Saturday, 29 December 2012

आत्मजिज्ञासा

आत्मजिज्ञासा
(१)उपनिषदांमध्ये जीवात्म्याभोवती जी आवरणे आहेत, त्यांना कोष म्हणले आहे.
(अ)अन्नमय कोष-पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये या कोषात येतात. अन्नरसांच्यामुळे त्यांचे पोषण होते व त्यांच्यासहाय्यानेच जीवाचे कार्य चालते.
(ब)प्राणमय कोष-स्थूल शरीरासाठी प्राणवायु अत्यावश्यक असतो. शरीरभर अस्तरासारखा तो सर्व पेशींना व्यापून असतो. त्याच्या अस्तित्वावरच कर्मेंद्रियांचे व पंचेद्रियांचे कार्य चालते.
(क)मनोमय कोष-वरील दोन कोषांपेक्षा हा सूक्ष्म असतो. त्याचे अस्तित्व व जाणीव सदैव आपल्याला कळत-नकळत होत असते. मनुष्यामध्ये व इतर प्राण्यांमध्ये ह्याच्यामुळेच मोठ्ठा फरक आहे. हा कोष सूक्ष्म असल्याने तो मृत्युनंतरही आत्म्याबरोबर प्रवास करीत राहतो. जीवाच्या पार्थिवते नंतरही तो कार्यरत असतो, संकल्प-विकल्पांसह त्याचा प्रवास होत राहतो.
(ड)विज्ञानमय कोष-बुध्दी म्हणजेच हा कोष होय. जीवाचे भौतिक अस्तित्व व भौतिक जीवनाचे अधिष्ठान ह्याच्या आधारावर प्रगत होत असते. ह्याचा प्रवासही मृत्युनंतरही आत्म्याबरोबर होत असतो. भौतिक जीवनाचे श्रेष्ठत्व ह्याच्या आधारेच प्रगट होते.
(इ)आनंदमय कोष-हा सर्व श्रेष्ठ, संपूर्ण सत्वगुण संपन्न अशा जीवाचा आधार असतो. ज्या जीवामध्ये ह्याचे अधिक्य, तो जीव सर्वांत सुखी असतो. सर्व जीवांची धडपड ह्याच्याकरीताच होत असते, पण तो असामान्य कोटीच्या लोकोत्तर माणसांमध्ये आढळतो. कारण हा कोष ज्या मनुष्यामध्ये प्रगट होतो, तो पूर्वजन्माचे अस्तित्व घेऊन प्रगट होत असतो.
(२)माणुस तीन प्रकारांनी घडत असतो:
(१)God made-परमेश्वर निर्मित- नियतीबध्द.
(२)Manmade-मनुष्य निर्मित- कुटुंब, समाज इ घटकांनीबध्द.
(३)Self made-स्व निर्मित- स्वत:च स्वत:ला घडविणारा.
ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्या संतांनी साकल्याने विचार केला करुन त्यांनी असे प्रतिपादित केले आहे की माणूस परमेश्वर निर्मित आहे, तरीही कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा अनेकविध संस्कारांनी त्याला घडविण्याची प्रक्रिया ही परमेश्वर निर्मित आहे. असे असूनही माणसाला स्वत:च स्वत:ला घडविण्यासाठी परमेश्वराने पुरेपूर, भरपूर व आवश्यक एव्हढा वाव ठेवला आहे. कारण माणसाने स्वत:ला स्वत: घडविण्याच्या प्रक्रियेतच परमेश्वराने माणसाला त्याची सृजनशीलता व विकसनशीलता जपण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे व माणसाचा म्हणून माणूसकी ह्या आपल्या स्वत:च्या नात्याचाही गौरव केलेला आहे.
          संतांनी कोणताही निष्कर्ष व निर्णय दिलेला नाही. त्यांनी माणूस ही निसर्गाची, परमेश्वराची सातत्याने, अखंडपणाने चालणारी सृजनाची व विकसनशीलतेची एक सनातन प्रक्रिया आहे, ह्या सत्याचा पुरस्कार केला आहे, उद्घोष केला आहे.
()इश्वराचा खूनअनेक वेळा झाला असेल, नव्हे दररोज पडतो आहे. अस्तित्ववादाने त्याला सेवानिवृत्त केले आहे का? असा प्रश्न पडला तरीही देवापेक्षा देवमाणूस अजूनही अस्तित्वात आहे, ह्यावर वसंत आबाजी डहाके ह्यांचा विश्वास आहे. कारण त्यांचादेवह्या संकल्पनेवर, निसर्गाच्या सृजनशीलतेवर विश्वासच नव्हे, तर त्यांची गाढ श्रध्दा आहे.
                                वेदांचा अर्थ तो आम्हासीच ठावा,
        येरांनी वहावा भार माथा
ह्यातून बाहेर पडून, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या पाऊलखूणा त्यांना दिसतात; पाऊलवाटा दिसू लागतात व ते म्हणतात-
          “आज पुन्हा सूर्य फुलासारखा कोमल वाटतो आहे,
          नुकतीच उमलेली शुभ्र-तांबडी कमळफुलं,
          तुझी आठवण करुन देतात.“
सृजनशीलतेला आवाहन करणे, हा युगायुगांचा धर्म आहे. डहाकेंचा न-नायक ह्या युगाचा युधिष्ठिर होऊ पाहतो. पंचमहाभूतांतून पतमेश्वर प्रगटतो,
     “परोक्षप्रिया: इव हि देवा:“
              एैतरेयोपनिषद १.३.१४
ईश्वराला परो-प्रिया आहे, त्याला पंचमहाभूतांतून प्रगट व्हायला आवडतं.
     वेदांतात “मन“ हा चंद्र आहे तर इंद्रिये तारका आहेत. सूर्याची प्राणशक्ती घेऊन चंद्र-तारका प्रकाशाच्या वाटा दाखवितात.

