभास आहे. वेदा पंडीत म्हणते, माझा विस्तार म्हणजे माझेपण आणि तू-तुझेपण आहे....हे एकमेकांवरील थर आहेत......म्हणून ते आभास आहेत......मी हा मुळात भास आहे, हे मला जाणवते....ही निर्गुणावस्था आहे. निराकार...मला आकार नाही, रूप नाही.....ही जाणीव म्हणजे विदेहावस्था आहे. अध्यात्मामध्ये ह्या अवस्थेला, निद्रा ह्या अवस्थे पलीकडील तुर्यावस्था म्हणतात. झोप-निद्रा-सुषुप्ती इ ह्या तात्कालिक म्हणजे स्थळ-काल (time & space) सापेक्ष अवस्था आहेत. तुर्यावस्था मात्र स्थळ-काळ सापेक्ष नसली तरी निर्विकल्प म्हणजे संकल्प, इच्छा, अपेक्षा नसताना घडणारी एक अवस्था आहे. आध्यात्मशास्त्रात ह्या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. समाधी म्हणण्याचे कारण असे की ह्या अवस्थेत मी ची जाणीव असली तरी मी देह, मी शरीर हे भान लुप्त झालेले असते. समाधी अवस्थेत शरीर काष्ठवत होऊन गेले, तरी त्यात प्राण असतो......पण तो चैतन्य रूपाने नसतो. प्राण हा मुळात चैतन्य आहे. पण त्याला शून्यावस्थेत स्थिर राखणे व जपणे.....ही योगविद्या आहे. योगीजन ती आत्यंतिक, खडतर, अखंड, आणि निरंतर साधनेने साध्य करू शकतात.
ह्या पलीकडील अवस्था म्हणजे सविकल्प समाधी.....ज्ञानेश्वर माऊलीनी घेतलेल्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. कारण त्यांनी समाधी घेण्याचा संकल्प केला व विधिवत समाधी अवस्थेत, काळ-स्थळ सापेक्ष असा, प्रवेश केला व देहत्याग केला. मी भास असून ह्या भासाला मी पाहतो...तेव्हा तो माझ्या अंत:करणात प्रतिभास-आभास-प्रतिबिंब इ चे अनुबंध असतात. ह्या संकीर्ण अशा भास-आभास-बिंब-प्रतिबिंब असलेल्या जगाला सोडून निर्द्वंद्व होणे.....म्हणजे द्वन्व्दातीत होणे....म्हणजेच अद्वैत होणे.....विश्वमय होणे....विश्वात्मक होणे.
द्वैत म्हणजे मी आणि माझेपण, मी आणि तू, मी आणि जग, सुख आणि दुख:, स्त्री आणि पुरुष, देव आणि दानव, देव आणि माणूस, सजीव आणि निर्जीव इ इ द्वंद्वे आहेत. ह्या द्वैतातून मुक्त होणे...हे अद्वैत आहे आणि हाच अद्वैताचा सिद्धांत आहे.
सगुण आणि निर्गुण हे सुद्धा एक द्वंद्व असून ते एकत्र संकीर्ण स्वरुपात जेव्हा साक्षात्कार पावते, तेव्हा अद्वैताचा अनुभव येत असतो. मुळात सगुण ह्याचा अर्थच मुळी वस्तुरूपता असा आहे. सगुण हा दृश्य आहे, देह किंवा शरीर आहे. म्हणून त्याला म्हणजे शरीर रुपी आत्म्याला हे जग सगुणात्मक आहे, असे जाणवते. पण जेव्हा मी हा निर्गुणात्मक असतो, अभिव्यक्ती असतो किंवा समष्टी असतो, तेव्हा माझा भवताल, आजूबाजूचे जग निर्गुण आहे, असे वाटू लागते......ही नेणीव आहे.... जगाची जाणीव ही नेणीव, शून्यत्व, किंवा माया वाटू लागते. भवताल नेणीवेत जातो, निराकार होऊन जातो, आणि मी-पणा हा त्यामध्ये विलय पावला तरी ह्या विलयातही माझे साक्षित्व मला जगासह, भवतालासह पाहता येते. भासांतर्गत भास म्हणजे प्रतिभास किंवा भास आणि अभास हे एकमेकांवरील थर किंवा स्थर किंवा पातळी मला दिसू लागतात.....हे साक्षित्व आहे. ह्यालाच निर्गुणाचा साक्षात्कार म्हणतात.
मी म्हणजे कोण? ह्याचे उत्तर देताना पतंजलीनी म्हणले आहे की हा मी म्हणजे बुद्धी-मन-चित्त आणि अहंकार ह्यांचा जोड complex आहे. ह्यातील अहंकार हा बुद्धी-मन-चित्त ह्यांना लपेटून घेणारा अत्यंत सूक्ष्म असा थर आहे. त्यामुळे अहंकाराचा भेद बुद्धी-मन-चित्त ह्यांच्या सहाय्याने करता येत नाही. त्यासाठी पतंजलींनी पातंजल योगदर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजेच असं की योगसाधनेने अहंकाराचा वेढा दूर करता येतो. ह्यावरून मी चा संबंध भास-आभास ह्या प्रभाव क्षेत्राखाली कसा येतो, हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे, अद्वैत सिद्धांतामध्ये मी चे स्थान आणि प्रभावक्षेत्र किती गुंतागुंतीचे आहे, हे लक्षात येते.
अद्वैत सिद्धांत हा विषय समजायला अवघड आहे. म्हणून ह्या विषयाचे निरुपण असंख्य संतांनी, विचारवंतांनी आणि तत्वज्ञानी लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून केले आहे. भगवत गीता, गीतेवरील शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वरांपासून ते आजच्या ओशो, जे. कृष्णमुर्ती, अनिरुद्धबापू आदि सद्गुरूंनी भाष्ये लिहिली आहेत, केली आहेत. तरीही ह्या विषयाचा आवाका आणि आकलन अपूर्ण आहे.