Friday, 1 June 2018

विंदा- रक्तसमाधी


रक्तसमाधी:
विचार-वाचन-व्याख्यानांनी होऊन वेडे आपण
खेडे शोधत गेलो;
आणि शेवट आलो धावत जेथे
आकाश निळे वरती;
आपण भूमीवरती;
हिरवळ आपुल्या भोवती;
आणिक देवीच्या राईतिल पक्षी कुजबुज करिती.

आतुरतेने संकल्प होऊन आलिस तू मग जवळी
आणिक त्या वेळी ! त्या अद्भुत काली !
अर्धोन्मीलित काळ्या डोळ्यांतुनिया
त्याहुन काळी उफाळली मग ज्वाळा;
गाल बोलले; नेत्र बोलले; ओठ बोलले; एकच माला...माला

केस तुझे सुटलेले पाठीवरती;
उभारलेले स्तन टवटवते पुढती;
आणिक त्या उन्मादक
भरिव नितंबाच्या भवतीच्या नीटस रेषा मोहक;
नितंब गोरे, मृदुल, गोल नी मांसल;
मस्त, पुष्ट, मादक मांड्या थरथरती;
विवस्त्र झालेली तव कंबर माझ्या पुढती झुलती.

हृदयाशी घट्ट घेउनी आवळताना तुजला
देह जाहला घामाने ओला;
तीव्र, गूढ नि:श्वसने
गाउ लागली अनंत अपुरे गाणे;
मृत्युतुनही अमर लागले होऊ;
जीवाजिवांच्या तारा सा-या जुळल्या;
संगितलहरी उठल्या रुधिरामधुनी;
जुन्या काळची नव्या सुरातुन गाउ लागलो गाणी;
तुझ्यात गेलो, विरलो; आणिक मेलो;
मजला पाजुन, तुजला गिळलो; प्यालो;
मीपण गेले; तूपण आले...आले.
जीवन संगित झाले, जीवन प्याले !

अव्यक्ताला व्यक्त करण्यासाठी
अद्वैतातच विरल्या सा-या गाठी;
विसरुनी गेलो अद्वैतातच मीपण,
स्वत्त्वाचे संरक्षण;
आणि त्या आत्यंतिक अद्भुत वेळी
दिक्कालाची बेडी भंगून गेली.
रक्तसमाधित दिव्य रवाने वदलो जेव्हा दोघे
तू- “ये...ये ...”, मी- “ घे....घे....”
रक्तसमाधी लागुन विरली माया;
रक्तातुनिया रक्त मिसळले जीवन पुढती न्याया !
-    विंदा

