Monday, 17 February 2020

तडजोड

                                               तडजोड - एक अनिर्वाय जीवनरेखा


तडजोड-१
आमची पिढी बरीचशी एकत्र कुटुंबात वाढली. घरात पाच-सहा माणसं सहज व नेहमी असायची. संकटं, आपत्ती, दु:खं आणि सुखंसुध्दा वाटून घ्यायची. सगळं काही निवारुन नेणारी, पाठबळ देणारी, दिलासा देणारी जेष्ठ, वृध्द, अनुभवी माणसं असायची. अशा वातावरणात मन, बुध्दी आणि माणूसकी ह्यांचा विकास करणारी व संवर्धन करणारी शक्ती वास करीत होती. एकटेपणा, एकाकीपणा सहसा कधी आला नाही. त्यामुळे मला वाटतं, आजच्या पिढीत जो स्वार्थ, अप्पलपोटेपणा, सुडबुध्दी आढळते तीच त्यांना आज समाजात सतत चाललेल्या स्पर्धेला, स्वार्थाला, फसवणूकीला तोंड देण्यास समर्थ बनवित आहे काय? साहजिकच आपणच आपलं कवच होणं, त्यांना आवश्यक झालं आहे काय? पूर्वी नात्या-गोत्यात, जवळचे-शेजार-पाजारचे मध्यस्थी करायचे, सगळ्या बाजू ऐकून एकोपा करत. आजकाल तडजोड, मध्यस्थी करायला कोण करतोय, कुणाला वेळ आहे आणि मी बरा, माझं बरं, अशा मनोवृत्तीच विकसित केल्या जातायत व संवर्धितही केल्या जातायत. कुणाच्या भानगडीत पडू नका, ही शिकवण लहानपणापासून दिली जात आहे. एव्हढेच नव्हे तर हा शिक्षणशास्त्राचा, प्रतिष्ठितपणाचा आणि सुशिक्षितपणाचा तो मानदंड बनला आहे.
      पण तडजोड ह्याचा अर्थ अन्याय निमूटपणे सहन करणे, .असा नव्हे. तडजोड ह्याचा अर्थ आपला अहंकार ओळखणे, आपल्या प्रमाणेच दुस-यालाही अहंकार आहे, ह्याची नोंद घेणे किंवा जाणीव ठेवणे व हा अहंकार दोघांनीही बाजूला ठेवून समस्येवर किंवा अडचणींवर किंवा संबंध तुटण्यापासून, वाचविण्याचा मार्ग काढणे, शोधणे, होय.
परस्परांत प्रेमभाव आणि आदरभाव असला की तडजोड मानहानीकारक नसते. संसार करायचा असेल तर आपला अहंकार, बुद्धिमत्ता, आपला अनेक बाबतीत असणारा मोठेपणा इ सर्व गोष्टी बाजुला ठेवाव्या लागतात.
ह्या संदर्भात, पुलंनी म्हणलं आहे ," ज्या तडजोडीमुळे आपण ज्या जीवन मूल्यांना पवित्र मानून जगत आलो, तीच टाकून द्यावी लागत असतील तर तसली तडजोड करण्यापेक्षा आपल्या मूल्यांना उराशी धरल्यामुळे भोगाव्या लागणा-या यातना अधिक सुखकारक ठरतील."
            पण घटस्फोटाचा निर्णय घेताना कोणती जीवनमूल्ये पवित्र आणि कोणत्या तडजोडी असह्य ह्याचा सखोल धांडोळा घेता आला पाहिजे. कारण विवाह हे बंधन आहे.... जबाबदारीचे, समजूतदारपणाचे, आणि नात्यांची जपणूक करण्याचे....म्हणून असे म्हणतात, परस्परांना असलेलं, पण एकमेकांपासून विलग असे नसलेलं स्वातंत्र्य म्हणजे विवाह हे बंधन आहे. स्त्री-पुरुष शक्तीचा, व्यक्तिमत्वाचा आणि अभिव्यक्तीचा विकास हे विवाह ह्या बंधनाचे सूत्र आहे. एकाचा विकास आणि दुस-याचा ही विकास हे वैवाहिक जीवन प्रणालीचे आदर्श असले तरी ते वास्तववादी नसतात किंवा नाहीत, हे मान्य करून सुद्धा दोघांनाही विवाह हा जीवन धारणेचा विकास करण्यासाठी त्यांचात त्यांनी तडजोड क्षमतेची आवश्यकता आहे, हे मान्य केले पाहिजे. ती नसेल किंवा नसल्यामुळे घटस्फोटांचे वाढते प्रमाण आणि अविवाहित किंवा विवाह वंचित स्त्री-पुरुषांचे प्रमाण वाढत आहे. ह्यातून सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या आणि लोकसंख्येची रचनात्मक बांधणी बिघडतं आहे, असे तज्ञ म्हणतात.
            दुस-याच मन जपण्यासाठी अहंकाराचा बळी द्यावा लागतो, स्वत्वाच समर्पण करावयाचे असते आणि आपलं व्यक्तित्व परिपोक्त (matured) बनवावं लागतं.....हे अत्यंत कठीण आहे, अवघड आहे...त्यासाठी दीर्घकाळ तपस्या करावी लागते, आध्यात्मिक समरसता आचार-विचारांत यावी लागते. आपल्या मनासारखं वागण पण कठीण असतं....कारण अशी मनमानी दुस-यांना असह्य असते. समाजात, कुटुंबात सुखी-समाधानी रहायचे असले तर आपलं मन आणि दुस-याच मन ह्यांचा सम्यक आणि सकारात्मक स्वीकार करता आला पाहिजे.
