लिहिणे म्हणजे काय ?
लिहिणे हे एक अनुभवांचे कथन आहे; अनुभवलेल्या घटनांचे वर्णन आहे; आकलन आहे आणि आपले प्रतिक्रियात्मक निवेदन आहे. मूळ मात्र अनुभव आहे.
मुख्यत: पहाणे, ह्या क्रियेतून अनुभव येत असतो. पण अंध व्यक्तीलाही अनुभव येतात. म्हणजे अनुभव न पाहता येत असतात. म्हणून अनुभव म्हणजे जाणीव....ही जाणींव जितकी परिपोक्त, विश्लेषणात्मक, सौंदर्यपूर्ण, अभिजात आणि परिपूर्ण .....तितका अनुभव संपन्न होत असतो.
तरीही कोणताही अनुभव पूर्णपणे संकीर्ण किंवा संपूर्ण नसतो. म्हणूनच साहित्य आणि कला निर्मिती ही जाणीवेच्या परिप्रेक्षात संपत नसते, संपूर्ण होत नसते. उदा. यमन राग गाणारा गायक त्या रागाचे आकलन, सौंदर्य, आणि स्वरांच्या जाणीवा कलात्मक दृष्टीने स्थळ - काळाच्या सापेक्षते मध्ये सादर करत असतो. पण ही स्वर - जाणीव किंवा अनुभवांची सजगता संपूर्ण कधीच होत नसते. म्हणून तोच गायक किंवा इतर कोणताही गायक हाच राग सादर करताना त्याला आणि श्रोत्यांना येणारा अनुभव नित्य नूतन असतो.
तेव्हा मला म्हणायचं आहे की जाणीव हा एक अनुभवाचा सिद्धांत आहे. स्वत:शी किंवा दुसऱ्यांशी संवाद साधणे, ही मूळ प्रेरणा आहे; किंबहुना ह्या प्रेरणेची जाणीव होणे, हे सजीव असण्याचे अधिष्ठान किंवा स्वसंवेद्य प्रतिपादन आहे. पण हे संवाद साधण्याचे प्रयत्न किंवा प्रयोग.... निराश करणारे आहेत. कारण खूप काही सांगून, लिहून, बोलूनही मला जे सांगायचे आहे, सांगायचे असते.....ते अपूर्ण आहे.....ही जाणीव संजीवन आहे. कालप्रवाहात सतत येणारे अनुभव आणि जाणीवा ह्यांचा प्रवास अनंत आहे, अमर्याद आहे. माझ्या जाणिवांचा प्रवास.....माझी अनुभव घेण्याची क्षमता जितकी मर्यादित आहे, तितका माझा लेखन प्रवास मर्यादित, अपूर्ण असा आहे. त्यामुळे मी असं म्हणतो की माझ्या जाणिवांचा प्रवास सतत विकसित होणारा अनुभव आहे; म्हणूनच तो सदैव अपूर्ण आहे.
************
No comments:
Post a Comment