(४) समाज, कौ़टुंबिक व्यवस्था व नीतिमत्ता इ. सर्व बंधने नव्हे संस्कार ही एक सतत उत्क्रांत होत जाणारी व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थेविरुध्द झगडणारी माणसे प्रत्येक युगात प्रगट होत असतात.माणूस ह्या व्यवस्थेला आव्हान का देतो? किंबहुना ह्या व्यवस्थाच त्याला आवाहन का करीत असतात?
                  प्रत्येक जीवाची स्वत:ची अश्या अनेकानेक व्यावस्था असतात. माझी स्वत:बद्दलची व स्वत:करीता एक अशा वेगवेगळ्या व्यवस्था असतातच पण माझ्या मनोविकास अवस्थाही तद्नुरुप घडत असतात. ह्याचं कारण मुख्य प्रारब्ध होय.
                 प्रत्येक प्राणीमात्राचा गुणधर्म, स्थायीभाव हा त्याच्या त्याच्या identity च्या, स्वामित्वाच्या विकसनशीलतेत असतो. माझा स्वभाव व तद्नुसार माझ्या प्रगट-अप्रगट होणा-या भाव-भावना, क्रिया, कतृत्व इ. सर्व व्यक्त होण्याच्या प्रक्रिया ह्या मला घडवत असतात.
              माणसाची मनोव्यवस्था ही प्रारब्धावर आधारलेली असते, हे मान्य करणे बुध्दीवाद्यांना फार अवघड जाते. त्यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे की माणसाच्या कर्मावरच त्याचे जीवन घडत असते. पण कर्माचे अधिष्ठान मात्र परिस्थितीप्रमाणे बदलत असते. म्हणून त्यांच्यामते कर्माची यशस्विता वा पराजितता परिस्थिती पालटविण्यावर किंवा बदलविण्यावर अवलंबून असते. किंवा असंही म्हणतात की परिस्थितीचा सुयोग्य उपयोग करुन घेणे, हे कर्मावर अवलंबून असते. थोडक्यात काय तर बुध्दीवादी कर्मफलाचा सिध्दांत स्विकारताना परिस्थितीची अनुकुलता वा प्रतिकुलता एवढेच प्रमाण सत्य मानतात. कारण त्यांच्यामते माणूस प्रारब्धाचा गुलाम नाही, तो स्वत: परिस्थिती बदलू शकतो, तिच्या प्रतिकुलतेवर मात करु शकतो. स्वत:ला घडवू शकतो, दुराचरण सोडून सदाचरणी बनू शकतो. ह्याचा अर्थ असा की एखादा माणूस आजारी पडला तर त्याला उपाय म्हणजे आजारी पडू नकोस ! कारण आजारपणाच्या परिस्थितीवर तू मात करु शकतोस !
              पण हे ही सत्य आहे की मनाच्या उर्मी, आज्ञा, अपेक्षा, इ अनेक घटकांनुसार माणूस वागत असतो, त्याचं जीवन घडत असतं. कारण मनाचा ढाचा अनंत जन्मांच्या संस्कारांनी बनलेला असतो व त्यानुसार मन शरीरावर ताबा ठेवून असतं. शरीर हे केवळ साधन आहे. मग नैतिक-अनैतिक, शुभाशुभ, मंगल-अमंगल इ पाप-पुण्याचरणाचा संबंध मनाशी जुळवायचा की बुध्दीनिष्ठ कौटुंबिक, सामाजिक, वैज्ञानिक धारणांशी व संस्कारांशी जोडायचा?
              बुध्दीनिष्ठता व संस्कारनिष्ठता ह्यांचे निरुपण अनेक धर्म-नीतीशास्त्रज्ञांनी वेळोवेळी करुन आपल्याला मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार असे दिसून येते की बुध्दी ही संस्कारक्षमतेच्या विकासातून कार्यप्रवण होत असते. परंतु मनाची संस्कारनिष्ठता मात्र अनंत जन्माचे फळ असते. बुध्दी व मनाच्या भिन्नभिन्न संस्कार आवरणामुळेच मला माझ्या नात्यांचे गुंते सोडविताना असंख्य समस्या भेडसावतात. त्यामध्ये माझे नाते हा तर शाश्वत शोधाचाच नव्हे तर हा माझा वास्तवातीलदेखिल शोध आहे.
(5)मनाचे चित्त हे संस्कारित सूक्ष्म अंग आहे. जीवाची वासनात्मकता चित्ताच्या प्रभावाखाली कार्यशील असते. त्यामुळे बाह्यजगातील सुखोपभोगांकडे जीव सहजपणे आकर्षित राहतो. ह्या चित्ताला बुध्दीच्या व विवेकाच्या अंमलाखाली टेवणे, हे फक्त मनुष्यप्राण्यालाच शक्य आहे. कारण चित्त प्रत्येक प्राणीमात्रात असतेच पण बुध्दी, विवेक ह्या व तद्नुषंगिक सूक्ष्म घटकांच्या अभावामुळे त्यांच्यातील चित्ताची पातळी मर्यादित अशा मनाच्या पातळीपर्यंतच झालेली आहे. प्राण्यांनाही सुख-सुख:, संकटं-भय इ. सर्व भावना असतात पण त्यांचे चित्त त्यापलीकडे विकसित झालेलं नसतं, बुध्दीविकास अत्यंत सीमित असतो. आपण मात्र अत्यंत विकसित झालेलो असलो तरी प्राणिमात्रांचा वारसा सोडू शकलेलो नाही. तेव्हा चित्ताचा विकास ही शंकराचार्यांच्या मते मूलभूत समस्या आहे. त्यांच्या मते माणुसकी ही बुध्दीच्या विकासामुळे एक प्रकारच्या बंधनांत आहे. त्यामुळेच मूढ, विक्षिप्त  आणि क्षिप्त चित्त असे चित्ताचे वर्गीकरण करून मानसशास्त्रीय समस्या सोडविता येतात.