एक काळ होता, जेव्हा ओशो “ संभोगातून समाधीकडे” ह्या विषयावर बोलले, तेव्हा त्यांच्यावर टीकेचे आसूड वगैरे ओढले गेले. ह्याच सुमारास विंदा रक्त समाधी प्रसिद्ध करून राहिले होते.
     मराठी साहित्यात विशेषत: कथा, कादंबरी इ.... ह्यातून वैयक्तिक विचार करण्यास लावण्याच्या स्वातंत्र्यावर समाजाने एक तर दुर्लक्ष करण्याची किंवा सहानुभूतीची भूमिका घेतली आहे. आजही अश्लील नव्हे...किंबहुना अश्लील कशाला म्हणायचे, ह्यावर चर्चा, वादंग चालू आहेतच.
       विंदांची ही कविता ह्या सा-या चर्चांना कदाचित उत्तर ठरावे, इतकी धाडसी रचना आहे. ह्या रचनेला कविता म्हणायचे तर समीक्षक किंवा आस्वादक म्हणून जे निकष मी लावीन ते इतर समीक्षक लावतीलच, असं नाही. प्रश्न ही कविता आहे की नाही हा नसून रक्त समाधी मध्ये मांडलेला विषय काय आहे, हे प्रथम समजून घेणे योग्य आहे.
       विंदांच्या कवितेत तर्काधिष्ठता हा नेहमीच वादग्रस्त प्रश्न राहिलेला आहे. ह्या कवितेत तर्काने काही जाणलेलं नाहीयेय. प्रत्येक माणसामध्ये एक आत्मतत्व असतं. ते आदीम संस्कृती पासून संभोग हे राहिलेलं आहे. म्हणूनच रक्तसमाधीची सुरुवात विचार-चिंतन-व्याख्यानांनी वेडे झालेल्या आपण ने होते. मग निसर्गाच्या सान्निध्यात निळे आकाश, हिरवळ, पक्षांची कुजबुज आहे. ह्यातून विंदांनी एक प्रतिमा निर्मिती साधली आहे. आपण भूमीवरती ह्या वास्तवाच्या संकल्प योजनेतून विंदा निसर्गाचे आणि भूमी म्हणजे पृथ्वीचे नाते सूचित करीत आहेत. निसर्ग हा पुरुष आणि पृथ्वी ही स्त्री हा संकेत ते करीत आहेत; आणि त्याचवेळी “आपण भूमीवरती” ह्या वास्तवाचे भान राखून मनुष्य मात्र वेडा आहे, हे मार्मिकपणे मांडत आहेत. आणखी एक शब्द आहे: देवीच्या राईतिल देवी देवळात असते. पण विंदांची देवी ज्या राईत म्हणजे राऊळीत म्हणजे गावात आहे, तेथील पक्षी कुजबुज करून संकेत देत आहेत, पुढील कडव्यात येणा-या अद्भुत काळाचा म्हणजे घटिकेचा ! माला ही स्त्री आहे, तिच्या मागे लागलेला उन्माद...कसा आहे...विंदा म्हणतात, “ अर्धोन्मीलित काळ्या डोळ्यातून....” हा आहे काळा डोह म्हणजे वासनेचा डंख आहे. तो तिला भेटतो. हे वर्णन म्हणजे विंदांचा शृंगार प्रगट करण्याचा एक झपाटा आहे, झंझावात आहे.....त्या झपाट्याचा उत्तरार्ध मात्र काहीसा शांत होताना तीव्र आहे पण गूढतेच्या नि:श्वसनात मग्न झाला आहे.
          ह्या पुढील वर्णन संभोगा नंतर जी एक अवस्था निर्माण होते, ती मांडताना विंदा भावूक होत नाहीत, माणसाच्या आत्मतत्वाच्या निष्ठा शोधू लागतात. म्हणून ते म्हणतात, “ मीपण गेले, तूपण आले...आले ”. ह्या तूपणाची “आले..आले” ही प्रतिध्वनीत्व प्रतिमा “ माला...माला “ ह्या अभिव्यक्तीच्या टोकाशी आहे.....संकेत हा आहे की पुरुष हा स्त्री मध्ये विरून जातो...ध्वनीच्या मागून प्रतिध्वनी विरून जावा तसा.....हीच प्रतिमा विंदा   तिस-यादा वापरतात, : तू “ ये...ये “ आणि मी “ घे...घे “ ह्या समारोपात. पुरुष स्त्री तत्वात विलीन होत असतो. शिवाची पिंड हे ह्या तत्वाचे प्रतिक आहे. स्त्रीचे जननेन्द्रिय खोल आहे तर पुरुषाचे त्या सखोलपणात शिरून स्वत:ला समर्पित करणारे इंद्रिय आहे.
        द्वैत-अद्वैत किंवा व्यक्त-अव्यक्त ह्या शब्दांच्या प्रतिमा अध्यात्मिक असून संभोगाच्या अनुभवाशी समाधी हे नाते किती सुसंगत आहे. हे स्पष्ट करण्याचा विंदांचा प्रयत्न आहे. “ दिक्कालाची बेडी भंगून गेली.” आणि        “ रक्तातुनिया रक्त मिसळले जीवन पुढती न्याया “ हा अनुभव वास्तव पातळीवर समजून घेता येतो. गर्भ निर्मितीचा क्षण हा पुरुष-स्त्री ह्याच्या रक्तमय स्त्रावातून होत असतो. हे विज्ञान विंदा काव्यात्म पद्धतीने मांडतात.
             ओशोंनी जो अध्यात्मिक सिद्धांत मांडला आहे, तोच काव्यात्म पद्धतीने विंदांनी मांडला आहे. संभोगातील पुरुष-स्त्री ह्यांचे सख्खलन ज्या अतिउच्च बिंदूला, climax ला , क्षणाला होते, त्या क्षणाला त्या दोघांच्या मीलनातून गर्भ निर्मितीची प्रक्रिया सुरु होत असते. तो क्षण म्हणजे त्या गर्भाचा शून्य 0 काळ असतो. त्या 0 क्षणापासून टप्प्याटप्प्याने जीव विकसित होऊन ९ महिन्यांनी जन्म पावतो. ही शून्यावस्था म्हणजेच समाधी होय. हा जीव निर्मितीचा क्षण असतो. त्या जीवाची कालगणना त्या क्षणापासून सुरु होते. आणि ही अवस्था ज्या दोघांच्या म्हणजे ज्या द्वैतातून घडते व गर्भ किंवा जीव ह्या अद्वैतातून विराम पावते......त्या अवस्थेला वैज्ञानिक सत्याचे अन्वेषण म्हणजे काव्यात्म न्याय विंदांनी रक्तसमाधी ह्या रचनेद्वारा दिला आहे.
                 ***************

विंदा - निळा पक्षी


निळा पक्षी
निळा पक्षी    काही केल्या
निळा पक्षी    जात नाही.

प्रकाशाचे     पंख सान
निळी चोच   निळी मान;
निळे डोळे   निळी चाल
निळा ढंग;   त्याने चढे
आकाशाला   निळा रंग.

असली ही   जात न्यारी
बसे माझ्या  बिम्बावरी;
पृथ्वीवरी;   पृथ्वीमध्ये
पाळे खोल;  तरीसुद्धा
जाई तोल;  ....अनंताचा
खड्डा खोल.

तर्काच्या या गोफणीने
फेकीतसे काही जड;
आणि पाने आघाताने
करतात तडफड;
टिकाळीला निळा पक्षी
जसा धड  तसा धड;
...उंच जागा अवघड.

याचे गान  याचे गान
अमृताची  जणू सुई;
पांघरूण  घेतो जाड,
तरी टोचे;

झोप नाही. मेलेल्याला;
जागृतांना  करी घाई.
याचे गान  याचे गान
स्वरालाच  नुरे भान.
नाही तार  नाही मंद्र;
....चोचीमध्ये धरी चंद्र.

काही केल्या   काही केल्या
निळा पक्षी   जात नाही.

-विंदा.

