कथात्म साहित्यप्रकारांचे बदलते परिघक्षेत्र
कथात्म
साहित्यात स्थलकालबध्द अशा एका गृहीत अवकाशात (dimensions) कार्यकारणभावाने परिपूर्ण असा एक अनुभव जिवंत होत असतो. प्रत्येक अनुभवाचे एक विवक्षित
केंद्र असते. त्या केंद्राच्या स्वरुपानुसार भिन्न-भिन्न
अवकाशाचे लेखनप्रकार निर्माण होतात. ते सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे
असतात.
(१) कथा- एककेंद्री जीवनाभुव, मर्यादित अवकाश.
(२) दीर्घकथा- एककेंद्री जीवनाभवाचा उत्क्रांत होत अंतिम टोकाकडे होणारा प्रवास, मोठा
अवकाश. दीर्घकथेचा प्रवास व विकास, कथेच्या तंत्रानेच पण कमी
वेगाने होत असतो.उ.दा. आशा बगे यांची “रुक्मिणी“.
(३) लघुकादंबरी- व्यक्तिनिष्ठ, व्यक्तिकेंद्री जीवनाभवाचा कादंबरीतंत्राने घेतलेला वेघ.
दीर्घकथेहून मोठा अवकाश. आशयक्षेत्र दीर्घकथेपेक्षा अधिक विस्तृत. प्रधान
व्यक्तिरेखेचे जीवन, नातेसंबंध, संघर्ष
यांचा कालपट मोठा असतो. सामाजिक जीवनाला भिडणारे अनुभव विस्तृत असतात. त्यामुळे
स्थळकाळाच्या मिती वाढतात. तसेच, वातावरण,
व्यक्तिरेखा, घटनाप्रसंग, संवाद इ.
अनेक घटकही दीर्घकथेपेक्षा जास्त येतात. उ.दा. श्री.ना.पेंडसे यांची “यशोदा“; व्यंकटेश
माडगूळकरांची “बनगरवाडी“
(४) कादंबरी- बहुकेंद्री, समग्र
जीवनाचा व्यापकतेने वेध घेणारा बहुपेडी अनुभव, लघुकादंबरीपेक्षा विस्तृत, व्यापक
अवकाश.
हे
चारही प्रकार जीवनदर्शनाची स्वतंत्र माध्यमे मानली जातात.
संकल्पना
(concept) ही ज्ञानव्यवहारातील एक संज्ञा आहे. एखाद्या विषयाच्या मांडणीसाठी ती एक
अत्यंत महत्वाची तात्विक बैठक असते. मध्यवर्ती जीवन, त्याभोवती
असणारे नातेसंबंध, त्यातील तणाव, व्यक्तिरेखांचा विकास
हे सारे मोजक्या एैवजात घेऊन लघुकादंबरी चित्रित होत असते. परंतु अनुभवांच्या कक्षा समाजजीवनापर्यंत संक्रमित होणा-या
नसतात. त्या कादंबरीत मात्र सार्थपणे उलगडत जात असतात व त्या अनुभवांच्या माध्यमातून होणारे वाचकाचे भानही विस्तृत व व्यापक करतात.
कोणतीही
नाविन्यता कधीही शून्यतेतून निर्माण होत नसते. परंपरेच्या प्रवाहातच तिचा जन्म होत असतो. तसेच
सामाजिक-सांस्कृतिक स्थितिगतीतून वाङमय-निर्मितीची मूल्ये विकसित होत असतात. त्याचप्रमाणे,
नवीन तयार होणारे आकृतीबंध साहित्याच्या मध्यवर्ती प्रवाहात समाविष्ट होताना त्यांचे प्रायिगिक स्तर, जाणीवपूर्वक विकास पावणारे स्तर, आणि
लोकप्रिय स्तर या तीन पातळ्यांवर विकसित होत असतात.
****************
No comments:
Post a Comment