           असे म्हणतात की निवड करण्याचे स्वातंत्र्य हे लोकशाहीचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे निवडणुकीत मत देताना म्हणजे मी मतदान केलेला उमेदवार मला आवडलेला असतोच असं नाही. कारण आवड ही व्यक्तिगत आणि बरीचशी किंवा बहुतांशी आपली एक प्रकारची मानसिक संवेदना किंवा अभिव्यक्तीची क्षमता असते. निवड करणे, ही बौद्धिक प्रक्रिया आहे, तर आवड ही एक मानसिक प्रक्रिया आहे. ह्या आवडीला बौद्धिक प्रक्रियेची जोड देऊन आपण बरेचशे निर्णय घेत असतो, असे मला वाटते.
           आयुष्यात म्हणण्यापेक्षा ज्याला आपलं जीवन घडवायचे आहे, त्याला किंवा तिला अनेक गोष्टींशी तडजोड करून, आपल्या आवडी-निवडींशी सांगड घालावी लागते, तरच संसाराची गाडी चालते आणि कालांतराने अवघा संसार, कुटुंब आणि कुटुंब संस्था विकसित होण्यास मदत होत असते.
१९९० नंतर असं म्हणतात की जागतिकीकरणाचे Globalization वारे आपल्या देशात वाहू लागले. त्याचबरोबर आधुनिक जीवन मूल्यांचे आव्हान तरुण पिढी पुढे उभे राहिले.
             ही आधुनिक मुल्ये कोणती? स्वयं किंवा स्व केन्द्रित तत्वे. त्यामध्ये स्त्रीवाद feminism आणि कुटुंब संस्था ह्या जीवन मूल्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. स्त्री-पुरुष समानता आणि कौटुंबिक असहिष्णुता...ही दोन तत्वे आत्यंतिक वादग्रस्त झाली आहेत. आधुनिक पोशाख आणि आधुनिक खाण्या-पिण्याच्या पद्धती व समजुती आणि पारंपारिक नैतिक संकेत ह्यांचा संघर्ष जुन्या म्हणजे फार जुन्या नव्हे, तर मागच्या पिढीशी, आई-वडील ह्या पिढीशी टोकाचे होत असताना दिसत आहेत. मुळात अनैतिक कशाला म्हणायचे, हाच संघर्षाचा केंद्र बिंदू झाला आहे. कायदा आणि राजकीय वातावरण आधुनिक मूल्यांना जवळ करू पहात आहे. ह्यातून आधुनिक आणि पारंपारिक मूल्यांची वैचारिक, तात्विक आणि आचरणात्मक घुसळण होत आहे.
            राजकीय आणि सामाजिक समस्या आणि वातावरण ह्यामुळे तरुण पिढीला असुरक्षितता वाटू लागली आहे. आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य ह्यांच्या संकल्पना संकुचित झाल्या आहेत. मला माझी space हवी आहे, ही हाकाटी, हेच दर्शविते आहे. एकटेपणा हवा आहे. कारण आर्थिक व व्यक्तिभूत अस्तित्वाचे प्रश्न निकरावर आले आहेत. तरुण पिढीला हे प्रश्न सोडविण्यासाठी कालची पिढी निरुपयोगी आहे, ही समजूत अगदी चूक नसली तरी ही समजूत एकांगी आणि परिपक्व नाहीयेय. कालची पिढी आमचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यास असमर्थ आहे, ही समजूत जेव्हढी घट्ट होत जाईल, तेव्हढे कौटुंबिक नाते आणि इतर नाती केवळ औपचारिक होत जातील, हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे.
            ह्या सर्व परिस्थितीचा परिपाक अर्थवाद बळकट होण्यात झालेला आहे. आयुष्याची क्षण भंगुरता एका टोकाला आहे, तर दुस-या टोकाला चंगळवाद आहे. ह्या दोन टोकांमध्ये तरुण पिढीची होणारी ओढाताण आणि त्यामुळे येणारे मानसिक अस्वास्थ्य....हा आज न दिसणारा प्रश्न उद्या उग्र स्वरुपात पुढे येणार आहे. ह्यातून कौटुंबिक जीवनाला आवश्यक असणारी जबाबदारी टाळण्याची वृत्ती तरुण पिढीमध्ये प्रकर्षाने दिसू लागली आहे. विवाह हा कौटुंबिक जीवनाचा पाया आहे आणि ती जबाबदारी आहे, ह्याची जाणीव आजच्या पिढीला नकोशी झाली आहे. मग आर्थिक सुरक्षा आणि तद्संबंधित अपेक्षा करणे, हे सुरक्षा कवच आहे, असे विशेषत: मुलींना वाटू लागले आहे. मुलांच्या क्षमता आर्थिक निकषांवर मोजणे, मुलींना आवश्यक वाटू लागले आहे.
थोडक्यात, आजच्या परिस्थितीची आव्हाने पेलण्याची क्षमता आणि धाडस तरुण पिढीत कमी पडत आहे, असं मला वाटते.              
          ह्या संदर्भात, हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्यामध्ये स्वार्थ, परमार्थ आणि नि:स्वार्थ एकाच वेळी वास्तव करून असतात.पण ह्यातील स्वार्थ ही प्रेरणा आदि मानवापासून असलेली मूलभूत धारणा इतर प्रेरणांवर कशी मात करत असते, हा अभ्यासाचा विषय असून मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा संशोधनात्मक विचाराचा पाया आहे. अनेकदा आपली कृती किंवा आपला कृतिशील विचार नेमका स्वार्थी आहे की इतर काही आहे, ह्यामध्ये आपण गोंधळून जातो. तरीही आपल्याला एक नक्की कळत असते...स्वार्थ प्रेयस असला तरी श्रेयस नाही. आपण व्यक्ती म्हणून हे स्वीकारून ह्या मूल्याचा योग्य तेव्हढा अंगिकारही करीत असतो.तरीही आपण समूहात असताना मात्र ह्या मूल्याशी तडजोड करत असतो. कारण समुदायाचे /समूहाचे मानसशास्त्र आपल्या व्यक्ती मनावर वर्चस्व गाजवित असते. व्यक्ती म्हणून आदरणीय,श्रेष्ठ आणि आदर्श वाटणारी अनेक माणसे समाजात, समूहात मात्र जेव्हा वेगळी वागताना अनुभवाला येतात, तेव्हां आपला भ्रम निरास होऊ लागतो किंवा आपण गोंधळून जातो.