विंदांच्या आणि नारायण सुर्वेंच्या कवितांनी विद्रोही भाव -भावनांना अभिजात दर्जा दिला. तोपर्यंत विद्रोह ही एक चळवळ मानण्या इतपतच कवितेकडे पाहिले जात होते. विंदांच्या कवितांचे आगळेपण मराठी साहित्याने मुख्यत: नमूद करून घेतले आहे, ते त्यांच्या विसंगतीतून सुसंगती शोधून सत्याच्या विविध अंगांची तपासणी करण्याच्या विंदांच्या मुलभूत प्रवृत्तीमुळे. विंदा बुद्धिवादी आहेत, नास्तिकत्वाकडे त्यांचा ओढ आहे. पण त्यांचा पिंड आत्म निष्ठेचा असल्यामुळे अध्यात्मिक तत्वज्ञान त्यांच्या कवितेतून डोकावत राहते. आत्मतत्वाची तार्किक सुसंगती न सापडल्याने ते व्यथित होतात.
            निळा पक्षी मध्ये “ असली ही जात न्यारी, बसे माझ्या निम्बावरी, पृथ्वीवरी | पृथ्वीमध्ये पाळे खोल, तरी सुद्धा जाई तोल.....अनंताचा खोल खड्डा.” माझं निळा पक्षी हे त्यांच्या अतींद्रिय अनुभवाचे प्रतिक आहे.....पृथ्वी हे आत्मविश्व आहे....ह्या विश्वात्म संवेदनेला निळा पक्षी अनंताच्या खोल गाभा-यात विंदांना घेऊन जातो. तेव्हा त्यांना आढळते, गूढ गर्भित विवर. इथे विंदांची विज्ञान निष्ठा निळ्या पक्ष्याला घेऊन जाते black hole ह्या संकल्पनेत. विंदांची प्रतिभा एकाच ठिकाणी कधी स्थिर नसते. ते एकाच अनुभवाच्या परिप्रेक्षात साहित्याचे, विज्ञानाचे आणि त्यांच्या आत्म प्रज्ञेचे विविध संस्कार प्रगट करते.
        निळा पक्षी हे खर तर एक प्रहसन आहे. “ तर्काच्या या गोफणीने फेकीतसे काही जड “ अशा आविर्भावाने मध्ये व्यक्त होते. मग विचारांची आंदोलने आविष्कृत होतात, “ आणि पाने आघाताने करतात तडफड.” तरीही वास्तवाचे भान न सुटल्यामुळे “ ...उंच जागा, अवघड “ हे ही त्यांना एका ‘टिकाळीला’ बसल्यावर कळते. पण तिथेही हा निळा पक्षी गातो... त्यांचे गान   “ अमृताची जणू सुई “ आणि “ पांघरूण घेतो जाड, तरी टोचे.” पक्ष्याचे गाणे ऐकताना विंदांची प्रतिभा शांत नाही....त्या गाण्यातील अमृताची गोडी त्यांना चाखता येत नसल्याने ते गाणे सुई सारखे टोचते. कान बंद केले तरी टोचत राहते. ही विद्रोही कवीची व्यथा आहे. विंदा एकाच अनुभवात रमत नाहीत, त्यांना वास्तवाची प्रखर जाणीव सतत अस्वस्थ करत राहते. म्हणून ते म्हणतात, “ झोप नाही. जागविते मेलेल्याला; जाग्रुतांना करी घाई. “ निळ्याचे गान कसे आहे...कवीचा थंड, गाढ झोपी गेलेला आत्मा जागविणारे आहे आणि  जागेपणात उठून उड्डाण करण्यास प्रवृत्त करणारे आहे. कारण ह्याच्या गाण्यात सुरांचेही भान हरपते ! ह्याच्या सुरांना मंद्र सप्तकाचा आधार नाही की तार सप्तकाची धार ! चोचीमध्ये चंद्र घेऊन उडणारा हा आहे, विंदांचा आशावाद.
           अखेरीस हा निळा पक्षी आहे तरी कोण ? अतींद्रिय अनुभवांना कवेत घेऊन माणसाच्या जगण्याचा शोध घेणारा हा आहे विंदांचा परमात्मा. आत्म निष्ठेच्या पंखांचे आधार घेऊन माणसाच्या अंतर्यामी परमात्म्याचा शोध घेणारा विंदा हा एक महान प्रतिभावंत आहे.
                ************

