व्यक्तीस्वातंत्र व उत्क्रांतीवाद-
जगातील साम्यवादाचा अस्त रशियन साम्राज्यवादाच्या
अस्ताबरोबर झाला, असं अनेकजण
मानतात. पण साम्यवाद
हा काही राजकीय सिध्दांत नव्हता व नाहीही. साम्यवाद काय, समाजवाद काय किंवा गांधीवाद काय,
हे सर्व सिध्दांतच नाहीत,
तर ह्या सर्व जीवनपध्दती आहेत व त्यांमधील सर्व जीवनधारणा व जीवनशैलींसह ह्या मानवी जीवनाच्या मूलभूत आधारस्तंभ आहेत.
व्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष ह्या सिध्दांतांनी केला
नसला तरी त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा मात्र निश्चितपणे मांडल्या आहेत.
व्यक्ती स्वातंत्र्याची वेस कुणी व कशी ठरवायची, तसेच ह्या संदर्भात समाजाला व आपल्या स्वत:च्या सामजिक जाणिवांना कुठपासून,
कुठपर्यंत जपायचं,
ही समस्या अनादी काळापासून आपल्याला अंर्तमुख करीत आलेली आहे.
“मी“ आणि “समाजाचा
/ कुटुंबाचा मी“
हा संघर्ष केवळ ऐतिहासिक नाही.
ह्याच्या मुळाशी जीवशास्त्र आहे. हे एडवर्ड विल्सनने पुन्हा दाखवून दिलं आहे. पण सिग्मंड फ्राइडने मानसशास्त्र प्रगत करुन त्याकाळापुरतं सिध्द केलं आहे.
एडवर्ड विल्सन हे हॉर्वर्डमध्ये एमिरेट प्राध्यापक आहेत आणि त्यांना दोनदा पुलीत्झर पारितोषिक मिळाले आहे. त्यांचा शोधनिबंध
“Evolution & inner conflicts” हा मुळातच संपूर्ण वाचावा इतका समृध्द आहे. त्यांच्या सिध्दांताप्रमाणे,
जगात जे जे कांही घडत असते,
ती माणसाचीच गोष्ट असते. ह्या गोष्टी तरंग भरणा-या, तिला वळण देणा-या शक्ती ह्या ऐतिहासिक नसतात तर त्या जैविक असतात. “Selfish Genes” ह्या ग्रंथात जी प्रमेयं मांडली गेली आहेत, तीच एडवर्ड विल्सनने सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्क्रांतीवादाच्या प्रवाहात ज्या अनेक घडामोडी सतत घडत असतात,
त्यामध्ये मानवी मेंदूचा विकास अधिक तीक्ष्ण व सूक्ष्मतेकडे होऊ लागला आहे,
हा विल्सन ह्यांचा मुख्य सिध्दांत आहे आणि हा सिध्दांत साहित्यातून,
विज्ञानातून,
कलांमधून सिध्द होऊ लागला आहे.
त्याचबरोबर भावनेपेक्षा स्मृती व बुध्दी यांना अतोनात महत्व आलेलं आहे, हे ही दिसून येत आहे.
उत्क्रांतीच्या साधारण २० लाख पूर्वी नि:स्वार्थीपणा व परहितदक्षता ह्या गुणांचा उगम झाला, असे मानतात, कारण मनुष्य प्राण्याला टोळ्यांमध्ये,
गटांमध्ये, समुहांमध्ये राहण्याची गरज इतर प्राण्यांप्रमाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य वाटू लागली.
त्याप्रमाणे टोळ्यांमध्ये जगताना,
एकत्रित जीवन जगताना नि:स्वार्थ हवा पण इतर टोळ्यांशी लढताना,
संघर्ष करताना स्वत:च्या टोळीचा, गटाचा स्वार्थ हवा, अशा दोन परस्परांना छेद देणा-या प्रेरणांचा व त्यांचे संवर्धन होणं, अत्यावश्यक झालं.
अशा प्रकारे स्वार्थ व नि:स्वार्थ ह्या परस्पर विरोधी प्रेरणांचा संघर्ष टोळी,
समूह अशा गरजांतून विकास पावत गेला व कुटुंबसंस्थेमध्ये ही झिरपत गेला.
राष्ट्रवाद,
प्रादेशिकवाद,
जातीवाद,
भाषावाद,
धर्मवाद,
आणि अर्थवाद अशा व इतर अनेक संकल्पना मानवी जीवनातच नव्हे तर मनातही साकार झालेल्या आहेत. आज ह्यांच रुप आणि स्वरूप इतकं भीषण, क्रुर-हिंसक, दुष्ट, अणि रौद्र झालं आहे की अतिरेकीवाद, नक्षलवाद इ भयानक समस्यां राजकारण, समाजकारण, अर्थकारण, इ अनेक मानवी जीवनाच्या अंग-प्रत्यंगांना भेडसावत आहेत.
************
No comments:
Post a Comment