          व्यक्ती म्हणून जो नि:स्वार्थ तो समूहाचा स्वार्थीपणा इतका असतो की तो समूह अमानवी, अमानुष वर्तन करताना दिसतो. दंगली,हत्याकांड,अतिरेकी हिंसक कृत्ये ह्यातील एकेक व्यक्ती जर नीट अभ्यासली तर मात्र ती तशी हिंसक प्रवृत्तीची नाही, असे अनुभवाला येते. त्यामुळे शासकीय धोरणे, कायदा, सामाजिक /राजकीय किंवा कामगार चळवळ चालविताना आणि ह्या चळवळींचे व्यवस्थापन करताना नेते लोकांची,शासकीय अधिका-यांची, आणि न्यायाधीशांची कसोटी,सत्व परीक्षा असते. समोर आलेल्या माणसाला व्यक्ती म्हणून वागवायचे की समूहवादी व्यक्ती म्हणून तिला हाताळावे?....?                   
        दुसरे असे की आपल्या हवे-नको पणाशी आपले आयुष्य बांधलेले असते. त्यापलीकडे एक जीवनाची कृतार्थता असते. आयुष्य म्हणजे जगण्याची एक प्रक्रिया आहे आणि ती आपण वैयक्तिक स्तरावर अनुभवीत असतो. जीवन ही गोष्ट आपण एकाच वेळेला वैयक्तिक आणि वैश्विक स्तरावर अनुभवीत असतो. अशा जीवनाचे मूल्यमापन करताना आपल्या वैयक्तिक अनुभवांना फारशी किंमत नसते.....आपण मानवी जीवनधारा कशाप्रकारे हाताळत असतो.....हा माझ्या चिंतनाचा विषय आहे. ह्या दृष्टीकोनातून जीवनातील श्रेयस ही अनुभूती आपण समष्टी स्तरावर अवलोकित करीत असतो, तर प्रेयस आपण यष्टी स्तरावर अनुभवीत असतो. जीवनाचे अवलोकन आणि मूल्यमापन कसे करावे आणि तसे करीत असताना तडजोड करणे, हा एक वेदनादायक क्लेश आहे.... त्याची व्याप्ती आणि अपरिहार्यता समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो, तर कर्तव्य आणि जबाबदारी हा एक आपला जीवन-यज्ञाचा भाग आहे, हे समजून घेऊन कर्तव्य कर्म करीत रहायचे असते.
        आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही. हाच तर श्रेयस आणि प्रेयस मधला संघर्ष आहे.त्यामध्ये प्रेयस बळी जाते अन मग उरते श्रेयस्कर विवंचना... जगत राहण्याची.... कर्तव्याच्या वेदीवर.
        पण हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की तत्व आणि आदर्श कधीच पराभूत होत नसतात. त्यांचा पाठपुरावा करण्यात आपण कमी पडतो, म्हणून आपण पराभूत होत असतो. ध्येय आणि तत्व ह्यापासून आपण ढळलो की आपण तडजोडवादी नवी मांडणी करू लागतो.
        ह्या दृष्टीने आपल्याला हे समजून घ्यायला हवे की वस्तुस्थिती आणि परिस्थिती ह्या मध्ये काय फरक आहे? परिस्थिती माणसाला वेढून टाकते. म्हणून तो परिस्थितीशी झगडत असतो किंवा तडजोड करतो किंवा बळी पडतो. माणूस वस्तुस्थितीला आपणहून वेढून घेत असतो. त्यामुळे तो वस्तुस्थितीचा अलिप्तपणे विचार करू शकतो. वस्तुस्थितीचा अभ्यास करून तो निर्णय घेऊ शकतो, तिच्यात उतरायचं की नाही, ह्याचा निर्णय घेऊ शकतो. परिस्थिती मात्र त्याला व्याप्त करून टाकत असल्याने त्याला परिस्थितीचा अभ्यास करूनही तिच्यात उतरणे किंवा न उतरणे हा पर्याय नसतो.
         माणसाची वस्तुस्थिती हा भवताल आहे, तर परिस्थिती हा त्याच्या शारीरिक-मानसिक स्थितीचा परिपाक आहे. परिस्थिती संचित-प्रारब्ध-नियती ह्यांच्या अधीन असते. वस्तुस्थिती व्यक्तीनिष्ठ नसते. ती भवताल सापेक्ष असते. माणसाचं जगण परिस्थिती घडवत असते; पण जीवन मात्र ह्या दोन्हींच्या साकल्याने घडत असतं.
         दुस-याच मन जपण्यासाठी अहंकाराचा बळी द्यावा लागतो, स्वत्वाच समर्पण करावयाचे असते आणि आपलं व्यक्तित्व परिपोक्त (matured) बनवावं लागतं.....हे अत्यंत कठीण आहे, अवघड आहे...त्यासाठी दीर्घकाळ तपस्या करावी लागते, आध्यात्मिक समरसता आचार-विचारांत यावी लागते. आपल्या मनासारखं वागण पण कठीण असतं....कारण अशी मनमानी दुस-यांना असह्य असते. समाजात, कुटुंबात सुखी-समाधानी रहायचे असले तर आपलं मन आणि दुस-याच मन ह्यांचा सम्यक आणि सकारात्मक स्वीकार करता आला पाहिजे.
