प्रकृति-पुरुष
जीवनात प्रत्येकाला ‘काम’ आणि ‘क्रोध’ ह्या महाकाय
शत्रूंशी मुकाबला करावा लागतो. ह्या शत्रूंच्या प्रादुर्भावामुळे ‘भ्रांति’
निर्माण होते. त्यात ‘अहंकार’ ह्या सर्वांवर वरकडी करून सत्यानाश करतो. ह्याखेरीज
भ्रांतिला सहाय्य करण्यासाठी ‘मद’ व ‘मत्सर’ तयारच असतात. ‘माया आणि ‘मोह’ अगदी
दबा धरूनच बसल्यासारखे असतात.
हे
विवेचन अनेक साधू-संतांनी, योग्यांनी, ग्रंथकर्त्यांनी केले आहे. माझ्या दृष्टीने
मात्र माझे अनुभवात्मक विवेचन वेगळे आहे.
सर्वात
महान आहे ‘माया’ कारण तिचे प्रभावक्षेत्र सर्व यच्चयावत प्रनिमात्राना व्यापून
आहे. फक्त ‘समाधी’ अवस्थेतील साधक, योगी ह्याला अपवाद आहेत. कारण जगाचे अस्तित्वच
मुळीमायुने व्याप्त आहे. त्यालुळे जो पर्यंत जीवन आहे; जन्म-मृत्युच्या दरम्यान
प्रवास चालू आहे, तो पर्यंत मायेच्या बंधनातून मुक्ती नाही. समाधी अवस्थेतील
मुक्ती काही काळापुरती मर्यादित असते, कालातीत नसते.
एकदा
मायेचे अस्तित्व मान्य केले की सर्व विकार व शत्रू हे तिचेच आविष्कार असल्याने
मोह,मद,मत्सर ह्यांचा अनुभव जाणीवेच्या कक्षात येतो. ‘मद’ हा एक प्रकारचा स्वभाव
आहे. व्यक्ती सापेक्षतेनुसार, त्या स्वभावात ‘मत्सर’ येतो. तर घटना सापेक्षत्वाने
‘मोह’ येतो. मायेचा प्रभाव जसा अटळ असतो, त्याचप्रमाणे ‘अहंकार’ आपला दिमाख अनेक
प्रकारांनी गाजवीत असतो. मुळात ‘अहंकार’ ही अतिसूक्ष्म अशी स्वत्वाची जाणीव आहे.
ती लोप पावली तर ‘भ्रांति’ होऊन अशा व्यक्तीला सामान्य जीवन जगणेही अशक्य होऊन जाते.
मर्यादित
प्रमाणात ‘अहंकार’ ही माणसाची कर्तृत्वशक्ती तर आहेच पण तिच्यामुळे काही प्रमाणात
‘भ्रांतिला टाळता येते.
शेवटी
राहिले ‘काम’ व ‘क्रोध’. ह्यापैकी क्रोध पूर्णपणे वश करून त्याला आपल्या कह्यात
ठेवता येते. शांत स्वभाव क्रोधाला मारक असतो. पण क्रोधावर अत्यंत बारकाईने व
काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागते. कारण तो आपला बळी कधी घेईल सांगता येत नाही.
‘काम’
हा मानवी जीवनाचा निर्मितीक्षम पाया आहे. त्याच बरोबर कामवासना ही एक उर्जा आहे.
तिच्या प्रभावाखाली केवळ भौतिक सृजन होते, असे नव्हे; तर अनेक सृजनशील व्यक्तिमत्वे
व व्यक्तीत्वांचा विकास घडत असतो व मानव जातीकरिता संवर्धन होत असते. ‘काम’ ही
क्रिडा स्वरुपात व्यक्त होते, पण उर्जा म्हणून तिचे महत्व क्रिडा,कृती व लीला
ह्यापेक्षा महान आहे.
विज्ञानाने
कामवासनेच्या भौतिक सृजनाला पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली आणले आहे. त्यामुळे
कामवासना निर्मित जबाबदाऱ्या, अनारोग्य, कौटुंबिक समस्या, समाजव्यवस्था इ. अनेक
बंधनात्मक अडसर दूर झाले असले तरी नीतिशास्त्र,कुटुंब-पद्धती,वैद्यकीय समस्या इ.
अनेक बंधनांमुळे ‘काम’ ह्या उर्जेवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवले गेले आहे व
ती अनिर्बंध, बेफिकीर,मोकाट न होण्याची काळजी घेतली गेली आहे.
निर्मितीचे
मुलास्त्रोत्र प्रकृति आणि पुरुष आहेत, असे भ.पतंजलीनी व इतर अनेक अध्यात्म
अभ्यासकानीं व योग्यांनी म्हणले आहे. त्यांच्यामते प्रकृति हे स्त्री तत्व आहे व
तिच्यापासून पुरुष ही निर्मिती झाली आहे. म्हणून प्रकृतीचे अस्तित्व पुरुषाशिवाय
असू शकते, पण पुरुष मात्र प्रकृतीशिवाय असू शकत नाही. तरीही प्रकृतीची निर्मिती
कोण करतो, ही समस्या शिल्लक राहते. म्हणून भ. पतंजली व इतर अभ्यासकांनी असे म्हणले
आहे की प्रकृतीची निर्मिती निसर्गाने / परमेश्वराने केली व तिच्यात निर्मितीचा
आविष्कार करण्यासाठी पुरुष तत्व नंतर निर्माण केले.
विज्ञानाने
प्रकृति-पुरुष ह्या संकल्पनेला लिंग देहात्मक स्वरुपात स्वीकारले आहे. पण पुरुष
म्हणजे परमात्मा असे अध्यात्माने मानले आहे. संस्कृत भाषेत पुरुष ह्या शब्दाची
व्याख्या “ पुरं उषति, इति पुरुष:|” अशी केली आहे. ‘उष’ ह्या धातूचा अर्थ जीवन
कंठणे, जाळणे, पीडणे असा आहे. ह्यावरून, जो जीवन कंठतो, प्राणवायूच्या ज्वलन
क्रियेने शरीरात उष्णता निर्माण करतो किंवा ज्या शरीराला भोग भोगताना पीडा
होते.....तो पुरुष होय.
थोडक्यात,
आपले सर्व जीवन व्यवहार चालविणारी शरीरातील शक्ती म्हणजे पुरुष, तोच परमात्मा आहे
कारण तो आपला कर्ता-करविता आहे. पण मायेच्या प्रभावामुळे तो लिंग देहात्मकभावाने
प्रगट होतो. प्रकृति म्हणजे स्त्री. स्त्री हा शब्द ‘स्थिती’ ह्या शब्दापासून बनला
आहे. जे स्थिर आहे ते स्थित आहे, स्थिर आहे, बद्ध आहे. पुरुषाशी बद्ध आहे आणि
सृजनाकरिता स्थिर आहे.
पृकृतीचा
दुसरा अर्थ मूळ स्वभाव. पंच महाभूते व मन-बुद्धी-अहंकार ही मूलतत्वे इ. गुणांनी
निर्मित असा देह व ते ‘स्थित’ या अर्थाशी सुसंगत आहेत. म्हणजे संकल्पना अशी आहे की
पुरुष हा देहधारी परमात्म तत्व आहे, तर स्त्री हे तत्व म्हणजे परमात्वरुपी, माया,
पंचमहाभूते, व मन-बुद्धी-अहंकार ह्या तत्वांना व्यापून असणारा लिंग देह आहे.
***************
No comments:
Post a Comment