Thursday, 23 December 2021

समाजभान

 माणसाच्या वृत्ती आणि प्रवृत्ती कौटुंबिक आणि सामाजिक परिप्रेक्षात घडत असतात. सामाजिक परिप्रेक्ष म्हणजे लोकांची मते, विचार, संकल्पना इत्यादी गोष्टींवरून आपली मते घडत जातात. परंतु आपण जेव्हा आपल्या व्यक्तिगत धारणा, विचार, संकल्पना इत्यादी गोष्टी आपण सामाजिक विचार प्रवाहांच्या संदर्भात तपासून न पाहता जशाच्या तशा स्वीकारतो ,तेव्हा आपण प्रवाहपतित होत असतो. 

                     मुळात आपण हे समजून घेत नाही की मी ही एक स्वतंत्र व्यक्ती असून, समाजाचे आणि माझे नाते काय आहे ? त्यामुळे, लोकांच्या मतांवरून ठरविलेली आपली अनुमाने, निष्कर्ष किंवा संकल्पना चुकीच्या आहेत, हे जेव्हा सिद्ध होते; तेव्हा मात्र आपल्या एकट्यालाच चुकलेल्या गोष्टींची फळे भोगावी लागतात. आपली मते, विचार, संकल्पना आपण किती प्रमाणात समाजाकडून मान्यता घेऊन सत्य - असत्य ठरविणार? ह्याचे भान न ठेवल्यामुळे जे काही भोगावे लागते, त्याला समाज नाही, तर आपण एकटेच जबाबदार असतो.

                       समाज आणि मी ह्यांचे नाते विविध पातळींवर कार्यरत असते आणि हे नाते नेहमीच एकोप्याचे नसते. कारण समाज ज्या विचारप्रवाहांवर कार्यरत असतो, त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर आपली वैयक्तिक जडणघडण झालेली असते. समाजाची मते ही बहुसंख्याक वादी असतात. ह्या बहुसंख्याकात वैयक्तिक विचार करणारे आणि त्या विचारांप्रमाणे समाजा बरोबर जाणारे अधिक असतात आणि विरुद्ध जाणारे फार थोडे असतात. कारण प्रत्येक माणसाची मनोबुद्धी एकसमान नसते. परंतु ज्याला ह्याची जाणीव असते की माझी प्रज्ञा, बुद्धी ही समाज म्हणतो, त्या विरुद्ध आहे; त्याला म्हणजे त्या व्यक्तीला समाजभान आहे, असे म्हणतात. 

                   थोडक्यात,समाज काय म्हणतो आणि मी काय म्हणतो; ह्यातील अंतर म्हणजे समाजभान होय.

                                                                   **************

No comments:

Post a Comment