Sunday, 11 May 2025

घर म्हणजे काय?

 

(१) घराचे माझेपण म्हणजे एका घरात रहाणे, नव्हे.

घराचे घरपण सांभाळणारी माणसं एकत्र रहाणे, म्हणजे घर असते. 

(२)घराला घरपण बाईमुळे येते. ही बाई बायको नसली तरी तिचे घरात वावरणं, घरातली काम करणं, साफसफाई करणे... हे सर्व पुरुषही करू शकतात. पण स्त्रीने हीच केलेली काम त्याच कामात सौन्दर्य निर्मिती करते....तिच्या हाताला आणि तिच्या श्वासोच्छवासातच एक घरपणाचा सुगंध असतो, जो त्या घराचा वास्तुपुरुष जागृत करून त्याच्या जाणिवेच आणि मानवी अस्तित्वाचे कुंजन स्वरमय करून टाकतो.

ह्यामुळे स्त्री म्हणजे घराचे अस्तित्व आहे...तर पुरुष म्हणजे घराचे वास्तव आहे. स्त्री-पुरुष किंवा स्त्री-स्त्री आणि पुरुष-पुरुष ह्यांच्या मैत्र भावात घर हा नातेबंध असतो किंवा अनुबंध असतो...

स्त्रीचे स्त्रीपण किंवा स्त्रीत्व घर ह्या संकल्पनेशिवाय साकार होत नाही.

मानवी उत्क्रांती स्त्रीच्या अस्तित्वामुळे झाली आहे.

 (३) Home is statement of your life.

-Ayan Rand.

       घराला आपण वास्तू पुरुष म्हणतो. घर म्हणजे केवळ राहण्याचे ठिकाण नाही किंवा वस्तू नव्हे. घर म्हणजे एक कुटुंब, एक जीवन घडविणारी वास्तू, एक जीवनप्रवासातील विश्राम धाम, मुलाबाळांची जडणघडण करणारी जननी आणि संस्कारक्षम वसती गृह आहे.

       माझ्या घराची व्यवस्था, निगा आणि सौन्दर्य ही माझ्या मनाच्या व्यवस्थेचं आणि आरोग्याचे सन्निध्यान आहे. घरातील वातावरण, अतिथ्य आणि सहवास-साहचर्य ह्या माझ्या मनाच्या प्रतिमा आहेत,प्रतीक आहेत. मी वागतो कसा, जगतो कसा आणि स्वतःचे व्यवस्थापन कसा करतो, ह्याचे प्रतिबिंब म्हणजे माझे घर आहे.

       घरा बाहेर असणारा मी कुठेही गेलो, तरी माझ्या घराशी मी सदैव एका अनामिक, अलौकिक आणि नि:संदिग्ध नात्याने जोडलेला असतो, निगडीत असतो. कारण तिथे माझेपण, माझेपणाचे अस्तित्व आणि माझे कर्तृत्व संचित झालेले आहे.

        माझ्या जीवनाचे प्रत्येक अंश ह्या घराच्या वास्तव्याने  समृद्ध झालेले आहेत. माझ्या मनाचे, बुद्धीचे कौटुंबिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संविधान माझ्या घराने घडविले आहे. माझ्या शिक्षणाचे आणि कर्तृत्वाचे धडे ह्या घराने साक्षीभावाने पाहिले आहेत. माझी जीवन निष्ठा, प्रामाणिकपणा आणि इतर सर्व सद्गुणांचे संवर्धन ह्या घराने केले आहे.

            माझा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ह्यांना घराचा अवकाश हा संदर्भ आहे. माझे बालपण हा भूतकाळ झाला असला तरी तो ह्या घराच्या कणाकणात वास करून राहिलेला आहे आणि माझी स्वप्ने साकार होताना माझे घर हा माझा साथीदार होता. आजचे वास्तव, वर्तमान हे माझे समर्पण, प्रार्थना, पूजा आणि मांगल्य असून त्यांचे परिशीलन माझे घर हेच आहे.

          ' प्रेमा, काय देऊ तुला? भाग्य दिले तू मला" हेच मी माझ्या घराला म्हणतो. माझे सदभाग्य, दुर्भाग्य, सुखदुःख, संकटे-आपत्ती इ इ सर्वाचा विधाता माझे घर आहे.

 

                      *************

No comments:

Post a Comment