Tuesday, 3 June 2014

काळाचे परिमाण

                                                             
तू माझी एक भूतकाळातील घटना नाहीस., त्यामुळे तू माझ्या त्यावेळेच्या वर्तमानात स्थिर झालीस आणि मला वाटत, मी पण तुझ्या वर्तमानात कुठेतरी व्यापून राहिलो.
           
                   वर्तमान स्थिर नसतो पण त्याला भविष्य काळाचे वेध असतात. वर्तमानाची गतिशीलता जी भविष्यात वाटचाल करते, तीच आपल्या जीवनाला विकसनशीलतेची परिमाणे उपलब्ध करून देते. पण आपण विकास पावलो का? व्यावहारिक आणि भौतिक दृष्टीने आपला विकास निश्चितपणे झाला आहे. पण हा विकास माझ्या जीवनाच्या परिमाणात मला दिसत नाही, जाणवत नाही. मला वाटत, मी तिथेच आहे, त्याचं भूतकाळात आहे, जिथे तू आणि मी एकमेकांसाठी जगत होतो. आपण आपापसात सामावून गेलेलो होतो. विस्मृतीत घटना जातात, पण नाती व त्यांचे बंध शाश्वतपणे माझ्यात वाहत राहिले आहेत. म्हणून तू माझ्या स्मृतीत, माझ्या जगण्याच्या परिमाणात संथ पणे वाहत राह्यली आहेस.

                  आजच्या वर्तमानात तुला शोधताना मला सतत जाणीव राह्यली आहे...तुझ्या श्वासांची, तुझ्या समजूतदार, प्रेमळ, निष्पाप आणि सुगंधी सहवासाची.....जी आज स्फुरण पावत आहे...तुझे-माझे सहजीवन आज पुन्हा उमलू पहात आहे. त्या उमलण्यात भूतकाळाची सहजता नसणार आहे. पण आपल्या ख-या नात्याच्या सत्यतेची जाणीव फुलणार आहे.
           
                 वास्तवाला बरोबर घेऊन हे सत्य आपल्याला जपायचं आहे, ही तुझी नव्हे, माझी जबाबदारी आहे. हे मला कळतंय. म्हणून मी तुझी वाट पहात बसणे सोडणार नाही....आणि तू कदाचित या जन्मी आली नाहीस तरी पुढच्या जन्म ही मी तुझीच वाट पाहणार आहे....
                                             *************



No comments:

Post a Comment