नरहर कुरुंदकर -विचार


साहित्य परिषदा व साहित्य संमेलने- नरहर कुरुंदकर विचार
(१)  जन्म- न्या रानडे- १८७८-म फुले व ज्योतिबा निमंत्रित- ज्योतिबा गेले नाहीत. ज्योतिबांचा आक्षेप- सहभागी साहित्यिक वर्ग प्रामाण्यवादी- आजही तीच परिस्थिती- वेगवेगळी संमेलने, परिषदा, बौद्ध, ख्रिश्चन इ ची वेगळी चूल.
(२)   पारंपारिक भारतीय समाज रचना-विषमता आधारित – इंग्रजांनी मात्र सत्ताकाराणासाठी सर्व जाती,धर्म,भाषां संस्कृती इ एकत्र मानले, आणि  राज्यशकट चालविला. साहित्य परिषदांना असा इतिहास नाही. त्यामुळे, साहित्य परिषदांचा कारभार आजही जातीभेद, धर्म इ वर अधिकृत किंवा अनधिकृत चाललेला आहे.
(३)   तरीही स्वातंत्र्या नंतर अनेक बदल घडत आहेत. हे बदल :
(अ)      साहित्य परिषदा परंपरावादी राहिलेल्या नाहीत. काही राहिलेल्या असल्या तरी त्याला साहित्यिक जबाबदार नाहीत. त्याला जबाबदार भोवतालची परिस्थिती होती आणि आहे.
(आ)   साहित्य परिषदांचे उद्देश व कार्य साहित्य संवर्धनाचे, प्रोत्साहनाचे, अभिवृद्धीचे आहे. सामाजिक चळवळ, धर्म-जाती व्यवस्था निर्मुलन किंवा व्यवस्थापन हे त्यांचे कार्य नाही.
(इ)        साहित्य परिषदा सुधारणे हे काम सामाजिक असले तरी ह्या कार्यात असलेल्या साहित्यिकांनीच ते कार्य परिषदेच्या आतून करावयास हरकत नाही. पण त्यामुळे मूळ कार्य आणि उद्देश बाजूला राहता कामा नयेत.
(4) १८५८ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. १८६०-७० ह्या काळात विद्यापीठ अंतर्गत मराठीतून वांग्मय निर्मिती व्हावी, अशी जिद्द दिसते. १८८० नंतर मात्र विद्यापीठात मराठीचे स्थान अवनीत होत गेलेले आहे. पण तरीही मराठी साहित्य निर्मिती व्वृद्धी बहरतच गेली. त्यामुळे लो टिळक आदींच्या जहाल राजकारणा पासून परिषदा वेगळे स्थान टिकवून ठेवू शकल्या. आजही राजकारण फारसे परिषदांमध्ये लुडबुड करताना दिसत नाही. उदघाटना पलीकडे काही फारसे ते करतात असे दिसत नाही !
(५) साहित्य परिषदांनी हाताळलेला दुसरा महत्वाचा प्रश्न शुद्धलेखनाचा आणि भाषा शुद्धीचा. शुद्धलेखनावर खरी जुंपली ती पुरोगामी आणि सनातनी विचारवाद्यांची....त्यातून पारिभाषिक शब्दांची पडलेली भर....आता हे वाद मिटले असून पारिभाषिक शब्दांचा वापर वृत्तपत्रांनी सुटसुटीत केल्याने मराठी भाषा विद्रूप होईल, ही भीती राहीली नाहीयेय. उलट, हे शब्द मराठीचे अभिव्यक्ती सामर्थ्य वाढवीत आहेत.
(६) १९३५ नंतर लोकप्रतिनिधींच्या हातात प्रांतिक आणि १९५२ नंतर राज्यांचा कारभार आला. मुंबईसह महाराष्ट्र ही चळवळ मुख्यत: भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर झाली आणि यशस्वी झाली.
(7) स्वातंत्रोत्तर काळात विद्यापीठातील पदव्या व पद्वुत्तर शिक्षण ह्यातून जो नवीन अध्यापक आणि विद्यार्थी वर्ग निर्माण झाला, त्यांना त्यांची ग्रंथालये व इतर सोयी परिषदांच्या सहभागा शिवाय उपलब्ध झाल्याने त्यांना परिषदांची गरज राहिली नाही. नंतर निर्माण झालेली शासकीय पारितोषिके, पद्मश्री इ बहुमान,अनुदान मंडळे, स्थानिक व दूरदर्शन वाहिन्यांची पारितोषिके इ इ मुळे मराठी साहित्य निर्मिती भरभराठीस इतकी झाली आहे की बहुमान-पारितोषिके इ साठी साहित्य कमी पडू लागले आहे, हे पारितोषिक मिळणा-या साहित्याच्या दर्जा वरून लक्षात येते.
(८) लेखकाच्या मुख्य तीन गरजा असतात- (अ) आपले लिखाण जास्तीत जास्त जनते समोर न्यायचे असते. (ब) त्याला यासाठी प्रकाशकाची गरज असते (क) त्याला आर्थिक फायदा, प्रतिष्ठा, आणि प्रसिद्धी हवी असते. ह्यासाठी तो आर्थिक झीझ ही तो सोसायला तयार असतो. कारण हल्लीचे ९०-९५ टक्के प्रकाशक लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तक छापत असतात.