          कर्तव्य आणि कर्तृत्व हे दोन्ही शब्द नसून संकल्पना आहेत. ह्या दोन्हींत कर म्हणजे कर्म ही संकल्पना अनुस्युत, समाविष्ट आहे.
कर्म म्हणजे काय आणि त्या संदर्भात कर्तव्य काय, ह्याची मीमांसा भगवत गीतेत भगवंतांनी अर्जुनाला विषाद योगापासून मोक्ष संन्यास योगापर्यंत सांगितली आहे. कर्माच्या संदर्भात कर्तृत्व म्हणजे काय, ह्याची चर्चा अहंकार, मी-पणा-माझेपण, स्वार्थ, स्वाभिमान आणि अस्मिता ह्या अनुषंगाने केली आहे.
कर्तव्य हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते प्रेयस म्हणजे प्राप्त परिस्थितीत श्रेयस नसले तरी मानवी जीवनाचे मूल्य आहे. व्यक्ती म्हणून आपल्याला अनेक समस्या असतात, कारण जगणे ही एक तडजोड आहे. ह्या स्तरावरील जीवन हे व्यष्टी म्हणून असते. त्या मध्ये अंतर्भूत असणा-या सर्व गोष्टी ह्या नैसर्गिक असतात. ह्या दृष्टीने, मानवी नाती फक्त दोनच...नर आणि मादी. हे एकमेव आणि खरे नैसर्गिक नाते आहे. ह्या नात्यातून निर्माण होणारे प्रजनन आणि नर-मादी ह्यांच्यात नैसर्गिक नाते नाही. कारण कुटुंब ही एक मूलत: व्यवस्था आहे. प्राचीन मानव एकटाच गुहेत रहात होता. त्याला आपल्या स्वत:च्या व आपण मिळविलेल्या उपजीविकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टोळी करून राहण योग्य वाटू लागलं. इथेच त्याला प्रथम स्वार्थी प्रवृत्तीशी पहिली तडजोड करावी लागली. मिळालेली शिकार, उपजीविका टोळीमध्ये वाटून घ्यावी लागली. राहण्याची जागा, खाणे-पिणे इ प्राथमिक आणि मुलभूत गरजा ह्या टोळीच्या जबाबदा-या झाल्या आणि येथून एक प्रकारची व्यवस्था निर्माण झाली. ह्या व्यवस्थेचा एक भाग टोळी प्रमुख...मग त्याची योग्यता, श्रेष्ठत्व, अधिकार हे एक शास्त्र म्हणजे व्यवस्थापन निर्माण झाले. त्यातून टोळी प्रमुखाचे अधिकार, हक्क ह्या बरोबरच त्याची कर्तव्ये हे व्यवस्थापनेचे एक सूत्र तयार झाले. थोडक्यात, जिथे अधिकार, हक्क निर्माण झाले त्याबरोबरच कर्तव्ये निर्माण झाली. अधिकार हा कर्तव्याचा आणि कर्तव्य हा अधिकाराचा एक अविभाज्य असा जोड तयार झाला.
            अशा प्रकारे, कर्तव्य ह्या संकल्पनेचा उगम झाला. कारण ती समूहाची, टोळीची व्यवस्था होती. ह्यातूनच मानव उत्क्रांत होऊन कुटुंब आणि समाज ह्या व्यवस्था विकसित पावल्या. म्हणजेच असं की कुटुंब ही गोष्ट गरज म्हणून निर्माण झाली व ती कृत्रिम होती. कारण ती मादी-पुरुष ह्या नैसर्गिक नात्यातून होणारे प्रजनन.... ह्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्था म्हणून  कुटुंब ही संस्था निर्माण झाली. मानवी हस्तक्षेपामुळे तयार झालेली ही एक व्यवस्था होती आणि आजच्या काळात तिला तडे जात असले तरी ही व्यवस्था टिकून आहे..... कालक्रमा मध्ये नंतर राज्य, राजा,प्रजा इ संकल्पना विकसित होऊन नवनव्या व्यवस्था निर्माण झाल्या. ह्या व्यवस्था म्हणजे जगण्याच्या गरजा बनल्या... ह्या गरजांतून अधिक गरजा निर्माण झाल्या......ह्या गरजांच्या पूर्ततेसाठी मानवाला विचार करण्याची गरज निर्माण झाली आणि ह्यातून बुद्धी ही संकल्पना निर्माण झाली. ह्याची जाणीव माणसाला होऊ लागली आणि मग बुद्धी विकासातून निरनिराळी अवजारे तयार करणे असे शोध माणूस घेऊ लागला. बुद्धीची जाणीव हा सर्वात मोठा उत्क्रांतीचा टप्पा होय.
           पण बुद्धीचे प्रमाण सर्व माणसांच्यात एक सारखे नव्हते आणि नाही. कारण कोणीतरी एक माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शोध लावीत होता,  शारीरिक व बुद्धी बळाचा वापर करून टोळी प्रमुख, कुटुंब प्रमुख, राज्य प्रमुख बनत होता. म्हणजेच अधिकार आणि हक्क प्रस्थापित करीत होता......थोडक्यात, व्यक्ती महत्वाची आहे. त्याने मिळविलेले यश, शोध, प्रमुखत्व हे त्याचे कर्तृत्व आहे, हे त्याच्या कर्माचे वैयक्तिक समाधान आहे, यश आहे. ह्याची जाणीव निर्माण झाली. म्हणजेच असं की प्रथम अधिकार, हक्क ही संकल्पना आली आणि तिचाच व्यत्यास किंवा पूरक म्हणून कर्तव्य ही संकल्पना विकसित झाली.