(6) परमेश्वराला ओळखणे खरच कठीण आहे. कारण आपल्याला स्वतःची ओळख पूर्ण नसते; तर द्वैतातील अवताररुपी परमेश्वराची ओळख होणे किती कठीण! म्हणून भगवंतानी म्हणले आहे-
                   अवजानन्ति मा मूढा; मानुषी तनुमाश्रीतम |
                   परम भावम अजनंतो मम भूत महेश्वरम ||
                                                                             (भ.गीता ९.११)
“मी मनुष्यरुपात / प्राणीमात्रात अवतरतो तेव्हा मूढलोक माझा उपहास करतात. सर्व विश्वाचा / चराचराचा मुख्य आधार असे माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत.”
                                                ************
(7) आध्यात्मिक ज्ञान नुसते कामाचे नव्हे. कारण अशा ज्ञानामुळे पांडित्य येते व त्याचाच अहंकार वाढविण्यास उपयोग होतो व गर्विष्ठपणा येतो.म्हणूनच गर्वहरण करण्याच्या युक्ती गजानन महाराज, माणिकप्रभू, साईबाबा,हरिभाऊ महाराज इ. योग्यांनी सांगितलेल्या सदैव लक्षात ठेवल्या पाहिजे. योगसाधनेच्या सहाय्याने सिद्धी प्राप्त होतात. पण त्यांचा उपयोग चमत्कार घडवून आणण्यासाठी केल्याने कीर्ती व प्रसिद्धी मिळून अहंकार व गर्विष्टपणा वाढविण्यात खर्ची पडतो व सिद्धी लोप पावतात. म्हणून अध्यात्माची खरी कसोटी सिद्धीप्राप्ती नंतरच होते.
                   ***************

No comments:

Post a Comment