(९) पैसा व प्रसिद्धी प्राप्त करून अनेक लेखक ग्रंथ,लेख, नाटक, कादंबरी, चित्रपट कथा-पटकथा, दूरदर्शन मालिका इ विविध क्षेत्रात निर्मिती करून, शाळा-कॉलेज भाषणे मधील भाषणे, व्याख्यानमाला,इ उपक्रमांद्वारे प्रसिद्ध होत असल्याने परिषदांचे व्यासपीठ फारसे गरजेचे राहिलेले नाही.
(१०) ख-या विचारवंत, प्रतिभावंत लेखकांची अत्यंत महत्वाची गरज असते.....जाणकार,समीक्षक,सुविज्ञ अधिकारी व्यक्तींकडून तपासणी व्हावी, मान्यता प्राप्त साहित्यिकांनी आपल्या लिखाणाचे गुणग्रहण करावे....याची नशा हजार मंडळींनी वाजविलेल्या किंवा वाजवून घेतलेल्या टाळ्यांपेक्षा निराळी-और असते. असा गुणग्राहक वर्ग दिवसेंदिवस मर्यादित होत चालला आहे. ह्या बाबतीत साहित्य परिषदांकडून खूप अपेक्षा आहेत. पण परिषदाही सन्मान प्राप्त, प्रसिद्ध साहित्यिकांचे कार्यक्रम करण्यात, गर्दी जमविण्यात समाधान मानू लागल्या आहेत.
(११) हल्ली अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष निवडणुकी वरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. त्यातील एक “ साहित्यिक कोणाला म्हणायचं “ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. या वादाचे प्रथम दर्शनी दिसते, तितके सोपे, साधे व सरळ नाही !कारण भाषा आणि वांगमय हा व्यवहार गुंतागुंतीचा आहे. मतदान म्हणल्यावर त्याची गणिते, आर्थिक उलाढाल, मतांची पळवापळव, मतपेट्या manage करणे इ सर्व व्यवहार-गैर व्यवहार अपरिहार्य होतात. त्यामुळे सभासद कोणाला व कसे निवडून देतात, हे फार मोठे गुपित राहिलेलं नाहीयेय.
(१२) शेवटचा व महत्वाचा मुद्दा हा की साहित्य परिषदे सारख्या संघटना साहित्यावर प्रेम करणा-यासाठी आहेत की साहित्यिकांसाठी आहेत? जर साहित्यावर प्रेम करणा-याच्या असतील तर परिषदांमध्ये विद्वान मान्यतेपेक्षा लोकमान्यता मान्य केली पाहिजे. लोकानुरंजन झाले पाहिजे, मतदान झाले पाहिजे.इ.इ. पण लोकमान्यता ही मोठी निर्दोष बाब आहे, असे नाही. त्याचप्रमाणे, प्रतिभावंत साहित्यिक सुद्धा मत्सरग्रस्त, मान, मानधन,आग्रह आणि पाहुणचार ह्यामध्ये अडकलेले नसतात, असे नाही.
(१३) थोडक्यात, गेली ६०-७० वर्षे परिषदांचा कारभार ज्या पद्धतीने चालतो, त्या पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. त्यांना आपला कायापालट करताना वान्गमयीन व्यवहारात आपल्या संघटनेचे स्थान काय असावे, हे निश्चित केले पाहिजे. परंपरागत दृष्टी आणि दृष्टीकोन सोडून त्यांनी हे निश्चितपणे जाणून घेतले पाहिजे की साहित्य परिषदा स्पर्धक नसतात. त्या उपकारक असतात. तसेच, कलेसाठी कलावाद किंवा जीवनसाठी कला अशा लढाया करून परिषदा चालविता येणार नाहीत. परिषदांची मुखपत्रे व त्यांची संपादक मंडळे ह्यांनी मुखपत्र हे साहित्य सेवेसाठी आहे, हे सूत्र बांधून घेतले पाहिजे आणि लोकप्रियता ह्या निकषा पासून दूर राहिले पाहिजे.
(१४) निरनिराळे साहित्य प्रकार अभ्यासू वृत्तीने परिषदांनी हाताळले पाहिजेत. उदा. शोकांतिका, कॉमेडी ह्या किंवा इतर वांगमय प्रकारांची सखोल अभ्यासने चालविली पाहिजेत. प्राचीन वान्गमयातील श्रेष्ठ साहित्यमूल्यांचा अभ्यास अजूनही मर्यादित आहे. विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या नियोजनात परिषदा भरीव कार्य करू शकतात.
(१५) सारांश रूपाने असे म्हणता येते की सर्वसंग्राहक असणे आणि सर्व इष्ट बाबींना उपकारक होणे, या दोन पद्धतींच्या आधारेच परिषदांची नवी मांडणी होऊ शकेल.
                     **************    