          अशा प्रकारे, हक्क आणि कर्तव्य ह्या दोन्ही भावना नैसर्गिकतेच्या जवळ जाणा-या संकल्पना आहेत, कारण त्या समूहाच्या, कुटुंबाच्या संकल्पनेतून निर्माण झाल्या आहेत. पण कर्तृत्व ही संकल्पना मात्र बुद्धीचे किंवा शक्तीचे व्यक्तीगामी प्राबल्य, त्या व्यक्तीला मिळणारे हक्क, अधिकार ह्यामुळे मिर्माण झालेली संपदा आहे. कर्तृत्व हे व्यक्ती केंद्रित असल्यामुळे त्यांतूनच स्वामित्व, स्वाभिमान, स्वार्थ आणि अहंकार ह्या धारणा विकसित झाल्या आहेत.
आजच्या आधुनिक काळात, अधिकार आणि हक्क परंपरेने आणि कायदयाने प्रमाणित standardized  झाले आहेत. बरेचशे परंपरागत अधिकार-हक्क कायदयाच्या सहाय्याने संकुचित होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती विकास, नीती-नैतिकता, सामाजिक आणि माणुसकीच्या जाणीवा इ अनेक संकल्पना टोकदार आणि जगण्यापेक्षा अधिक मूल्यवान झाल्या आहेत. हे वास्तवतेचे विस्तीर्ण असे अवकाश तयार झाले आहे आणि त्यातून निघणारे अस्तित्वाचे हुंकार मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध बनवित आहेत.
ह्यावरून असे दिसते की कर्तव्य हे मानवी जीवनाचे संविधान आहे किंबहुना माणसाची कर्तव्याशी असलेली बांधिलकी ही त्याच्या अस्तित्व ह्या प्रकृतीशी घटनात्मक आहे. Duty is a constitution of human mind.... Wherever man goes, he creates a civilization along with woman as his second being.... Not as first being! There is no either historical, mythological or even psychological evidence to show that two women created civilization. In fact, there is evidence in history that when there were two women, they sought a man to create family which subsequently became society and then a civilization.
                        ************
                        तडजोड -२
               श्वास ही सजीवांच्या अस्तित्ववादाची भौतिक अभिव्यक्ती आहे. ती प्रेम-विरह इत्यादी सर्व द्वंद्व पार करून जगत असते. सजीवतेची अभिव्यक्ती जेव्हा व्यक्त होवु लागली, तेव्हां द्वंद्वात्मक आविष्कार होऊन मानवी मनाचे प्राबल्य व मानसिकता ह्यातून संस्कृतीची वाटचाल निर्माण झाली.
मानवी मन हे मुख्यतः भूतकाळात म्हणजे आठवणीत सहज रमते, कारण मग त्या जीवाला त्या आठवणींना घेऊन भविष्यकाळाचे पंख देता येतात. भूतकाळातील सत्य हे अर्धसत्य आणि असत्य अशा दोन पंखांवर वर्तमानाचे जगणे सुसह्य करण्यासाठी उपयुक्त होते. पण ख-या वर्तमानाची जाणीव होताच ही माणसं कावरीबावरी होतात आणि आपल्या मानसिक व्यवस्थेशी तडजोड करून जगू लागतात, एक नि:श्वास टाकून पुन्हा श्वास घेतात व जीवनाचे अनुबंध पुनश्च जुळवून घेतात.
           बहिणाबाईंनी, त्या काळा मध्ये, स्वतः अशिक्षित असून सुद्धा म्हणलं आहे, " अरे, संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर". आता स्त्रिया सुशिक्षित झाल्या आहेत. ज्ञानार्जन, अर्थाजन करून ब-याच मोठ्या प्रमाणात मुक्त झाल्या आहेत. संसाराची दोन्ही चाके खर तर अधिक सक्षम झाली आहेत. तरी समस्या बिकट होत आहेत! असं का होत आहे?
बहिणाबाईच्या कवितेचा अभ्यास केला तर हे लक्षात येते की स्त्री-पुरुष दोघांचाही अहंकार आधुनिक काळात अधिक टोकदार झाला आहे आणि मग हाताला चटके न लागता, भाकरी मात्र पाहिजे,  ह्या अपेक्षेमुळे संसार भौतिक दृष्टीने सुखाचा आहे, पण मानसिक समस्यांचा अधिक झाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या फाजील आकांक्षा जीवन / कुटुंब अस्तित्वाच्या मुळावरच आघात करू लागल्या आहेत, असं मला वाटतं.
              सुखी संसाराच्या अनेक सूत्रांतील एक सूत्र तडजोड करणे, हे होय. मग ती तडजोड माणसांशी असते, परिस्थितीशी असते आणि स्वतःशी, आपला अहंकार, दुराग्रह,तथाकथित बौद्धिक मोठेपणा इ इ अनेक गोष्टींशी तडजोड संसारातच नव्हे तर जगातील सर्वच घटकांशी करावी लागते. जे अशा तडजोडी न करता जीवन घडवितात, ते विवेकानंद, महात्माजी, आदी थोर लोकोत्तर महान विभूती होतात.
