Monday, 6 June 2022

स्त्री आणि पुरुष

 स्त्री - पुरुष संबंध हा एक मानवी उत्क्रांती मधील एक महत्वाचा टप्पा आहे. मुळात हा संबंध नर - मादी असा निर्माण झाला. उत्क्रांतीच्या एका पुढील टप्प्यावर मादीचे सृजनशीलतेचे अंग लक्षात आल्यावर कुटुंब संस्था टोळीच्या स्वरूपातून विकास पावून घर ह्या संस्थेत रुपांतरीत झाली आणि स्त्री - पुरुष हे नाते निर्माण झाले. कुटुंब - घर ह्या संस्था पुढे आणखी विकसित होऊन समाज आणि त्या बरोबर धर्म ही संस्था निर्माण झाली. धर्माचरण म्हणजे एक जीवन पद्धती विकास पावली आणि उत्तरोत्तर धर्माचा प्रभाव वाढत जाऊन राज्य संस्था आणि धर्म ह्यांनी समाज व्यवस्था निर्माण केली. सत्ता संघर्ष, समाज, आणि राजकारण ह्यांच्या गुंतागुंतीतून मानवी जीवन हे एक शैक्षणिक  परिक्षेत्र उदयाला आले. 

                      राज्य संस्था, राजकारण आणि मानवी सत्ताकांक्षा ह्यातून आर्थिक व्यवहार विकसित झाले. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राजकारण ह्यांच्या विकासातून मानवता, साहित्य, कला आणि शिक्षण ह्यांचा प्रचार आणि प्रसार झाला. यंत्र विकासातून आधुनिकता आली आणि आधुनिकता वादातून आजचे स्त्री - पुरुष नाते कुटुंब ह्या परिघासह जागतिकीकरणाच्या प्रवाहात अत्यंत ताणले गेले आहे. हा ताण कुटुंब संस्थेवर इतका पडला आहे की कुटुंब ही संकल्पना क्षीण होऊन...केवळ स्त्री

-पुरुष नात्यांचेच नाहीतर संपूर्ण मानव वंशाचे वस्तूकरण होऊ लागले आहे. युद्ध, हिंसा, सत्ता, आर्थिक प्राबल्य, आणि राजकारण ह्यांच्या संघर्षात माणूस एक वस्तू होऊन गेला आहे. रोबोट आणि माणूस ह्यांतील सीमा रेषा सतत आक्रसत जात चालली आहे. 

                       घर आणि स्त्री -पुरुष ह्यांच्यातील नाते संबंध सैल होत चालले आहे. स्त्री चे पारंपारिक स्थान आणि तिची कौटुंबिक ओळख पुसत चालली आहे. दोघांमधील नैसर्गिक संबंध नात्याच्या परिक्षेत्रात व्यावहारिक होऊन जात आहेत. ह्यातून निर्माण होणाऱ्या विवाह समस्या हे आधुनिक विश्वाचे मानवी जीवनाला आव्हान आहे. घटस्फोट हे विवाहोत्तर वास्तव झाले असून वैवाहिक जीवनाची जोखीम झाली आहे. वैवाहिक जीवन टिकवणे.....हे मानवी स्वभाव आणि नात्यांचे प्रभाव क्षेत्र राहिले नसून आर्थिक आणि व्यावहारिक नात्याचे प्रतिष्ठान झाले आहे. 

                     स्त्रीचे पारंपारिक प्रभाव क्षेत्र घर होते आणि आजही मोठ्या प्रमाणात आहे. पण स्त्रीवाद प्रभावित स्त्रियांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त झाले आहे. कारण पुरुष जितका स्वातंत्र्य आणि अहंकार प्रभावित आहे; तितकीच आजची स्त्री प्रभावित झालेली आहे. प्रत्येकाला आपली स्वतंत्र space म्हणजे अनिर्बंध सत्ता, वर्तणूक आणि स्वातंत्र्य पूर्ण अधिकार हवेत आहेत. पुरुषाच्या जीवाची नाही, पण जीवनाची घर ही एक अस्तित्वपूर्ण संदर्भ चौकट आहे; तर स्त्रीचे स्वत:चे घर हे एक वास्तववादी अस्तित्व आहे. तिचे सुरक्षित वास्तव्य आहे; भावनाशील कर्तृत्व आहे. दोघांचे घर ह्या जाणिवेशी असणारे नाते कुटुंब वत्सल भावनेपेक्षा, संवेदनेपेक्षा अधिक वास्तववादी आहे; आर्थिक आणि व्यावहारिक सोयीचे झाले आहे. 

                        ह्या वस्तुस्थितीमुळे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि कतृत्व क्षेत्र ह्यांतील तणाव वाढले असून स्त्री - पुरुष दोघांच्या वागणुकीच्या आणि वर्तणुकीच्या मर्यादा सभ्य -असभ्य, प्रतिष्ठित - अप्रतिष्ठित, नैतिक -अनैतिक अशा विविध संघर्षात भरडून निघत आहेत. ह्या संघर्षातून घडत जाणारे परिवर्तन काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजे. नवीन जीवन मूल्यांची जडणघडण हे काळाचे आवाहन आणि आव्हान आहे.

                                                                 **************

No comments:

Post a Comment