Monday, 7 May 2018

नैराश्य Depression

Depression हा शब्द नसून एक संज्ञा आहे. इथे आपण मराठीत चर्चा करताना depression चा विचार वैद्यकीय दृष्टीकोनातून, एक रोग किंवा रुग्णावस्था ह्या संदर्भात करणार आहोत.
          मी स्वत: ह्या अवस्थेमधून गेलेलो असल्यामुळे व माझा चिकित्सक स्वभाव असल्याने मी ह्या अवस्थेवर खूप वाचन केले, माझ्या अवस्थेबद्दल त्यावरून चिंतन केले व नंतर अनेकदा लेखन करताना मनन केले आहे.
            प्रथम आपण हे समजावून घेऊ की ह्या अवस्थेचे अनेक पैलू किंवा अंगे आहेत. नैराश्य हे मुख्य अंग आहे तर विषण्णता, खिन्नता, औदासिन्य किंवा उदासीनता ही ह्याच अवस्थेची इतर अंगे आहेत.
           निराशा ह्या शब्दांगापासून नैराश्य हे अर्थांग तयार झाले आहे. निराशा अनेक कारणांमुळे येत असते किंबहुना आयुष्य हा आशा-निराशा ह्यांचा खेळ असतो. हे सर्व अतिशय सामान्य आहे, कारण आशा-निराशा ह्या तत्कालीन, निश्चित कारणोद्भव असतात आणि ह्या अवस्था नसतात. सामान्य माणसाच्या ह्या भाव-भावना असतात. आशा-निराशा ह्या जगणे ह्या अवस्थेचे संवेदनात्मक, सजीव आणि संजीवन असे परिमाण आहे. ह्या अर्थाने विषण्णता विषय (objective) संबंधित आहे. खिन्नता खेद म्हणजे दुख:, वाईट वाटणे, ह्या भावना (Emotional) संबंधित आहे. तर उदासीनता तटस्थ, अलिप्त, संवेदनाक्षम पण अंतर राखून असणे ह्या ऐहिक व वैयक्तिक (subjective) बाबी आहेत. पण ह्या सर्वांच्या मुळाशी निराशा ही सर्वसामान्य अभिव्यक्ती आहे आणि तिचा परिप्रेक्ष निरनिराळ्या पातळ्यांवर अभिव्यक्त होत असतो.
 ह्या पातळ्या पुढील प्रमाणे आहेत-
 (१) नैसर्गिक नैराश्य ( Natural depression)-काही काळापुरते म्हणजे ४८ तासांपेक्षा कमी काळ टिकणारे असते.
(2) तपासणी सिद्ध नैराश्य (Clinical depression)- नैसर्गिक नैराश्य ४८ तासांपेक्षा जास्त व सातत्याने जाणवत राहते. ह्या अवस्थेमध्ये भीती, एक प्रकारचे गूढ भय -भूतकाळातील किंवा भविष्यातील - जाणवत राहते. हे भय निराकार म्हणजे abstract स्वरूपाचे असते. जे भय किंवा भीती सामान्य माणसाला जाणवत नाही, पण रुग्णावस्थेतील माणसाला जाणवत राहते. कित्येकदा रुग्णाला भयग्रस्त किंवा भीतीग्रस्त करणारे कारण अत्यंत साधे, सामान्य व्यवहारातले असते. पण त्या भयाची अकारण तीव्रता रुग्ण व्यक्तीलाच ग्रासून टाकते. त्यामुळे सदर व्यक्ती स्वत;ला असुरक्षित (Insecure) मानते व आपले शरीर,मन आणि कार्यक्षमता गमावून बसते. ही मनोरुग्णावस्था clinical intervention म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी अत्यावश्यक असते.
(३) नैराश्यग्रस्त हालचाली/ व्यवहार (Depressive disorders)- काही रुग्णांमध्ये सतत विशिष्ट प्रकारच्या हालचाली, हावभाव किंवा व्यवहार करण्याच्या पद्धती स्पष्टपणे किंवा ठळकपणे दिसून येतात. असे रुग्ण वेडाच्या पातळीवर केव्हाही, कधीही जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दखल करणे, त्य रुग्णासह सर्वांच्या हिताचे असते.
                   नैराश्य म्हणजे नक्की  काय ह्याचे विस्तृत उत्तर मानसशास्त्राच्या ग्रंथांत उपलब्ध आहे. तसेच वर दिलेल्या विवेचनावरून हे स्पष्ट होते की नैराश्य ही एक अवस्था असून त्यामुळे सदर व्यक्ती सर्वच बाबतीत नकारात्मक होते. तिच्या भावना, कृतीजन्य हालचाली आणि विचार असमाधानपूर्ण असतात. ही व्यक्ती न्यूनगंडग्रस्त , भयगंडग्रस्त आणि अस्वस्थ असते. तरीही काही जणाची बौद्धिक, वैचारिक आणि व्यवहारिक पातळी सामान्य दिसते किंवा भासते. कारण ही रुग्णावस्था प्राथमिक स्वरुपात असते. पण ह्या प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार (clinical treatment) व उपचार पद्धती (counselling / therapy) अनुसरली गेली नाही, तर ही अवस्था विकोपाला जाऊन रुग्ण वेडा (insane) किंवा वेडसर ( distressed sanity) होऊ शकतो.
              नैराश्याची लक्षणे -
(१) भूक मंदावणे (2) वजन कमी होणे किंवा वाढणे.(३) खूप झोप येणे किंवा न येणे (४) अशक्तपणा आणि दुर्बलता (Loss of energy or increased fatigue-ness).(5) आयुष्य किंवा जगणे निरर्थक, बेचव वाटणे.(६) अकारण अपराधीपण (7) विचार करणे, एकाग्रतेने ऐकणे,आणि निर्णय घेणे, ह्यामध्ये अडथळा येणे, सुसंगती न लागणे. (८) आत्महत्या किंवा मृत्यूबद्दल सारखा विचार करणे.
         ह्यातील एक किंवा अधिक लक्षणे 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहणे किंवा दिसत असतील तर नैराश्य ह्या रोगाची किंवा व्याधीची सुरुवात झालेली आहे, असे मानता येते. मात्र आणि अर्थात, मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरचे मत हे अधिकृत असते व तेच अंतिम समजायचे असते.
         ह्याशिवाय, काही इतर वैद्यकीय कारणे उदा. थायरोईड, मेंदूतील गाठ, आणि व्हीटामिन्सची कमतरता ही करणे सुद्धा नैराश्य सूचक लक्षणे दर्शवित असतात. ती नाहीत ना,ह्याची खात्री करून घ्यावी लागते.तसेच, हे लक्षात घेतले पाहिजे की एका पाहणीनुसार, १६% लोक नैराश्याचे रुग्ण आहेत आणि ३३% स्त्रीयांना ह्या रोगाची बाधा झालेली आहे.
                 दुख:असणं किंवा असमाधानी असणं म्हणजे नैराश्य नव्हे. तसेच, अकस्मात घडलेल्या धक्क्यामुळे (trauma) झालेला आघात आणि त्यामुळे आलेले नैराश्य हा रोग नाही.
                नैराश्य हा विकार जडण्याची काही शास्त्रीय कारणे-
(1) मेंदूतील काही विशिष्ट जीव-रासायनिक द्रव्ये किंवा थायरोईड ग्रंथीतील थायरोकझिन हा स्त्राव  अधिक प्रमाणात स्त्रवण होणे.
(2)अनुवांशिकता- काही विशिष्ट प्रकारच्या जनुकांमध्ये विपरीत बदल घडणे. ही जनुके मेंदूचे कार्य नियंत्रित करीत असतात.
(३) काही व्यक्तींचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व नकारात्मक, सतत काळजी करणारा, मनाविरुद्ध घडणा-या गोष्टींमुळे अस्वस्थ होऊन ताणतणाव सहन करणारा किंवा परिस्थिती आणि सभोवताल ह्या बद्दल खूप चिंतीत असणारा स्वभाव.
(४) सातत्याने सभोवताली घडणारे अन्याय, अत्याचार, असमाधानकारक गोष्टी ह्यामुळे स्वत:ची प्रतिमा सांभाळू न शकणारा स्वभाव.
                            ह्या वरील कारणांवरून असे दिसते की नैराश्य ही अवस्था भौतिक कारणांपेक्षा मानसिक कारणांमुळे जास्त संभाव्य असते. त्याप्रमाणे, पुढील उपचार करता येतात-
(१) थायरोईड ह्या ग्रंथीच्या अयोग्य कार्यामुळे नैराश्य येऊ शकते, म्हणून ह्या ग्रंथीची Radio isotopic उपकरणे वापरून काटेकोर तपासणी करणे, आवश्यक आहे.
(2) ह्याखेरीज, रुग्णाची सांस्कृतिक आणि कौटुंबिक जडणघडण तपासली पाहिजे. ह्या कारणांची मीमांसा तज्ञ मानस शास्त्रज्ञाने करणे, आवश्यक आहे.
(३) मेंदूच्या सुलभ कार्य करण्यासाठी antidepressant drugs तज्ञ डॉक्टर वापरतात.
(४) Cognitive Behavioural Therapy (CBT) ही उपचार पद्धती काही तज्ञ वापरतात.त्यामुळे वागणूक, वर्तणूक, विचार पद्धती मध्ये काही चांगले बदल होऊ शकतात.