             पण तडजोड, चर्चा कशासाठी करायची? एकामेकांना समजून घेण्यासाठी की एकमेकांचे विचार समजून घेण्यासाठी? जिथे मनमोकळी चर्चा होत असते, तिथे नेहमी देवाण-घेवाण म्हणजे तडजोडी होत असतात आणि त्या होत नसतील तर चर्चा कशाला? पती-पत्नी ह्या नात्यात विचारांपेक्षा व्यक्ती समजून घेणे आवश्यक असते. कारण वैचारिक मतभेद असणे, हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे....पण व्यक्ती म्हणजे तिचे केवळ विचार नव्हे. व्यक्तीला समग्र समजून घेणे आवश्यक असते आणि त्या साठी नुसती वैचारिक तडजोड नाही तर शारीरिक,मानसिक, बौद्धिक अशा अनेक तडजोडी करावयाच्या असतात, तरच संसार, यशस्वी म्हणाला नाहीतरी, टिकून राहू शकतो......व्यक्ती विकास मोठा, श्रेष्ठ आणि अत्यावश्यक की कुटुंब टिकविणे, कुटुंब ह्या संस्थेचे सातत्य टिकविणे श्रेष्ठ?....समाज स्वास्थ्य हे कौटुंबिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. कुटुंब ही संस्था मोडकळीस येणे किंवा कोलमडून पडणे म्हणजे व्यक्ती विकास नव्हे. अशा कुटुंब संस्था खच्चीकरणातूनच मानसिक अनारोग्य, समाज विघातक प्रवृत्ती निर्माण होतात. अमेरिका आणि इतर अनेक युरोपियन आर्थिक संपन्न देशांतील कुटुंब संस्था खूप कमकुवत झाल्यामुळे तिथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आर्थिक विवंचना नाहीत, पण मानसिक समाधान नाही, अशी परिस्थिती अनेक देशांत आहे. तडजोडी करणे हा समग्र एकरूप होण्याचा किंवा समग्रतेने समजून घेण्याचा अनिवार्य भाग आहे. बहिणाबाईच्या कवितांचा हाच मुलभूत गाभा आहे, असं मला वाटतं.
            प्रेम ह्या जीवन मूल्याच्या विरोधात अर्चि-परचा ह्यांचा जीव घेतला जातो, हे मंजुनाथने वास्तव आहे, म्हणून पूढे आणलं आहे. जुन्या चित्रपटांप्रमाणे अर्चिचा संघर्ष यशस्वी होतो, हे दिग्दर्शित केलं असतं, तर समाज परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असते. कला-गुणांशी,सत्याशी कदाचित तडजोड झाली असती. पण एका चांगल्या मूल्याचा गौरव झाला असता, असं मला ह्या निमित्ताने मांडावस वाटतं.
                     ***********












Monday, 16 September 2019

जगणे आणि जीवन


                
मानवी आयुष्य हा एक संग्रह आहे. ह्यामध्ये दोन घटक आहेत. एक आहे जगणे आणि दुसरा घटक आहे, जीवन. जगणे, ही प्रक्रिया आहे तर जीवन घडविले जाते. त्यावरून जीवनवाद म्हणजे व्यक्तीच्या चारित्र्याची वैचारिक, सैद्धांतिक, मानसिक आणि वास्तविक प्रणाली किंवा मांडणी आहे.
              जगणे आणि जीवन ह्या दोन्ही स्वरुपात आयुष्य सरत असतं. पण जगण्यामध्ये असणारी आयुष्याची जडण-घडण हा नैसर्गिक आणि वास्तव अशा गोष्टींचा संग्रह असतो; तर जीवन हे आयुष्यातील अटळ-अनिवार्य अशा घटकांचे संकलन असते. म्हणजेच असं की जगणे हा आयुष्याच्या प्रक्रियेमधून निर्माण होणारा संग्रह आहे तर जीवन हे संकलन आहे. संग्रह ही केवळ साठवण आहे तर संकलन हे संस्कार संपन्न संपादन आहे.
               माणसाच्या चारित्र्याला जगण्याचा परिप्रेक्ष (perspective) असतो; तर जीवनाला चरित्र (इतिहास) आणि चारित्र्य (चरित्रात्मक संस्कार)  ह्या दोन्हींचा संदर्भ आणि परिप्रेक्ष असतो. चरित्र हे घटनांशी बद्ध असते, तर चारित्र्य हे घटनांचे मनावर झालेल्या संस्कारांवर बद्ध असते. उदा. गांधीजींच्या आयुष्यातील दक्षिण ऑफ्रिकेतील घटना हा त्यांच्या चरित्राचा भाग आहे, तर त्या घटनांनी त्यांच्या आयुष्यावर झालेले परिणाम हा त्यांच्या चारित्र्याचा भाग आहे. चरित्र हा आयुष्याचा अनिवार्य आणि अटळ असा घटनात्मक भाग आहे, तर चारित्र्य हा आयुष्य घडविताना झालेल्या संस्कारांचा भाग आहे. म्हणून असे म्हणतात की मानवी जीवनाच्या संदर्भात व्यक्तीचे आयुष्य किंवा जगणे हा महत्वाचा किंवा नोंद घ्यावा, असा संदर्भ नाही; पण व्यक्तीच्या जीवनाचा संदर्भ निश्चितपणे मानवी इतिहासाच्या व संस्कृतीच्या आविष्काराला आवश्यक असा घटक असतो. उदा. श्रीकृष्ण ह्या व्यक्तीच्या जीवनाचा संदर्भच नव्हे मानवी जीवनाचा संपूर्ण परिप्रेक्ष श्रीकृष्ण ह्या अभिव्यक्तीने व्यापून टाकलेला आहे. म्हणून असे म्हणतात की जगण्याला व्यक्ती संदर्भ आहे, तर जीवनाला अभिव्यक्ती हा संदर्भ व परिप्रेक्ष आहे.
