Sunday, 12 December 2021

आत्मविश्वास

 आत्मविश्वास हा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहे. हे व्यक्तिमत्व ज्या प्रमाणात विकास पावत जाते, त्या प्रमाणात ती व्यक्ती इतरांना प्रभावित करू शकते. त्यामुळे ती व्यक्ती इतरांचा विश्वास संपादन करून घेऊ शकते. ह्यामुळे ती व्यक्ती लोकप्रियतेची एकेक शिखरे पादाक्रांत करत जाते. त्या बरोबर सदर व्यक्तीचा इतर लोकांबद्दल वाटणारा विश्वास वाढत जातो. ह्याच लोकप्रियतेचा उपयोग आणि दुरुपयोग राजकीय पक्ष करून  घेऊ लागतात. त्या व्यक्तीला पक्षातील विविध पदे बहाल करणे, विविध ठिकाणी मिरवण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, शासकीय विविध सांस्कृतिक समित्यांवर वर्णी लावणे, विविध प्रशस्ती पत्रे, विविध पुरस्कार, बक्षिसे इत्यादी गोष्टींचा वर्षाव करून सदर व्यक्ती सतत प्रसिद्धीच्या झोतात, विशेषत: पक्षांकित वृत्तपत्रे, मासिके इत्यादी मार्फत, सतत प्रसिद्धी माध्यमातून झळकत ठेवली जाते.. मग त्या व्यक्तीला वाटू लागते की मी आता नेता झालो आहे...कारण लोक ह्यांचे ऐकतात. ह्यांचा शब्द झेलण्यास तयार होतात. मग हळूच स्थानिक निवडणुकीचे तिकीट बहाल केले जाते. निवडून जिंकण्याचे प्रशिक्षण, पैशाचा वापर, प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे, त्याच्या खाजगी खऱ्या खोट्या प्रसारित करणे इत्यादी इत्यादी....ह्यातून सदर व्यक्तीला इतका आत्मविश्वास वाटू लागतो की प्रत्येक निवडणूक ही इर्षा होऊन जाते. आत्मविश्वास इतका बळावून जातो की तो अहंकार, गर्व, दर्प, आढ्यता, उर्मटपणा, उद्धटपणा कधी होऊन जातो, ह्याचा पत्ता त्या व्यक्तीला लागत नाही. अखेर अशी व्यक्ती राजकारणी होऊन जाते. 

                             व्यक्तिमत्व विकासाच्या एका टप्प्यावर अशी व्यक्ती पोहोचते, तेव्हा एकतर वर म्हणल्याप्रमाणे ती  राजकीय नेता बनून जाते. दुसरी गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीबद्दल लोकांना खात्री वाटू लागते की ही व्यक्ती विश्वासू आहे. ती आपला विश्वासघात करणार नाही. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की मुळात आत्मविश्वास ह्या शब्दाचे गांभीर्य आपण जाणून घेत नाही. इथे आत्मा ह्या शब्दाचा विस्तार होऊन आत्मविश्वास हा शब्द तयार झाला आहे. इथे आत्मा म्हणजे अंतर्मन....आतला आवाज. हा आवाज...दैवाधीनता स्वीकारत असतो की मला मिळणारे यश हे माझे कर्तृत्व आहे ! देवाने मला मिळालेली देणगी आहे! इथेच खरी फसगत चालू होते. कारण आत्मविश्वास कसा विकसित झाला.? कोणी विकसित केला? का केला? ह्या प्रश्नांना समोर जायचे धाडस तीच व्यक्ती करू शकते, जिला अंतर्मन, अंतरात्मा म्हणजे काय आणि त्याचा संबंध आपल्या आत्मविश्वासाशी कसा आहे....ह्याची जाण असते.

                               अशी जाण अपोआप निर्माण होत नसते,कारण अध्यात्म साधनेत आत्मा + विश्वास हे अत्यंत कळीचे ( critical ) अनुभव आहेत. गुरु -शिष्य हे नाते द्वंद्वात्मक आहे...हे वास्तव आहे. पण जेव्हा हे नाते पूर्ण विकसित होते, तेव्हा मी - तु पणा गुरु - शिष्यामध्ये रहात नाही. ह्यालाच रामदास स्वामी " समर्पण " भाव म्हणतात. ही अवस्था म्हणजे ह्या ' हृदयीचे त्या हृदयी ' अपोआप म्हणजे नकळत होऊन जाते.  शिष्याचे गुरु सर्वस्व होऊन जातात. तेव्हा आप पर भाव, मी -तु पण, सर्व विसर्जित होऊन जाते.

                                                                    ********************

No comments:

Post a Comment