(५) नैराश्याचा खूप त्रास म्हणजे हालचाली, तोल सांभाळणे इ वर होत असेल तर Electroconvulsive Therapy (ECT) is a medical treatment most commonly used for patients with severe major depression or bipolar disorder who have not responded to other treatments. It involves a brief electrical stimulation of the brain while the patient is under anesthesia. A patient typically receives ECT two to three times a week for a total of six to 12 treatments. ECT has been used since the 1940s, and many years of research have led to major improvements. It is usually managed by a team of trained medical professionals including a psychiatrist, an anesthesiologist and a nurse or physician assistant.

(6) For many people, regular exercise helps create positive feeling and improve mood. Getting enough quality sleep on a regular basis, eating a healthy diet and avoiding alcohol (a depressant) can also help reduce symptoms of depression.

             शेवटच्या दोन उपायांचे भाषांतर टाळले आहे. कारण अनेक वैद्यकीय शब्द आहेत, जे पारिभाषिक असल्याने भाषांतर बोजड होईल. 
             ओशोंच्या मते " नैराश्य म्हणजे तुमच्यात कसला तरी राग, क्रोध नकारात्मक स्थितीत दडून बसला आहे." त्यांच्या मते नैराश्य म्हणजे क्रोध, राग. खरी समस्या क्रोध आणि उपाय योजना नैराश्यावर....हे म्हणजे सावल्यांशी लढल्यासारखे झाले ! "
               आता माझा अनुभव. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्या आपल्या मुलभूत जगण्याच्या प्रेरणांना उखडून टाकतात. नुसता आदर्शवाद नव्हे तर जीवनाची मुलभूत चाकोरीच उध्वस्त करतात. प्रामाणिकपणा ही माझी नुसती श्रद्धा नाहीतर जगण्याचे एक सूत्र आहे. उदा. प्रामाणिकपणा व सत्य निष्ठा. ह्या माझ्या गेल्या ६७ वर्षे जपलेल्या नैतिक आधारभूत जीवनेच्छा आहेत. ज्यावेळी वास्तवात ह्या निष्ठा असून ही माझ्यावर गुन्हेगारीचे आरोप ठेवून माझ्यावर खोटी, अप्रामाणिक आणि भ्रष्टचारयुक्त कारवाई झाली, तेव्हा मला जबदस्त धक्का बसलो. पण त्यावेळी माझ्या अंगभूत मानसिक शक्तीच्या जोरावर मी सर्व सहन केले. कालांतराने मात्र हा मनाच्या तळाशी गेलेला धक्का अचानक उसळी मारून, ज्व्लामुखीसारखा उद्रेक पावला. त्यामुळे मी कामावर असताना माझी बुद्धी, कार्यक्षमता अवगुंठीत होऊन जाऊ लागली. मी एकदम blank, शून्य होऊ लागलो. काहीच आठवत नाही, सुचत नाही, हातपाय गळून गेले आहेत....अशी अवस्था होऊन जायची. मग मी कामावरून घरी परत येत असे आणि सतत झोपून जात असे. अर्धवट जागेपण अनेकदा जाणवत असे आणि पूर्वी घडून गेलेल्या घटनांची काल्पनिक भीती स्वप्नवत माझ्या मनांत घिरट्या घालू लागत असे.
           मनोविकार तज्ञांच्या सल्याप्रमाणे औधधे घेतल्यावर थोडे बरे वाटल्यावर कामावर जाऊ लागलो. पण तिथेच पुन्हा असे नैराश्याचे झटके येऊ लागत. मी पुन्हा घरी व औषध पाणी....असे एकून तीन वेळा attacks आले...मग मात्र सलग जवळ जवळ ६ महिने मी मनोविकार तज्ञ डॉक्टरांकडून औषध व्यवस्था आणि counselling घेतले. तेव्हा पूर्ण बरा झालो.
          ह्या माझ्या अवस्थेचे त्यावेळी नाही पण नंतर मी विश्लेषण केले तेव्हा माझ्या लक्षात आले की एखादी घटना घडून जाते. तिला आपण धैर्याने तोंड देतो. पण कालांतराने ज्यावेळी  मन:स्थिती आणि शारीरिक आजार वगैरे मुळे आपल्याला दुर्बलता आलेली असते, तेव्हा जुन्या धक्का देऊन गेलेल्या घटनांमुळे मनाला झालेल्या जखमा, ओरखडे भरून येतात. पण आपले नैसर्गिक बळ जेव्हा इतर मूळ घटनेशी संबंधित नसलेल्या घटना, मानसिक व शारीरिक दुर्बलता ह्यामुळे अशक्त होते, तेव्हा ह्या भूतकाळात गाडलेल्या घटनांचे मानसिक आघात उचल घेतात व नैराश्याचे झटके येऊ लागतात.
                  म्हणून वेळीच मनोविकार तज्ञ डॉक्टरांकडून उपाय योजना केल्या पाहिजेत व counselling करून घेतले पाहिजे. 
                                            ***************
 