          मानवी आयुष्याचा अत्यंत मौलिक आणि महत्वाचा घटक आहे, शिक्षण. असं म्हणतात की जगण्यात जर शैक्षणिक मूल्य असेल, तर ते जीवन घडविण्याचे सूत्र असते. ह्याचे कारण मानव हा केवळ प्राणी नसून तो सतत सातत्याने जे पहात जातो, अनुभवत जातो; त्या प्रत्येक अनुभवाचा, घटनेचा एक स्मृतिकोष त्याच्या आयुष्याचा अनिवार्य व अटळ असा भाग बनून जातो. त्यातून जी बौद्धिक आणि मानसिक प्रक्रिया घडते, ती म्हणजेच संस्कार किंवा शिक्षण होय.
         शिक्षण आणि संस्कार ह्यांच्यात मुलभूत भेद हा आहे की संस्कार हे घडत जात असतात. कारण मानवी मनाच्या व बुद्धीच्या प्रक्रियेचे संस्कार हे अनुस्यूत असे अंग आहे, आणि हे अनौपचारिक (informal) आहे. शिक्षण ही सुद्धा मानसिक आणि बौद्धिक प्रक्रिया आहे, पण ती औपचारिक (formal) आहे.  ह्याशिवाय, शिक्षण हा संस्कारपूर्ण मानवी अविष्कार आहे, असं म्हणतात, ते अर्थपूर्ण आहे. कारण शिक्षणात जितकी अनौपचारिकता असेल, तितके असे शिक्षण अधिक अर्थपूर्ण, सदृढ व संपन्न असते. ज्या काळात शिक्षण हे शाळांतर्गत नव्हते; व्यक्तीभूत किंवा वैयक्तिक पातळीवर दिले जात असे; तेव्हा त्या शिक्षणाला शिकवणी म्हणले जायचे आणि त्यातून गुरु-शिष्य असे नाते व शैक्षणिक परंपरा निर्माण झालेली होती. अजूनही असे प्रयोग काही ठिकाणी होत आहेत आणि ते अत्यंत महत्वाचे आणि मौलिक आहेत.
                 ***********

Monday, 27 August 2018

आपण आणि विश्व

                      आपला भवताल विश्वाचा एक छोटासा भाग आहे, विभाग नाही. विश्व रचना पृथ्वीसह सूर्यमाला,आकाशगंगा, कृष्ण विवरे इत्यादींनी बनली आहे. विश्व हा एक महाविस्तृत पटल आहे, आलेख आहे. ह्या आलेखावर असंख्य अक्ष आहेत. जे एकामेकांना छेद देत असतात. ह्यातील दोन अक्षांचा विचार आपण करूया.
                    हे दोन अक्ष आहेत, अवकाश आणि काळ. आपल्या आयुष्यात घडणा-या घटना म्हणजे आपली कर्म आहेत. तर जगात घडणा-या घटना ही जगाची कर्म आहेत. ही दोन्ही कर्मे काळाच्या प्रवाहात घडत असतात.  ह्या घडणा-या दोन घटना म्हणजे अवकाश आणि काळ ह्यांच्या अक्षावर वाटचाल करणारी जगरहाटी आहे.  ह्या जगरहाटीचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि जीवनावरही परिणाम घडत असतो. हे दोन अक्ष ज्या बिंदूवर एकामेकांना छेडतात, त्या बिंदूवर परिणाम उद्भवत असतो. दोन अक्षावर वाटचाल करणा-या घटना आपल्या व्यष्टीशी अनुकूल किंवा सुसंगत असतील, तर घडणारे परिणामही चांगले असतात. पण ते तर विसंगत किंवा प्रतिकूल असतील, तर परिणामही वाईट किंवा ते दुष्परिणाम आहेत, असं आपण म्हणतो.
                     थोडक्यात असे की अवकाश आणि काळ ह्या अक्षांचा छेदन बिंदू आपल्या आयुष्यावर परिणाम घडवीत असतो. म्हणजेच असे की घडणारा परिणाम हा विश्व कर्म आणि आपले कर्म ह्यांचा साकल्यपूर्ण  किंवा संकीर्ण परिणाम असतो. आपल्या आयुष्याची जडणघडण अवकाश आणि काळ ह्यांच्या अक्षांवर घडत असते. प्रत्यक्ष भोगावे लागणारे परिणाम किंवा फळ हा जग आणि आपण ह्यांच्या कर्माचा विपाक असतो आणि तो म्हणजे अवकाश व काळ ह्यांचा छेदन बिंदू असतो.
                     आपले आयुष्य विश्वापासून अलग किंवा पृथक नसून विश्व रचनेतील एक परिणामकारक घटना आहे. म्हणून असं म्हणतात की मानवी जीवनामध्ये  घडणा-या प्रत्येक किंवा संकीर्ण घटनांचा संबंध व नाते विश्वात्मक आहे. सूर्यावर घडणा-या घटना, ग्रह-तारे ह्यांच्या गतीमध्ये व स्थानांमध्ये घडणारे बदल अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यावर परिणाम घडवीत असतात. उदा. प्रदूषण ही समस्या. जंगले, वृक्ष वनराजी, ऋतू, आणि आपले आरोग्य ह्यांचा निकटचा संबंध आहे, हेच प्रदूषण ह्या समस्येने अधोरेखित केले आहे. दुस-या टोकावर आपले ज्योतिष किंवा भविष्य शास्त्र आहे, ज्या मध्ये ग्रहांची स्थाने, गती, दशा इत्यांदिंचा सखोल विचार झालेला आहे. पण तो अपूर्ण आहे. शिवाय निष्कर्ष पद्धती अवैज्ञानिक आहेत. कारण वैज्ञानिक पद्धतीने, सूत्रबद्ध संशोधन ह्या शास्त्रांचे झालेले नाही. त्यामुळे त्यांची भाकिते किंवा निष्कर्ष सत्य असतातच, असे नाही आणि ह्यामुळे ह्या शास्त्रांचे महत्व त्यामुळे कमी नव्हे तर विश्वास ठेवण्या इतपत नाही. हे मान्य केलेच पाहिजे. दुसरे असे की वैद्यक शास्त्रात सुद्धा डॉक्टर जितका निष्णात, तितके त्याचे रोगनिदान अचूक असते. डॉक्टरचे रोगनिदान चुकले म्हणून वैद्यक शास्त्र खोटे किंवा चूक ठरत नसते. त्याचप्रमाणे, ज्योतिष शास्त्रज्ञ जेव्हढा निष्णात, तितके त्याने वर्तविलेले भविष्य, विशिष्ट घटने आणि काळा संदर्भात तेवढ्यापुरते सत्य असते, तेव्हढ्याच चौकटीत खरे असते.