                   
               
            

Tuesday, 24 April 2018

मांडुक्य उपनिषद सार-१

मांडुक्य उपनिषद आत्मा म्हणजे काय, ह्याचे निवेदन करताना म्हणते,

                            एकात्मप्रत्ययसारं, प्रपंचोपशमं, शान्तं, शिवं, अद्वैतं |
                            चतुर्थं मन्यन्ते | स आत्मा | स विज्ञेय: ||7 ||
आत्मा कसा आहे तर तो -
(१)  एकात्मप्रत्ययसारं- एकात्मता म्हणजे सर्वत्र एकच भाव, एकच अवस्था आणि एकच गती. आत्मा एकात्म आहे म्हणजेच आत्मतत्व आहे. चराचरात हे आत्मतत्व सामावलेलं आहे. ह्याची जाणींव जेव्हा जीवाला, आपल्याला होते, तेव्हा एकात्म तत्वाचे सार अंतर्मनात उतरते. ह्यालाच ' एकात्मप्रत्ययसार ' म्हणतात.
(2) प्रपंचोपशमं - आत्मा प्रपंचाचा उपशम करतो. प्रपंच म्हणजे जगण्याची धडपड. ह्यात सर्व आले, खाण्याची धडपड, पिण्याची धडपड, सुख मिळविण्याची धडपड, प्रजोत्पत्तीची ( लिंग वासना ) धडपड इ इ.
जग म्हणजे  ' ज ' जन्म आणि ' ग ' म्हणजे गमन = मृत्यू. जन्मापासून मृत्यू पर्यंत जे अस्तित्व रूपाने आपल्या जाणीवेत असते, ते म्हणजे जग. ह्या जाणीव म्हणजे जगण्याची सगळी धडपड आहे. ही जगण्याची धडपड म्हणजे जगण्याची प्रापंचिक अवस्था भ्रामक आहे म्हणून ह्या अवस्थेचा जो अंत म्हणजे उपशम करतो, ती म्हणजे आत्मा होय.
(३) शान्तं- आत्म्याला राग, लोभ, मद, मत्सर इ षड्रिपू, वासना, नसतात.म्हणून तो शांत असतो.
(४) शिवं- शिव म्हणजे कल्याणकारी...आनंददायी. शिव हा आत्म्याचा मनुष्य अवतार म्हणून त्याला परमात्मा म्हणतात. पण मूलतः तोच आत्मा होय.
(५) अद्वैतं - आत्मा निरंतर, संजीवन, निराकार, निर्गुण असून चैतन्यमय आहे. तो अद्वितीय आहे. त्याला दुसरेपण नाही. म्हणजे तो एकमेव, द्वंद्वरहित, द्वंद्वशून्य असा आहे.
                                    आत्मा हे विज्ञान आहे म्हणून त्याला विज्ञेय म्हणाले आहे. आत्मा समजून घेण्यासाठी मांडुक्य ऋषींनी चार भागात निवेंदन केले आहे. पहिल्या भाग - वैश्वानर, दुसरा- तैजस, तिसरा- प्राज्ञ. हे तिन्ही भाग बौद्धिक पातळीवर समजून घेता येतात. पण चौथा भाग मात्र मानून घ्यावा लागतो. कारण हा भाग सर्वस्वी स्वानुभावाचा आहे. अनुभव शिवाय प्रचिती येत नाही आणि प्रचीती शिवाय सिद्धता नाही. म्हणून मांडुक्य म्हणतात, " चतुर्थं मन्यन्ते " चौथा भाग गृहीतक असल्या प्रमाणे मान्य करावा लागतो.
                                                ***************