पारंपारिक विचार आणि बुद्धिवाद

परंपरा म्हणजे काय, हा प्रश्न प्रथम समजून घेण्यासारखा आहे. प्रत्येक माणूस हा आपल्या बरोबर जन्मत:च अनुवांशिक hereditary गुण-दुर्गुण घेऊन जन्माला येत असतो. हे वैज्ञानिक सत्य आहे. ही अनुवंशिकता ह्यालाच अध्यात्मामध्ये आधिभौतिक म्हणतात, असं माझं मत आहे.
                दुसरा भाग म्हणजे जन्मत:च फ्राईडच्या मानसशास्त्रानुसार प्राणिजात उत्क्रांतीचे अंश आपल्या बरोबर घेऊन जन्माला येत असतात.
               तिसरा भाग म्हणजे ह्या वरील दोन्ही भागांचे एकत्रित असे अनेक समूह आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या म्हणजे मेंदूच्या रचनेत समाविष्ट होऊन आपण जन्म घेत असतो.
                ह्या तिन्ही भागांचा मिळून जो कोष तयार होत असतो, त्याला स्मृतिकोष म्हणतात. स्मृतिकोष हा सतत, सातत्याने आणि सदैव जागृत असतो. झोप-निद्रा, बेशुद्ध आणि कोमा ह्या तिन्ही अवस्थेत वेगवेगळ्या पातळ्यांवर हा कोष अस्तित्वात रहात असतो.
                परंपरा म्हणजे ह्या दृष्टीकोनातून स्मृतिकोष हा एक वैचारिक, तात्त्विक, तर्कनिष्ठ आणि संवयीचा असा भाग आहे. म्हणजे असं की आपल्या धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आणि पिढ्यानपिढ्या संस्कारित असा एक भाग आहे. ह्याच्यावरून आपले व्यक्तिनिष्ठ, व्यष्टीधारक आणि अत्यंत सूक्ष्म असे एक व्यक्तित्व विकसित होत असते. तसेच, आपले कौटुंबिक, सामाजिक, समूहवाचक, आर्थिक, राजकीय आणि समष्टीधारक व्यक्तिमत्व विकास पावत असते.
                   ह्यावरून असे दिसते की पारंपारिक विचारसरणीवर मुख्यत: प्रभाव,  पिढीजात संस्कार व सामाजिक विचारांचे असतो.  पिढीजात संस्कार म्हणजे पारदर्शीपणे जाणवणारे आई-वडील व इतर नातेवाईक. ह्यांचे आचार-विचार विश्व होय. ह्या पारदर्शी विचारसरणीच्या साकल्याने आपलाही एक वैचारिक गाभा तयार होत असतो. पण व्यक्ती पातळीवर प्रत्येक व्यक्तीवर आधुनिक विचारसरणी, शिक्षण, मित्रमंडळ, समाज, राजकारण, आर्थिक क्षमता इत्यांदिंचा प्रभाव अधिक मोठ्या प्रमाणात पडत असतो. त्यामुळे व्यक्तिमत्व तयार होत असते. अशा प्रकारे आपल्या बाह्य भवतालाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव  आपल्या व्यक्तिमत्व विकास क्षमतेवर होत असतो. तदनुसार, काहींचे व्यक्तिमत्व बाह्य संस्कारित अधिक झाल्यामुळे अशा व्यक्ती extrovert किंवा introvert होतात. Extrovert व्यक्ती बाह्य संस्कारांमुळे व्यक्त होताना open minded, हजरजबाबी, आणि आक्रमक होत असतात. तर introvert व्यक्ती फारश्या बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, सतत विचार करीत राहतात, कुढत राहतात आणि काही वेळा,apparent or latent or hidden मनोरुग्ण होतात.
               साहित्यिक व कलेच्या क्षेत्रातील लोक संवेदनशील, सर्जनशील आणि सृजनशील असतात. त्यांच्यावर समाजशील माणूस म्हणून आणि व्यक्ती म्हणून दोन्ही अस्तित्वाचा प्रभाव असतो. त्यांची जडणघडण इतर लोकांप्रमाणे होत असते. त्यांच्यावरही परंपरा, संस्कृती, इ इ वरील मानवी मनाच्या व बुद्धीच्या रचनांचा प्रभाव असतो. त्यामुळे, आशा-निराशा, सुख-दुख: इ द्वंद्वे, पारंपारिक आचार-विचार इ चे  परिणाम त्यांच्यावर ही होत असतात. साहित्यिक व कलावंत ह्या सर्व परिणामांचा, द्वंद्वात्मक जगाचा, आणि स्वत:चा भावनात्मक अर्थ लावू शकतो. ही अर्थ लावण्याची त्याची क्षमता किती सखोल, सदृढ, जाणीवेच्या-नेणीवेच्या पातळीवर स्थिर-अस्थिर असते, आणि ह्या क्षमता शब्द, चित्र, शिल्प इ माध्यमातून तो कसा मांडू शकतो....ह्यावर त्याची प्रतिभावंत प्रज्ञा विकसित होत असते.